Tuesday 28 April 2020

डी ऍक्टिव्हेट

चार एक वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा अकौंट डी ऍक्टिव्हेट केलं तेव्हा पार अगदी इमोशनल वगैरे पोस्ट टाकली होती. आज ती पोस्ट वाचली तेव्हा हसू येतं. डी ऍक्टिव्हेट चं टॅब दाबताना पार अगदी शेवटल्या सिगारेटचं थोटूक ज्या भावनेने फेकतो तसं झालं होतं. नंतर मग सवय लागत गेली डी ऍक्टिव्हेट करण्याची आणि परत ऍक्टिव्हेट करण्याची. आणि हा काळ अगदी एक आठवड्यापासून ते दोन-अडीच महिन्यापर्यंत आहे. पूर्वी लोकसुद्धा वेलकम बॅक वगैरे म्हणून स्वागत करायचे. आता कुणी ते पण म्हणत नाही. आली परत कटकट असं कुणी म्हणत असावेत कदाचित. पण आता ती एक एसओपी झाली आहे. ज्या भावनेने पोस्ट करतो त्याच भावनेने डी ऍक्टिव्हेट पण करतो.

अधून मधून डी ऍक्टिव्हेट होण्याची काही कारणे आहेत. एक म्हणजे, हा लॉक डाऊन पिरियड सोडून द्या, पण दिवसात दीड एक तास फेसबुकवर व्यतीत केला जातो. (माझ्या बऱ्याच नातेवाईकांना मी चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो असं वाटतं). जेव्हा मी पहिल्यांदा डी ऍक्टिव्हेट केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फेसबुक डी ऍक्टिव्हेट केल्यावर सुद्धा कुठल्यातरी दुसऱ्या कामात अडकलेला असतो. आता या लॉक डाऊन मध्ये सुद्धा मी एक आठवडा डी ऍक्टिव्हेट होतो आणि त्या काळात मी अनेक इतर कामं केली. म्हणजे थोडक्यात फेसबुकवर जो वेळ जातो तो दुसऱ्या कशाला कमी प्रायोरिटी दिल्यामुळे काढता येतो. ज्या वेळेस म्हणून असं लक्षात येतं की आता फेसबुकपेक्षा फार महत्वाची कामं नाही आहेत तेव्हा मग मी परत येतो.

दुसरं म्हणजे मी जे लिहितो ते बहुतांशी स्वानुभवावर आधारित असतं. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात जर काही घडलं की ज्यामुळे मी लो फील करत आहे तेव्हा मला फेसबुकवर यायला आवडत नाही. कारण माझ्याकडे शेअर करण्यासाठी मालमसाला नसतो. त्यामुळे मी इथे फेसबुकवर आनंद मिळवायला वगैरे येत नाही तर माझी मन:स्थिती जेव्हा आनंदी असेल तेव्हा येतो. सहसा इथे काहीही फालतू चालू असेल तरी त्याचा स्वतःवर सहसा परिणाम करून घेत नाही, मग ते राजकारण असो, धार्मिक/जातीय वाद असो वा ट्रेंड असो. डी ऍक्टिव्हेट असताना जर काही शेअर करण्याजोगं घडलं तर मी ब्लॉग वर लिहून ठेवतो आणि परत आल्यावर शेअर करतो.

आता शेवटचा प्रश्न उरतो ते अकौंट लॉग आऊट करून ठेवता येत नाही का? इथे मात्र माझी सपशेल हार आहे. म्हणजे ते काही लोकांना नॉन व्हेज बंद करण्यासाठी श्रावण महिना लागतो तसं मला फेसबुकवर न येण्यासाठी डी ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले उदय जोशी सर किंवा डॉ देशपांडे कसे डी ऍक्टिव्हेट न होऊनही फेसबुकवर येत नाही, ते अजून जमलं नाही.

कुणास ठाऊक काही वर्षाने ते ही जमेल आणि तेव्हा परत ही पोस्ट वाचताना मला हसू येईल. 

No comments:

Post a Comment