Friday, 24 April 2020

सापेक्षता

टाटा या ग्रुप बद्दल माझ्या मनात तीव्र आदर आहे. त्यांनी देशात आणलेली औद्योगिक परिवर्तन. टाटा एअरलाईन्स, (जी नंतर एअर इंडिया झाली), टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा केमिकल, टीसीएस, इंडियन हॉटेल्स अशा अनेक कंपन्या त्यांनी चालू केल्या आणि नावारूपाला आणल्या. टी आय एस एस, आय आय एस सी सारख्या संस्था चालू केल्या. टाटा ट्रस्ट तर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली. जे आर डी टाटा यांचा फोटो आमच्या शॉप फ्लोअर ला लावला आहे. जर मी टाटा च्या कुठल्याही कंपनीत लागलो असतो तर एक लॉयल एम्प्लॉयी म्हणून नाव काढलं असतं.

पण असं असलं तरी ते तसे आहेत म्हणून मी त्यांचे प्रॉडक्टस विकत घेईल याची शाश्वती नाही. किंबहुना माझ्याकडे टाटा ची कुठलीही कार नाही आहे आणि ना मी तिचं फारसं कधी कौतुक केलं आहे. टाटा ग्रुप ची कंपनी म्हणून मी फक्त विस्तारा ने प्रवास करेल असा पण सुद्धा कधी केला नाही. अगदीच नाही म्हणायला आम्ही अशात टीसीएस ची इऑन नावाची इआरपी वापरतो, पण ती टाटा ग्रुप ची आहे म्हणून नव्हे तर तिची उपयुक्तता सिद्ध झाली, त्यामुळे वापरतो. टाटा नॅनो न चालण्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तिची क्वालिटी आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली नसावी असा एक माझा अंदाज आहे. पंचतारांकित हॉटेल्स मध्ये राहायचा योग फार कधी आला नाही, पण जेव्हा आला तेव्हा राहील तर इंडियन हॉटेल्स मध्येच असं कधी ठरवलं नाही. याचं कारण माझ्या सापेक्ष त्यांच्या प्रॉडक्टस किंवा सर्व्हिसेस ची क्वालिटी आणि रेट हे मला इम्प्रेस करू शकले नसावे.

कुणाचं चांगलं वागणं हे हे त्यांनी दिलेल्या प्रॉडक्ट क्वालिटी ला ऑप्शन असू शकत नाही.

आमच्या बिझिनेस मध्ये आम्ही भरपूर गोष्टी कस्टमर बरोबर शेअर करतो. आणि माझे किंवा माझ्या बिझिनेस पार्टनर चे त्यांच्या बरोबर अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तरीही काही मोजके कस्टमर आमच्याकडे आजकाल काम पाठवत नाही. आमचा एक सेमिनार आहे "व्हाय डू स्पिंडल्स फेल अँड हाऊ टू प्रिव्हेंट इट". आमच्या बिझिनेस च्या रिलेटेड आम्ही खूप गोष्टी सांगतो. हेच कस्टमर तिथं कौतुक करतात, टाळ्या वाजवतात पण बिझिनेस देत नाही. कदाचित आमची क्वालिटी, रेट किंवा आफ्टर सेल्स ग्राहकाला पटत नसावी.

इतकं काय पण इथं मी फेसबुकवर वेगवेगळे अनुभव शेअर करतो. माझ्या जवळच्या लोकांना माहित असतात ते. पण मला लोकांनी त्या गोष्टीमुळे स्वीकारावं असं जर मनात ठेवलं तर तसं प्रत्यक्षात होत नाही. त्यांना स्वतःच्या अपेक्षा असतात, त्यांची जर पूर्तता केली नाही तर ते सरळ बाय करतात. लोकांच्या गुड बुक्स मध्ये रहावं या उद्देशाने जर वागणं ठेवलं तर पदरात काही पडत नाही.

त्यामुळे तुमचं चांगलं वागणं, लोकांना मदत करणं हे आपल्या जागी ठीक. ते तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करता हा भाव हवा. जर दुसऱ्यासाठी करतो आणि म्हणून दुसर्यांनी मला स्वीकारलं पाहिजे असा भाव ठेवला तर निराशा वाट्याला येते.

त्यामुळे सापेक्षता हा सिद्धांत भौतिकशास्त्रातच नव्हे तर भौतिक जगण्यात सुद्धा चपखल लागू होतो.
  

No comments:

Post a Comment