Thursday 21 March 2019

५७ सेकंदाचा व्हिडीओ.

मोजून ५७ सेकंदाचा व्हिडीओ.

चौथी पाचवीच्या मुलामुलींचा शाळेतला क्लास. जेवणाची सुट्टी होते. मुलं मुली वह्या पुस्तकं दप्तरात टाकतात आणि खाण्याचे डबे उघडतात.

तो ही डबा काढतो. थोडयाशा आशंकेनेच झाकण उघडतो. त्याच्या मनातील भीती जी चेहऱ्यावर दिसते तीच खरी ठरते.

डबा ठक्क रिकामा असतो.

गरिबीने दिलेला चटका त्याच्या बरोबर आपल्यालाही बसतो.

क्लास टीचर ला सांगून तो एवढासा जीव वर्गाबाहेर जातो. तोंडात आलेलं पाणी बाहेर थुंकून टाकतो. थोड्यावेळ वर्गाबाहेर टाईमपास करत, बाकीच्यांचं खाऊन झालं असेल या बेताने तो परत वर्गात येतो.

अत्यंत निराश मनाने त्याचा डब्बा परत स्कुल बॅग मध्ये टाकण्यासाठी उचलतो.

त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य. डबा थोडासा जड लागतो. विस्मयचकित भावनेने तो हळूच झाकण उघडतो तर डबा काही खाद्य पदार्थांनी पूर्ण भरला असतो.

तो आजूबाजूला पाहतो. सगळी मुलं मुली आपापल्या जगात मश्गुल असतात. काही गालात हसतात पण डबा कुणी भरला हे त्याला कळू न देण्यात ते यशस्वी होतात.

आत्यंतिक आनंदाने तो पहिला घास घेतो.

आणि आपल्या धूसर डोळ्याला स्क्रीनवर मेसेज दिसतो.

We can not help everyone, but everyone can help someone.

कुणीतरी म्हणून गेलं आहे

"भले तुम्ही मेंदूने कॅपिटलिस्ट असा, नव्हे व्हाच, पण हृदयात समाजवाद जोपासा आणि हाताला साम्यवाद शिकवा. There is possibility that this world may be livable and lovable."

(कुणीतरी म्हंटलं असं लिहिलं की लोक सिरियसली घेतात, आदरवाईज हे वाक्य माझंच आहे 😊)

No comments:

Post a Comment