Thursday 21 March 2019

काढता पाय

लिंक्ड इन वर एक पोस्ट होती. भारताच्या मार्केट कॅप ने जगात सातवा क्रमांक गाठला. जर्मनी ला मागे टाकले.

आता अशा बातम्या वाचून भारताबद्दल विनाकारण पोटशूळ उठणारे आंग्लेय मंडळी असतातच. तिथे एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली.

"देव असे न करो, पण भारत या भूमीवरून नाहीसा झाला तर कुठल्याही दुसऱ्या देशाचं काहीही बिघडणार नाही. जर्मनीबद्दल तसं म्हणता येणार नाही."

मी प्रतिवाद करत त्याला सांगितलं "त्या पोस्टमध्ये भारताची टिमकी वाजवायची असं काही नाही आहे. ती फक्त माहिती आहे. त्यामध्ये आम्ही भारतीय हे जर्मन पेक्षा भारी आहोत असा कुठेही अविर्भाव नाही आहे"

मग अजून एकाने भारतातल्या खराब प्रॉडक्ट क्वालिटीचा उल्लेख केला. महिंद्रा किंवा टाटा च्या गाड्या बेसिक सेफ्टी नॉर्मस् पूर्ण करू शकत नाही. (हे कुठून कळलं ते देव जाणे) बीएमडब्ल्यू किंवा मर्क बद्दल असं बोलू शकत नाही.

मी परत त्याला सांगितलं "पोस्ट आणि तुम्ही म्हणता ती कदाचित वस्तुस्थिती असेलही. आमच्या लोकसंख्येच्या हिशोबाने केवळ हे झालंही असेल. त्यामध्ये आमची प्रॉडक्ट क्वालिटी ग्रेट आहे हा दावा कुठंही नाही. इन फॅक्ट आमची सगळी इंजिनियरिंग इंडस्ट्री ही जर्मन इंडस्ट्री ला बेंचमार्क करते." वगैरे वगैरे.

असे वाद प्रतिवाद चालू असताना तिथे एक उत्तर भारतीय सद्गृहस्थ आले. आणि त्यांनी आंग्ल लोकांना उद्देशून कॉमेंट टाकली
"तुम्हाला माहिती आहे का भारताने जगाला शून्य दिलं......" आणि मग तेच पुढचं टेस्ट ट्यूब बेबी, प्लास्टिक सर्जरी वगैरे.

मी तिथून मग हळूच काढता पाय घेतला. 😊😊

No comments:

Post a Comment