Thursday 21 March 2019

फेसबुकवर ओळख

फेसबुकवर ओळख झालेल्या एक कुटुंबाकडे मला जेवायला बोलवलं होतं. माझ्याबरोबर त्यांनी अजून एका मित्राला जेवायला बोलावलं होतं जो त्या कुटुंबाला बरेच वर्षांपासून, म्हणजे वीस एक वर्षे, ओळखत होता.

नमस्कार झाले, ओळख झाली, गप्पा झाल्या, बिझिनेस काय वगैरे जाणून झालं.

जेवणाच्या टेबलवर तो कौटुंबिक मित्र म्हणाला "हे तुमचं सगळं छान आहे. फेसबुकवरील मैत्री, विचार जुळले वगैरे वगैरे. पण तरीही एक गोष्ट मला झेपत नाही ती अशी की मी या कुटुंबाबरोबर मैत्रीचं नातं फुलवण्यासाठी पंचवीस वर्षे व्यतीत केली आहेत. तुझी यांच्याशी मैत्री फारतर दोन वर्षांची. आणि तरीही आपण आज एका टेबल वर एकत्र जेवायला बसलो आहे, हे काही मला पटत नाही."

म्हणणं बिनतोड होतं.

माझा एक लहानपणीचा मित्र मला नेहमी तक्रारवजा म्हणतो "फेसबुकच्या लोकांना द्यायला तुला वेळ आहे आणि आम्हाला भेटत नाही."

हे बरोबर की नाही ते वेगळं पण प्रतिमा तशी तयार झाली आहे हे खरं. तसं बघायला गेलं तर गेल्या पाच वर्षात फार तर पन्नास एक वेळा, जास्तच वाटताहेत, फेसबुकच्या मित्रांना भेटलो असेल. पण त्या न्यूज फीड चा आवाका इतका मोठा आहे, आणि परत पोस्टवर होणारी चर्चा यामुळे पोस्टकर्ता कायम या गोतावळ्यात असतो असं वाटण्याची शक्यता आहे.

खरंतर काळाच्या कसोटीवर इथली मैत्री अजून सिद्ध व्हायची आहे. एखादी जाहिरात केल्यासारखे आपण, म्हणजे मी तरी, इथे व्यक्त होतो. त्यावरून कुणी इम्प्रेस होतं, कुणी हाडतुड करतं. प्रत्यक्षात मी किती चालू आहे, आक्रस्ताळा आहे हे इथं माहीत होण्याची सुतराम शक्यता नसेल याची मी पुरेपूर काळजी ब्रँड बनवताना घेतो. इथे आतापर्यंत मोजके लोक भेटले आहेत जे मला लॉंग टर्म मध्ये मित्र म्हणून स्वीकारतील. अन्यथा फेसबुकवरील मैत्री न्यूज फीड पुरती मर्यादित असून ती प्रत्यक्षात फुलवण्यासाठी, तो मित्र म्हणल्याप्रमाणे, खूप प्रयत्न करावे लागतील पण तितका वेळ देऊ शकणार नाही, हे माझं मत आहे.

😊😊

No comments:

Post a Comment