Tuesday 28 April 2020

कृतीशील निर्णय

तसं पाहिलं तर मी कमालीचा भित्रा माणूस. आणि भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तसं काही विचित्र घडलं की माझी विचारधारा मृत्युपाशी जाऊन थांबते. पण असला भित्रा स्वभाव असला तरी कृती करायची म्हंटली की ही भीती पळून जाते. करोना चं नाटक चालू झालं तेव्हा मी कंपनीत सांगितलं की " हा व्हायरस आला आहे आणि आपल्या हातात फक्त त्यापासून सावधान राहणं आहे आणि आपल्यामुळे तो दुसऱ्याला होणार नाही हे बघणं आहे. त्यामुळे भीती आहे पण घाबरून काम करणं बंद वगैरे असं करू नका तर त्या भीतीवर मात करण्यासाठी काही कृती शोधा आणि कृतिशील रहा." अर्थात बहुतेकांना ते पटलं नाहीच, काहींनी पटल्यासारखं दाखवलं पण कृती शून्य. अर्थात मला कुणाला कमी लेखायचं नाही आहे कारण या आजाराची व्याप्ती मोठी आहे. तेव्हा हा संदर्भ घेऊन मी  लिहिणार त्यावर विचार नक्की व्हावा असं माझं आवाहन आहे.

व्हायरस जेव्हा आला तेव्हा मी काळजी काय घ्यायची हे लोकांना सांगितलं आणि त्यांना हे ही सांगितलं की लागलं तर मी त्यांची कंपनीत राहायची व्यवस्था करेन. सगळ्यांनी मनातून तो उपाय उडवून लावला. गंमत म्हणजे कंपनी चालू करण्यासाठी शासनाने जी नियमावली आणली, जी प्रत्येकाला प्रत्यक्षात आणायला अवघड आहे, त्यात हा एक नियम आहे की कंपनीने शक्य झाल्यास लोकांची कंपनीत राहायची व्यवस्था करावी.

तो व्हायरस, त्याची काम करण्याची पद्धत लक्षात आल्यावर मी मनातून घाबरलो असलो तरी लॉक डाऊन मध्ये जेव्हा कधी म्हणून गरज म्हणून काम करायची वेळ आली तेव्हा सर्व काळजी घेऊन बाहेर पडलो. हे कुणाला आततायीपणाचं वाटेल. पण चार दिवस आपलं घरच्या अन्नदान कार्यक्रमासाठी, त्यांनतर तीन दिवस कंपनी चालू करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी (हा एक पोस्टचा विषय आहे), मग कंपनीतील अर्जंट काम संपवण्यासाठी दहा दिवस अन त्याबरोबर आपलं घर बरोबर ग्रोसरी किट्स वाटण्यासाठी. या दिवसात एक दिवस त्या नॉन करोना पेशंटला लिफ्ट पण दिली.

जरी घाबरट असलो तरी मी विचार केला:

- जी काही कामं आली  ती "अबाऊव्ह सेल्फ" अशा प्रकारची होती. कारण या कुठल्याही कामात माझा वैयक्तिक स्वार्थ नव्हता.

- व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून मेडिकल स्टाफ काळजी घेतोय आणि दररोज कामावर जातोय तर आपण योग्य ती काळजी घेऊन काम का नाही करू शकत?

- ज्या लोकांची इम्यून सिस्टम चांगली आहे त्यांना हा व्हायरस त्रास देत नाही आणि इम्यून सिस्टम चांगले असण्याचे निकष गेली अनेक वर्षे पाळतो आहे.

- जरी संसर्ग झाला तरी पेशंटचं बरं होण्याचं प्रमाण हे ८५% आहे. मग आपण त्या ८५% असू अशी आशा बाळगण्यात काय चूक आहे.

या विचारांनी माझ्या भीतीवर मात केली अन काम केलं.

हातातली कामं उरकली म्हणून परत गेले चार दिवस लॉक डाऊन मध्ये आहे. पण महत्वाचं काम आलं तर परत कामाला बाहेर जाईल.

भीती जर आपल्याला निष्क्रिय बनवत असेल तर ती विजयी होईल, पण मनातील भीतीमुळे जर आपण काही कृतीशील निर्णय घेत असू अन तिची अंमलबजावणी करत असू तर भीतीवर आपण विजय मिळवू.

मी दुसरा पर्याय निवडला.

(यांनंतरही जर मला करोनाचा संसर्ग झालाच तर आला मोठा दीडशहाणा अशी भावना जर तुमच्या मनात आली तर माझा नाईलाज आहे.)



No comments:

Post a Comment