Monday 18 March 2019

पाचवी पणती

ती आली होती माझ्याकडे फेसबुकच्या माध्यमातून. कुणीतरी रेफरन्स दिला होता. जॉब साठी. त्या वेळेस माझ्याकडे तिच्या प्रोफाईलचा जॉब नव्हता. मुलगी थोडी विस्कळीत वाटली होती मला. नकारात्मकता तर अगदी ठासून भरली होती तिच्यामध्ये. मी सांगितलं तिला की सध्या तरी जॉब नाही.

साधारण पाच महिन्यात तिच्या प्रोफाईलचा जॉब माझ्याकडे तयार झाला. मी तिला कॉंन्टॅक्ट केला तर ती कुठलासा कोर्स करायला बंगलोर का कुठेशी गेली असं कळलं. मग मी ती जागा भरली. तेव्हापासून एकाच महिन्यात ती परत आली जॉब मागायला. मी तर जागा भरली होती.

मला काळजी वाटली त्या मुलीची. तिच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. होती मराठवाड्यातील. एकटीच पुण्याला. वय ही २८-२९. लग्नाचा पत्ता नाही. निगेटिव्हिटी सदैव टपकायची तिच्या बोलण्यातून. मी विचार केला ही पोरगी जर रस्त्यावर आली नाही तर आयुष्यातून उठेल.

मी तिला पहिले सांगितलं "तुला पहिले आर्थिक स्थैर्य आणावं लागेल आयुष्यात. मग आपण तुझे बाकीचे प्रॉब्लेम बघू. जॉब शोधतो तुझ्यासाठी."

सुदैवाने एक जॉब मिळाला, तिच्या प्रोफाईल ला सूट होणारा. मुख्य म्हणजे ऑफिस मला माहित होतं. तिथला मालक आणि इतर अनेक एम्प्लॉईजला मी ओळखत होतो. तिथं तिच्या व्यक्तिमत्वात बदल होईल असं मला वाटायचं.

ती जॉईन झाली तिथं. काम चालू झालं. पण ही  दर  महिन्याला कटकट करायची. मला जमत नाही, आवडत नाही, मला तुमच्या कंपनीत घ्या. मी जॉब सोडते. एकदा आली आणि म्हणाली "मी ब्युटी पार्लर काढते." आता मात्र तडकलो. तिला म्हणालो "डोकं जागेवर असेल तर एक वर्ष हा जॉब सोडू नको. चार पैसे कमव. एक वर्षाच्या आधी जर जॉब सोडलास तर परत मला कुठल्याही कारणांसाठी कॉन्टॅक्ट करायचा नाही. आणि जरा अवतार बदल. थोडी जिम वगैरे लाव, वॉर्डरोब चेंज कर."

पोरीने ऐकलं. खुश राहू लागली. सव्वा वर्षे काम केलं.

आणि एक दिवशी तिचा फोन आला. स्थळ आलं आहे, मुलगा जर्मनीत असतो. पोराचं प्रोफाईल झकास. आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं घडतं म्हणजे काही तरी प्रॉब्लेम या धारणेने ती मुलगी परत काही त्यात खोट काढत होती. मी तिला सांगितलं "जास्त फाटे फोडू नकोस. जशा गोष्टी सामोऱ्या येतील तशा फेस कर. चांगलं होईल."

यथावकाश तिचं लग्न झालं.

दहा दिवसांपूर्वी भेटली मला. खूप खुश दिसत होती. सुखात्मकता आणि सकारात्मकता ठायी ठायी दिसत होती. जी मुलगी फक्त माझ्याशी प्रॉब्लेम्स शेअर करायची, तिने सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं. काही दिवसात जाईल ती जर्मनीला. तिला हार्दिक शुभेच्छा.

मी वर पोहोचल्यावर चित्रगुप्त सांगेल मला की तुझी जागा तशी नरकातच आहे. पण अशी काही गोष्ट सांगितली की ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचा ट्रॅक बदलण्यात तुझा थोडा हातभार आहे, तर मी तुला दोन एक दिवस स्वर्गात राहायला देईल. तर मी ही घटना सांगेन.

(स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या मी पोस्ट टाकतोच. पण ही पकडून आधीच्या पाच पोस्ट या केवळ फेसबुकच्या माध्यमातून काही चांगलं घडू शकतं हे सांगण्यासाठी आहेत.)

पाचवी पणती 

No comments:

Post a Comment