Friday, 9 May 2014

वस्तुस्थिती

आज काल मी बर्याच पोस्ट वाचतो कि अमेरिकेला आपला बिझिनेस वाढवायचा आहे भारतात म्हणून मेडिया ला हाताशी धरले आहे वैगेरे. जे मांडलं जातं त्यात थोडं तथ्य असेलही कदाचित, पण थोडंच. माझा काही या विषयावर अभ्यास नाही किंवा आंतरराष्ट्रीय देशाच्या संबंधावर मी काही प्रोजेक्ट पण केला नाही आहे. एक छोटी कंपनी आहे, थोडी माहिती आहे. त्याला back up नाही आहे. जे तर्क बुद्धीला वाटतं ते लिहितोय.

अमेरिका किंवा युरोप ला आपली बाजारपेठ खुणवत आहे म्हणून strategically ते आपल्या मेडिया मध्ये घुसत आहेत किंवा ओबामा प्रशासनात काही भारतीय appoint करत आहेत या मध्ये मला काही तथ्य वाटत नाही. अंतर्देशीय बाजारात माझ्या मते middle east शी आपला जास्त व्यापार असावा चायना, अमेरिका, युरोप हे त्यानंतर येत असतील. पण एक गोष्ट नक्की कि चायना कडून आपण जास्त गोष्ट import करत असू त्यांना export करण्यापेक्षा. आणि अमेरिकेत मात्र किंवा युरोप ला याच्या बरोबर उलट. म्हणजे आपला पाश्चिमात्य देशात बिझिनेस आणि पर्यायाने इंटरेस्ट जास्त आहे न कि त्यांचा आपल्यात. या उलट चायना किंवा कोरिया यांना आपल्याला विविध गोष्टी supply करण्यात जास्त इंटरेस्ट आहे.

माझी काही निरीक्षणे:

- भारतातील नंबर एक कार कंपनी: सुझुकी जपानची आहे
- दोन नंबर ला Hyundai कोरियन आहे.
- white goods मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या LG आणि Samsung दोन्ही कोरियन आहेत.
- देशातील जनता ज्या गोष्टी जास्त consume करते त्या Asian country तून येतात.

म्हणजे भारताच्या लोकसंख्येचे कौतुक हे आशियातल्या देशांनाच आहे.

अमेरिकेतल्या general motors किंवा ford तसंच युरोप मधल्या Mercedes, Volkswagen, Volvo यांचे भारतातले प्लांट हे तुलेनेने लहान कमी investment चे. (नाही म्हणायला Benz ने चेन्नई ला HCV चा प्लांट उभा केला पण अजून पूर्ण capacity ने चालू व्हायचा, त्यात recession).

ज्या McDonald, KFC किंवा Wall mart वरून बोंब मारली जाते कि अमेरिकेला हे मार्केट खुणावतंय त्यांनी असे किती पाय रोवले हे जर बारकाईने बघितलं तर खिजगणतीत हि नाही आहोत आपण. २-३ किमी च्या लांबीच्या अमेरिकेच्या रस्त्यावर  McDonald, KFC, Subway, Pizza Hut यांची रेलचेल असते तिथे ९-१० किमी च्या सिंहगड रोड वर यापैकी एकही outlet नाही आहे. cadbury, नेसले, या कंपन्या कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसल्या आहेत भारतात पण त्यांच्या जागतिक उलाढालीपैकी भारत किती contribute करतो हे बघितलं तर लक्षात येईल कि आसपास पण नाही आहे आपण. हीच गोष्ट पेप्सी आणि कोकाकोला बद्दल असावी असा माझा अंदाज आहे. potential लाख असेल हो पण buying power तर पाहिजे ना.

ज्या SKF कंपनीत मी career चालू केलं तिची कित्येक वर्ष उलाढाल ३००-४०० कोटी मध्ये फिरत होती आता कुठे १२०० कोटीला पोहोचली आहे. किती वर्षानंतर तर तब्बल ५३ वर्षे.

अमेरिका तरी ठीक आहे हो, थोडा तरी भाव देतं आपल्याला. युरोप तर उभं पण करत नाही आपल्याला. काही घेणं देणं नसतं आपल्याशी. Germany आणि Switzerland आणि थोडं Italy (हा एक बावळट देश) सोडलं ना तर बिझिनेस साठी काही संबंध नाही आपला. (नाही म्हणायला UK आहे, पण लंडन मध्ये नाही ५ वर्षात अतिक्रमणावर कारवाई वैगेरे अशा बातम्या येतात कि नाही ते बघा एवढं आपल्या लोकांनी capture केलं आहे). France, Sweden (पुण्यातच ५/६ स्वीडिश कंपन्या, बाकी आनंद), Holland, Luxemburg, Norway, Finland, ऑस्ट्रिया  या अति प्रगत देशांचा आपल्याशी दूर दूर संबंध नाही हो.

टीचभर singapore आज जगातील सगळ्या जास्त per capita income असलेला देश आहे.

INR काही मोजके देश सोडले ना तर exchange मध्ये accept पण होत नाही हो.

माझ्या बिझिनेस च्या अनुषंगाने काही माहिती देतो:

- Westwind हि UK ची कंपनी महिन्याला २००० spindles बनवते. गेले कित्येक वर्षांपासून. अख्या भारतात westwind चे फक्त ४००० spindles आहेत. चायना मध्ये under one roof २००० पेक्षा spindles असणार्या २० कंपन्या आहेत.
- मशीन टूल च पूर्ण भारताचं production वर्षाला रु ५००० कोटी आहे (ओढून ताणून). जगात १५ कंपन्या आहेत जिचा प्रत्येकी turn over ५००० कोटी पेक्षा जास्त आहे.
- spindle ज्यात मी डील करतो आणि काही advance product develop करण्याचा काही वर्षांपासून प्रयत्न करतोय, ते बनवणारी भारतात एकही कंपनी नाही आहे. १५-२० लाख population असणार्या taichung मध्ये २० कंपन्या आहेत.
- भारतात PCB (printed circuit board) बनतात, पण हे बनवायला लागणारे raw material, process material आणि मशिन्स यापैकी एकही गोष्ट भारतात बनत नाही. सगळं बाहेरून आणायचं आणि मग काय value addition करणार.??

हि अमेरिका किंवा इतर प्रगत देश आहेत ना सगळं niche स्वत:कडे ठेवतात मग ते software असो, फार्मा असो, किंवा अजून काही असो research सगळं तिकडे. aviation industry किंवा aerospace industry झाली का develop आपल्याकडे. Boeing किंवा Airbus आहे का कुठे. आता कुठे हवा यायला लागली आहे त्यांची.

अशा भरपूर गोष्टी आहेत. बोर व्हाल. थोडक्यात माझं मत असं आहे कि पाश्चात्य देशाला आपल्या लोकसंख्येचं अजिबात कौतुक नाही. जे ते असेल तर आशिया तल्या देशांना असेल (चायना, तैवान, थायलंड वैगेरे, जपान पण टांगता आपल्याला). इथला बिझिनेस आहे म्हणून हे देश फार strategic decisions घेत आहेत वैगेरे आपले misconceptions आहेत.

तेव्हा काम करणे, आपली पत वाढवणे, Reliance सारख्या कंपन्या manufacturing सेक्टर मध्ये तयार करणे, value add करणारे products आणि प्रोसेस बनवणे आणि जगाला आपली जाणीव करून देणे हेच आपल्या हातात आहे.

Notes:
- defense हा एक grey area आहे ज्याच्यामुळे काही decisions होत असतील तर माहित नाही
- reference मागाल तर काहीच नाही. जे काही फिरलो, अनुभवलं त्यातून लिहिलं आहे. feelings आहेत, present करायचा पेपर नाही.
- चूक भूल देणे घेणे

वस्तुस्थिती

Thursday, 8 May 2014

कंजूष

डीएसके विश्व मधे एक डाॅ रीव्हस् नावाचे osteopathy ची प्रॅक्टीस करणारे डाॅक्टर राहतात. बायकोचा पाय दुखत होता म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. मी जसा उभा राहतो हे पाहून त्यांनी मला दोन पायावर equal वजन ठेवून कसं उभं रहायला पाहिजे ते दाखवलं. मग माझं पाकीट खिशातुन काढायला सांगितलं. जाड पाकीट बघून म्हणाले "oh rich man" मला हसायला आलं. कधीही न वापरलेले credit cards, फुकटात मिळालेले वेगवेगळ्या malls चे कार्ड, दुनियादारीच्या चिठ्ठ्या चपाट्या, बिलं आणि यांच्या आत कुठेतरी लपलेले १५० रू यामुळे जाड झालेल्या पाकीटाला बघून तो जर मला rich man म्हणत असेल तर मी कशाला झाकलेली सव्वा लाखाची मूठ सोडू. असो. तर ते म्हणाले हे पाकीट घालून तु खुर्चीवर नको बसू. दोन्ही heap ची alignment चुकते आणि त्याचा effect पाठदुखीवर होतो. त्यामुळे ते पाकीट काढून मी आॅफीसमधे बसू लागलो.



 काल माझ्या मित्राच्या वडिलांचं निधन झालं. मी गेलो होतो अंत्यविधीला. तिथंच आला बायकोचा मित्र सुशील. अंत्यविधी पार पडला. सर्व मंडळी घरी निघाली. मी आणि सुशील थांबलो होतो काय मदत लागते का विचारायला. शेवटी मित्र पण निघाला. अशा वेळेस वातावरणात एक दु:खाची किनार असते. सर्व लोकं गेल्यावर सुशील मला म्हणाला "चल चहा पिऊ". मळभ साचलेल्या मनावर चहा एक ज़ालिम उपाय आहे. (खरं तर त्याचबरोबर एक सिगरेट. पण गेले काही वर्ष या स्वर्गीय आनंदाला सोडचिठ्ठी दिली आहे). मी पण लागलीच होकार दिला. नगर रोडच्या कैलाश मधून बाहेर आलो आणि लागलीच चहाची टपरी दिसली. गाड्या लावून तीन चहाची आॅर्डर दिली. (माझा सारथी पण बरोबर होता). एक एक सीप घेत चहा संपवला. (मी चहा पण सीप घेतंच संपवतो. दारूला सीप आणि चहासाठी घुटका हे मला मंज़ूर नाही). आणि मग सुशील ने त्याचं खरंखुरं जाडजूड पाकीट काढलं आणि त्यातुन सगळ्यात कमी denomination ची नोट बाहेर काढली जी अर्थात शंभरची होती. पिण्याचं पाणी आणि सुट्टे पैसे याचं नियोजन आपला देश ६६ वर्षापासून करू नाही शकला याचं नेहमीच आश्चर्य वाटतं. (वाईट दिवस संपणार आहेत आता) चहावाल्याकडे सुट्टे पैसे नव्हते याची कल्पना आल्या आल्या मी खिशात पाकीट काढण्यासाठी हात घातला (आधीच मला आवडत नाही हे काम) आणि डाॅ रीव्हस् च्या सल्ल्यानी काम दाखवलं. पाकीट मी आॅफीसमधे टेबलच्या वर ठेवून मी ऐटीत आलो होतो. सुशील ने साहजिकंच माझ्याकडे मदतीच्या आशेनं पाहिलं. मी आपल्या
ओशाळल्या चेहर्याने उभा राहिलो. तो असा विचित्र चेहरा बघून चहावाला त्याच्या व्यवसायबंधूकडे गेला आणि सुट्टे मागू
लागला. एव्हाना सुशीलच्या मनात आलं असावं "येडा आहे का हा, साला खिशातून २० रू काढत नाही आहे" नसलेली पण गेलेली इज़्ज़त वाचवावी म्हणून मी माझ्या चालकाला बोलावलं, पण तो पर्यंत चहावाल्याने उरलेले पैसे दिले आणि माझी हौदसे गयी हुई बुंदसे लानेकी कोशिश नाकाम गेली. सुशीलने मला बाय म्हंटलं (कोपर्यापासून नमस्कार केला असेल) आणि आम्ही मार्गस्थ झालो.

सुशील गाडी चालवत असताना असाच विचार करत असेल "वैभीचा नवरा फेसबुकवर चुरचुर लिहीतो पण actual मधे लैच चिंगूस आहे" आणि आता हे वाचल्यावर म्हणेल "तिथं सांगायचं ना हे, इथं फेसबुकवर टॅग करतोय. येडाच आहे" एकंदरीत गोळाबेरीज एकच. (वैभवीला काही मित्र मैत्रिणी वैभे/वैभी, तर काही वैभू म्हणतात आणि काही भूभू म्हणतात. मला हे शेवटचं नाव फारंच आवडतं)

काही काही दु:खद प्रसंगावेळी असं काही वेगळंच घडतं की त्याने थोडंसं हलकं व्हायला मदत होते. 

Tuesday, 6 May 2014

Sensitive

हो बरेच लोक मला म्हणतात मी संवेदनशील (sensitive) माणूस आहे.

- नितीन आगे बद्दल वाचतो मी, दाभोळकर आणि निर्भया ही ओरखडे ओढून जातात, २६/११ ला भयचकित होतो, मन विदीर्ण होतं, मुठी पण आवळल्या जातात कधी कधी. मग मला sense होतं कि माझी भावना हि केविलवाणी आहे. मी गपगुमान विसरतो आणि कामाला लागतो, पुढच्या खुनाची बातमी वाचेपर्यंत. हो मग, मी sensitive माणूस आहे.

- रस्त्यावर पडलेला माणूस पाहतो. रक्ताचा ओघळ दिसतोही. मनात खूप कालवाकालव होते. पण मग sense होतं कि चाळीस लाखाची order फायनल करायची आहे. साडेदहाची वेळ दिली आहे. वाईट वाटत वाटत मी हलकेच accelerator वर पाय दाबतो. त्याचं काय आहे, मी जरा sensitive आहे हो.

- सिग्नल ला गाडी उभी राहिली कि येतात २-४ चिल्लीपिल्ली काहीतरी मागण्यासाठी. जातोही हात खिशात २ रुपये फेकण्यासाठी देणगीच्या अविर्भावात. आणि मग sense होतं गाडीतला laptop चोरणार तर नाहीत ती. मी हळूच सेन्ट्रल lock चा खटका दाबतो. खरंच हो, मी फार sensitive माणूस आहे.

- कधी दिसतं डोळ्यांना कुठल्या तरी माय भगिनीची छेड काढतंय कुणीतरी, वडिलांच्या वयाच्या माणसाला त्याची चुकी असताना उद्दाम बोलताना. मग sense होतं कि ते "मेरे अपने" थोडीच आहेत. भोकर्या डोळ्यांनी बघत मी रस्ता काटून पुढे जातो. अहो विसरलात का, मी sensitive माणूस आहे म्हणून.

- आणि जातीय दंगलीच्या बातम्या, ओहो, इथे तर माझ्या संवेदनशीलतेचा कस लागतो. कधी झाड उन्मळून पडतं, तर कधी उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते म्हणे. असो बापडी. मला लागलीच sense होतं की दंगल माझ्या दाराशी थोडीच आहे. मी पण मग चार भिंतीआड बसून बियरचे घुटके घेत tv च्या बातम्या ऐकत बसतो. आता कितीदा सांगू राव की मी sensitive आहे.

अजूनही कळलं नाही म्हणता, ठीक आहे, मग ओरडूनच सांगतो "हो हो मी sensitive माणूस आहे"

Focussed

काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे १९९२ मधे धंदा करण्याची ठिणगी पडली मनात, आणि त्यामुळे ज्योत पेटलीही. पण ती ज्योत झाली मेणबत्तीची किंवा फारफारतर पणतीची. म्हणजे त्या ज्योतीने कधी आयुष्यात अंगार फुलवला नाही किंवा ती ज्योत दुसर्यांना प्रकाश देणारी मशाल नाही झाली. पण मिणमिणत्या प्रकाशात स्वत:ला मार्ग दाखवत गेली. आणि मग काही विशिष्ट लोकांना भेटलं की मग आपलं खुजेपण लक्षात येतं. कळतं की focused माणसं़ काय कमाल करतात ते.

म्हणजे कसं ते सांगतो तुम्हाला. अथांग अशा समुद्रात कधी पोहलोच नाही हो. त्या भिरकावून देणार्या लाटा, तोंडात जाणारं खारं पाणी आणि मग अचानक पाण्यानें ओढून नेल्यावर लक्षात येतं की जमीनंच नाही खाली. फाटते हो. मग कसं आपला स्विमींग पूलच बरा. पाणी पण गोड. बुडायला लागलो की तळ असतोच. थोडा धक्का मारला की येतो पाण्यावर. फार प्राॅब्लेम झाला तर लाईफ गार्ड असतोच.

हिमालय कधी खुणावत नाही मला. कुणी सांगितलं त्या जीवघेण्या थंडीत जायला. श्वास पण धड घेता येत नाही. आपली मजल सिंहगडापर्यंत. सगळं कसं तब्येतीला सांभाळून.

कातडी वाचवायची, पोटात जास्त खड्डा नाही पडू द्यायचा, मेंदू वापरायचा पण डोकं दुखु लागलं की बास!

लोकं भेटतात हो, सागराला कवेत घेणारी, एव्हरेस्टला साद घालणारी, ध्यास ठेवणारी आणि मग नतमस्तक होतो. आणि गर्दभावलोकन करायला मी मोकळा होतो. हात पाय कुठे झाडायचं ते कळतं तरी.

डबक्याला जलाशय आणि टेकडीला गड मानला नाही हेच नशीब.

अर्ध हळकुंड मिळालं आहे, पण पिवळा झालो नाही हीच काय ती जमेची बाजू.

समुद्र किनार्यावर सकाळी चालत असताना लाटा आदळल्या पण त्या अशा. 

अट्टल

आज सकाळीच बीचवर चालायला गेलो. हो, इकडे सगळी नाटकं करतो बरं का, सकाळी बीचवर चालणं, मग परत आलो की स्वीमिंग पूल मधे डुबकी. बरेच फायदे असतात़, एकतर conference ला आलेले फारंच कौतुकाने बघतात आणि विचारतात "morning walk।" "नाही, भेळपुरी खायला गेलो होतो" असं उत्तर द्यायची फार इच्छा होते. पण आवरतो. परत सकाळी विदेशी बा......जाउ द्या भौ, आपली भारी प्रतिमा आहे फेसबुकवर, कशाला डागाळा. असो तर कौतुकाने बघितलं की जे काही मिलीग्राम वजन कमी झालं असतं ते डबल वाढतं.

तर सांगत होतो की बीचवर माणूस इकडेतिकडे बघत एकटाच उभा होता. मला बघितल्यावर माझ्याजवळ आला. बघतो तर काय SKF चा, माझी पहिली कंपनी. CDO/MERI हायस्कूल नासिक, Govt Polytechnic Aurangabad, आणि SKF चे मित्र मैत्रिणी भेटले की मला विशेष ममत्व वाटतं. (मैत्रिणी फक्त नासिकच्या आहेत, त्या आहेत Whatsapp वर बाकी GPA आणि SKF मधे दुष्काळ. पण असं लिहीलं की वजन येतं वाक्याला) तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला "I will start running from that point for 50 mtrs in sea water. You need to shoot me" i phone होता. नाही म्हणायला काही कारणंच नव्हते. तो पळाला आणि मी इमानऐतबारे त्यांचं shooting केलं. त्यानं बघितलं आणि म्हणाला "thanks" मी म्हणालो "you are welcome. Let us get connected on Facebook. I will send you friend request as soon as I am back in room" तो चपापला. आणि फोनकडे बघत म्हणाला "oh no, this is not for Facebook, but to show to my daughter" मी म्हंटलं "भावड्या, तु ज्या मंदिराची घंटा वाजवतोस ना, त्या देवळाचा मी पुजारी आहे. तु काय मला सांगतोस" तर लाजलाच म्हणाला "I appreciate your guess which is right"

मग बाकी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि तो खुश होत विडीओ बघत हाॅटेल कडे परत निघाला.

मनात आलं "चला आजच्या रात्रीची पोस्टची सोय झाली" खुपंच खुश झालो.

एखादा बेवडा संध्याकाळच्या क्वार्टर ची सोय झाल्यावर खुश कसा होतो तसंच जणू.

अट्टल 

Tuesday, 29 April 2014

प्रहसन

फेसबुकमुळे मला माझ्यामधे विविध गुण आहेत याचा साक्षात्कार होत गेला. म्हणजे अगदी multifaceted का काय अशी माझी personality झाली आहे याची मला जाणीव होऊ लागली आहे.

- राजकारण आणि अर्थकारण या दोन नवीन विद्येचा शोध लागला आहे. राहुल, अरविंद दादा आणि मी लहानपणी क्रिकेट खेळायचो (प्रियांका सायकलवर खेळायची) आणि मी मारलेला बाॅल तिसर्या मजल्यावरच्या मोदीकाकांच्या खिडकीची काच फोडतोय इतकी घष्टन असल्याच्या सहजतेने मी त्यांच्यातल्या गुण दोषांची चिकित्सा करत असतो.

स्वत:च्या धंद्याची balance sheet न वाचता येणारा मी, चलनवाढ, भारतीय रूपयांची अंतरराष्ट्रीय बाजारात घसरण होण्याची कारणं याबद्दल हिरीरीने मतं मांडतो.

- आणि मला अचानक मला साक्षात्कार झाला की ते म्हणजे इतिहासातले नेते किती चुकीचं वागले ते. त्यातल्या त्यात गांधीजी आणि सावरकर यांच्याबद्दल लिहायचे म्हंटलं की माझी लेखणी सरसावते आणि मग मी फटकारे मारायला चालू करतो. आजकाल तर मी ज्ञानेश्वर आणि रामदास यांचं कसं चुकलं यावर नेहमीप्रमाणे अर्धवट अभ्यास चालू केला आहे. लवकरच येत आहे यावरचा लेख.

तरी बरं यावर खराखुरा अभ्यास असणारे हुशार लोकं माझ्या मित्रयादीत आहेत, पण मी त्यांनी लिहीलेल्या मतांच्या वाटेलाही जात नाही. मी माझ्यासारखी अर्धवट बुद्धी असणार्यांच्या वादविवादात रमतो.

- दुसरा गुण म्हणजे मला एक जाणवायला लागलं आहे की मी एक सिद्धहस्त लेखक झालो आहे. म्हणजे पुल आणि वपुंनंतर रामं च. (जरा जास्तच होतोय ना………… खर्च)

- computer वर copy-paste ह्या function चा बेफाम वापर चालू केला आहे. इतका कि परवा office मध्ये PDF format मधला content मी copy करून word मध्ये paste करण्याचा एक तास प्रयत्न केला. 

- आता राहिले माझ्यातले दोन गुण त्यातला एक म्हणजे photography. नाही म्हणायला फेसबुक वापरायला चालू करून दोन एक वर्ष झालीत पण तरीही माझ्यातला निद्रिस्त फोटोग्राफर अजून जागा कसा झाला नाही ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. (तरी परवा झर्याचा फोटो टाकून रंगीत तालीम चालू केली आहे, बघू कसं जमतंय ते) आणि दुसरं म्हणजे कविता. तसं र ला र आणि 
ट ला ट जुळवतो हि मी. सध्या कागदावर खरडण चालू आहे. थोडं जमलं कि पाऊस च पाडतो बघा कवितांचा.  

(माझ्या मित्रायादीत ल्या नितांत सुंदर फोटो काढणारे मित्र आणि तेवढ्याच ताकदीच्या कविता लिहिणाऱ्या मित्रांची मन:पूर्वक क्षमा मागून)

अशा रितीने झुकेरबर्गांच्या च्या मार्कमुळे माझ्यात लपलेल्या सुप्त गुणांचा विकास होत आहे याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

प्रहसन 

Monday, 28 April 2014

नील चं पहिलं स्फुट

इंडिया हे किती घाण आहे हे असं मी लिहीतो आहे. डस्टबीनच्या ऐवजी रोड वर जास्त कचरा दिसतो. एक चांगली टेम्पो जाते वाटतं की काही तरी चांगलं काम असेल. पण मग दिसतात २-३ गरीब बसलेले तिकडे. रोडच्या बाजूला दुकानं आणि घरांच्या ऐवजी एक झोपड्याचं गाव दिसतं. तिकडे ग़रीब बसलेले असतात़ आणि चांगले चांगले माणसं़ त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत. आणि ते बिचारे उपाशी मरून जातात. एक चांगलं टेम्पल असतं, खूप लोकं जातात तिकडे. मग त्याच्या साईडला एक लाईन लागलेली असते गरीबांची आणि श्रीमंत माणसं़ फक्त त्यांच्या स्वत:साठी प्रेयर करतात. आता हे सगळं आहेच तर त्यांचं इकडे जगून काय तरी फ़ायदा आहे ते म्हणतात. आपण इकडे जगतो हे बरं आहे पण गरीबांसाठी इंडिया सर्वात चुकीची जागा आहे. कारण जिथे त्यांच्यासाठी काहीच पर्वा नाही तिकडे, तिथे राहून  काहीच फायदा नाही.