Thursday, 21 July 2016

अहंकारी

ज्यांना थर्मामीटर, स्टेथोस्कोप, होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक, घड्याळ, सायकल, बॅटरी सेल, चष्मा, शिलाई मशीन, रबर, इलॅस्टिक, कपड्याची झिप हे साधे शोध लावता आले नाहीत ते स्वतः ला फार ज्ञानी म्हणवून घेतात म्हणजे नुसता पोकळ अहंकार पोसायची वृत्ती आहे.

काय, वाक्यात कसला दम आहे की नाही?

होल्ड ऑन. वाक्य माझं नाही आहे. पण सुचलं असतं तर फार भारी वाटलं असतं.

एका सद्गृहस्थांची मित्र विनंती स्वीकारल्यावर त्यांनी मला टाईम लाईन वर पाठवलेला मेसेज आहे.

सॉलिड आवडला.

स्वागत अशा मेसेजने करणारे मित्र आहेत, म्हणून आमचे पाय जागेवर आहेत. नाहीतर आपण फारच अहंकारी आहोत बरं!

सांगून ठेवतो. हा!

लायर्स प्रॉस्पर

Liars prosper

दोनच शब्दांची पोस्ट पण डोकं घुसळवून गेली. अर्थात पोस्ट शिवा ची होती. त्याचं असं आहे, थोडक्यात खूप काही सांगून जातो.

पण ही संपन्नता आपण कशात मोजतो यावर सगळं अवलंबून आहे. ती पैशात च मोजणार असू तर त्यात नक्कीच तथ्य आहे. पण prosperity ही नेहमी पैशात च मोजली जात नाही हे ही तितकं च खरं आहे. दोन्ही वाक्यातला च फार महत्वाचा आहे.

आता हेच बघा ना, अंबानी आणि टाटा. दोन अत्यंत भारदस्त नावं. भौतिक संपत्तीचा विचार करता अंबानी कित्येक मैल टाटांच्या पुढे. पण संपन्नता जेव्हा नैतिकतेच्या तराजूत तोलली जाते तेव्हा मात्र टाटा कुठं आहेत हे सांगायला कुणा बिझिनेस पंडितांची गरज नाही आहे.

जिम कोलिन्स नावाच्या लेखकाचं पुस्तक नुकतंच वाचलं "built to last". थोडं किचकट आहे, पण ज्यांना आपला बिझिनेस १०० वर्षं चालावा असं वाटत असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. ज्यांची झेप "आपल्या नंतर कोण बघणार हा बिझिनेस?" असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जाऊ नये.

तुमच्या स्वतः च्या core values (मूळ सिद्धांत) आणि core purpose (मूळ उद्देश) बिझिनेस करताना काय आहेत, हे शोधायला हे पुस्तक मदत करते. आणि हे सिद्धांत पैशाच्या पलीकडे आहेत. अत्यंत अवघड असा exercise आहे. आपलं असणं हे कशासाठी आहे हे शोधणं.

तुम्ही कधी आर्मी च्या कुठल्या ऑफिस ला गेला आहात का? तिथल्या कोअर वॅल्यूज वाचाच. अंगावर काटा उभा राहतो. आर्मीचा जवान देशावर आपली जान न्योछावर करायला कसा तयार होतो हे ते सिद्धांत वाचून कळतं.

आणि प्रत्यक्ष जीवनातही हे मूळ सिद्धांत आणि मूळ उद्देश असेच असावेत की साला जीव गेला तरी बेहत्तर पण मी माझ्या वॅल्यूज पासून ढळणार नाही. आर्मी आणि आपल्यात हाच फरक आहे की बिझिनेस डेथ बेड वर असेल तर तुम्हाला कन्सेशन आहे.

काही जिवंत उदाहरणं आहेत. आपलं घर चे विजय फळणीकर, स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी, आणि फार दूर कशाला फेबु वर ऍक्टिव्ह असणाऱ्या प्रथितयश लेखिका कविता महाजन यांचं जीवन म्हणजे संपन्नता काय आहे याचा वस्तुपाठ आहे. ही लोकं आपल्या जगण्यातून त्यांचा उद्देश आणि ते कुठल्या सिद्धांतावर, याचा वेळोवेळी प्रत्यय देत असतात. भौतिक संपन्नतेच्या निकषावर ही मंडळी 'फोर्ब्स' च्या लिस्ट वर आसपास ही पोहोचणार नाहीत, पण माझ्या लेखी ह्यांच्या सारखी जमात जगात अतिशय दुर्मिळ आहे हे नि:संशय.

ज्यांचं असणं हे बाह्यरूपानं तोललं जातं, पण त्यांचं अंतरंग काही वॅल्युज जपत असतं, अशांना मात्र त्या शोधाव्या लागतात. आणि त्या एकदा सापडल्या की जगणं हा एक सोहळा असतो. एखाद्या ग्लायडर ला ते भलं मोठं शीड घेऊन धावावं लागतं तशा त्या वॅल्युज मग खांद्यावर वाहाव्या लागतात आणि एकदा की मग कड्यावरून दरीत झेप घेतली की आपण विनासायास विहार करत राहतो.

संपन्नता ह्याला म्हणतात राजा!

आपलं घर

आपलं घर........खुपदा गेलो आहे मी तिथे. आता सवय झाली. भावूक वगैरे होत नाही. तिथल्या मुलामुलींची निरागसता, आजी आजोबांची व्याकुळता, तिथली नि:शब्द शांतता हे पाहून डोळ्यातील पाणी थोपवण्याची गरज पडत नाही. फळणीकर तिथल्या म्हाताऱ्या आजीचा सुरकुतलेला गाल ओढून "माझी माय गं तू" हे म्हणतात तेव्हा मी तिथल्या ताई सारखा फसकन हसतो. आधी सारखा आवंढा गिळत नाही. तिथे पोहोचलो की पोरं पोरी एकसुरात "नमस्कार काका" तेव्हा सराईत पणे हात दाखवतो. जेवायला बसलो की मोठमोठ्याने "वदन कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे" म्हणताना आता अवघडल्यासारखं वाटत नाही.

फळणीकर म्हणाले "आमच्या मुलांशी संवाद साधा. बाहेरच्या जगात काय चालू आहे त्याचा अंदाज येऊ द्या. तुम्ही फिरता इतके". त्या बिचार्यांना काय माहित की मलाच कळत नाही अजून पाण्याची खोली किती आहे ते. अजूनही दोन्ही पाय बुडवून बघतो मी आणि मग गटांगळ्या खातो. पण माझ्या बद्दलच्या गैरसमजाला तडा नव्हता जाऊ द्यायचा. मी पटकन हो म्हंटलं.

या फोटोतली मुलं मुली बघताय? कुणाला आय पी एस, तर कुणाला कॉम्पुटर इंजिनियर, कुणी आर्किटेकट, तर कुणी वकील बनू इच्छितं. दोन मुलींना एअर होस्टेस व्हायचं आणि ज्याच्या खांद्यावर माझा हात आहे त्याला डॉक्टर व्हायचं आहे. त्याला मी विचारलं "हृदयाचा डॉक्टर होणार का?" तर म्हणाला "नाही, मला मेंदूचा डॉक्टर व्हायचंय?" मी त्याला सांगितलं "तू हो बाबा. तसंही मेंदूवरच्या इलाजाची बऱ्याच जणांना गरज आहे" हं, आणि पोरगा आठवीला आहे. फळणीकरांनी या मुलामुलींना उभं केलं हे कर्तृत्व वादातीत आहे पण ही जगण्याची उमेद निर्माण केली आहे ती अद्भुत आहे.

सव्वा तास बोललो. इतक्या लहान मुलांशी संवाद पहिल्यांदा साधला. अवघड असतं ते. किती convey करू शकलो देवच जाणे. शाळेतल्या शिक्षक मंडळींसमोर मी मनोमन नतमस्तक झालो.

त्यांच्या बरोबर जेवण करून निघालो. मुलं परत किलबिल करत म्हणाली "काका, परत या". मी ही हसत त्यांचा निरोप घेतला. आता गलबलून येत नाही, कारण मी परत तिथे लवकर जाणार असतो.

रविवार नखशिखांत सत्कारणी लागतो. 

जोशी आणि मंडलिक

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझा चुलत भाऊ समीर पारीख ऑटो लिमिटेड नावाच्या नामांकित कंपनीत मेंटेनन्स ला होता. मॅनेजर म्हणून. मी एकदा स्पिंडल च्या कामानिमित्त त्याला भेटायला गेलो होतो. तिथे गेलो तेव्हा त्याने माझी जोशी नावाच्या दुसऱ्या मेंटेनन्स मॅनेजर शी ओळख करून दिली. समीर इलेक्ट्रिकल तर जोशी मेकॅनिकल.

मी पुढचे दोन तास दोघांचं निरीक्षण करत होतो. आणि मी पुढचे दोन वर्ष सतत भेटत होतो. जोशींच्या कामात विलक्षण धडाडी होती. समीर जिथे निर्णय घ्यायला कचरायचा, जोशी पटकन "हे करून टाक" किंवा पटकन सप्लायर ला फोन करून ऑर्डर करून टाकायचा. मी एकदा जोशीला हे बोलून दाखवलं तर म्हणाला "I do not like to procrastinate. I believe that action delayed is action denied."

जोशी रिस्क पण घ्यायचा. मी बिझिनेस मध्ये नवीन होतो. किंबहुना मला असं आज वाटतं की समीर माझा चुलत भाऊ असून तो मला काम द्यायला घाबरायचा. त्या कंपनीतून मला पहिली ऑर्डर मिळाली ती जोशी मुळेच. ऑर्डर मिळाल्यावर जोशीला धन्यवाद दिल्यावर, तो म्हणाला "अरे, नवीन सप्लायर ला प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. आणि मी तुमच्या प्रोसेस दोन तीन दा ऑडिट केल्या. मोठ्या कंपनीच्या आणि तुमच्या कामाच्या पद्धतीत काही फरक नाही दिसला. पैसे वाचत होते तुझ्या बरोबर. ऑर्डर देण्याची रिस्क घेऊ शकत होतो"

जोशी चं त्याच्या सहकाऱ्यांशी बोलणं दोस्तीचं होतं. हसी मजाक चालायची, पण काम म्हंटलं की जोशी सिरीयस असायचा, आपल्या म्हणण्यावर ठाम ही. समीर च्या बोलण्यात अरेरावी असायची. त्याच्या आवाजाचा प्रॉब्लेम होता की काय जाणे पण त्यात एक तुसडेपणा जाणवायचा.

एकदा मी फर्स्ट शिफ्ट संपताना गेलो होतो. जोशींची घरी जायची वेळ झाली होती, तरी तो कंपनीत होता. समीर ला बाय केल्यावर मी जोशींना विचारलं "काय नेहमीच थांबता का?" तर म्हणाला "हो रे, थांबावं लागतं. एकदा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की त्याची ओनरशीप घ्यावी लागते. And for that you might need to walk that extra mile"

पुढे दोघांनीही कंपनी सोडल्याचं कळलं आणि पारीख ऑटो च्या एका फास्ट ग्रोइंग वेंडर कडे जॉईन झाल्याचं कळलं होतं. मागच्या आठवड्यात समीर ला फोन केला, भेटायला येतो म्हणून, ख्याली खुशाली पण कळावी आणि काही बिझिनेस मिळतो का ते पण बघावं. गेल्यावर त्याने कार्ड दिलं Sameer Mandlik, Sr Manager Maintenance. कामाबद्दल बोललो तर "बघू, नंतर कधी तरी" वगैरे चालू झालं.

तेवढ्यात तिकडून एक परिचयाची व्यक्ती दिसली. हो, जोशीच तो. मी पटकन हात मिळवला. तर परिचयाचं हसू दाखवत जुनी ओळख पक्की झाली. समीर ला जोशी म्हणाले "अरे, तो स्पिंडल याला दे रिपेयर ला" समीर, कशाला, तो मोठा वेंडर वगैरे करू लागला. तर जोशी म्हणाले "No arguments Sameer. Please send spindle tomorrow itself" समीर म्हणाला "यस सर, पाठवतो मी"

कुतूहल म्हणून मी जोशीबरोबर कार्ड एक्स्चेंज केलं. कार्ड बघून मला आश्चर्य वाटलं नाही.

Vijay Joshi, Technical Director. 

Wednesday, 20 July 2016

Growth

एखादा माणूस जेव्हा काही छोटा  बिझिनेस चालू करतो, तेव्हा त्याने बऱ्यापैकी वैयक्तिक आणि आर्थिक रिस्क घेतलेली असते. काय बिझिनेस करायचा, कसा करायचा हे त्याच्या डोक्यात कायम भिरभिर करत असतं. हा बिझिनेस जेव्हा चालू होतो, तेव्हा त्याला बरेच रोल घ्यावे लागतात. अगदी कधी कधी हेल्पर चा सुद्धा. आणि सुरुवातीला तो बऱ्यापैकी हुकूमशाही पद्धतीने बिझिनेस चालवत असतो. बाकी मदतीला काही एम्प्लॉई असतात, पण ते बहुधा सांगितलेलं काम करत असतात. स्वतःचं डोकं वापरायची त्यांना फारशी मुभा नसते. अशा वागणुकीचे बरेच फायदे ही असतात. डिसिजन पटकन घेतले जातात आणि त्यावरची ऍक्शन पण. 


अशा वेळेस बिझिनेस ओनर २४ तास कामाचा विचार करता असतो, सात ही दिवस. बऱ्याचदा या आयुष्याबद्दल ते कम्प्लेंट करत असतात. पण काहीतरी करून दाखवण्याची आस इतकी जबरदस्त असते आणि या कामाचा ते इतका लुफत उठवत असतात की त्यांच्या प्रयत्नांचं  कौतुक त्यांना स्वतः ला वाटत असतं. 


आणि मग लहान मूल जसं तरुण होतं तसा बिझिनेस ही वयात येतो. आणि तेव्हा मात्र खूप वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागतं. बिझिनेस मध्ये होणाऱ्या वृद्धीचं मग तणावात रूपांतर होतं. कंपनी चालू केल्यावर जो आनंद मिळायचा तो गुल होतो. 
असं असेल तर मग वृद्धी कशाला हवी बिझिनेस मध्ये?. इथेच मेख आहे. एकदा तुम्ही कंपनी सुरू करून ती चालू केली की सायकल शिकल्यासारखं आहे. ते पेडल मारावं लागतंच. नाही तर पडला म्हणून समजायचं. बिझिनेस ग्रो करणं वा न करणं यात चॉईस उरत नाही. तुम्हाला व्यवसाय वृद्धी ही करावीच लागते. नाहीतर मग तो गुंडाळावा लागतो.

ग्रोथ आली की मग प्रकरण गुंतागुंतीचं होऊन जातं. डिलिव्हरी प्रेशर्स येतात. नवीन सिनियर आणि ज्युनियर लोकं आले. मग त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी. अहो इतकंच काय त्यांचं बलस्थान (स्ट्रेंथ) पण डोकेदुखी होऊन बसते. आणि हे सगळं व्यवस्थित मॅनेज केलं नाही तर कंपनीची पाटी गायब होण्याचीच शक्यता जास्त.

गंमत अशी होते की, बिझिनेस वाढला तरी ओनर ला प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीवर आणि ती करणाऱ्या प्रत्येक माणसावर नियंत्रण ठेवावं वाटतं. आणि इथे सगळी गडबड होते. या ठिकाणी ओनर ला काम करण्याच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं असतं. बिझिनेस ग्रोथ च्या गरजा वेगळ्या होतात. कम्युनिकेशन, मग ते कस्टमर बरोबर असू द्या वा टीम मेंबर मधलं, त्याचा स्पीड आणि क्वालिटी यात फरक येणं गरजेचं झालं.

मालक मात्र नियंत्रकाच्या भूमिकेत वावरत असतो. अशा नियंत्रकांच्या भूमिकेमुळे तो बिझिनेस ओनर च ग्रोथ साठी मोठा अडथळा होऊन बसतो. त्याच्या आडमुठ्या वागण्यामुळे तो उद्योग ग्रोथच्या अनेक संधी गमावतो.
जो पर्यंत बिझिनेस लहान असतो तो पर्यंत बिझिनेस चा ओनर हीच त्या कंपनीची ओळख असते. आणि एकदा का वृद्धी झाली की मग मात्र मालक आणि मॅनेजमेंट हे अलग होणं क्रमप्राप्त होतं. पण हा असा घटस्फोट, मालकी हक्क गाजवणाऱ्या आणि कुठल्याही प्रॉब्लेम वर विजय मिळवण्याची क्षमता माझ्यातच आहे असं समजणाऱ्या मालकांच्या पचनी पडत नाही. 
कंपनीचे ओनर हे कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात, किंबहुना जातातच. पण कंपनीचा कंट्रोल स्वतः च्या हातून मॅनेजमेंट च्या दुसऱ्या मंडळींच्या हातात देताना मात्र कचरतात. नाही म्हणजे त्यांची फाटतेच. बिझिनेस चा लगाम अलगद दुसऱ्याला देण्यासाठी बुद्धी तर लागतेच पण प्रचंड धैर्य ही लागतं. 
बिझिनेस ची वृद्धी हि एक तर बिझिनेस ला वरच्या इयत्तेत टाकते नाही तर झोपवते. The latter is more than likely unless founders change from driving /controlling to managing /leading, and from doing /driving to enabling /facilitating.

मुळात लोच्या असा असतो की मालकाला वाटतं, मीच एकटा शहाणा. मलाच कळतं कुठं काय करायचं अन कसं करायचं. ओनर ला जो विरोध करतो तो बिझिनेस चा दुश्मन. हे टाळण्यासाठी मग बिझिनेस ओनर मॅनेजमेंट च्या की पोझिशन ला आपले जवळचे नातेवाईक आणून ठेवतात. आता या नातेवाईक मंडळींनी कितीही विचित्र तारे तोडले तरी हाकलून देता येत नाही. आणि मग मॅनेजमेंट ला काम करणं हे दुस्तर होऊन बसतं. जगातल्या कुठल्याही प्रचंड कंपन्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या मॅनेजमेन्ट मध्ये प्रोफेशनल्स चा भरणा असतो. (या प्रकाराला सन्माननीय अपवाद असतात पण, ते बोटावर मोजण्याइतके). 

मॅनेजमेंट वर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली जाते पण ऑथॉरिटी मात्र स्वतः: कडे किंवा ह्या फॅमिली मेम्बर कडे. अशा वेळेस चांगली माणसं सोडून जातात आणि जी राहतात त्यांचा प्रकाश पडत नाही. बऱ्याचदा तर बघितलं आहे की खूप चांगलं काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला बिझिनेस ओनर आपला प्रतिस्पर्धी समजतो. आणि मग कंपनी राजकारणाचा आखाडा बनतो. 

आणि मग हे असं घडलं की मग मात्र कंपनीची उतरंड चालू होते. बिझिनेस ओनर जो एकेकाळी हिरो असतो, त्याला लोकं अक्षरश: सहन करतात आणि कंपनी रडतखडत चालू लागते. आणि मग एखाद्या ग्रेट म्हणून ओळखल्या जाऊ शकणाऱ्या कंपनीची ऱ्हासाकडे वाटचाल होऊ लागते.

- मूळ इंग्रजी लेखक गुरविंदर सिंग 

Wednesday, 6 July 2016

पार्टनर १

मी म्हणालो पार्टनरला "काय रे, इतक्या बेफाम गर्दीत तू इतका कुल पणे कसा गाडी चालवतो"

पार्टनर म्हणाला "कसं आहे, मी सगळ्यांना पुढे जाऊ देतो मग मला खूप मोकळा रस्ता मिळतो. मग मी निवांत गाडी चालवतो"

मी: अरे, याला काय अर्थ आहे. सगळे तुझ्या पुढे निघून जातील ना!

पार्टनर: त्याने काय फरक पडतो. आणि खरं सांगू, यातील बरेच जण पुढच्या सिग्नल वर नाही तर एखाद्या ट्राफिक जॅम मध्ये भेटतात.

मी: अरे, पण तुला पहिले निघून जावं असं कधी वाटत नाही?

पार्टनर: नाही वाटत. मला नाही आवडत त्या रॅट रेस मध्ये पळायला. आणि गंमत म्हणजे "Even if you win this rat race, you are still rat"

पुढे म्हणतो कसा, "आयुष्यात ही मी असाच जगतो"

आयला, हा पार्टनर म्हणजे खरंच डोक्याला खुराक आहे.

बलविंदर

मी त्याला भेटलो तेव्हा फारच इम्प्रेस झालो होतो. झकास ऑफिस, त्याचा तिथला वचक, बाहेर उभी असलेली बी एम डब्ल्यू, त्याने दाखवलेलं अगत्य. एकदम टकाटक. तो त्या ऑफिसचा मालक होता याबाबत माझ्या मनात अजिबात संदेह नव्हता. बलविंदर नाव त्याचं. सुपर प्रिसिजन नावाची त्याची कंपनी. एक्स वाय झेड नावाच्या जगातल्या सर्वोत्तम बेअरिंग कंपनीचे वितरक आहेत ते. ज्या पद्धतीने बलविंदर कंपनी चालवायचा त्यामुळे कंपनीची सॉलिड भरभराट होत होती.

माझी आणि बलविंदर ची ओळख झाल्यावर त्याने मला काही वर्षांनी सांगितलं की तो त्या कंपनीचा ओनर नाही आहे तर तो जनरल मॅनेजर आहे. पण मला हे कळलं तेव्हा त्याची अन माझी ओळख होऊन तीन वर्ष होऊन गेली होती. माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. पण आता तोच सांगत होता म्हंटल्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला विचारलं,  हे कसं काय जमलं बुवा तुला?

तर स्टोरी अशी होती की कंपनीचे मालक कलकत्त्याला राहतात. ९५ च्या सुमारास त्यांना दिल्ली भागात बिझिनेस वाढवायचा होता. हा बलविंदर त्यांच्या संपर्कात आला. त्याने बेफाम काम सुरु केलं. मला सांगताना बलविंदर ने सांगितलं "माझं एक आहे. मी कंपनीचा नोकर आहे असं मी कधीच मानत नाही. मी स्वतः ला कंपनीचा ओनर समजतो. आणि सगळे निर्णय तसे घेत गेलो. मालकांनी त्यावर कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. बिझिनेस वाढवताना मी मालकांना पैसे मागत नव्हतो, त्यामुळे त्यांनीही मला कधी आडकाठी आणली नाही"

हे सांगताना सुद्धा त्याने एक किस्सा सांगितला. कंपनी भाड्याच्या जागेत होती. जागा कमी पडत होती. तिथपासून काही अंतरावर बलविंदर ला हवी तशी जागा/बिल्डिंग मिळत होती, पण भाड्याने नव्हे तर विकत. त्याने मालकाला सांगितलं. साडेसहा कोटी किंमत. ओनर टाळाटाळ करत होते. या पठ्ठ्याने एक इनव्हेस्टर शोधून स्वतः अख्खी बिल्डिंग विकत घेतली अन कंपनीला भाड्याने दिली. जेव्हा मालकाने ती विकत घेण्याची तयारी दाखवली तेव्हा एक मिनिट वाया न घालवता कंपनीला मामुली प्रॉफिट वर ट्रान्सफर केली.

९८ साली बलविंदर ला मारुती ८०० द्यायला खळखळ करणाऱ्या मालकाने २००७ साली बी एम डब्लू दिली आणि आता त्याने अजून एक स्वतः घेतली. दुसरी घेताना मी त्याच्या समोर होतो. ती घेण्याआधी सचिन तेंडुलकरची एम ६ उचलायचा त्याचा प्लॅन होता. किमतीवरून फिसकटला.

शक्यतो आपण नोकरदार आधी गोष्टी मिळाव्यात अशी आशा ठेवतो आणि मग जेवढे मिळतील त्याला अनुरूप काम करतो, नंतर आयुष्यात पुढची पायरी गाठतो. (Having-Doing-Being). बलविंदर सारखी माणसे शिडीच्या शेवटच्या पायरीवर जाऊन मनाने उभे राहतात. त्याचप्रमाणे ते कामाची दिशा ठरवतात आणि मग त्यांना पाहिजे त्या गोष्टी पायाशी लोळण घेतात. (Being-Doing-Having).

म्हणून जुनाच धोशा परत लावतो

"Be an employee, be an employer"