Sunday 10 March 2019

ताडोबा 1

या हर्षदचं पुस्तक वाचून वाघ बघण्याची उर्मी फारच मनात दाटून आली होती. माझे मित्र आणि सीएनसीटाइम्स.कॉम चे प्रवर्तक नीरज वणीकर यांनी ताडोबाची ट्रिप ठरवली आणि मी विचार केला, हा उद्योग पण करून टाकू.

वणीकरांनी बरोबर काय गोष्टी घ्यायच्या याची लिस्ट पाठवली होती. त्यात आयकार्ड घेण्याबद्दल चार चार वेळा बजावून ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं की आयकार्ड नसेल तर जंगलात जाण्याचा विचार पण करू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल. नागपूरला इनोव्हा मध्ये बसल्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. इतकं घाबरवल्यामुळे मी कार मध्येच थांबवली. बॅगेत पॅन कार्ड आहे ते बघितलं आणि सुस्कारा सोडला.

तरुवन  नावाच्या रिसॉर्ट चे मालक निखिल अभ्यंकर, वणीकर, संदीप आणि मी असे गप्पा मारत निघालो, उमरेडला चहासाठी थांबलो. या जंगल क्षेत्रात चहा पिण्यासाठी सुद्धा पॅनकार्ड लागत असेल हा विचार करून मी कार्ड चहावाल्याला दाखवलं. सगळे हसले. चहावाल्याला काही कळलं नाही.

ताडोबाला पोहोचल्यावर पहिल्या सफारीसाठी सज्ज झालो. गाडीत इतकी उत्कंठा वाढली होती की कधी वाघ दिसतो असं झालं होतं. दुर्दैवाने ८ फेब्रुवारी ची पहिली सफारी आमची ड्राय गेली. सगळे हिरमुसले. मला फार काही वाटलं नाही. कारण तो आनंद काय असतो हे मला अजून माहित नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाची पहिली सफारी चालू केली. इतका वेळ बरोबरच्या लोकांचं बोलणं ऐकून मला बफर, कोअर हा जंगलाचा एरिया, एकुणात १८०० स्क्वे किमी क्षेत्रफळ, त्यातील साधारण १२०० बफर तर ६०० कोअर हे कळलं होतं. जंगलातील सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकल्या होत्या. मटकासुर, माया, तारा, रूपा, सोनम, ताराचंद, छोटा मटका, कुवानी ही वाघ वाघिणींची नावं मला एव्हाना पाठ झाली होती.  कॉल कसे मिळतात तेही कळलं. आतली गावं कशी विस्थापित केलं तेही कळलं. काही कारणामुळे गावकरी कपल जंगलात उभं होतं आणि दोन वाघ त्यांना कसे हुंगून गेले अशा भीतीदायक कथा पण ऐकवल्या गेल्या.

एकुणात माहोल तयार झाला होता. बफर एरियात जिप्सी एंट्री करतो तोच गाईड प्रवीण म्हणाला, "थांबा. लेपर्ड रस्ता क्रॉस करतोय." डोळे फाडून बघत असताना ते छोटं जनावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एका दगडावर बसलेलं दिसलं, फक्त एका मिनिटासाठी. आणि पटकन बाजूच्या झाडीत पळून गेलं. "फार शाय असतं ते". जंगलातील टर्म्स मला कळत  होत्या. सफारी चालू असताना जंगलातल्या एका पॉइंटला गार्डला हळूच विचारायचं, काही न्यूज. मग तो सांगणार त्या दिशेने जिप्सी पळवायची. आणि निराशा पदरी यायची. जंगलातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर चार पाच जिप्सी आणि दोन कँटर कॉल मुळे शांतपणे थांबल्या होत्या.

आणि तितक्यात तीन एकशे मीटर वर ते डौलदार जनावर जिप्सीतील एकाला दिसलं आणि सर्व गाड्या सुसाट जात त्याच्या पासून अलीकडे थांबल्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा जंगलाची सम्राज्ञी, हो वाघीण होती ती, दिसली. क्लिक क्लिक करत खचाखच फोटो ओढू लागले. आणि तितक्यात आमचा गाईड म्हणाला, ती थांबली आहे याचा अर्थ बच्चू येत आहे. रस्त्याच्या डाव्या कडेला ती राणी, छोटी तारा नाव तिचं उभी होती, सर्वच गाडीतील लोक कुजबुजत होते. 

शेवटी तिचा बछडा उजवीकडच्या जंगलातून आला. त्याच्या आईच्या दिशेने पळत गेला. इथे तो डौल नव्हता. बछडंच ते. दुडूदुडू करत आईला बिलगलं. आई आणि तिचं पिल्लू एकमेकांना अंग घासू लागलं. नील दुपारी अडीच वाजता शाळेतून आल्यावर जो सिन असतो त्याची आठवण आली.

पुढील दहा मिनिटे एकमेकांच्या साथीने ते मायलेकरू रस्त्याने जात मग जंगलात नाहीसे झाले.

उरलेल्या एक तासात आम्ही जंग जंग पछाडलं, पण त्या व्याघ्रराजाने किंवा राणीने काही दर्शन दिलं नाही.

कहर झाला तो दुपारच्या राईड मध्ये. त्या बद्दल पुढच्या पोस्ट मध्ये.

मला साईटिंग झालं (साईटिंग हा शब्द मला पहिल्यांदा कळला) यापेक्षा मी जास्त एन्जॉय केलं तो तिथला माहौल, ती उत्कंठा, जंगलातील शिस्त. मुख्य म्हणजे घरामध्ये लग्न असेल तेव्हा ते कसं भिनतं, तसा वणीकर किंवा बर्वेसारख्या लोकांमध्ये ताडोबा भिनतं.

अर्थात वणीकर. माझी आणि कॅमेराची दुश्मनी आहे.  

No comments:

Post a Comment