२००३ साली टाटा सन्स मध्ये हरखलो होतो. लंडन मध्ये ललिता जेम्स मला तिच्या ऑफिस मध्ये घेऊन गेली होती. तिने मला एक केबिन दाखवली होती, एम एस ओबेरॉय यांची. फार भारी वाटलं होतं. असाच एक अनुभव नुकताच आयुष्यात आला. तो म्हणजे आर के लक्ष्मण यांच्या घरी जाण्याचा. हो तेच “Creator of common man with uncommon sense of humor”.
फेसबुकने मला काही रत्ने दिली आहेत. त्यापैकी एक आहे तिच्या वयाला न शोभणारी संवेदनशीलता बाळगणारी, शास्त्रज्ञ होण्याच्या दिशेने हळूहळू पण दमदार पावलं टाकणारी. तिची अन माझी ओळख झाली तेव्हा मला तिचं फेक अकौंट वाटलेलं. अनेकानेक प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. (तिच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतातच). तिच्याच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबाबद्दल मला आत्मीयता आहे अशी रुचिरा.
तर ही सारखी मला सांगायची श्रीनि सर आणि तुम्ही भेटावेत असं खूप वाटतं. तर हे श्रीनि सर म्हणजे आर कें चे चिरंजीव. मी विचार करायचो, इतक्या मोठ्या माणसाचा वारसा. मी भेटून काय बोलणार? त्यांना आवडेल का? बरं ते स्पेस जर्नलिस्ट. माझं त्या बद्दलचं नॉलेज अगदी उथळ. मी आपलं हो म्हणायचो. १४ फेब्रुवारीला ने रुचिरा ने परत चिवचिव केल्यावर आम्ही तारीख ठरवली. ९ मार्च.
प्रिया प्रभुदेसाई बरोबर आस्वाद मध्ये नाश्ता केला. आणि मॅजेस्टिक मध्ये काही पुस्तकं घेतली एक श्रीनिसाठी आणि एक माझ्यासाठी. श्रीनि सरांना द्यायचं पुस्तक अर्थात रुचिरा ने ठरवलेलं. मग लोअर परेल च्या फिनिक्स मॉल मध्ये भेटलो श्रीनि सरांना. तुम्हाला सांगतो साधेपणाची कमाल मर्यादा म्हणजे श्रीनिवास लक्ष्मण. गर्व, अहंकार, दिखाऊपणा हे अवगुण त्यांच्या जवळपास पण नाहीत. दोन एक तास गप्पा मारल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो. पेडर रोडला.
दरवाजावर पाटी वाचली. R K Laxman. अंतर्बाह्य थरारलो. आत गेलो आणि भारावल्यासारखं त्या हॉल मध्ये भिरभिरत होतो. आर कें नी स्वहस्ते काढलेली अनेक चित्रे मी पाहिली. यातली तीन मला चित्रं फार आवडली. पण सगळ्यात भारी १९६२ साली काढलेलं, ज्यात त्यांनी त्यांचा मुलगा चांद्रभूमीवरून पृथ्वीकडे पाहतो. १९६९ साली मानवाने चंद्रावर पाय ठेवला आणि श्रीनि पुढे स्पेस जर्नलिस्ट झाले. हा दिवस आहे की स्वप्न याची मी पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेत होतो.
श्रीनिवास सरांची स्वतःची रूम म्हणजे अंतराळातल्या माहितीचा खजाना आहे. आपल्या आवडीच्या कामासोबत जगणे म्हणजे काय हे तिथं जाऊन कळतं. दुपारभर सर आणि त्यांची पत्नी उषा यांच्याशी गप्पा आणि सोबतीला रुचिरा ची टीवटीव.
निघालो. राहवलं नाही. R K Laxman या पाटीच्या शेजारी उभा राहून फोटो काढून घेतला. कुणाबद्दल असणारी आदराची भावना उचंबळून येणे याची अनुभूती झाली.
एका स्वप्नवत दिवस अंजली आळेकर यांना भेटून संपला.
सांगायचं म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदा कुणाला भेटण्यासाठी कामावरून सुट्टी घेतली.
No comments:
Post a Comment