दुपारची राईड आमची पावडी गेट पासून होती जे तरुवन रिसॉर्ट पासून ४० किमी लांब होतं. पहिली राईड संपवून थोडा
वेळ आराम केला आणि गेट वर पोहोचलो. त्या गेट वरून दुपारच्या राईड ला १ च जिप्सी ची परवानगी आणि दोन जिप्सी
अपॉझिट गेट ने. त्यामुळे त्या कोअर मध्ये फक्त ३ जिप्सी असणार होत्या.
गाईडने एका पाणवठ्यावर गाडी घेतली, मागोवा घेतला आणि पुढच्या वॉटर बॉडी वर घेऊन गेला. तिथं जिप्सी बंद करून
आम्ही वाट बघत असताना मला वॉटर बॉडीच्या पलीकडे झुडुपात काही हालचाल दिसली आणि कुणीतरी मोठा प्राणी आहे
हे जाणवलं. मी ग्रुपला सांगितलं आणि हो नाही करता करता ते अजस्त्र धूड सगळ्यांना दिसलं. समोर दाट झाडी. गाईड
आणि इतर दर्दी लोक अंदाज घेत राहिले आणि ते जनावर दिसेनासं झालं. आम्ही तिथेच थांबलो. वाघ उजवीकडे गेला
हे दिसलं पण नंतर काही अंदाज लागेना. पाच एक मिनिटे थांबून आम्ही पण उजवीकडे जिप्सी घेऊन एका झाडाखाली
वाट पाहत थांबलो.
दहा मिनिटे झाली. उत्कंठा शिगेला पोहीचली. शेवटी गाईड म्हणाला समोरच्या मोकळ्या रानात जिप्सी घाल. बघू काही
दिसतं कां ते! गाडी शंभर मिनिटे जाते ना तोच झाडाखाली ते डौलदार जनावर पहुडलेलं दिसलं. त्याची ती सिग्नेचर पोझ.
अख्खा देह जमिनीवर आणि मान अन अजस्त्र तोंड आमच्याकडे. जणू आव्हान, घ्या लेको किती फोटो काढता ते!
त्या रानात जिप्सी नेण्याची परवानगी नसल्यामुळे गाईड ने फक्त एक मिनिट वेळ दिला आणि झरकन जिप्सी आम्ही परत
झाडाखाली आणली आणि वाट बघत थांबलो. दहा एक मिनिटे थांबूनही राजा बधला नाही. ते उमदं जनावर परत
पणवठ्याला गेलं असेल म्हणून परत आम्ही तिथं गेलो, पाच मिनिटे थांबलो. पण दर्शन नाही.
त्या एक दीड मिनिटाच्या दर्शनावर समाधान मानावं लागतं की काय असा विचार करत आम्ही जिप्सी परत मूळ रस्त्याला
नेतो ना नेतो तोच ती सम्राज्ञी, हो वाघीण च परत, झाडाला अंग घासत असताना दिसली. समोर मोकळा रस्ता अन रान,
आम्ही अन ती वाघीण. वणीकरना घबाड मिळल्यासारखं वाटलं. बाजीप्रभूंची तलवार काय तळपली असेल तसे लोक
कॅमेरा फिरवू लागले.
आणि ज्या क्षणासाठी हे जंगल वेडे तरसत असतात तो आला. हेड ऑन. जिप्सी पुढे आणि समोर ती वाघीण. सागर मध्ये
डिंपल कपाडिया ला पहिल्यांदा पाहिल्यावर ऋषी कपूर जसा सैरभैर होतो तसे आम्ही जिप्सीतील लोक वेडावले होतो. जिप्सी
पुढे आणि ती कुवानी, हो हे नाव सांगितलं होतं, आमच्या मागे. तो तिचा आब, डौल न्याराच. सालं हे जनावर जंगलातच
शोभून दिसतं. जवळपास पंचवीस मिनिटे कुवानी आम्हाला दर्शन देत राहिली. अत्यंत रुबाबदार पणे रान सोडून ती वाघीण
झाडात शिरली पण आमच्या नजरेच्या टप्प्यात होती. त्या जंगलात तिचं राजबिंडं रूप आम्हाला दिसत होतं.
आणि अचानक जी गोष्ट जंगलात दिसायला काही पुण्य पदरात असावं लागतं त्याची पोझिशन वाघिणीने घेतली
अन ती म्हणजे शिकार. इंग्रजीत त्याला स्टोकिंग म्हणतात हे कळलं. दोन अजस्त्र गवे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आणि
वाघीण त्यांच्या दिशेने पळाली.
गवे पळाले, आमचं पुण्य कमी पडलं.
पहिलं दर्शन दिल्यापासून दीड एक तासाचा खेळ झाला होता. मगच वाघिणीने आम्हाला निरोप दिला. मनसोक्त
दर्शन दिलं. दिल जंगल झालं होतं. पुढचे दोन तास आम्ही परत प्रयत्न केला पण डरकाळ्याशिवाय फार काही हाती लागलं
नाही.
काही नोंदी:
१. वाघिणीचं नाव हे कुवानी नसून ........ आहे हे वणिकरानी आल्यावर पाच मिनिटात सांगितलं. इतका या लोकांचा अभ्यास
पक्का आहे.
२. वाघीण पहिल्यांदा मला दिसली, हे मुद्दामून लिहिण्याचं कारण म्हणजे वणीकर आणि गाईड हे नंतर भेटलेल्या प्रत्येकाला
आवर्जून सांगत होते की, मंडलिकने पहिल्यांदा स्पॉट केलं. त्याचं अप्रूप माझ्यापेक्षा त्यांना जास्त होतं.
३. ताडोबात जाणारे जंगलवेडे, गाईड, रेंजर्स, गार्डस यांनी शिस्त सॉलिड पाळली आहे.
४. पहिल्यांदा जुगार खेळणारा जसा जिंकतो आणि त्याला मग व्यसन लागतं तसं, जंगलात पहिल्यांदा येणाऱ्याला साईटिंग
होतं. मग त्याला व्यसन लागतं जंगलात जाण्याचं. त्याच्या बऱ्याच राईड ड्राय जातात. पण व्यसनच ते. सुटत नाही.
|
Sunday, 10 March 2019
ताडोबा 2
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment