Thursday 21 March 2019

मी

मी एक सुशिक्षित बिनडोक आहे. मुर्खच म्हणा ना! मी माझ्या देशात फारसा फिरलो नाही आहे. इथे शेकडो भाषा बोलल्या जातात याची मला काहीही कल्पना नाही आहे. मी विविध प्रदेशातील अन्नाची चव कधी घेतली नाही आहे. मी इतर राज्यातील लोक, धर्म, भाषा, प्रथा, कथा, कला, कविता याबाबत जागरूक नाही आहे. मी माझ्या विश्वात, माझ्या सुखासीनतेत रममाण आहे. माझ्या साठी प्रगती म्हणजे, मोठे रोड्स, एक चांगली नोकरी, त्यातून मिळणारा पगार ज्यातून मी छान कपडे विकत घेऊ शकतो आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत दारू पिऊ शकतो. कधीही आणि कुणीही मला विरोध केला की मी त्याला माझा दुश्मन समजतो. माझ्या मागे सेल्फीत दिसला पाहिजे किंवा कधी सुट्टीत मला त्याची शांतता वाटली पाहिजे, याशिवाय निसर्गाशी मला काही घेणं देणं नाही आहे. मला संस्कृती म्हणजे काय हे माहीत नाही. सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असणं म्हणजे काय हेही मला माहित नाही. आयुष्याचा अत्यंत उथळ विचार करणारा माणूस आहे मी.

मला सार्वजनिक ठिकाणी वागावं कसं, स्वच्छता ठेवावी कशी याची अक्कल नाही आहे. मी कुठंही थुंकतो, कुठेही मुततो, बायकांची छेड काढतो, त्यांच्यावर बलात्कार करतो, त्यांना घाणेरड्या शब्दात शिव्या देतो. दुसऱ्या भाषा तर सोडाच, मी माझ्या भाषेतील कोणतेही साहित्य वाचले नाही आहे. इतिहासाकडून काय शिकावं ही बुद्धी माझ्याकडे नाहीच. ऐतिहासिक स्थळांना विद्रुप करणं, धार्मिक स्थळांची कचराकुंडी करणं हा माझा हक्क आहे. माझी विनोदबुद्धी बकवास आहे. स्वच्छता ठेवणे ही मी सोडून बाकी साऱ्यांची जबाबदारी आहे यावर मी ठाम आहे. मी विनाकारण जोरात हॉर्न वाजवतो, नो एन्ट्री मध्ये बिनदिक्कत गाडी घालतो, रांग मोडतो, काम करून घेण्यासाठी लाच देतो, निषेध व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. समाजात वावरताना मी खांद्याच्या वरचा भागाचा वापर करत नाही, सुसंवाद साधत नाही, दुसर्याप्रति आदर ठेवत नाही, शांतता ठेवत नाही, स्वच्छता पाळत नाही. त्यामुळेच राजकारणात मी ज्यांना फॉलो करतो ते ही असेच एकतर भ्रष्ट आहेत, नाहीतर अहंकारी आहेत, माजोरडे आहेत आणि त्यांच्या असं असण्याचा मी उदोउदो करतो.

मी असा आहे. इथल्या बहुतांश वर्गाचा प्रतिनिधी. काय म्हणता, तुम्ही असे नाही आहात? खरं सांगताय का? नाही, तुम्ही असे नसाल तर कदाचित तुम्ही या देशाचे नागरिक आहात का, या बद्दल शंका आहे. किंवा तुम्हाला शिक्षण आणि संस्कार चुकीचे मिळाले आहेत. किंवा परिस्थितीने तुम्हाला मूर्खासारखं वागण्यापासून परावृत्त केलं आहे. कुणास ठाऊक, तुम्ही चांगली पुस्तकं वाचली असावीत, कदाचित. की असं काही आहे की "विशाल मनाचा माणूस" हा रोग तुम्हाला झाला आहे?

या सर्वसाधारणपणे बिनडोक लोकांच्या महाकाय देशात तुमचं अस्तित्व नगण्य आहे. तुमच्या असण्याचा इथं काहीही फरक पडत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही असे मूर्ख नाही आहात यासाठी मी तुम्हाला ठोकुही शकतो. 

(श्रीविद्या श्रीनिवासन यांचा मूळ इंग्रजी लेख चैताली आहेर यांच्या वॉल वर वाचल्यावर कुणीतरी कानाखाली मारली असं वाटलं मला. मी विचार केला, मी एकटाच का मार खाऊ. म्हणून मग भाषांतर केलं आणि इथं टाकला 😊😊)

No comments:

Post a Comment