Wednesday, 10 December 2014

कभी ख़ुशी कभी ग़म

मिलिंदने उरलेलं शेवटी खाणार्या माणसाचा उल्लेख केला आणि माझं मन अगदी ३०-३२ वर्षं मागे गेलं. आम्ही चार, बाबा-आई-मी-उन्मेष आणि काकांची फ्यामिली काका-काकू-जयेश-स्वाती. आम्ही एकत्र दोन अविस्मरणीय ट्रीप केल्या. एक गोवा आणि दुसरी उत्तर भारत. दोन्ही वेळेसच्या आठवणीनी  ह्या मनाचा एक कोपरा व्यापून राहिला आहे. आणि माझाच का आमच्या सगळ्यांचाच.

आम्ही चौघं, मी, उन्मेष, जयेश, स्वाती साधारण एकाच वयोगटाचे. सातवी आठवीतले १३-१४ वर्ष वय. त्यात स्वाती सगळ्यात लहान. आधीच शेंडेफळ अन त्यात तीन भावात एकंच बहीण, त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी.  त्यावेळेस ट्रीपला हॉटेल मध्ये जेवण करताना मोठे चार एका टेबल वर आणि आम्ही बारके एका टेबल वर अशी विभागणी व्हायची. आमचे शरद काका, म्हणजे एकदम राजा माणूस. खूप मजा करायचे. ते पैज लावायचे, ज्यांनी ताटात लं सगळं संपवलं त्यांना बक्षीस. कधी चोकलेट, कधी रुपया तर कधी काही. आमच्या भावंडापैकी माझं संपायचं आणि थोडं फार जयेशचं संपायचं पण स्वाती आणि उन्मेषच कधीच नाही. मग ते माझ्याकडे बघायचे आणि मी त्यांच्या उरलेल्या अन्नाकडे. मनातून खुश व्हायचो. आणि सगळी ताट बिलकुल साफ करायचो. हा सिलसिला कित्येक वर्षं चालला.

मोठेपणी हा किस्सा सांगताना माझं नाव "मी खाईल" मिखाईल असं सांगताना सगळेच खदखदून हसायचे. पण आजही माझं आणि जयेश चं ताट चाटून पुसून साफ असतं. स्वाती तसंही कमीच खाते. उन्मेषच्या ताटात मात्र अजूनही residual असतात.

वर्षं सरली. स्वाती कॅनडा त असते. जयेश ठाण्यात असतो. उन्मेष पुण्यात असतो पण भेट दोन आठवडयात. सगळे आपापल्या रगाड्यात आहेत. माझ्या खाण्यावर हि बंधन आली आहेत. त्यामुळे सध्या माझंच ताट चाटून पुसून स्वछ करून टाकतो. आणि काय करणार दुसर्या टेबलवर बसणाऱ्या  चार जणांपैकी शरद काका, आशा काकू आणि माझे बाबा हे अनंताच्या प्रवासाच्या गेले आहेत. त्यामुळे सध्या ताट नाहीतर त्या तीन रिकाम्या जागांकडे आशाळभूतासारखा बघतो आहे.

******************************************************************************
दुसरे पंडितजी. त्यांनी सांगितले कि त्यांचे मित्र त्यांचे किती कौतुक करतात ते. या उलट माझं. माझा एक मित्र आहे. औरंगाबादला बरोबर होतो. हुशार आहे. पण स्वत:ला अति शहाणा समजतो. म्हणजे माझ्या साध्या हलक्या शब्दातल्या पोस्ट ला पार हलक्या दर्जाची आहे हे दाखवण्याचं कसब त्याच्या अंगात आहे. बरं याला मी इतक्यांदा तोंडावर पाडलं आहे. कारण आपण एकदा काय बोलतो आणि नंतर काय याचा अर्थ अर्थी काही संबंध नसतो. पण तोंडावर आपटून याचं नाक वरंच असतं. किमान पंचवीस वेळा तरी या मित्राने विनोदी पोस्टमधून काहीतरी गंभीर, सामाजिक पोस्टमधून अध्यात्मिक, आत्मनिंदा केली असेल तर पुढे जाऊन न मागता सल्ला देणे अशा मुळ पोस्टच्या आसपासही न फिरकणार्या पासिंग कॉमेंटस नी पार डोकं पकवून टाकलं आहे. आपला जुना मित्र आहे ८३ पासून, म्हणून इतके दिवस गपगुमान ऐकून घेतलं. आता मात्र मित्रा, तुझी हुशारी तुलाच लखलाभ. कधी भेटलोच तर चहा पिऊ, बियरही पिऊ पण बंगलोरची हवा कशी अन पुण्याला महागाई किती इतकं बोलू, बास!

Saturday, 6 December 2014

Attitude

"Have not you ever pissed off, Rajesh" लहानपणापासूनचा मित्र. हॉटेल ambassador मध्ये. अर्थात २ पेग रिचवल्यावर. मधल्या काळात काय घडलं त्याला माहितच नाही. त्याचाही बिझिनेस आहे मोठ्ठा. बर्याच वर्षांनी. लिहीलेलं वाचलं होतं त्याने.  "नाही म्हणजे नेहमीच कसं गोड गोड. तुला कधीच त्रास होत नाही का लोकांचा?"

आता काय सांगू या भावड्याला. अरे मित्रा, हा पाच फुट साडेनऊ इंचाचा, अन ८० किलोचा देह आहे ना, तो लोकांनी, अन लोकांनी का मित्रांनीच, केलेल्या अपमानाने झिजून झिजून एवढा झाला आहे रे. टाचण्या टोचायच्या आतून. पुना हॉस्पिटल चे वाटवे डॉक्टर, हो हो तेच psychiatrist, व्यथा मांडली त्यांच्यासमोर. त्यानंतर कथा सादर झाली.

कुठल्या देवाचं मंदिर आहे माहिती नसायचं. जायचं फक्त, डोकं टेकवायचं आणि परत. कुठला देव अन कसलं काय.

सपोर्ट मागायचो तेव्हा लोकांना वाटायचं financial सपोर्ट पाहिजे. बोंबला, मोरल सपोर्ट नावाचा एक प्रकार असतो हे कळायचं नाही लोकांना.

रेसकोर्स वर मणभराचं ओझं मनावर घेऊन जात असताना पुर्या ताकदीनिशी त्याला गवतावर फेकून ढसाढसा रडत हलका झालो, तेव्हा कुठे आता बघतो आहेस मला.

जवळच्याने दाखवलेल्या अविश्वासाने त्याचा फोन आला कि थरथर कापायचो, नाही नाही भीतीने नाही, आता हा नालायक परत आपल्यावर अविश्वास दाखवतो का म्हणून!

पासिंग comments नि उन्मळून जायचो. साले, हि बांडगुळं, शहाणपणा चोदवायची. एकेका गोष्टीसाठी रक्त आटायच. वैतागून सिगारेट प्यायचो ना, तेव्हा शिलगावताना हात थरथरायचे माझे. एकेक कश मारताना एक पाकीट ओढल्या इतकी रक्त वाहिनी आकुंचन पावायची. हृदय पिळवटत गेलो, इतकं कि त्याला रक्तप्रवाह कमी पडायला लागला. नळीचं भोक मोठं केलं तेव्हा कुठे पुरवठा पाहिजे तेव्हढा झाला.

गोर्यांशी हात मिळवले तेव्हा एकाने विचारलं "what are your objectives of this jv" त्याला बोललो "ते प्रोफेशनल objectives तर meet होतील. माझं एक पर्सनल ओब्जेक्टीव आहे. या ताणताणावा मुळे मी आयुष्यातला विनोद हरवून बसलो आहे. तो मला परत आणायचा आहे. I would like to get back my lost sense of humor" त्या गोर्याला माहिती नव्हतं, हातरूमाल असतो माझ्याकडे. येडा टिश्यू पेपर देत होता डोळे पुसायला.

मित्रा, अन साधारण एक वर्षापूर्वी लिहायला लागलो. अन त्याचबरोबर दान पण बरोबर पडत गेलं अन भाऊ हा काय positive का काय म्हणतात ना, तो attitudeहि  आला. पण फार मिन्नतवारीने आला आहे रे तो. आणि आताच त्याला सोड म्हणतोस. आता नाही सोडणार त्याला.

जे आहे ते आहे. त्याला आत्मस्तुति म्हण की स्वत:भवती स्वत:च उदबत्ती ओवाळतो म्हण. Choice is yours. मनात येईलही तुझ्या, इथं भेटलास वर नको भेटू म्हणून. कशी होईल भेट, तु स्वर्गात अन मी नरकात. काळजी नसावी.

आणि हो, दारू मलाही चढते बरं का!

बाकी निवांत. Happy new year. 

Wednesday, 3 December 2014

संभ्रमित

स्वच्छ भारत, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, हाय स्पीड ट्रेन्स, (आणि हो, हाय स्पीड च बरं, ते बुलेट ट्रेन विसरा),  कालव्यांचं सोलारीकरण, स्मार्ट सिटीज, जनधन, मिशन हाउसिंग, मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया आणि minimum govt, max governance साधारण या एकादश योजनांवर भाजप सरकारची दौड़ चालू आहे. लोकांचं भले करण्याच्या नावाखाली पापं करण्याचा मक्ता असणार्या भांडवलशाहीचा मी अगदी मायक्रो लेवलचा का असेना पण प्रतिनिधि आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांबद्दल उत्सुकता आहे आणि हे तडीला जायला हवं असंही मनोमन वाटतं. राहता राहिला अदानी आणि अंबानींचा सतत होणारा उल्लेख. खरं तर अनुल्लेख म्हणू.  पण राजकीय पुढार्यांना हाताला धरून स्वत:च्या धंद्याची भरभराट करण्याची (सत किंवा कु, व्यक्तीसापेक्ष आहे) प्रवृत्ती  जगात सगळीकडेच आढळते. आपण कसे अपवाद असणार. आणि रिलायन्सचं म्हणाल तर ३ लाख कोटी पर्यंत उलाढाल ही त्यांनी कॉंग्रेसच्या राजवटीतच achieve केली होती. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या उन्नतीवरून पोटशूळ उठण्याचं काही कारण नाही. अहो इतकंच काय, पण ज्या महात्मा गांधींचा उल्लेख आपण साधी रहाणी यावरून करतो त्यांनीही घनश्यामदास बिर्ला अन जमनालाल बजाज या भांडवलदारांना मदत केली असा आरोप चर्चिला जातोच की! मला तर वाटतं की भांडवलदारांना जर स्वत:पासून चार हात कुणी दुर ठेवलं असेल तर भारतातील सध्याच्या प्रचलित भांडवलशाहीचे पुरस्कर्ते, उद्गाते मनमोहनसिंग यांनीच. आता या अकरा योजनांतूनच रू २५ लाख कोटींची उलाढाल होणे अपेक्षित आहे. समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आतापेक्षा वरच्या स्तराला नेले जाणार आहे हे न समजण्याइतकं आम्ही दुधखुळे तर नक्कीच नाही आहोत. उदाहरणच द्यायचं झालं तर निव्वळ टॉयलेट बांधायला सँनीटरीवेअर बनवणार्या सर्व कंपन्या पुढील ४ते ५ वर्षासाठी बुक असणार आहेत.

त्यामुळे प्रश्न तो नाहीच. प्रश्न आहे तो हे सगळं साध्य करताना अमूर्त अशा सामाजिक जाणीवांचं मूल्यवृद्धी करतोय की अवमूल्यन करतोय. नवीन सरकार आल्याबरोबर शंकराचार्यांनी साईबाबाचे फोटो काढून टाकण्याचा आदेश, किंवा दलितांना मंदिर प्रवेश नाकारावा असा फ़तवा, साध्वीने रामजादे अन हरामज़ादे असं लोकांचं केलेलं वर्गीकरण, साधूने विरोधकांना पाकिस्तानात जाण्याचे केलेले आवाहान, IIT मधे मांसाहारी आणि शाकाहारी कँटीन वेगळे पाहिजे अशा ज्या पत्राला कचर्याचा डब्बा दाखवायला पाहिजे त्याची शासकीय लेवलवर चर्चा होणे, बत्रा का कोण ते त्यांनी धादांत खोटी माहिती शाळांतून पसरवणे, रामधारी लोकांचा धुमाकूळ, देशाच्या प्रमुखाने गणपतीला प्लास्टिक सर्जरी संबोधणे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या समाजाला काही दशके मागे घेऊन जात आहेत. बरं या गोष्टी बोलल्या जातात त्याबद्दलही काही हरकत नाही. लोकांचं तोंडं तर पकडू नाही शकत, पण शासकांकडून त्यावर  विरोध तर दूर पण मौन बाळगलं जात आहे. अन काही ठिकाणी तर शासकांच्या मदतीनेच हे सगळं घडवून आणलं जातं आहे हे फार धक्कादायक आहे.

राष्ट्रीय स्तरावर हा प्रकार तर महाराष्ट्रातही लागोलाग या गोष्टी चालू झाल्या आहेत. नाणीजच्या नरेंद्र महाराजांचं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला व्यासपीठावर असणं हा दुर्दैवी योगायोग नाहीतर केंद्राचीच या बाबतीत री ओढण्याचा प्रकार आहे.  वारीबद्दल मला तसंही फारसं ममत्व नाहीच. आणि त्यांनीच एलिझाबेथ एकादशीवर बंदी घाला ह्याच्याइतकी हास्यास्पद मागणी दुसरी नसावी.  आज ऐकलं कि बैलगाडीच्या शर्यती वरची बंदी उचलली. का तर परंपरा जपली पाहिजे वैगेरे. (आपला घोडयांच्या रेसलाही दणकून विरोध आहे). ते राज्याचे दोन तुकडे करा हो, पण त्याचं समर्थन किंवा विरोध करताना भाषिक अस्मिता, मराठी मनाचे दोन तुकडे असं करण्याऐवजी विकासाची कूर्मगती किंवा ease in administrative governance अशा मुद्द्यावर सत्तेतील दोन्ही भागीदार्यांनी बोलावं आणि निर्णय घ्यावा. उगाच आपलं लोकांची मनं भडकावून अजून एक बेळगाव तयार नका करून ठेवू.

रूढी, परंपरा, प्रथा, गर्व, अस्मिता याचं जोखड महत्प्रयासाने आम्ही फेकून दिलं आहे. ते परत हळूहळू लादू नका हीच विनंती.

कसं आहे बघा, गुळगुळीत रस्ते आणि फ्लाय ओव्हर्स, स्वच्छता, चकाचकपणा, इंधनाच्या कमी किंमती, कमी भ्रष्टाचार ही परिमाणं राष्ट्र म्हणून तर सौदी अरेबियालाही लागू होतात.

तेव्हा विकासाच्या नावाखाली आपण समाजाच्या अवमुल्यनाकडे डोळेझाक करायची आणि दुसर्या बाजूला केवळ विरोधाला विरोध म्हणून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणार्या योजनांची उगाच खिल्ली उडवायची या दोन्ही गोष्टी आपल्याला तर काही जमणार नाही बुवा!

म्या पामर  संभ्रमित आहे हे खरं. बाकी निवांत……  

टीप

वेटर्स लोकांना टीप का द्यावी?

२०१० साली अमेरिकेत मी पहिल्यांदा गेलो होतो. डेट्रोइट च्या हॉटेलमधे जेवलो. पैसे दिल्यावर २ डॉलरच्या आतच परत मिळणे expected होतं. टीपची पद्धत आणि ती by default द्यावीच लागते हे माहित होतं. मी waitress ला बिल मागितलं, तर तिला वाटलं मी उरलेली चेंज मागितली. अक्षरश: डाफरली ती माझ्यावर. अविश्वासाने म्हणाली, तुला ते उरलेले पैसे पाहिजेत. जेव्हा लक्षात आलं की बिल मागतोय, तेव्हा बया शांत झाली आणि हसली. ती हसली अन मग माझाही राग पळून गेला. And they parted happily ever after.

टीप ची प्रथा कुठून चालू झाली असावी. जी ऐकीव माहिती आहे ती अशी कि हि अमेरिकेतच चालू झाली आहे. कारण हॉटेल चे वेटर हे organised सेक्टर मध्ये नव्हते. त्यामुळे त्यांना provident fund, health insurance या स्कीम लागू नव्हत्या. आणि मग या गोष्टींना alternative पद्धत म्हणून टीप देण्याची प्रथा चालू झाली असेल.

पण मग आता भारतात काय परिस्थिती आहे. तर एका विशिष्ट category च्या पुढच्या हॉटेल मध्ये नक्कीच PF आणि ESI चे रुल्स लागू झाले असावेत. पूर्वी पुण्याच्या हॉटेल मध्ये पाटी असायची "इथे नोकरांना पगार दिला जातो." तसं जर हॉटेल मालकांनी लिहावं "इथे PF/ESI लागू आहे." नक्कीच टीप देण्याची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. मला असं आठवतं कि बायपासच्या सयाजी हॉटेल मध्ये पाटी आहे कि इथे टीप देऊ नये म्हणून.

पूर्वी क्रेडीट कार्ड वर टीप लिहिल्यानंतर परत ती रक्कम नंतर चार्ज व्हायची. आता ती हि पद्धत बंद झाली आहे. म्हणजे क्रेडीट कार्ड इश्यू करणारे पण टीप पद्धत बंद झाली आहे असं समजत असावेत.

थोडक्यात unorganized सेक्टर मधील हॉटेलच्या वेटरांना नक्कीच टीप द्यावी, पण एकतरांकित ते पंचतारांकित हॉटेल्स मधे टीप देण्याची गरज नाही कारण तिथले लोकं socially secured असतात, असं मला वाटतं.

मला प्रश्न हा आहे की सोशल सिक्युरिटी देण्यात भारतातले हॉटेल मालक हे अमेरिकेतल्या हॉटेल मालकांपेक्षा पुढे आहेत का?




Saturday, 29 November 2014

रविवारचे रिकामे उदयोग

च्या मारी, शप्पथ सांगतो, या इंग्रजीने घात केला. नाही तर फेसबुकवर जेव्हढे तारे तोडतो, तेवढे Linked In वर तोडले असते ना, बिझिनेस डबल तरी केला असता एव्हाना. (झुक्याला सांगू नका रे कोणी. नाहीतर linked in चं मार्केटिंग केलं म्हणून माझं अकौंट च ब्लॉक करायचा).

आता हेच बघा ना, गेले काही दिवसांपासून फेसबुक अगदी स्पिंडल मय झालं आहे. Multifaceted शिवा ने माझ्या विनंतीला मान देऊन माझं स्केच काढलं अन त्यात गळ्यात स्पिंडल अडकवला. मेडलच जणू. नर्मविनोदी यशवंत पाटील यांनी तिथेच मला Amazing Spindleman हि पदवी दिली. ती वाचल्या वाचल्या मी भिंतीवर चढून बसलो. ह्या पदवीदानाची तुलना मी फक्त लोकमान्यांनी नारायण रावांना (हे राजहंस, राणे नव्हे) बालगंधर्व म्हंटले या घटनेशी करू शकतो. भरीस भर म्हणून कि काय पण आमचे परम मैतर अनिकेत बोंद्रे मुरुमकर यांनी मी राजेश स्पिंडलिक असे नामकरण करावे हे हि सुचवले. सध्या हे औरंगाबाद च्या दौऱ्यावर आहेत. माझ्या प्रदेशाचे पाणी पिल्यामुळे आमची मैत्री अजून दृढ होईल यात शंका नाही. मला आठवतंय पत्नीमित्र (इथे हा अर्थ अनेकांच्या पत्नीचे मित्र असा बहुवचनी नसून, माझ्या एकमेव पत्नीचे मित्र इतका एकवचनी घ्यावा) हृषीकेश कुलकर्णी एकदा म्हणाले "राजेश चं नाव घेतलं कि मला तो वैभवीचा नवरा आहे हे दिसत नाही, तो इंजिनियर आहे ते कळत नाही, तर फक्त स्पिंडल दिसतो." परवा (खरंतर दोन महिन्यापूर्वी, पण एका वर्षापूर्वीच्या सगळ्या घटनांना आमच्या मराठ्वाड्यात "परवा" असंच म्हणतात) जर्मनीत त्याला  स्पिंडल या विषयावरून इतकं पकवलं कि आता परत तो स्पिंडल च नाव म्हणून काढणार नाही. पराशर अग्रो टुरिझम चे सर्वेसर्वा मनोज याने सुद्धा मला "ये इलू इलू क्या है" च्या धरतीवर विचारले "ये स्पिंडल स्पिंडल क्या है". आता हाच प्रश्न मला मनीषा कोयराला सारख्या कुणी सुंदरीने विचारला असता तर त्या विवेक मुश्रन सारखा लाजलो हि असतो. (विवेक मुश्रन चं नाव आठवलं राव, मानता कि नाही आपल्या मेमरीला). नाही म्हणायला राजेंद्र गानू सर ही मला इतके मस्त प्रश्न विचारत आहेत कि मला खात्री आहे, एक दोन महिन्यात ते मला सांगणार "अरे, जरा XXXXX कंपनीत visit करून ये, तिथे ५० एक मशिन्स आहेत. तुझा चांगला बिझिनेस वाढेल." (XXXXX याचा अर्थ या लेखापुरता सभ्य घ्यावा.). मध्ये दिवाळीला आपल्या सगळ्यांचा आवडता गणेश ने स्पिंडल ला जणू नववधू समजून असे बहारदार फोटो काढले कि काय सांगू. फेस बुकर प्राईज विजेत्या प्रिया प्रभुदेसाई या सुद्धा स्पिंडल बिझिनेस वर प्रोत्साहनपर कोटस टाकत असतात. (प्रिया ताई, तुम्हाला अरुंधती रॉय बद्दल फारसं ममत्व नसावं. पण हे फेसबुकर प्राईज आहे याची नोंद घ्यावी)

इतका सगळा गदारोळ झाल्यावर मी माझे नाव "राजेश स्पिंडलवाला" वाला का करू नये, या माझा मित्र सुबोध याच्या सुचनेवर मी गंभीर विचार करत आहे. (ज्याच्या बाईक मुळे या पामराचं प्रोफाईल पिक्चर मोनालिसा सारखं जगप्रसिद्ध झालं त्या बाईकचा मालक सुबोध आहे.) तसंही ५०% पेक्षा जास्त बोहरी शेजार असलेल्या आमच्या सोसायटीत हे नाव चपखल बसेल.

आता हे सर्व लिहिल्यावर "लवकरच येत आहे: स्पिंडल म्हणजे काय" अशी, बर्याच जणांना आवडणारे आणि बर्याच जणांना न आवडणारे माझे मित्र डॉ अभिराम दीक्षित यांच्या स्टायल ची पोस्ट नक्कीच पडेल.

खरं तर या लेखातल्या सगळ्यांना tag करणार होतो. पण विजयकुमार देशपांडे सरांच्या उघडtag  विरोधी पोस्ट मुळे आणि मीराताई यांनी काढलेल्या चिमट्या मुळे माझं मानसिक सक्षमीकरण झालं आहे. त्यामुळे ते महापाप माझ्याकडून कदापि होणार नाही. (तसं ते छोटंच पाप आहे, पण आजकाल या भूमीवर प्रत्येक गोष्टीमागे "महा" लिहिण्याची fashion आहे) काय आहे, फेसबुकवर नवीन आलो होतो, तेव्हा आपलं घर च्या विजय फळणीकर यांच्यावर लेख लिहिला होता. तो सर्वदूर पोहोचावा म्हणून tag चा सहारा लेखात सांगून घेतला होता. पण तरीही एक मित्रवर नाराज झाले होते. मग मीही त्यांच्यावर शरसंधान केले. बरं तेही मला ब्लॉक करत नाही अन मी हि त्यांना. हे म्हणजे एका वर्गात बाकावर बसून न बोलण्यासारखं आहे. (तुमच्या पेज ला लाईक करण्याची तुमची आज्ञा ही मान्य केली हो. आता तरी सोडा नाराजी).

(लेखात नेहमी प्रमाणे कंस जास्त झाल्यामुळे "फेसबुकवर चा कंस" या निलेश बंडाळे यांनी मला दिलेल्या उपाधीला जागलो आहे हे नम्रपणे नमूद करतो.) खरं तर कंसाबाहेरचे वाक्य कंसात टाकून आणि कंसात लिहायचे वाक्य कंसाबाहेर लिहून मी निलेशच्या आरोपाचा योग्य परामर्श घेतला आहे हे गर्वाने नमूद करतो आणि थांबतो.

रविवारचे रिकामे उदयोग

Wednesday, 26 November 2014

Amchi Kampani

काल फारच डोकं भनकल होतं. हा म्हणजे गोष्टच तशी घडली. नाही म्हणजे असेल तुमची मल्टी national वैगेरे. आहात तुम्ही माझे नेहमीचे कस्टमर. हे जे आले होते ते वेगळं department, नेहमी ओर्डर येते ती वेगळी लोकं. मला म्हणाले "आम्ही हे काम नेहमी करतो आणि मास्टर आहोत. आमच्या पद्धतीने तुम्ही काम करायचं. तेव्हा आमची दोन लोकं काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या माणसाबरोबर काम करतील. त्याला सांगतील काम कसं करायचं ते " शक्यतो आम्ही कुणाला असेम्ब्ली कशी करतो ते दाखवत नाही. पण कंपनी मोठी, दुसर्या डिविजन मधून येणारा बिझिनेस चांगला. म्हंटल ठीक आहे. पाठवा तुम्ही लोकं. शिकायला तर मिळेल.

आली दोघे जण. कदम आणि शेख नावं ठेवू. आणि काम चालू झालं. लेकाच्यांना काही म्हणता काही माहित नव्हतं.आमचा technician इरफान, पाहिजे ती मदत करत होता. मोठी होती हो स्पिंडल असेम्ब्ली. ती पूर्ण झाल्यावर म्हणाले "नाही हे बहुतेक चेक करायचं राहिलं आहे. असेम्ब्ली परत उघडा." गम्मत नाही हो ती असेम्ब्ली उघडायची. इरफान ने गपगुमान उघडली. जे चेक करायचं ते केलं. इरफान ने काम एक नंबर केलं होतं. बिनकामाची हमाली झाली होती. परत झालं सगळं काम.

आता टेस्टिंग. त्याच वेळेस मी तिथून जात होतो. मला बोलले "इथे आम्हाला हा एक parameter असा पाहिजे." आता ते टेक्निकल आहे म्हणून लिहित नाही, पण थोडक्यात "या भिंतीला luster पेंट लावून पाहिजे, पण मध्ये जर धब्बा दिसला पाहिजे किंवा फोफडे उडले पाहिजे" असं काही तरी. मी म्हणालो अहो हे नाही जमणार. उदया तुम्ही poultry मध्ये जाऊन म्हणाल "मला जरा नासकी अंडी पाहिजेत हो." तर म्हणाले "नाही आम्हाला तसंच पाहिजे." तर इरफान म्हणाला "अहो तसं करायचं असेल तर करून देतो पण लॉक नट लूज ठेवून स्पिंडल चालवावा लागेल." तर कदम भडकला ना "इरफान, तुला कळतं का काय बोलतो ते. नॉन टेक्निकल बोलतोस. असं कधी असतं का"

मग मात्र इतका वेळ शांत बसलेलो मी, सटकलो. त्याला बोललो "ए भाऊ, तू त्याची अक्कल काढतोस. तुझी जागेवर आहे का. तुम्ही जे मागताय ते तरी कधी असतं का? सकाळपासून माझा माणूस तुम्ही सांगाल ते काम करतोय. तुम्हाला जास्त नॉलेज म्हणून तुम्ही येणार होते. तुम्हाला माहित तर काहीच नाही वर आमच्या माणसाला शहाणपणा शिकवताय. हा जॉब उचला आणि जावा घेऊन" कदम सटपटलाच, तरी म्हणाला "कुणाला बोलताय कळतंय का. बिझिनेस जाईल तुमचा इतका मोठा."

मी बोललो "ओ कदम, तुमच्या या बिझिनेस पेक्षा मला माझ्या पोराचा, इरफानचा सेल्फ एस्टीम जास्त महत्वाचा आहे. तुमची भंकस ऐकून घ्यायला तो काही बांधील नाही आहे. आमच्या कंपनीत येउन आमच्याच माणसाची अक्कल काढताय, त्याची काही चुकी नसताना. नको मला तुमचा बिझिनेस."

"बघतोच तुम्हाला" वैगेरे म्हणत गेला. मी दट्ट आहे माझ्या भूमिकेवर. इरफानची चूक नसताना त्याच्यावर चिखलफेक करणाऱ्या कंपनीचा बिझिनेस नकोच मला, कितीही मोठी असू दे न ती.  

सल्ला

बर्याचदा वाचायला मिळतं, फेसबुकवर कमी यायला पाहिजे. व्यसन आहे. इथे बऱ्याचदा डोक्याला ताप होतो. आठवडयातून एकदाच यावे. कंपल्सरी पोस्ट टाकायच्या नाहीत. comment टाकायच्या नाहीत. फक्त लाईक द्यायचं. गेल्या दोन एक महिन्यात असे काही मेसेज आले कि मलाही वाटलं कि आपण पण इथला वावर जरा कमी करावा. नाही म्हणजे, आपली प्रकृती अशी कि कुणी "हाड" म्हणल्याशिवाय आपण काही जागचं हलत नाही. पण आता मेसेज खाली दिले आहेत.

********************************************************************************
मी लहानसा व्यावसायिक आहे. गेल्या दहा वर्षात प्रचंड चढ उतार अनुभवलेत . 8करोड वार्षिक उलाढाल पर्यंत पोहचून परत प्रचंड अपयश हि पाहतोय. अनेक professional motivation आणि managment सेमीनार्स ,पुस्तके , चिंतन ,psychiatrist  सगळे झाले. पण तुमच्या साध्या सरळ अनुभव सिध्द लिखाणाने जितक बळ  मिळाल तितक कशानेच नाही मिळाल ! धन्यवाद ! नाही तर शेतकरया सारखी उद्योकाकाची आत्महत्या का असू नये ..असे विचार भुंगा करीत डोके कुरतडत असतात. अर्थातच मी इतका दुर्बल नाहीच !पण थकतो हे मात्र खर ! कुठल्याही व्यावसायिक ,अथवा आर्थिक लालसे शिवाय एकदा तुम्हाला भेटुन , बोलून स्वतः ला अधिक channelized करता येईल असे वाटतंय. कारण आज सर्वाधिक गरज आहे ती एका friend, philosopher आणि guide ची . आपण थोडा वेळ दिलात तर आनंद होईल. धन्यवाद !!

*********************************************************************************

Rajesh, kindly give your Pune address where I can meet you next time when I come to Pune..I read your observations on automobile industry and without hesitating requesting your half an hour time to seek your guidance specifically on "Challenges in passenger car segment and future trends" I will inform you two days in advance before planning. I am based at Hyderabad. I hope you will love to help and will share your knowledge and experience. Thanks in advance 

*********************************************************************************

आता आली का पंचाईत. नाही म्हणजे लिहिताना तारे तोडणे वेगळं. आणि याची देही याची डोळा (अ) ज्ञान पाजळणं वेगळं. इथे म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. बरं हे मला मार्गदर्शन मागत आहेत. मला, मी कोण, तर ज्याला स्वत:च्या च मार्गाचं दर्शन झालं नाही त्याला. नाही म्हणजे, या तुम्ही. आपण चहा पिऊ, हवं तर जेवण करू एकत्र. पण हे guidance वैगेरे. टेन्शन येतं हो. काही बोलताना चुकलं, किंवा नाहीच बोलता आलं तर तुम्ही म्हणणार "लिहितो बरा चुरूचुरू. बाकी बोंबाबोंब आहे. नाव मोठं, लक्षण खोटं. बडा घर पोकळ वासा" न जाणो अजून काही. 

As a friend कधीही, कुठेही एका पायावर भेटायला तयार आहे आपण. पण त्याच्या पुढची भूमिका हि मोठया जोखमीची. responsibility आहे मोठी, नाही का? काही चुकीचा सल्ला जाईल, याची तुमच्यापेक्षा मलाच भीती जास्त आहे हो. बाकी काही नाही. 

सल्ला