Monday, 13 April 2020

चूक

सीन १.

आम्ही नवीन ग्राइंडिंग मशीन घेतली होती. २००६ साली. बिझिनेस मध्ये नवीन, त्यामुळे रिसोर्सेस माहित नाही. आम्हाला ग्राइंडिंग ऑपरेटर ची गरज होती. आम्ही त्यावेळेस ग्राइंडिंग एका टूल रूम मधून करवून घ्यायचो. तिथे एक सतीश नावाचा स्किल्ड ऑपरेटर होता. आणि आमचं सगळं काम तोच करायचा. आम्ही जी मशीन घेतली होती तीच सप्लायर कडे पण होती. आम्हाला रेडिमेड ऑपरेटर नजरेसमोर दिसत होता. आमचा पाय घसरला. आम्ही त्याला आमच्याकडे काम करायला आमंत्रण दिलं.

तो आलाही. पण तीन दिवस काम केल्यावर काय किल्ली फिरली माहित नाही. पण सतीश परत त्या टूल रूम मध्ये गेला. आम्हालाही गिल्ट फिलिंग होतं की आपण आपल्याच सप्लायर चा माणूस फोडला. पण जादू झाली आणि आम्ही त्या गुन्ह्यातून आपसूक मुक्त झालो. त्यानंतर मात्र आम्ही सप्लायर, कस्टमर, स्पर्धक कंपनीतून कुणी माणूस घ्यायचा नाही अशी शपथ खाल्ली. आणि आजतागायत पाळतो आहोत.

सीन २.

मला बंगलोर मध्ये माणूस घ्यायचा होता. खूप शोध घेतला पण बजेटमध्ये बसणारा आणि स्किल सेट असणारा माणूस मिळतच नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर एक सापडला. गिरीश त्याचं नाव. मी त्याला एका संध्याकाळी ऑफर लेटर द्यायला जाणार होतो. त्याच सकाळी माझा अशा कंपनीत कस्टमर कॉल होता जिथे गिरीश ने काम केलं होतं. सहज बोलताना मी तिथे सांगितलं की गिरीश आमच्या कंपनीत बहुतेक पंधरा दिवसात जॉईन होणार आहे.

कस्टमरने मला गिरीश ची सारी स्टोरीच सांगितली. तो कंपनीत कशा चोऱ्या करायचा अन नंतर दारुड्या झाला. मी अजून दोन तीन ठिकाणहून ती कहाणी खरी असल्याचं कन्फर्म केलं. लाँग टर्म मध्ये फसलो असतो, मी जर त्याला घेतलं असतं  तर. पण जादू झाली अन मी त्या प्रॉब्लेम मधून आपसूक मुक्त झालो.

सीन ३.

एक चायनीज स्पिंडल कंपनी आहे. शिरस्त्याप्रमाणे त्यांचे स्पिंडल खूप स्वस्त. आणि त्या प्रकारचे स्पिंडल आमच्या रेंज मध्ये नव्हते. काही भारतातले कस्टमर आमच्या खूप मागे लागले की त्यांची एजन्सी घ्या. आमच्या रेंज मध्ये त्यांचे प्रॉडक्टस नव्हते मग त्यामुळे मी पण विचार केला की असू द्यावी चायनीज कंपनीची रेंज आपल्या बास्केट मध्ये. भरपूर मेलामेली झाली. त्यांनी आमची कंपनी ऑडिट करायचं ठरवलं. २५ डिसेंबर २०१९ ला या चायनीज कंपनीचे लोक आमचं ऑडिट करायला पुण्यात येणार होते. मी पण पूर्ण तयारीत होतो.

२५ डिसेंबर ला सकाळी चायनीज कंपनीचा मला फोन आला. त्यांनी बंगलोर मध्ये कुठल्या दुसऱ्या कंपनीला एजन्सी दिली आणि आता पुण्याला येत नाही म्हणाले. मी त्यांना म्हणालो की तुम्ही हीच गोष्ट पुण्याची माझी कंपनी बघून, ऑडिट करून सांगू शकत होते. भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम मधून मी इथेही आपसूक मुक्त झालो.

असे अनेक किस्से आहेत. मी काही तरी चूक वागायला जातो, पण विधात्याच्या मनात काही वेगळं असतं, आणि ती चूक काही माझ्याकडून घडत नाही.

No comments:

Post a Comment