Sunday, 31 July 2016

जेफ क्लार्क

बऱ्याचदा पोस्ट मध्ये जेफ चा उल्लेख येतो. परवा मिलिंद ने विचारलं '"हा जेफ काल्पनिक आहे का?" त्यावरून वाटलं ह्या जेफ बद्दल सांगावं.

जेफ्री जॉन्सन क्लार्क हे पूर्ण नाव. वय ५९. अमेरिकन पद्धतीप्रमाणे त्याला जेफ म्हणून संबोधतो. त्याची अन माझी ओळख २००७ साली बंगलोर ला झाली. पहिल्या भेटीतच आमची दोस्ती झाली. त्याच्या बरोबर त्यावेळेला बॉब म्हणून एक कालिग होता. जेफ सांगतो "मी त्या वेळेसच बॉब ला सांगितलं होतं की जर भारतात आपण पार्टनरशिप केली तर ती अल्ट्रा बरोबर असेल".

या जेफ च्या अंगात अजिबात बडेजाव नाही. मी २०१० ला अमेरिकेला गेलो तेव्हा त्याला डेट्रॉईट ला भेटलो. आणि तो बसतो सिनसिनाटी ला. त्यानंतर तो भारतात येत राहिला. या आमच्या भेटीत तो सेटको चा प्रेसिडेंट आहे याचा पुसटसा देखील दर्प आम्हाला जाणवला नाही. २०११ ला मी जेव्हा सिनसिनाटी ला गेलो अन जेव्हा त्याची केबिन, कॉन्फरन्स रूम बघितली तेव्हा मनोमन चरकलो. सेटको मध्ये त्याला किती मान आहे हे ही दिसलं.

जेफ काम जरी खूप करत असला तरी अत्यंत कुटुंब वत्सल आहे. बायको पॅटी आणि दोन पोरं बिल आणि स्मिथ यांच्याशी त्याचं मोहक नातं आहे. इतकंच नाही तर बाकी कुटुंबाच्या गोतावळामध्ये तो रमतो. वडील, जे नुकतेच गेले, भाऊ याच्याशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इतकं असलं तरी टिपिकल अमेरिकन पद्धती प्रमाणे जीवनाबद्दल त्याच्या कल्पना क्लीअर आहेत. मुलांच्या लग्नानंतर मला त्यांच्या बरोबर राहायला जमणार नाही असं तो स्पष्ट सांगतो.

त्याचे सहकारी आणि बाकी कर्मचार्यांशी त्याचे स्नेहबंध आहेत. डेट्रॉईट ला जाताना तिथल्या टेक्निशियन साठी आठवणीने एका फेमस बेकरीतून तो केक्स, पेस्ट्री वगैरे घेऊन जातो. मागच्या महिन्यात जिम ब्रोझ नावाचा आमचा सहकारी भारतात कामासाठी आला होता. पंधरा दिवस आधी जिमची गुडघ्यांची मायनर सर्जरी झाली होती. जेफ ने त्याला बिझिनेस क्लास ने पाठवलं. गेले तीन चार महिने मी बेधुंद कामासाठी फिरलो. जुलैत तर कहर झाला होता. भुवनेश्वर, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, औरंगाबाद दोन वेळा, दिल्ली दोन वेळा. काही विचारू नका. २३ जुलै ला, शनिवारी जेफ दिल्लीत पोहोचला. "२४ ला रविवार आहे, तर मी आराम करणार आहे. तू रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी ये" मला मेसेज दिला. तो येईल तेव्हा रविवारी दिल्ली त्याला फिरवायची असं खरं तर ठरलं होतं. मी सोमवारी २५ ला भेटलो आणि म्हंटलं "आपल्याला दिल्ली बघायची होती. तू काय आरामाचं काढलं" तर जेफ म्हणाला "मी नोटीस केलं की तू गेले काही दिवस खूप घराबाहेर आहेस. या रविवारी तू फॅमिली बरोबर वेळ घालवावा असं मला वाटलं. मी येतच असतो, तेव्हा नंतर दिल्ली बघू" मी अवाक झालो. आमच्या कार च्या ड्रायव्हर ने Marriott कधी बघावं म्हणून त्याला २४ व्या मजल्यावर नेऊन जेवण खाऊ घातलं. हीच कार पाहिजे म्हणून मागणी नाही. वैभवी मंडलिक पासून ते कैलास, विष्णूजी की रसोई पर्यंत पुण्यातल्या यच्चयावत बल्लवानी त्याच्या पोटावर केलेले अनन्वित अत्याचार त्याने हसतमुखाने पचवले आहेत.

समोरच्या वर प्रेशर न टाकता त्याच्याकडून काम करवून घेण्याची त्याची हातोटी आगळी आहे. तो स्वतः ही अत्यंत कामसू आहे. सतत कामाबद्दल विचार करत असतो. पैसे खर्च किती अन कसे करायचे याचं त्याला भान आहे. त्याला आणि सेटको च्या सिनियर लोकांना बिझिनेस क्लास ने एयर ट्राव्हेल करणे अवघड नाही. पण जेफ म्हणतो, आम्ही सगळ्यांनी इकॉनॉमी ट्राव्हेल केलं तर वर्षाला लाखभर डॉलर वाचवू शकतो आणि त्या पैशातून काही इक्विपमेंट्स घेऊ शकतो. असं असलं तरी वेस्टर्न लोंकांमध्ये दिसणारी कंजूषगिरी जेफ मध्ये पासंगाला पण नाही आहे.

माझे अन जेफचे वैयक्तिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. आम्ही भेटलो की कायम हास्याची कारंजी उडत असतात. अमेरिकन लोकांवर तो स्वतः खूप विनोद करतो आणि मी जर केले तर त्याला अगदी खळखळून दाद देतो. त्याचे अनंत किस्से आहेत. सांगायचे म्हंटले तर दोन तीन पोस्ट होतील. माझ्या कामावरचा ताण कसा कमी होईल यावर तो माझ्याइतकाच, किंबहुना जास्त, विचार करतो. सेटको ग्रुप मध्ये टर्न ओव्हर प्रमाणे आमची कंपनी सगळ्यात लहान आहे. पण जेफ ला आम्हा सगळ्याबद्दल कमालीची आत्मीयता आहे.

असा हा जेफ....एक सहकारी.......एक मित्र.......आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक सच्चा अन दिलदार माणूस. 

Friday, 29 July 2016

Complescancy

फार वर्षांपूर्वी मला एका नातेवाईकांचा फोन आला होता. ते राहायचे औरंगाबादला. त्यांच्या मुलाला प्रोजेक्त करायचा होता कंपनीत. मी त्या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले. ते म्हणाले "मी मुलाला विचारून सांगतो" मी म्हणालो "तुम्ही फोन नका करू. मुलाला माझा नंबर द्या अन फोन करायला सांगा. मी बोलतो अन काय आहे ते त्याला सांगतो" मुलाचा ही फोन आला नाही अन नातेवाईकांचा पण.

परवा ची गोष्ट. मित्राचा फोन आला. पाच महिन्याने मुलगा अमेरिकेला जाणार आहे, तो पर्यंत तुझ्या कंपनीत ट्रेनिंग दे. मी मुलाशी बोलतो म्हणून सांगितलं. मित्र मुलाला घेऊन आला. मी ऐकलं. त्याची आवड इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग ची. आणि राहायला सोलापूर रोडला, लोणी च्या आत. मी म्हणालो "तुझ्या भविष्याच्या दृष्टीने, ट्रेनिंग साठी तुला मास प्रोडक्शन ची कंपनी चांगली राहील. आणि माझी कंपनी रिपेयर बिझिनेस मध्ये. परत तुझ्या घरापासून चाळीस किमी लांब. मी योग्य त्या कंपनीत हडपसर मध्ये ट्रेनिंग अरेंज करतो" फोन झाले, मित्राच्या कंपनीत ट्रेनिंग साठी शब्द टाकला. पोरगा एक दिवस गेला. अन नंतर गायब.

माझा असा अनुभव आहे. पालक लोकांच्या आपल्या पोराबद्दल अवास्तव कल्पना असतात. मुलांनी आपली लाईन सेट केली असते आणि आपण आई बाप विनाकारण काळज्या करत असतो किंवा काळजी करतो हे दाखवत असतो. मुलं सुद्धा देखल्या देवा दंडवत करतात आणि त्यांना जे करायचं ते करतात. म्हणून मी आई वडिलांनी फोन केला तरी मुलांशी बोलण्याचा आग्रह धरतो.

बाकीच्यांचं काय सांगायचं. आमचे चिरंजीव मेकॅनिकल ला असून माझ्या कंपनीत अजून आले नाही आहेत. मला तर नेहमी प्रश्न पडतो की आपण जो बिझिनेस करतो त्यात स्वतः च्या पोराला आकृष्ट करत नाही तर बाकीच्या पोरांना काय ढेकळं करणार. आता प्रोजेकट चालू केला आहे फायनल चा. बहुधा जे मार्केट मध्ये दिवे लावतो त्याचा मिणमिणता का होईना प्रकाश पडतोय. कशामुळे ते देव च जाणे.

अजून एक निरीक्षण आहे. हा अनुभव शहरातले मुलं आणि त्यांचे आई वडील यांच्या बाबतीत येतो. ज्यांचे आई वडील इंजिनियरिंग किंवा तत्सम ट्रेंड शी संबंधित नाही त्यांचे कधी फोन येत नाहीत. ती पोरं येतात, काम करतात, पास होतात, पेढे देऊन जातात, नोकरीला लागतात आणि लाईफ बनवतात. शक्यतो ही मुलं आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती ही फार श्रीमंतीची असते असं ही नाही, किंबहुना ती नसतेच.  कुणी तुषार सोलापूर हुन, तर एखादा संतोष अहमद नगर च्या जवळ कुठल्या खेड्यातून. मला तर आजकाल असं नेहमीच वाटतं की भारताचं भविष्य यश मंडलिक सारख्या मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मुलांपेक्षा या स्वबळावर वाट शोधत आलेल्या विक्रम सारख्या मुलांच्या हातात सुरक्षित आहे.

कदाचित शहरीकरणामुळे आलेली वेगवेगळ्या आकर्षणात ही मुलं इतकी मग्न असतात की या मुलांना ध्येय नीट दिसत नाहीत आणि सुखवस्तू पणा त्यांना complacent बनवतो, असं मला वाटतं.

फंडे

काही मार्केटिंगचे फंडे येडं करून सोडतात. गोष्ट छोटीच असते, पण हे ह्या मंडळींना कसं सुचलं असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

प्रत्येक विमान कंपनीच्या दोन शहरांमधल्या विमान प्रवासाला एक विशिष्ट नंबर असतो. आणि त्या नंबर च्या अगोदर दोन अक्षरचं प्रिफिक्स असतं. उदा: जेट एयरवेज ला 9W873, किंवा स्पाईस जेट ला SG3308.

तसं इंडिगो चं आहे 6E.

आणि त्यांनी त्यांच्या इन फ्लाईट मॅगेझिन चं नाव ठेवलं आहे हॅलो 6E. आता जर का हे पटकन म्हंटलं तर त्याचा उच्चार काय होतो ते म्हणून बघा. अर्थात विमानातले एयर होस्ट वा होस्टेस हे हॅलो सिक्स इ असं म्हणतात, कटाक्षाने. ट्रेनिंग च दिलं असेल तसं.

हे प्रिफिक्स निवडण्याचा चॉईस जर विमान कंपनीला नसेल तर फार काही कौतुक नाही, पण जर असेल तर इंडिगो च्या मार्केटिंग प्रोफेसर बद्दल कौतुक वाटतं.

गोष्ट छोटीसी पण इंडिगो जरा हटके.

पोस्ट लिहिता दोन गोष्टी आठवल्या. अमूल म्हणजे Anand Milk Udyog Ltd आणि M&M म्हणजे सुरुवातीला मोहम्मद&महिंद्रा असं होतं कारण ते दोघे पार्टनर होते. फाळणीनंतर मोहम्मद पाकिस्तानात गेले आणि M&M आता काय म्हणून ओळखायचं तर mahindra & mahindra असं नाव झालं.

इतकंच काय सेटको हे आमचं नाव जे स्पिण्डल मध्ये फेमस आहे ह्याचं अमेरिकेतील मूळ नाव आहे Standard Electrical Tool Company S E T C O.

नावाचा प्रवास कसा होईल अन कुठे पोहोचेल, सांगता येत नाही.





डोमेन

माझ्या कंपनीचं नाव सेटको च्या आधी अल्ट्रा प्रिसीजन स्पीडल्स प्रायव्हेट लिमिटेड असं होतं. त्यातल्या पहिल्या तीन शब्दाचं abbreviation वापरून म्हणजे UPS मी वेबसाईट च्या डोमेन नेम साठी अर्ज केला साधारण २००३ साली. आता काय पद्धत आहे ते माहित नाही, पण त्यावेळेला तीन चॉईस तुम्हाला द्यावे लागायचे. मी पहिला चॉईस www.ups.co.in असा दिला आणि पुढे अजून दोन चॉईस लिहून दिले. सुदैवाने मला जो पहिला चॉईस दिला ते डोमेन नेम मिळालं. www. ups. co. in. आम्ही साईट बनवली. लॉन्च केली. लोकांनी कौतुक ही केलं, काहींनी वेड्यात ही काढलं. कशात काही नाही तर वेब साईट बनवली म्हणून.

साधारण दोन एक वर्षांनी मला एक खूप मोठं बाड कुरियर ने आलं.   अग्रगण्य लॉ फार्म कडून . तर ती होती लीगल नोटीस. यु पी एस म्हणजे युनायटेड पार्सल सर्व्हिस ह्या कंपनीची. आणि ते म्हणत होते की आम्ही ups.co.in वापरून act of infringement केलं आहे. आणि बऱ्या बोलाने ते आम्हाला सरंडर करा नाहीतर आम्ही तुमच्या वर लीगल ऍक्शन घेऊ.

मला पहिल्यांदा तर काही सुधारलं च नाही. मी आपलं, यु पी एस गंडलं असा विचार करून ते बाड कोपऱ्यात ठेवून दिलं.

दोन दिवसांनी मात्र दिल्लीहून वकिलाचा फोन आला. नोटीस मिळाली का? आणि बाकी सगळे तारे तोडले. तुमच्यावर केस टाकू आणि अलाना फलना दंड पडेल वगैरे. टिपिकल मध्यम वर्गीय धंदेवाईक माणसाचं जे व्हावं तेच माझं झालं, धाबे दणाणले. ते वकील लोकं दररोज मला फोन करायचे आणि वेगवेगळ्या कहाण्या सांगायचे.

ह्या सगळ्या प्रकारात मला एक कळत होतं की ते यु आर एल हे मला दिलं होतं. मी काही त्यासाठी धडपडलो नव्हतो. आणि इंश्युइंग ऑथोरिटी भारत सरकार होती.

माझे एक जवळचे नातेवाईक खूप चांगले वकील आहेत. त्यांच्याकडून एक झ्याक लेटर बनवलं अन पाठवून दिलं त्या लॉ फर्म ला. आणि त्या काळात नेट वर नेम होस्टिंग च्या खूप केसेस चा किस पाडला. त्या सगळ्यात माझ्या लक्षात आलं की युनायटेड पार्सल सर्व्हिस आम्हाला मसल पॉवर ने लपेट्यात घेत होतं. लीगली ते आम्ही त्यांना डोमेन नेम द्यायला अजिबात बांधील नव्हतो.

माझा हा व्ह्यू मी बोलून दाखवला. मग ते मला हळूहळू पैसे ऑफर करू लागले. मुळात मला ते डोमेन नेम द्यायचं नव्हतं. कारण दोन तीन वर्षात ते बऱ्यापैकी पॉप्युलर झालं होतं आणि आमच्या नावाला संयुक्तिक ही होतं. त्या उपरही ते पैसे जे ऑफर करत होते ते म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होता.

एव्हाना माझ्या लक्षात आलं की यु पी एस कितीही मोठी कंपनी असू द्या, पण माझी इच्छा नसेल तर डोमेन नेम ते माझ्याकडून काही हिरावून घेऊ शकत नाही. माझं काही त्या डोमेन नेमवाचून काही अडणार होतं अशातला भाग नाही आणि माझं कंपनीच्या नावावर प्रेम होतं, डोमेन नावावर नाही. पण ज्या पद्धतीने यु पी एस आमच्याशी बोलत होती ती खूप अरेरावीची भाषा होती.

मी सरळ एक किंमत ठरवली. ती लिहीत नाही इथे पण एकंच सांगतो, त्या काळात जर ती आम्हाला मिळाली असती तर तेव्हाच गाशा गुंडाळून हरी नाम घ्यायला मोकळा झालो असतो. फोन आला अन धडधडत्या अंत:करणाने मी ती फिगर सांगितली. न जाणो ते हो म्हंटले तर.

पण झालं उलटंच. तो समोरचा वकील उसळला च. तुम्ही स्वतः ला कोण समजता, जितके पैसे देतोय ते घेऊन गप्प व्हा, इतके पैसे तुम्ही जन्मात तरी कमवाल का, लायकी बघून पैसे मागा.

किंमत ठरवताना माझ्यातला वरण भात सळसळत होता पण जेव्हा त्याने माझी लायकी काढली तेव्हा मात्र नागपूरच्या सावजी मटणाच्या काळ्या मसाल्यापासून ते कोल्हापूरचा तांबड्या पांढऱ्या रस्यापर्यंत (व्हाया मराठवाड्यातील हिरवा ठेचा) सगळं फुरफुरु लागलं अन त्याला सांगितलं "भावड्या, जा तुला काय करायचं ते कर. पण डोमेन नेम हवं असेल तर ही किंमत, नाहीतर चल हवा येऊ दे"

धमकीवरून नंतर अजीजी ची भाषा झाली, पण आम्ही काही बधलो नाही. सरतेशेवटी त्यांनी डोमेन नेम वापरण्या बाबत आमची काही हरकत नाही असं पत्र पाठवलं. ते पत्र ही असं होतं, जणू काही ते आम्हाला परवानगी देऊन फार उपकार करत आहेत.

आता तर माझ्या कंपनीचं नाव ही अल्ट्रा प्रिसीजन स्पिन्डल नाही पण तरीही त्या डोमेन नेम ची मालकी आमच्याकडेच आहे. बाकी तो लायकी काढणारा वकील आज भेटायला पाहिजे.

सांगायचं एकच, जे तुमचं आहे ते तुमचं च. फुकाचा जोर टाकून कुणी हिरावून नाही घेऊ शकत. कंपनी छोटी आहे म्हणून असोसिएटेड मोठ्या कंपनीची अरेरावी ऐकून घेऊ नये.

सदिच्छा

माझा मित्र विवेक पत्की औरंगाबादच्या कॉलेज मध्ये अतिशय सुंदर चित्र काढायचा. म्हणजे अजूनही काढत असेलच. पण त्या वेळेला तो आवर्जून आम्हाला त्याची चित्र दाखवायचा. त्याचं आम्ही कॉलेज मध्ये प्रदर्शन भरावल्याचं अंधुकसं आठवतंय.

एके दिवशी त्याने मला त्याने काढलेल्या एका चित्रबद्दल सांगितले. "म्हणजे साधारण त्या चित्राची थीम अशी आहे राजेश, की एक तरुणी ओल्या वस्त्रनिशी नदीतून बाहेर येत आली आहे. तिच्या सुंदर चेहऱ्यावरून पाण्याचे ओघळ वाहत आहेत. तिने तिचे केस पाठीवर मोकळे सोडले आहेत. आणि मान वळवून तिचे मोहक स्मितहास्य विलसत आहे. आणि मी त्या चित्राला नाव ओलेती दिलं आहे"

पुढे जाऊन त्याने हे ही सांगितलं की '"सातारा जिल्ह्यातल्या औंध च्या राजवाड्यात हेच चित्र आहे आणि मी ते कॅनव्हास वर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे".

त्याने जे वर्णन केलं ते माझ्या मनावर पक्कं ठसलं गेलं. वय पण तेच होतं म्हणा.

दोन तीन दिवसांनी मी गुलमंडीवर फिरत असताना सुपारी हनुमान जवळ एक फ्रेम बनवणाऱ्या दुकानासमोर थबकलो. विवेक ने सांगितलेल्या सारखं हुबेहूब चित्र समोर दिसत होतं. तीच ती मोहक ललना, नखशिखांत भिजलेली, पाठमोरी पण हलकेच मान वळवून भाव विभोर करणारं स्मित देणारी. मी स्तिमित होऊन पाहत राहिलो. दोन मिनिटाने दुकानदार म्हणाला "पावनं, कुठं हरवलात?" मी त्याला त्या कॅनव्हास च्या खाली असलेलं दुसरं चित्र हलवायला सांगितलं. आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य फुललं.

खाली विसू अशी सही होती. विवेक पत्की ची.

हे लिहिण्याचं निमित्त झालं बालाजी सुतार यांचं लिखाण. बासुदांची ओळख मी करून द्यावी इतकं काही माझं कर्तृत्व नाही. पण एक जाणवतं मात्र की त्यांचं लिखाण हे वेगळ्या धाटणीचं आहे. अगदी  ठसतं ते मनावर. मला खात्री आहे, यापुढे मला कधीही बासुदाचं लिखाण ओळखायला कष्ट पडणार नाही. त्यांच्या लिखाणात त्यांची झोकदार सही एकदम उठून दिसते. अर्थात ते प्रथितयश लेखक अन कवी म्हणून प्रसिद्ध आहेतच. किंबहुना आपल्या व्यापातून वेळ काढून ते कधी त्यांचे शब्द अग्निहोत्र म्हणून उतरवतात तर कधी शीतल चांदणे बनून. कधी दाहक वास्तव म्हणून तर कधी कल्पनेच्या भराऱ्या घेत.

खरं सांगायचं तर बासुदा सारखंच आपल्या एका वेगळ्या शैलीची छाप सोडणारे बरेच जण आहेत. त्यांची सगळ्यांची नावं लिहीत नाही. कारण त्यातून मन दुखवण्याची शक्यता असते. ग्रामीण बाज जपणारे उच्च श्रेणीचं लिहिणारे आहेत, ज्या पार्ल्यात पु ल चं वास्तव्य झालं ती शैली हुबेहूब पकडणारे आहेत, चित्रपट आणि त्याच्या गाण्याचं विवेचन करणारे आहेत, पुरोगामी असूनही विषय छान मांडणारे आहेत, गूढकथा, भयकथा लिहिणारे आहेत, एखादया कुंभाराप्रमाणे कुठल्याही विषयाला आकार देणारे आहेत, विनोदाचा बाज पकडणारे आहेत, तात्विक लिहिणारे आहेत, अध्यात्मिकही लिहिणारे आहेत. चित्रकार आहेत, छायाचित्रकार आहेत.

बस, या फेसबुकच्या उंचच उंच वॉल ओलांडून तुम्हा सगळ्यांचं लिखाण फलो फुलो हीच सदिच्छा.



Thursday, 21 July 2016

उपरती

मी एक मॅनेजमेंट चा कोर्स जॉईन केला आहे. महिन्यातून एक सेशन असतं.  ते झालं की आम्हाला असाईनमेंट असतात ज्या एका महिन्यात पूर्ण करायच्या असतात. त्या क्लास मध्ये जे शिकवतात त्याचे मिनिट्स लिहायला आणि आम्ही महिनाभर असाईनमेंट मध्ये काही दिवे लावलेत का, हे बघायला एक मुलगी आहे, रीमा ठेवू आपण तिचं नाव.

रीमा ने एक व्हाट्स अप ग्रुप बनवला आहे. आमच्या असाईनमेंट्स चे अपडेट्स ती त्यावर टाकते. आणि आम्ही त्या केला की नाही याचा ही फॉलो अप घेते.

तिचा फोन आला की "काय कटकट आहे" वगैरे भाव आमच्या मनात येतात. कुणी तिचा फोन टाळतं. आम्ही कसेही वागलो तरी ती तिचं काम इमान ऐतबारे करते, न कंटाळता. वाईट न वाटू देता.

मागच्या आठवड्यात रीमाने ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोडली. काल तिने तो व्हाट्स अप ग्रुप ही सोडला. गंमत म्हणजे तिने ग्रुप सोडल्यापासून तिच्या आभार प्रदर्शनाचे सतत मेसेज ग्रुप वर येत आहेत. खरं तर ती ते वाचूही शकत नाही. रीमा ग्रुपमधून गेल्यापासून तिच्या कामाचं महत्व लोकांना कळतं आहे. ती असताना मात्र तिचं असणं लोकांना कदाचित त्रास वाटत असावं.

आयुष्यही आपण असंच जगतो, नाही? 

पहिला फॉलोअर

कुठलीही कृती करायची म्हंटली की एखादा माणूस आवाज देतो आणि मग लोकं त्याला फॉलो करतात. म्हणजे बघा सिग्नल ला लाल रंग झाला की कुणी एखादा थांबतो आणि मग बाकी सगळे थांबतात.

एखाद्या कंपनीची पार्टी चालू असते. तो इव्हेंट मॅनेजर आवाज देतो की नाचायला या, पण कुणी येत नाही. आणि मग कोपऱ्यातून कुणी एक येतो, नाचायला चालू करतो आणि मग सगळा ग्रुप डान्स करू लागतो.

चांगलं काम करण्यासाठी कुणी एक जण, जो सहसा लीडर असतो, आवाज देतो. सुरुवातीला त्या सादेला कुणी प्रतिसाद देत नाही आणि मग अचानक एक जण डावीकडून येतो आणि म्हणतो "चला काम करू यात". आणि मग ती झुंड कामाला लागते.

सांगायचा मुद्दा हा, की तुम्ही तो साद घालणारा लीडर च असायला पाहिजे असं काही नाही. त्याला प्रतिसाद देणारा पहिला माणूस असला तरी काम पुढे सरकतं. कदाचित त्या यशाच्या अध्यायात तुमचं नाव दिसणार नाही पण या पहिल्या फॉलोअर चं महत्व अनन्यसाधारण आहे.

लीडर असाल तर छानच पण नसाल तर त्याच्या हाकेला पहिला ओ देणारे असाल तरी आयुष्य कारणी लागतं.