Thursday, 21 March 2019

समाजसेवा

२०१३ साली मला समाजसेवा करण्याची खाज आली होती. त्यातून मग मी पाच समाजसेवी संस्थांना कॉन्टॅक्ट केलं. त्यातील आपलं घर चे फळणीकर आणि स्नेहालय च्या गिरीश कुलकर्णी यांच्या संपर्कात आलो. दोन्ही संस्थांना वेळ देता येतो का याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही ठिकाणी मी जाऊ लागलो. पण लक्षात आलं, सेटको सांभाळून या संस्थांना वेळ देणं हे निव्वळ अवघड आहे. थोडक्यात खाज कमी झाली. 😊😊.

दोन्ही संस्थाचालकांच्या संपर्कात मात्र राहिलो. पुढे मग स्नेहवन च्या अशोक देशमाने आणि आरंभ च्या अंबिका टाकळकर यांच्याशी ओळख झाली.

या भेटीगाठी चालू असताना, आपलं घर आणि माझी कंपनी जवळ असल्याने तिथे मी बऱ्याचदा जाऊ लागलो. आपलं घर च्या डोणजे वसतिगृहात या ना त्या कारणाने चकरा वाढल्या.

एके दिवशी फळणीकरांनी आपलं घरच्या विश्वस्त मंडळावर यायचं निमंत्रण दिलं. काम काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं. तरी एक अनुभव घ्यावा म्हणून मी मंडळावर गेलो. त्यांच्या मीटिंग अटेंड करू लागलो. त्यापेक्षा भरीव काम काही मी करू नाही शकलो. पण एकुणात समाजसेवी संस्थांचं काम कसं चालतं याची जाणीव झाली. परत फळणीकर म्हणजे परफेक्शन चे भोक्ते. शासनाची कुठलीही मदत घ्यायची नाही हा खाक्या. शिस्तीचे दुसरे नाव.

वर्षभरातील काही नोंदी आणि आवाहन.

१. ना नफा ना तोटा तत्वावर समाजसेवी संस्था चालवणं हे एखादा नफा कमावणारा बिझिनेस चालवण्यापेक्षा खूप अवघड असतं.

२. आधी नि:स्पृहपणे काम करायचं, तेच संतपणाचं काम. ते केल्यावर काही असे काही अनुभव येतात की "हे ची फळ काय मम तपाला" अशी परिस्थिती फाळणीकरांनी खूप वेळा अनुभवली. जिवंतपणी मोक्ष प्राप्ती घ्यावी वाटली.

३. या समाजसेवी संस्था चालवताना डोनेशनची गरज असतेच, पण मनुष्यबळ ही लागतं.

४. समाजसेवेसाठी दुसरी फळी तयार करणं हे फार जिकिरीचं काम.

५. कुणाला डोनेशन द्यायची किंवा संस्थेत काम करायची इच्छा असेल तर जरूर संपर्क साधावा.

Monday, 18 March 2019

पाचवी पणती

ती आली होती माझ्याकडे फेसबुकच्या माध्यमातून. कुणीतरी रेफरन्स दिला होता. जॉब साठी. त्या वेळेस माझ्याकडे तिच्या प्रोफाईलचा जॉब नव्हता. मुलगी थोडी विस्कळीत वाटली होती मला. नकारात्मकता तर अगदी ठासून भरली होती तिच्यामध्ये. मी सांगितलं तिला की सध्या तरी जॉब नाही.

साधारण पाच महिन्यात तिच्या प्रोफाईलचा जॉब माझ्याकडे तयार झाला. मी तिला कॉंन्टॅक्ट केला तर ती कुठलासा कोर्स करायला बंगलोर का कुठेशी गेली असं कळलं. मग मी ती जागा भरली. तेव्हापासून एकाच महिन्यात ती परत आली जॉब मागायला. मी तर जागा भरली होती.

मला काळजी वाटली त्या मुलीची. तिच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. होती मराठवाड्यातील. एकटीच पुण्याला. वय ही २८-२९. लग्नाचा पत्ता नाही. निगेटिव्हिटी सदैव टपकायची तिच्या बोलण्यातून. मी विचार केला ही पोरगी जर रस्त्यावर आली नाही तर आयुष्यातून उठेल.

मी तिला पहिले सांगितलं "तुला पहिले आर्थिक स्थैर्य आणावं लागेल आयुष्यात. मग आपण तुझे बाकीचे प्रॉब्लेम बघू. जॉब शोधतो तुझ्यासाठी."

सुदैवाने एक जॉब मिळाला, तिच्या प्रोफाईल ला सूट होणारा. मुख्य म्हणजे ऑफिस मला माहित होतं. तिथला मालक आणि इतर अनेक एम्प्लॉईजला मी ओळखत होतो. तिथं तिच्या व्यक्तिमत्वात बदल होईल असं मला वाटायचं.

ती जॉईन झाली तिथं. काम चालू झालं. पण ही  दर  महिन्याला कटकट करायची. मला जमत नाही, आवडत नाही, मला तुमच्या कंपनीत घ्या. मी जॉब सोडते. एकदा आली आणि म्हणाली "मी ब्युटी पार्लर काढते." आता मात्र तडकलो. तिला म्हणालो "डोकं जागेवर असेल तर एक वर्ष हा जॉब सोडू नको. चार पैसे कमव. एक वर्षाच्या आधी जर जॉब सोडलास तर परत मला कुठल्याही कारणांसाठी कॉन्टॅक्ट करायचा नाही. आणि जरा अवतार बदल. थोडी जिम वगैरे लाव, वॉर्डरोब चेंज कर."

पोरीने ऐकलं. खुश राहू लागली. सव्वा वर्षे काम केलं.

आणि एक दिवशी तिचा फोन आला. स्थळ आलं आहे, मुलगा जर्मनीत असतो. पोराचं प्रोफाईल झकास. आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं घडतं म्हणजे काही तरी प्रॉब्लेम या धारणेने ती मुलगी परत काही त्यात खोट काढत होती. मी तिला सांगितलं "जास्त फाटे फोडू नकोस. जशा गोष्टी सामोऱ्या येतील तशा फेस कर. चांगलं होईल."

यथावकाश तिचं लग्न झालं.

दहा दिवसांपूर्वी भेटली मला. खूप खुश दिसत होती. सुखात्मकता आणि सकारात्मकता ठायी ठायी दिसत होती. जी मुलगी फक्त माझ्याशी प्रॉब्लेम्स शेअर करायची, तिने सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं. काही दिवसात जाईल ती जर्मनीला. तिला हार्दिक शुभेच्छा.

मी वर पोहोचल्यावर चित्रगुप्त सांगेल मला की तुझी जागा तशी नरकातच आहे. पण अशी काही गोष्ट सांगितली की ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचा ट्रॅक बदलण्यात तुझा थोडा हातभार आहे, तर मी तुला दोन एक दिवस स्वर्गात राहायला देईल. तर मी ही घटना सांगेन.

(स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या मी पोस्ट टाकतोच. पण ही पकडून आधीच्या पाच पोस्ट या केवळ फेसबुकच्या माध्यमातून काही चांगलं घडू शकतं हे सांगण्यासाठी आहेत.)

पाचवी पणती 

R K Laxman

२००३ साली टाटा सन्स मध्ये हरखलो होतो. लंडन मध्ये ललिता जेम्स मला तिच्या ऑफिस मध्ये घेऊन गेली होती. तिने मला एक केबिन दाखवली होती, एम एस ओबेरॉय यांची. फार भारी वाटलं होतं. असाच एक अनुभव नुकताच आयुष्यात आला. तो म्हणजे आर के लक्ष्मण यांच्या घरी जाण्याचा. हो तेच “Creator of common man with uncommon sense of humor”.

फेसबुकने मला काही रत्ने दिली आहेत. त्यापैकी एक आहे  तिच्या वयाला न शोभणारी संवेदनशीलता बाळगणारी, शास्त्रज्ञ होण्याच्या दिशेने हळूहळू पण दमदार पावलं टाकणारी. तिची अन माझी ओळख झाली तेव्हा मला तिचं फेक अकौंट वाटलेलं. अनेकानेक प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. (तिच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतातच). तिच्याच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबाबद्दल मला आत्मीयता आहे अशी रुचिरा.

तर ही सारखी मला सांगायची श्रीनि सर आणि तुम्ही भेटावेत असं खूप वाटतं. तर हे श्रीनि सर म्हणजे आर कें चे चिरंजीव. मी विचार करायचो, इतक्या मोठ्या माणसाचा वारसा. मी भेटून काय बोलणार? त्यांना आवडेल का? बरं ते स्पेस जर्नलिस्ट. माझं त्या बद्दलचं नॉलेज अगदी उथळ. मी आपलं हो म्हणायचो. १४ फेब्रुवारीला ने रुचिरा ने परत चिवचिव केल्यावर आम्ही तारीख ठरवली. ९ मार्च.

प्रिया प्रभुदेसाई बरोबर आस्वाद मध्ये नाश्ता केला. आणि मॅजेस्टिक मध्ये काही पुस्तकं घेतली एक श्रीनिसाठी आणि एक माझ्यासाठी. श्रीनि सरांना द्यायचं पुस्तक अर्थात रुचिरा ने ठरवलेलं. मग लोअर परेल च्या फिनिक्स मॉल मध्ये भेटलो श्रीनि सरांना. तुम्हाला सांगतो साधेपणाची कमाल मर्यादा म्हणजे श्रीनिवास लक्ष्मण. गर्व, अहंकार, दिखाऊपणा हे अवगुण त्यांच्या जवळपास पण नाहीत. दोन एक तास गप्पा मारल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो. पेडर रोडला.

दरवाजावर पाटी वाचली. R K Laxman. अंतर्बाह्य थरारलो. आत गेलो आणि भारावल्यासारखं त्या हॉल मध्ये भिरभिरत होतो. आर कें नी स्वहस्ते काढलेली अनेक चित्रे मी पाहिली. यातली तीन मला चित्रं फार आवडली. पण सगळ्यात भारी १९६२ साली काढलेलं, ज्यात त्यांनी त्यांचा मुलगा चांद्रभूमीवरून पृथ्वीकडे पाहतो. १९६९ साली मानवाने चंद्रावर पाय ठेवला आणि श्रीनि पुढे स्पेस जर्नलिस्ट झाले. हा दिवस आहे की स्वप्न याची मी पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेत होतो.

श्रीनिवास सरांची स्वतःची रूम म्हणजे अंतराळातल्या माहितीचा खजाना आहे. आपल्या आवडीच्या कामासोबत जगणे म्हणजे काय हे तिथं जाऊन कळतं. दुपारभर सर आणि त्यांची पत्नी उषा यांच्याशी गप्पा आणि सोबतीला रुचिरा ची टीवटीव.

निघालो. राहवलं नाही. R K Laxman या पाटीच्या शेजारी उभा राहून फोटो काढून घेतला. कुणाबद्दल असणारी आदराची भावना उचंबळून येणे याची अनुभूती झाली.

एका स्वप्नवत दिवस अंजली आळेकर यांना भेटून संपला.

सांगायचं म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदा कुणाला भेटण्यासाठी कामावरून सुट्टी घेतली.

Thursday, 14 March 2019

जॉब

फोन आला. फोनकर्त्याच्या मित्राला जॉब हवा होता. जॉब सिकर चं नाव होतं सचिन. 

सचिनचा बायोडाटा आला. खणखणीत करियर होतं. मल्टिनॅशनल कंपनीत दहा बारा वर्षे काम केलं होतं. नंतर आवड म्हणून टिचिंग प्रोफेशन मध्ये शिरले. पण एकुणात शिक्षण महर्षींनी केलेला बाजार पाहून आणि एकुणात अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्वालिटी ची वाट लागलेली पाहून तीन चार वर्षात पस्तावले. 

माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं पोटतिडकीने बोलले. त्यांची या विषयाची तळमळ पाहून मी त्यांना विचारलं की फायनली काय करायचं ठरवलं आहे. तर म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये परत यायचं. मी विचारलं, पण तुमची आवड अध्यापन असेल तरीही. तर हो म्हणाले. 

मी म्हणालो "असं समजा की माझ्याकडे मॅन्युफक्चरिंग च्या हेड ची पोझिशन आहे आणि एक माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे मला एका चांगल्या प्रोफेसरची गरज आहे. हे कॉइन आहे. टॉस करू. हेड पडलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि टेल पडलं तर ट्रेनिंग मध्ये. आता मी टॉस केलं तर कॉइन हवेत असताना, तुमच्या मनाला काय वाटेल? हेड पडावं की टेल?"

सचिन संभ्रमात पडला. अन हळूच म्हणाला "टेल. पण तरीही......"

मी सांगितलं "कॉइन पडल्यावर जे येईल ते स्वीकारणं ही तडजोड झाली. आणि कॉइन हवेत असताना काय पडावं असं वाटणं ते निवडणं हे आयुष्य. तुम्ही अध्यापन क्षेत्र सोडू नका. तुमच्या सारखी लोक अभियांत्रिकी क्षेत्राची गरज आहे. दुर्दैव हे की आज सगळ्यात जास्त विनोद हे इंजिनियर्स वर होत आहेत. चहाचा धंदा चांगलाच पण इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून त्याची खिल्ली उडवण्याचा नतद्रष्ट पणा डोक्यात जातो. लॅब मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाला लोकाभिमुख करण्याचं काम तंत्रज्ञांचं आणि ते ताकदीने व्हावं यासाठी तुमच्या सारख्या लोकांनी हे क्षेत्र सोडू नये". 

इतकं बोलून अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवडली जी प्रोफेशनल पद्धतीने चालवली जाते. तिथे त्यांचा रेफरन्स दिला. इंटरव्ह्यू बहुतेक शेड्युल झाला आहे. सचिनला जॉब मिळाला तर तो त्याचं सोनं करेल याबाबत शंका नाही. त्याला हार्दिक शुभेच्छा. 

अ...... अभियंत्याचा हे फक्त पुस्तकाचं नाव नाही आहे, ती माझी जीवन प्रणाली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हो, अभिमान आहे, गर्व नव्हे. 

Wednesday, 13 March 2019

फेसबुक ची पणती

एक महिना फेबुवर नसताना दोन महत्वाचे प्रसंग घडले आणि त्याला करण फेसबुकच होतं. 

२१ फेब्रुवारीला जयसिंगपूर येथील जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग इथे "उद्योजकता" या विषयावर बोलायला बोलावलं होतं. खणखणीत स्वागत केलं होतं. ढोलताशा, औक्षण अन काय काय! प्रमुख पाहुण्यांमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी होती, त्यामुळे गर्दीला तोटा नव्हता. पण तिच्याशिवाय श्री सुनील जाजीत होते. एल अँड टी बंगलोर चे एच आर चे प्रमुख. काही महिन्यांपूर्वी भारताला इंजिनियर लोकांची किती कमी प्रमाणात गरज आहे हे अधोरेखित करणारा, तो लेख श्री जाजीत यांनी लिहिलेला. मी त्यावर आधारित मराठीत लेख पण लिहिला होता. चौथे गेस्ट होते ते कॉलेज चे माजी विद्यार्थी श्री बघाटे. पुढे आय आयटी करून युकेमध्ये पीएचडी केली आणि दहा वर्षे जॉब केला. फक्त बिझिनेस करण्याच्या उद्देशाने ते पुण्यात परत आले आणि तो व्यवस्थित सेट केला. या तिघांनीही अत्यंत समयोचित आणि मुद्देसूद भाषणं केली. 

उद्योजकता या विषयावर माझी मतं आता आकार घेत आहेत आणि ती माझ्या अनुभवातून आली आहेत. मुलांना ती पटतात असं मला त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवतं. 

असाच एक अनुभव आय एम डी आर, पुणे येथेही आला. स्टार्ट अप च्या कॉन्फरन्स मध्ये पुन्हा एकदा तरुणाईशी "उद्योजकता" या विषयावर बोलायला निमंत्रित होतो ते २ मार्चला. साधारण नव्वद साली आय एम डी आर ला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो. काही कारणाने नव्हती घेतली. २ तारखेला वक्ता म्हणून गेलो. 

दोन्ही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ती फेसबुकमुळे. जयसिंगपूरच्या कॉलेजला रेफरन्स दिला कोल्हापूरचे राजन गुणे सरांनी तर आय एम डी आर ला बोलावलं श्री दिलीप रणदिवे यांनी. 

एका वर्षात पाच ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनीशी संवाद साधायचा हे ठरवलं होतं ते साध्य झालं. 


Sunday, 10 March 2019

ताडोबा 2

ताडोबा 1

या हर्षदचं पुस्तक वाचून वाघ बघण्याची उर्मी फारच मनात दाटून आली होती. माझे मित्र आणि सीएनसीटाइम्स.कॉम चे प्रवर्तक नीरज वणीकर यांनी ताडोबाची ट्रिप ठरवली आणि मी विचार केला, हा उद्योग पण करून टाकू.

वणीकरांनी बरोबर काय गोष्टी घ्यायच्या याची लिस्ट पाठवली होती. त्यात आयकार्ड घेण्याबद्दल चार चार वेळा बजावून ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं की आयकार्ड नसेल तर जंगलात जाण्याचा विचार पण करू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल. नागपूरला इनोव्हा मध्ये बसल्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. इतकं घाबरवल्यामुळे मी कार मध्येच थांबवली. बॅगेत पॅन कार्ड आहे ते बघितलं आणि सुस्कारा सोडला.

तरुवन  नावाच्या रिसॉर्ट चे मालक निखिल अभ्यंकर, वणीकर, संदीप आणि मी असे गप्पा मारत निघालो, उमरेडला चहासाठी थांबलो. या जंगल क्षेत्रात चहा पिण्यासाठी सुद्धा पॅनकार्ड लागत असेल हा विचार करून मी कार्ड चहावाल्याला दाखवलं. सगळे हसले. चहावाल्याला काही कळलं नाही.

ताडोबाला पोहोचल्यावर पहिल्या सफारीसाठी सज्ज झालो. गाडीत इतकी उत्कंठा वाढली होती की कधी वाघ दिसतो असं झालं होतं. दुर्दैवाने ८ फेब्रुवारी ची पहिली सफारी आमची ड्राय गेली. सगळे हिरमुसले. मला फार काही वाटलं नाही. कारण तो आनंद काय असतो हे मला अजून माहित नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाची पहिली सफारी चालू केली. इतका वेळ बरोबरच्या लोकांचं बोलणं ऐकून मला बफर, कोअर हा जंगलाचा एरिया, एकुणात १८०० स्क्वे किमी क्षेत्रफळ, त्यातील साधारण १२०० बफर तर ६०० कोअर हे कळलं होतं. जंगलातील सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकल्या होत्या. मटकासुर, माया, तारा, रूपा, सोनम, ताराचंद, छोटा मटका, कुवानी ही वाघ वाघिणींची नावं मला एव्हाना पाठ झाली होती.  कॉल कसे मिळतात तेही कळलं. आतली गावं कशी विस्थापित केलं तेही कळलं. काही कारणामुळे गावकरी कपल जंगलात उभं होतं आणि दोन वाघ त्यांना कसे हुंगून गेले अशा भीतीदायक कथा पण ऐकवल्या गेल्या.

एकुणात माहोल तयार झाला होता. बफर एरियात जिप्सी एंट्री करतो तोच गाईड प्रवीण म्हणाला, "थांबा. लेपर्ड रस्ता क्रॉस करतोय." डोळे फाडून बघत असताना ते छोटं जनावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एका दगडावर बसलेलं दिसलं, फक्त एका मिनिटासाठी. आणि पटकन बाजूच्या झाडीत पळून गेलं. "फार शाय असतं ते". जंगलातील टर्म्स मला कळत  होत्या. सफारी चालू असताना जंगलातल्या एका पॉइंटला गार्डला हळूच विचारायचं, काही न्यूज. मग तो सांगणार त्या दिशेने जिप्सी पळवायची. आणि निराशा पदरी यायची. जंगलातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर चार पाच जिप्सी आणि दोन कँटर कॉल मुळे शांतपणे थांबल्या होत्या.

आणि तितक्यात तीन एकशे मीटर वर ते डौलदार जनावर जिप्सीतील एकाला दिसलं आणि सर्व गाड्या सुसाट जात त्याच्या पासून अलीकडे थांबल्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा जंगलाची सम्राज्ञी, हो वाघीण होती ती, दिसली. क्लिक क्लिक करत खचाखच फोटो ओढू लागले. आणि तितक्यात आमचा गाईड म्हणाला, ती थांबली आहे याचा अर्थ बच्चू येत आहे. रस्त्याच्या डाव्या कडेला ती राणी, छोटी तारा नाव तिचं उभी होती, सर्वच गाडीतील लोक कुजबुजत होते. 

शेवटी तिचा बछडा उजवीकडच्या जंगलातून आला. त्याच्या आईच्या दिशेने पळत गेला. इथे तो डौल नव्हता. बछडंच ते. दुडूदुडू करत आईला बिलगलं. आई आणि तिचं पिल्लू एकमेकांना अंग घासू लागलं. नील दुपारी अडीच वाजता शाळेतून आल्यावर जो सिन असतो त्याची आठवण आली.

पुढील दहा मिनिटे एकमेकांच्या साथीने ते मायलेकरू रस्त्याने जात मग जंगलात नाहीसे झाले.

उरलेल्या एक तासात आम्ही जंग जंग पछाडलं, पण त्या व्याघ्रराजाने किंवा राणीने काही दर्शन दिलं नाही.

कहर झाला तो दुपारच्या राईड मध्ये. त्या बद्दल पुढच्या पोस्ट मध्ये.

मला साईटिंग झालं (साईटिंग हा शब्द मला पहिल्यांदा कळला) यापेक्षा मी जास्त एन्जॉय केलं तो तिथला माहौल, ती उत्कंठा, जंगलातील शिस्त. मुख्य म्हणजे घरामध्ये लग्न असेल तेव्हा ते कसं भिनतं, तसा वणीकर किंवा बर्वेसारख्या लोकांमध्ये ताडोबा भिनतं.

अर्थात वणीकर. माझी आणि कॅमेराची दुश्मनी आहे.