Thursday, 21 July 2016

जोशी आणि मंडलिक

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझा चुलत भाऊ समीर पारीख ऑटो लिमिटेड नावाच्या नामांकित कंपनीत मेंटेनन्स ला होता. मॅनेजर म्हणून. मी एकदा स्पिंडल च्या कामानिमित्त त्याला भेटायला गेलो होतो. तिथे गेलो तेव्हा त्याने माझी जोशी नावाच्या दुसऱ्या मेंटेनन्स मॅनेजर शी ओळख करून दिली. समीर इलेक्ट्रिकल तर जोशी मेकॅनिकल.

मी पुढचे दोन तास दोघांचं निरीक्षण करत होतो. आणि मी पुढचे दोन वर्ष सतत भेटत होतो. जोशींच्या कामात विलक्षण धडाडी होती. समीर जिथे निर्णय घ्यायला कचरायचा, जोशी पटकन "हे करून टाक" किंवा पटकन सप्लायर ला फोन करून ऑर्डर करून टाकायचा. मी एकदा जोशीला हे बोलून दाखवलं तर म्हणाला "I do not like to procrastinate. I believe that action delayed is action denied."

जोशी रिस्क पण घ्यायचा. मी बिझिनेस मध्ये नवीन होतो. किंबहुना मला असं आज वाटतं की समीर माझा चुलत भाऊ असून तो मला काम द्यायला घाबरायचा. त्या कंपनीतून मला पहिली ऑर्डर मिळाली ती जोशी मुळेच. ऑर्डर मिळाल्यावर जोशीला धन्यवाद दिल्यावर, तो म्हणाला "अरे, नवीन सप्लायर ला प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. आणि मी तुमच्या प्रोसेस दोन तीन दा ऑडिट केल्या. मोठ्या कंपनीच्या आणि तुमच्या कामाच्या पद्धतीत काही फरक नाही दिसला. पैसे वाचत होते तुझ्या बरोबर. ऑर्डर देण्याची रिस्क घेऊ शकत होतो"

जोशी चं त्याच्या सहकाऱ्यांशी बोलणं दोस्तीचं होतं. हसी मजाक चालायची, पण काम म्हंटलं की जोशी सिरीयस असायचा, आपल्या म्हणण्यावर ठाम ही. समीर च्या बोलण्यात अरेरावी असायची. त्याच्या आवाजाचा प्रॉब्लेम होता की काय जाणे पण त्यात एक तुसडेपणा जाणवायचा.

एकदा मी फर्स्ट शिफ्ट संपताना गेलो होतो. जोशींची घरी जायची वेळ झाली होती, तरी तो कंपनीत होता. समीर ला बाय केल्यावर मी जोशींना विचारलं "काय नेहमीच थांबता का?" तर म्हणाला "हो रे, थांबावं लागतं. एकदा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की त्याची ओनरशीप घ्यावी लागते. And for that you might need to walk that extra mile"

पुढे दोघांनीही कंपनी सोडल्याचं कळलं आणि पारीख ऑटो च्या एका फास्ट ग्रोइंग वेंडर कडे जॉईन झाल्याचं कळलं होतं. मागच्या आठवड्यात समीर ला फोन केला, भेटायला येतो म्हणून, ख्याली खुशाली पण कळावी आणि काही बिझिनेस मिळतो का ते पण बघावं. गेल्यावर त्याने कार्ड दिलं Sameer Mandlik, Sr Manager Maintenance. कामाबद्दल बोललो तर "बघू, नंतर कधी तरी" वगैरे चालू झालं.

तेवढ्यात तिकडून एक परिचयाची व्यक्ती दिसली. हो, जोशीच तो. मी पटकन हात मिळवला. तर परिचयाचं हसू दाखवत जुनी ओळख पक्की झाली. समीर ला जोशी म्हणाले "अरे, तो स्पिंडल याला दे रिपेयर ला" समीर, कशाला, तो मोठा वेंडर वगैरे करू लागला. तर जोशी म्हणाले "No arguments Sameer. Please send spindle tomorrow itself" समीर म्हणाला "यस सर, पाठवतो मी"

कुतूहल म्हणून मी जोशीबरोबर कार्ड एक्स्चेंज केलं. कार्ड बघून मला आश्चर्य वाटलं नाही.

Vijay Joshi, Technical Director. 

Wednesday, 20 July 2016

Growth

एखादा माणूस जेव्हा काही छोटा  बिझिनेस चालू करतो, तेव्हा त्याने बऱ्यापैकी वैयक्तिक आणि आर्थिक रिस्क घेतलेली असते. काय बिझिनेस करायचा, कसा करायचा हे त्याच्या डोक्यात कायम भिरभिर करत असतं. हा बिझिनेस जेव्हा चालू होतो, तेव्हा त्याला बरेच रोल घ्यावे लागतात. अगदी कधी कधी हेल्पर चा सुद्धा. आणि सुरुवातीला तो बऱ्यापैकी हुकूमशाही पद्धतीने बिझिनेस चालवत असतो. बाकी मदतीला काही एम्प्लॉई असतात, पण ते बहुधा सांगितलेलं काम करत असतात. स्वतःचं डोकं वापरायची त्यांना फारशी मुभा नसते. अशा वागणुकीचे बरेच फायदे ही असतात. डिसिजन पटकन घेतले जातात आणि त्यावरची ऍक्शन पण. 


अशा वेळेस बिझिनेस ओनर २४ तास कामाचा विचार करता असतो, सात ही दिवस. बऱ्याचदा या आयुष्याबद्दल ते कम्प्लेंट करत असतात. पण काहीतरी करून दाखवण्याची आस इतकी जबरदस्त असते आणि या कामाचा ते इतका लुफत उठवत असतात की त्यांच्या प्रयत्नांचं  कौतुक त्यांना स्वतः ला वाटत असतं. 


आणि मग लहान मूल जसं तरुण होतं तसा बिझिनेस ही वयात येतो. आणि तेव्हा मात्र खूप वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागतं. बिझिनेस मध्ये होणाऱ्या वृद्धीचं मग तणावात रूपांतर होतं. कंपनी चालू केल्यावर जो आनंद मिळायचा तो गुल होतो. 
असं असेल तर मग वृद्धी कशाला हवी बिझिनेस मध्ये?. इथेच मेख आहे. एकदा तुम्ही कंपनी सुरू करून ती चालू केली की सायकल शिकल्यासारखं आहे. ते पेडल मारावं लागतंच. नाही तर पडला म्हणून समजायचं. बिझिनेस ग्रो करणं वा न करणं यात चॉईस उरत नाही. तुम्हाला व्यवसाय वृद्धी ही करावीच लागते. नाहीतर मग तो गुंडाळावा लागतो.

ग्रोथ आली की मग प्रकरण गुंतागुंतीचं होऊन जातं. डिलिव्हरी प्रेशर्स येतात. नवीन सिनियर आणि ज्युनियर लोकं आले. मग त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी. अहो इतकंच काय त्यांचं बलस्थान (स्ट्रेंथ) पण डोकेदुखी होऊन बसते. आणि हे सगळं व्यवस्थित मॅनेज केलं नाही तर कंपनीची पाटी गायब होण्याचीच शक्यता जास्त.

गंमत अशी होते की, बिझिनेस वाढला तरी ओनर ला प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीवर आणि ती करणाऱ्या प्रत्येक माणसावर नियंत्रण ठेवावं वाटतं. आणि इथे सगळी गडबड होते. या ठिकाणी ओनर ला काम करण्याच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं असतं. बिझिनेस ग्रोथ च्या गरजा वेगळ्या होतात. कम्युनिकेशन, मग ते कस्टमर बरोबर असू द्या वा टीम मेंबर मधलं, त्याचा स्पीड आणि क्वालिटी यात फरक येणं गरजेचं झालं.

मालक मात्र नियंत्रकाच्या भूमिकेत वावरत असतो. अशा नियंत्रकांच्या भूमिकेमुळे तो बिझिनेस ओनर च ग्रोथ साठी मोठा अडथळा होऊन बसतो. त्याच्या आडमुठ्या वागण्यामुळे तो उद्योग ग्रोथच्या अनेक संधी गमावतो.
जो पर्यंत बिझिनेस लहान असतो तो पर्यंत बिझिनेस चा ओनर हीच त्या कंपनीची ओळख असते. आणि एकदा का वृद्धी झाली की मग मात्र मालक आणि मॅनेजमेंट हे अलग होणं क्रमप्राप्त होतं. पण हा असा घटस्फोट, मालकी हक्क गाजवणाऱ्या आणि कुठल्याही प्रॉब्लेम वर विजय मिळवण्याची क्षमता माझ्यातच आहे असं समजणाऱ्या मालकांच्या पचनी पडत नाही. 
कंपनीचे ओनर हे कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात, किंबहुना जातातच. पण कंपनीचा कंट्रोल स्वतः च्या हातून मॅनेजमेंट च्या दुसऱ्या मंडळींच्या हातात देताना मात्र कचरतात. नाही म्हणजे त्यांची फाटतेच. बिझिनेस चा लगाम अलगद दुसऱ्याला देण्यासाठी बुद्धी तर लागतेच पण प्रचंड धैर्य ही लागतं. 
बिझिनेस ची वृद्धी हि एक तर बिझिनेस ला वरच्या इयत्तेत टाकते नाही तर झोपवते. The latter is more than likely unless founders change from driving /controlling to managing /leading, and from doing /driving to enabling /facilitating.

मुळात लोच्या असा असतो की मालकाला वाटतं, मीच एकटा शहाणा. मलाच कळतं कुठं काय करायचं अन कसं करायचं. ओनर ला जो विरोध करतो तो बिझिनेस चा दुश्मन. हे टाळण्यासाठी मग बिझिनेस ओनर मॅनेजमेंट च्या की पोझिशन ला आपले जवळचे नातेवाईक आणून ठेवतात. आता या नातेवाईक मंडळींनी कितीही विचित्र तारे तोडले तरी हाकलून देता येत नाही. आणि मग मॅनेजमेंट ला काम करणं हे दुस्तर होऊन बसतं. जगातल्या कुठल्याही प्रचंड कंपन्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या मॅनेजमेन्ट मध्ये प्रोफेशनल्स चा भरणा असतो. (या प्रकाराला सन्माननीय अपवाद असतात पण, ते बोटावर मोजण्याइतके). 

मॅनेजमेंट वर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली जाते पण ऑथॉरिटी मात्र स्वतः: कडे किंवा ह्या फॅमिली मेम्बर कडे. अशा वेळेस चांगली माणसं सोडून जातात आणि जी राहतात त्यांचा प्रकाश पडत नाही. बऱ्याचदा तर बघितलं आहे की खूप चांगलं काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला बिझिनेस ओनर आपला प्रतिस्पर्धी समजतो. आणि मग कंपनी राजकारणाचा आखाडा बनतो. 

आणि मग हे असं घडलं की मग मात्र कंपनीची उतरंड चालू होते. बिझिनेस ओनर जो एकेकाळी हिरो असतो, त्याला लोकं अक्षरश: सहन करतात आणि कंपनी रडतखडत चालू लागते. आणि मग एखाद्या ग्रेट म्हणून ओळखल्या जाऊ शकणाऱ्या कंपनीची ऱ्हासाकडे वाटचाल होऊ लागते.

- मूळ इंग्रजी लेखक गुरविंदर सिंग 

Wednesday, 6 July 2016

पार्टनर १

मी म्हणालो पार्टनरला "काय रे, इतक्या बेफाम गर्दीत तू इतका कुल पणे कसा गाडी चालवतो"

पार्टनर म्हणाला "कसं आहे, मी सगळ्यांना पुढे जाऊ देतो मग मला खूप मोकळा रस्ता मिळतो. मग मी निवांत गाडी चालवतो"

मी: अरे, याला काय अर्थ आहे. सगळे तुझ्या पुढे निघून जातील ना!

पार्टनर: त्याने काय फरक पडतो. आणि खरं सांगू, यातील बरेच जण पुढच्या सिग्नल वर नाही तर एखाद्या ट्राफिक जॅम मध्ये भेटतात.

मी: अरे, पण तुला पहिले निघून जावं असं कधी वाटत नाही?

पार्टनर: नाही वाटत. मला नाही आवडत त्या रॅट रेस मध्ये पळायला. आणि गंमत म्हणजे "Even if you win this rat race, you are still rat"

पुढे म्हणतो कसा, "आयुष्यात ही मी असाच जगतो"

आयला, हा पार्टनर म्हणजे खरंच डोक्याला खुराक आहे.

बलविंदर

मी त्याला भेटलो तेव्हा फारच इम्प्रेस झालो होतो. झकास ऑफिस, त्याचा तिथला वचक, बाहेर उभी असलेली बी एम डब्ल्यू, त्याने दाखवलेलं अगत्य. एकदम टकाटक. तो त्या ऑफिसचा मालक होता याबाबत माझ्या मनात अजिबात संदेह नव्हता. बलविंदर नाव त्याचं. सुपर प्रिसिजन नावाची त्याची कंपनी. एक्स वाय झेड नावाच्या जगातल्या सर्वोत्तम बेअरिंग कंपनीचे वितरक आहेत ते. ज्या पद्धतीने बलविंदर कंपनी चालवायचा त्यामुळे कंपनीची सॉलिड भरभराट होत होती.

माझी आणि बलविंदर ची ओळख झाल्यावर त्याने मला काही वर्षांनी सांगितलं की तो त्या कंपनीचा ओनर नाही आहे तर तो जनरल मॅनेजर आहे. पण मला हे कळलं तेव्हा त्याची अन माझी ओळख होऊन तीन वर्ष होऊन गेली होती. माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. पण आता तोच सांगत होता म्हंटल्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला विचारलं,  हे कसं काय जमलं बुवा तुला?

तर स्टोरी अशी होती की कंपनीचे मालक कलकत्त्याला राहतात. ९५ च्या सुमारास त्यांना दिल्ली भागात बिझिनेस वाढवायचा होता. हा बलविंदर त्यांच्या संपर्कात आला. त्याने बेफाम काम सुरु केलं. मला सांगताना बलविंदर ने सांगितलं "माझं एक आहे. मी कंपनीचा नोकर आहे असं मी कधीच मानत नाही. मी स्वतः ला कंपनीचा ओनर समजतो. आणि सगळे निर्णय तसे घेत गेलो. मालकांनी त्यावर कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. बिझिनेस वाढवताना मी मालकांना पैसे मागत नव्हतो, त्यामुळे त्यांनीही मला कधी आडकाठी आणली नाही"

हे सांगताना सुद्धा त्याने एक किस्सा सांगितला. कंपनी भाड्याच्या जागेत होती. जागा कमी पडत होती. तिथपासून काही अंतरावर बलविंदर ला हवी तशी जागा/बिल्डिंग मिळत होती, पण भाड्याने नव्हे तर विकत. त्याने मालकाला सांगितलं. साडेसहा कोटी किंमत. ओनर टाळाटाळ करत होते. या पठ्ठ्याने एक इनव्हेस्टर शोधून स्वतः अख्खी बिल्डिंग विकत घेतली अन कंपनीला भाड्याने दिली. जेव्हा मालकाने ती विकत घेण्याची तयारी दाखवली तेव्हा एक मिनिट वाया न घालवता कंपनीला मामुली प्रॉफिट वर ट्रान्सफर केली.

९८ साली बलविंदर ला मारुती ८०० द्यायला खळखळ करणाऱ्या मालकाने २००७ साली बी एम डब्लू दिली आणि आता त्याने अजून एक स्वतः घेतली. दुसरी घेताना मी त्याच्या समोर होतो. ती घेण्याआधी सचिन तेंडुलकरची एम ६ उचलायचा त्याचा प्लॅन होता. किमतीवरून फिसकटला.

शक्यतो आपण नोकरदार आधी गोष्टी मिळाव्यात अशी आशा ठेवतो आणि मग जेवढे मिळतील त्याला अनुरूप काम करतो, नंतर आयुष्यात पुढची पायरी गाठतो. (Having-Doing-Being). बलविंदर सारखी माणसे शिडीच्या शेवटच्या पायरीवर जाऊन मनाने उभे राहतात. त्याचप्रमाणे ते कामाची दिशा ठरवतात आणि मग त्यांना पाहिजे त्या गोष्टी पायाशी लोळण घेतात. (Being-Doing-Having).

म्हणून जुनाच धोशा परत लावतो

"Be an employee, be an employer"

डॉक्टर, तुम्हीच

नाही नाही, हा व्हाट्स अप फॉरवर्ड नाही आहे. दस्तुरखुद्द अस्मादिक (काय कौतुक. आवरा) सदर डॉक्टरकडे पेशंट म्हणून गेले आहेत. एकदा २००९ साली. वडिलांना घेऊन. अत्यंत स्थितप्रज्ञतेने त्यांनी समजावून सांगितलं "लास्ट स्टेज पोटाचा कँसर आहे. फार तर सहा महिने. Palliative treatment म्हणून एक छोटं ऑपरेशन करू यात. बाकी खूप खर्च करण्यात अर्थ नाही" तेव्हाही ही पाटी होतीच. पण तेव्हा स्मार्ट फोन नव्हते, फेसबुक ही नव्हतं. काही दिसलं की फोटो उडवायची खाज नव्हती, लिहायची पण नव्हती अन या त्या डेज ला शुभेच्छा द्यायची तर त्याहून नव्हती.

चार महिन्यापूर्वी बेकार पोट दुखत होतं. आमच्या एरियातल्या एका डॉक्टर कडे ट्रीटमेंट घेतली पण काय बरं वाटेना. बरं घरच्या डॉक्टर ची थेअरी अशी की पोटदुखी, ताप, सर्दी असले आजार औषध घेतले की आठवड्यात बरे होतात. अन नाही घेतले तर सात दिवसात. त्यामुळे त्यांच्याकडे तब्येत दाखवायची काही सोय नाही.

मग परत हे डॉक्टर आठवले. त्यांच्याकडे गेलो.  ही पाटी दिसली. लागलीच हात सरसावले. स्मार्ट फोन काढला, खिच्याक. मध्ये फेबु वर नसल्यामुळे फोटो माझ्या अद्वितीय संग्रहात पडून होता. आज वाचलं की डॉक्टर डे आहे म्हणून.

शोधून काढला. शुभेच्छां बरोबर तो फोटो ही झळकवतो.

खूप मस्त वाटतंय. अगदी डॉक्टरांच्या ट्रीटमेंट नंतर पोट दुखायचं थांबलं, त्यापेक्षाही मस्त.

(त्यांचं नाव दिसू नये अशी मी काळजी फोटो काढताना घेतली असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. तो माझ्या फोटोग्राफीच्या दिव्य कलेचा नमुना आहे. पण पोस्टला फिट आहे. कसलं ना! गिरे तो भी टांग ऊपर)

कॉपी पेस्ट, शेयर आणि मी.

कॉपी पेस्ट, शेयर आणि मी.

(इडली, ऑर्किड आणि मी च्या चालीवर)

मी इथे अधून मधून लिहितो. त्याचा दर्जा वगैरे काय असतो हा वादाचा मुद्दा आहे. माझा एक कॉलेज चा मित्र म्हणतो, "तू काय लिहितोस ते काही फार भारी नाही आहे. समोर आलेले अनुभव शब्दबद्ध करतोस. लिखाण म्हणजे, जे तुम्ही बघत नाही त्या पलीकडे जाऊन लिहिणं. तिथे कल्पकता दिसते. त्यामुळे तू काही फार हुरळून जाऊ नको" असो. तो काहीही म्हणत असला तरी इथे मला वेगळ्या प्रतिक्रिया ऐकू येतात. इतकंच नाही तर विविध लोकं ते शेयर करतात. यात वेगवेगळ्या वयोगटातले लोकं आले. माझ्यापेक्षा वयाने लहान, मोठे आणि समवयीन.  गंमत अशी की काही जण शेयर करताना माझी परवानगी मागतात. तिथे मात्र मी पाणी पाणी होतो.

मला सगळ्यांना हेच सांगणं आहे की शेयर करताना माझी परवानगी ची गरज नाही आहे. तुम्ही ते खुशाल शेयर करू शकता.

काय आहे, हा प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे शेयर करू नका असा अट्टहास ठेवण्यात काही मतलब नाही. शेयर करताना माझं नाव लिहिलंत तर आनंद आहे. ते नाही लिहिलं तरी मला स्वतः ला काही फरक पडत नाही. अगदी थोडक्यात सांगतो की जो पर्यंत माझ्या शब्दांचा वापर करून कुणी पैसे कमवत नाही तो पर्यँत हे या इंटरनेट च्या नभंगणात कुठेही फिरलं तरी माझी काही हरकत नाही. पैसे जरी कमावले तरी आकांडतांडव करण्या पलीकडे मी काही करू शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आणि तो करण्याचा हक्क बजावेल हे नक्की. अर्थात हे सगळं इतकं आत्मविश्वासाने लिहिण्याचं कारण हे आहे की त्या लिहिण्याला व्हॅल्यू , काही लोकं म्हणतात तशी, असेलही कदाचित, पण त्याला किंमत नाही याची मला मनोमन कल्पना आहे.

याचं कारण आहे. माझं फुटकळ लिहिणं फुकट लोकांपर्यंत पोहोचेल अशी या फेसबुकची किमया आहे. अन ते तसं पोहचावं हा माझा निर्णय आहे. एका लाइक ला पाच रुपये पडतील आणि ते गोळा करण्यामागे कितीही उदात्त हेतू लिहिला तरी माझ्या पोस्टवर लाइक करणे तर दूर, मित्र यादीत किती जण ठेवतील हा प्रश्न आहे. त्यामुळे फेसबुक अन व्हाट्स ऍप वर लिहून जर नंतर माझं नाव काढून कुणी शेयर केलं तर आरडाओरड करण्यात काही मजा नाही असं मला वाटतं. मायक्रोसॉफ्ट ने सुरुवातीला स्वतः पायरेटेड सॉफ्टवेयर मार्केट मध्ये वाटले अन नंतर त्यावर बोंब मारण्यासारखा प्रकार आहे तो.

ज्यांच्या विचारांची, लिखाणाची लोकं किंमत करतात ते ती कशी वाजवून घेतात हे मी पाहतो. काही चांगलं ऐकायला मिळावं यासाठी मी २००० रुपये तासाला मोजले आहेत. बाकीच्यांचं काय घ्या, फार काही तारे न तोडता सुद्धा शिरपूरच्या प्राचार्यांनी पाकीट दिलंच की मला.  फेसबुकच्या मित्रांनी सुद्धा पुस्तकं, काव्य संग्रह प्रकशित केलीच आहेत. 

एकदा एका कॉन्फरन्स मध्ये एक उद्योजक आपण ट्रेन केलेली लोकं, शिकून झालं की कसं दुसरीकडे जातात याची कैफियत मांडत होता. वक्ता की जो एका जापनिज कंपनीचा एम डी होता, म्हणाला "इतकी पण काळजी करू नका. तुम्ही ट्रेन केलेला माणूस तुमच्या सेगमेंट मध्ये, मग दुसऱ्या इंडस्ट्रीत का असेना, काम करतोय यात समाधान माना. इंडस्ट्री प्रति, समाजाप्रती तुमची काही लायबेलिटी आहे, ती पूर्ण केली असं समजा". त्याच धर्तीवर माझे शब्द स्वतः चे म्हणून कुणी खपवले तर गालातल्या गालात हसून आनंद घेण्यात काय हरकत आहे.

अर्थात हे माझं स्वतः चं मत आहे. बाकी अनेक विचाराप्रमाणे त्याला ही काही फारशी किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. ☺☺

टीसी

काही काही लोकांचा मला लहानपणापासूनच दरारा जाणवतो. पोलीस एक आणि दुसरे लोकं म्हणजे रेल्वे चे टी सी. अगदी आता आता पर्यंत टी सी रेल्वे त तिकीट चेक करायला आला की ते चेक करून मला परत देईपर्यंत माझ्या हृदयाची धडधड वाढलेली असायची.

तसं बघायला गेलं तर निवांत लोकं असतात, ही टी सी मंडळी. बरं पोलिसांसारखा राकट भाव ही नसतो त्यांच्या चेहऱ्यावर. तरीहि त्यांच्याबद्दल माझ्या मनात दहशत का होती हे एक न सुटलेलं कोडं आहे.

त्यांच्या प्रोफेशन बद्दल आकर्षण ही आहे. कदाचित ते घालत असलेला कोट अन टाय यामुळे ते निर्माण झालेलं असावं. पूर्वी तर ते टोपी ही घालायचे.  काही टी सी जरी कडक बिडक कोट घालत असले तरी बहुतांश जरा जुनाट च घालतात. समाजातल्या सर्व वर्गाशी संबंध येणाऱ्या या लोकांच्या गणवेशात कोट अन टाय चा समावेश कुणी आणि का केला असावा हा प्रश्न माझ्या मनात बऱ्याचदा येऊन गेला आहे. आजकाल दिसत नाही, पण पूर्वी यांची नियमानुसार आणि टॉयलेट च्या बाजूला होणारी वसुली बरीच असायची. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण होताना ते कोटाच्या खिशातून बऱ्याच नोटा काढायचे. ते सुद्धा आकर्षणाचे कारण असावे.

त्यांची बाकीची आयुधं अगदी कित्येक वर्ष जशीच्या तशी आहेत. एक ब्रिफकेस अन हातात तिकिटाच्या लिस्ट चं भेंडोळं. पूर्वीच्या टंक सदृश लोखंडी पेट्यांची जागा आता व्ही आय पी ने घेतली हाच तो काय फरक. त्या ब्रिफकेस मध्ये काय असेल याचा मी आता अंदाज बांधू शकत असलो तरी लहानपणी बरीच उत्सुकता असायची. बहुधा त्यात नोटाच असाव्यात असं वाटायचं.

दिवसा किंवा रात्री कधीही तिकीट चेक करायला आले तर टी सी च्या डोळ्यावर मी कधीही झोप बघितली नाही आहे. ही किमया ते कशी साधू शकतात हे एक आश्चर्यच आहे. ते स्वतः ला ठेवतात ही व्यवस्थित. घोटलेली दाढी, व्यवस्थित भांग, अगदी शुभ्र नसले तरी बऱ्यापैकी पांढरी शर्ट पँट, वर उल्लेखलेला कोट, त्यावर एकीकडे त्यांचं नाव, तर दुसरीकडे भारतीय रेल्वे चा शिक्का कोरलेला बिल्ला असा वेष घातलेली एक कुटुंब वत्सल व्यक्ती समोर येते. आपल्याला असलेल्या अधिकाराचा अत्यंत सुयोग्य वापर करत असल्यामुळे त्यांच्या बद्दल आदर मिश्रित भीती वाटते. आता पर्यंत मी हजारो रेल्वे प्रवास केले आहेत. पण या प्रवासात एका ही टीसी शी कडक्याचं तर सोडाच पण आवाज चढवून भांडण पाहिल्याचं माझ्या लक्षात नाही आहे. बरं इतके लोकं डब्यात असले तरी त्यांच्याशी वायफळ बडबड करताना ही मी त्यांना कधी बघितलं नाही आहे. एखाद्या सुंदर तरुणींचे किंवा माझ्यासारख्या अजागळ माणसाचं तिकीट बघताना एकच प्रकारचा स्थितप्रज्ञ भाव तोंडावर ठेवणे हे योगी माणसाचं लक्षण आहे. आपण बरं आणि आपलं काम बरं असा त्यांचा खाक्या असतो.

ही लोकं कधी त्यांच्या कामाबद्दल फारशा कंप्लेंट करताना ही दिसत नाहीत. कधी संपावर गेल्याचं आठवत नाही. डब्यात त्यांचा वावर अगदी उत्फुल दिसत नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावर वैफल्य ही दिसत नाही. अत्यंत निर्विकारपणे ते काम करतात अन डब्यातून निघून ही जातात.

त्यांच्या कामाच्या वेळा हा माझा आजही कुतूहलाचा विषय आहे. ते डब्यात शिरतात अन साधारण चार पाच तासाने कुठल्याशा स्टेशन वर उतरतात. त्यांचं घर कुठल्या गावाला असतं, जिथे चढतात की जिथे उतरतात तिथे, की अजून भलत्याच गावाला, उतरल्यावर ते राहतात कुठे, जेवतात कुठे, ते जर इतके फिरतात तर त्यांचे घरचे लोकं त्यांची काळजी करतात का, आपली पोरं प्रवासातून घरी आलो की चिकटतात, त्यांची ही तसंच करत असतील का, डब्यात तिकीट चेक केल्यावर अन चार्ट वर अतिशय बारीक अक्षरात काही लिहिल्यावर ही लोकं पुढचं स्टेशन येईपर्यंत गायब असतात, मग तेव्हा ते काय करतात, ते नेहमीच रेल्वे च्या पँट्री चं खातात का, त्यांचे कपडे पांढरे कसे राहतात, शूज नेहमीच पॉलिश केलेले कसे असतात असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात कायम रुंजी घालतात.

खरं तर त्या चार तासाच्या प्रवासासाठी टीसी त्या दोन किंवा तीन डब्यांचा अनभिषिक्त सम्राट च असतो. पण तरीही त्यांच्या वागणुकीत तो तोरा नसतो. अगदी आऊट ऑफ वे जाऊन त्यांना फारसे निर्णय घेता येत नसावेत पण मी बऱ्याच टीसी ना एखाद्या कुटुंबाला, अडलेल्याला जमेल तशी मदत करताना कैक वार बघितलं आहे.

ज्या कुणी या लोकांचा गणवेश, कामाच्या वेळा, जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ठरवल्या असतील तो प्रोफेसर ग्रेट च म्हंटला पाहिजे.

वर्षानुवर्षे अत्यंत निगर्वीपणे काम करणाऱ्या या टीसी जमातीला प्रेमभरा नमस्कार.

(खरं तर मानाचा मुजरा वगैरे लिहिणार होतो, पण टीसी मुजरा केल्यावर येऊन आपले दोन्ही हात पकडतील आणि म्हणतील "अहो, मुजरा कशाला, आपला नमस्कार बराय")