Thursday, 14 March 2019

जॉब

फोन आला. फोनकर्त्याच्या मित्राला जॉब हवा होता. जॉब सिकर चं नाव होतं सचिन. 

सचिनचा बायोडाटा आला. खणखणीत करियर होतं. मल्टिनॅशनल कंपनीत दहा बारा वर्षे काम केलं होतं. नंतर आवड म्हणून टिचिंग प्रोफेशन मध्ये शिरले. पण एकुणात शिक्षण महर्षींनी केलेला बाजार पाहून आणि एकुणात अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्वालिटी ची वाट लागलेली पाहून तीन चार वर्षात पस्तावले. 

माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं पोटतिडकीने बोलले. त्यांची या विषयाची तळमळ पाहून मी त्यांना विचारलं की फायनली काय करायचं ठरवलं आहे. तर म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये परत यायचं. मी विचारलं, पण तुमची आवड अध्यापन असेल तरीही. तर हो म्हणाले. 

मी म्हणालो "असं समजा की माझ्याकडे मॅन्युफक्चरिंग च्या हेड ची पोझिशन आहे आणि एक माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे मला एका चांगल्या प्रोफेसरची गरज आहे. हे कॉइन आहे. टॉस करू. हेड पडलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि टेल पडलं तर ट्रेनिंग मध्ये. आता मी टॉस केलं तर कॉइन हवेत असताना, तुमच्या मनाला काय वाटेल? हेड पडावं की टेल?"

सचिन संभ्रमात पडला. अन हळूच म्हणाला "टेल. पण तरीही......"

मी सांगितलं "कॉइन पडल्यावर जे येईल ते स्वीकारणं ही तडजोड झाली. आणि कॉइन हवेत असताना काय पडावं असं वाटणं ते निवडणं हे आयुष्य. तुम्ही अध्यापन क्षेत्र सोडू नका. तुमच्या सारखी लोक अभियांत्रिकी क्षेत्राची गरज आहे. दुर्दैव हे की आज सगळ्यात जास्त विनोद हे इंजिनियर्स वर होत आहेत. चहाचा धंदा चांगलाच पण इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून त्याची खिल्ली उडवण्याचा नतद्रष्ट पणा डोक्यात जातो. लॅब मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाला लोकाभिमुख करण्याचं काम तंत्रज्ञांचं आणि ते ताकदीने व्हावं यासाठी तुमच्या सारख्या लोकांनी हे क्षेत्र सोडू नये". 

इतकं बोलून अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवडली जी प्रोफेशनल पद्धतीने चालवली जाते. तिथे त्यांचा रेफरन्स दिला. इंटरव्ह्यू बहुतेक शेड्युल झाला आहे. सचिनला जॉब मिळाला तर तो त्याचं सोनं करेल याबाबत शंका नाही. त्याला हार्दिक शुभेच्छा. 

अ...... अभियंत्याचा हे फक्त पुस्तकाचं नाव नाही आहे, ती माझी जीवन प्रणाली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हो, अभिमान आहे, गर्व नव्हे. 

No comments:

Post a Comment