Thursday 21 March 2019

ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी

एअरपोर्टवर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी नावाचं पुस्तक वाचत बसलो होतो. बिझिनेस करताना कॉम्पिटिशन ला तोंड देताना काय करायला पाहिजे, आपल्या प्रॉडक्ट च्या प्राईस वर नव्हे तर व्हॅल्यू वर लक्ष केंद्रित करून, ती वाढवून स्वतःला वेगळं कसं प्रस्थापित करायचं याचं सुंदर स्पष्टीकरण पुस्तकात दिलं आहे. थोडक्यात स्वतःची एक मार्केट स्पेस तयार करून तिथे असलेल्या भाऊगर्दीपासून वेगळं कसं ठेवायचं याबद्दल युक्तीच्या चार गोष्टी त्यात आहेत.

बोर्डिंगची घोषणा झाली अन मी विमानाकडे नेणाऱ्या बसमध्ये शिरलो. या बसच्या मधल्या भागात मोकळी जागा असते. तिथे एकमेकांना रेटारेटी करत खूप लोक दाटीवाटीने उभे होते. माझी नजर बसच्या मागच्या बाजूला गेली तर तिथे अमाप जागा होती. सीटची मागील रांग तर पूर्ण रिकामी होती.

मी त्या गर्दीतून वाट काढत बसच्या मागच्या बाजूला गेलो. त्या मागील सीटच्या रांगेत मी एकटाच बसलो होतो. मी इकडे एकटा बसलो असताना समोर मधे उभे असलेले लोक मात्र श्वास पण धड घेऊ शकत नव्हते.

एखादं मॅनेजमेंटचं पुस्तक वाचावं आणि त्यात लिहिलेल्या गोष्टीचा अनुभव इतक्या पटकन आपल्याला यावा असं या आधी क्वचितच घडलं होतं.

No comments:

Post a Comment