Thursday, 21 March 2019

राम 20

मी असा एम डी वगैरे झालो कंपनीचा तरी तु माझ्याकडे ढुंकून पण पाहत नाहीस. साला समजतो कोण तू स्वतःला?" मी रामला चिडून विचारलं.

"भावड्या, तुझी पोझिशन काय, तू एमडी का काय असशील, तू पैसे किती कमावतो याने मला काही घंटा फरक पडत नाही. तू लोकांना कसं वागवतोस इतक्या साध्या गोष्टीवरून तुझी लायकी कळते'. राम म्हणाला.

माझी लायकी काढल्यावर मी ही सटकलो. मी म्हणालो "अच्छा, अजून काय तुझे असले फंडे आहेत, ते तर कळू देत."

"आता तू विचारण्याचा गुन्हा केला आहेस तर ऐकून घे."

- स्वतः प्रॉब्लेम्स च्या गर्तेत अडकला असताना सुद्धा तू दुसर्यांना मदत करू शकतो का?

किंवा

- ज्याला इम्प्रेस करायचं त्यालाच नव्हे तर प्रत्येकाशी आदर देत तू वागतोस का?

झालंच तर

- स्वतःच्या चुका कबूल करण्याइतकं तुझं मन मोठं आहे का आणि मुख्य म्हणजे ती चूक निस्तरण्याची धमक ठेवतोस का?

असलं काही असेल तर माझ्यासमोर उभा रहा. नाहीतर बाजू हो. जरा हवा येऊ दे."

मी

मी एक सुशिक्षित बिनडोक आहे. मुर्खच म्हणा ना! मी माझ्या देशात फारसा फिरलो नाही आहे. इथे शेकडो भाषा बोलल्या जातात याची मला काहीही कल्पना नाही आहे. मी विविध प्रदेशातील अन्नाची चव कधी घेतली नाही आहे. मी इतर राज्यातील लोक, धर्म, भाषा, प्रथा, कथा, कला, कविता याबाबत जागरूक नाही आहे. मी माझ्या विश्वात, माझ्या सुखासीनतेत रममाण आहे. माझ्या साठी प्रगती म्हणजे, मोठे रोड्स, एक चांगली नोकरी, त्यातून मिळणारा पगार ज्यातून मी छान कपडे विकत घेऊ शकतो आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत दारू पिऊ शकतो. कधीही आणि कुणीही मला विरोध केला की मी त्याला माझा दुश्मन समजतो. माझ्या मागे सेल्फीत दिसला पाहिजे किंवा कधी सुट्टीत मला त्याची शांतता वाटली पाहिजे, याशिवाय निसर्गाशी मला काही घेणं देणं नाही आहे. मला संस्कृती म्हणजे काय हे माहीत नाही. सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असणं म्हणजे काय हेही मला माहित नाही. आयुष्याचा अत्यंत उथळ विचार करणारा माणूस आहे मी.

मला सार्वजनिक ठिकाणी वागावं कसं, स्वच्छता ठेवावी कशी याची अक्कल नाही आहे. मी कुठंही थुंकतो, कुठेही मुततो, बायकांची छेड काढतो, त्यांच्यावर बलात्कार करतो, त्यांना घाणेरड्या शब्दात शिव्या देतो. दुसऱ्या भाषा तर सोडाच, मी माझ्या भाषेतील कोणतेही साहित्य वाचले नाही आहे. इतिहासाकडून काय शिकावं ही बुद्धी माझ्याकडे नाहीच. ऐतिहासिक स्थळांना विद्रुप करणं, धार्मिक स्थळांची कचराकुंडी करणं हा माझा हक्क आहे. माझी विनोदबुद्धी बकवास आहे. स्वच्छता ठेवणे ही मी सोडून बाकी साऱ्यांची जबाबदारी आहे यावर मी ठाम आहे. मी विनाकारण जोरात हॉर्न वाजवतो, नो एन्ट्री मध्ये बिनदिक्कत गाडी घालतो, रांग मोडतो, काम करून घेण्यासाठी लाच देतो, निषेध व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. समाजात वावरताना मी खांद्याच्या वरचा भागाचा वापर करत नाही, सुसंवाद साधत नाही, दुसर्याप्रति आदर ठेवत नाही, शांतता ठेवत नाही, स्वच्छता पाळत नाही. त्यामुळेच राजकारणात मी ज्यांना फॉलो करतो ते ही असेच एकतर भ्रष्ट आहेत, नाहीतर अहंकारी आहेत, माजोरडे आहेत आणि त्यांच्या असं असण्याचा मी उदोउदो करतो.

मी असा आहे. इथल्या बहुतांश वर्गाचा प्रतिनिधी. काय म्हणता, तुम्ही असे नाही आहात? खरं सांगताय का? नाही, तुम्ही असे नसाल तर कदाचित तुम्ही या देशाचे नागरिक आहात का, या बद्दल शंका आहे. किंवा तुम्हाला शिक्षण आणि संस्कार चुकीचे मिळाले आहेत. किंवा परिस्थितीने तुम्हाला मूर्खासारखं वागण्यापासून परावृत्त केलं आहे. कुणास ठाऊक, तुम्ही चांगली पुस्तकं वाचली असावीत, कदाचित. की असं काही आहे की "विशाल मनाचा माणूस" हा रोग तुम्हाला झाला आहे?

या सर्वसाधारणपणे बिनडोक लोकांच्या महाकाय देशात तुमचं अस्तित्व नगण्य आहे. तुमच्या असण्याचा इथं काहीही फरक पडत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही असे मूर्ख नाही आहात यासाठी मी तुम्हाला ठोकुही शकतो. 

(श्रीविद्या श्रीनिवासन यांचा मूळ इंग्रजी लेख चैताली आहेर यांच्या वॉल वर वाचल्यावर कुणीतरी कानाखाली मारली असं वाटलं मला. मी विचार केला, मी एकटाच का मार खाऊ. म्हणून मग भाषांतर केलं आणि इथं टाकला 😊😊)

इंडिया शायनिंग

बीजेपी चं हे मागच्या वेळीही झालं होतं. त्यावेळी इंडिया शायनिंग ह्या टॅग लाईन ने त्यांचा घात केला होता. आता अशी काही टॅग लाईन नाही आहे, पण एकुणात न केलेल्या कामाचा बोलबाला रेटून करायचा आणि मुख्य म्हणजे जनतेला येडं समजायचं, हा बीजेपी चा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या मानसिकतेतून ते बाहेर येत नाहीत.

सगळ्यात मोठी गल्लत इथे झाली की बीजेपी ला अजूनही असं वाटतं की लोकांमध्ये धार्मिक तेढ वाढवून राज्य करता येईल. विकासाचं नाव पुढं करायचं आणि अत्यंत हिणकस असे धार्मिक अजेंडे रेटायचे. हा जो विश्वासघात ते करतात त्यामुळे त्यांचे वांदे होतात. स्वच्छ भारत साठी महात्मा गांधींचा वापर करून घेणे, वल्लभभाई पटेल यांना हायजॅक करणं, त्या योगींनी सुद्धा काय बिनडोक मुहूर्त शोधला, फैजाबाद चं नाव बदलायला, गायीचं अनाठायी उदात्तीकरण हे सगळं भोवलं. जे तुमच्या मनात आहे ते स्वीकारलं जाणार नाही हे माहिती असल्यामुळे विकासाचा मुखवटा समोर केला आणि अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करत समाजात तेढ निर्माण केली. फाजील आत्मविश्वास आणि सगळी दुनिया आपल्या मुठीत आहे या गैरसमजात राहिले आणि स्वतःचा गळा घोटून घेतला.

एक वेळेत गरिबीत राहू हे जनता मान्य करेल, धार्मिक अस्मितेच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व जोपासणं हे सामान्य जनतेला कधी जमलं नाही आणि जमणार नाही हे बीजेपी कधी ध्यानात घेत नाही.

भ्रष्टाचार हा मोठा प्रॉब्लेम आहेच आणि काँग्रेस त्यासाठी बदनाम आहे. पण तो सामान्य माणसाच्या आयुष्यात भीती निर्माण करत नाही, असुरक्षितता तयार करत नाही, मनातल्या माणुसकीला मारत नाही. भ्रष्टाचार हा गुन्हा आहे आणि त्याला योग्य ती शिक्षा दिली जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ती दिली जात नाही हे सत्य आहे, पण तो स्वीकारार्ह नसतो. पण धर्मांधता आणि भ्रष्टाचार असा जर चॉईस दिला तर सामान्य जनता भ्रष्टाचाराचा स्वीकार करेल हे पण या निकालावरून सिद्ध होतंय.

मंदिर, पुतळे, नाव बदलणे, गोहत्याबंदी, बाष्कळ बरळणे या असल्या अन प्रॉडक्टिव्ह गोष्टीत हे सरकार वेळ, पैसा, ऊर्जा वाया घालवत गेली. शेतकऱ्यांप्रति दाखवलेली अनास्था आणि आश्वासनांची चक्क जुमला म्हणून केलेली बोळवण   

समाजसेवा

२०१३ साली मला समाजसेवा करण्याची खाज आली होती. त्यातून मग मी पाच समाजसेवी संस्थांना कॉन्टॅक्ट केलं. त्यातील आपलं घर चे फळणीकर आणि स्नेहालय च्या गिरीश कुलकर्णी यांच्या संपर्कात आलो. दोन्ही संस्थांना वेळ देता येतो का याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही ठिकाणी मी जाऊ लागलो. पण लक्षात आलं, सेटको सांभाळून या संस्थांना वेळ देणं हे निव्वळ अवघड आहे. थोडक्यात खाज कमी झाली. 😊😊.

दोन्ही संस्थाचालकांच्या संपर्कात मात्र राहिलो. पुढे मग स्नेहवन च्या अशोक देशमाने आणि आरंभ च्या अंबिका टाकळकर यांच्याशी ओळख झाली.

या भेटीगाठी चालू असताना, आपलं घर आणि माझी कंपनी जवळ असल्याने तिथे मी बऱ्याचदा जाऊ लागलो. आपलं घर च्या डोणजे वसतिगृहात या ना त्या कारणाने चकरा वाढल्या.

एके दिवशी फळणीकरांनी आपलं घरच्या विश्वस्त मंडळावर यायचं निमंत्रण दिलं. काम काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं. तरी एक अनुभव घ्यावा म्हणून मी मंडळावर गेलो. त्यांच्या मीटिंग अटेंड करू लागलो. त्यापेक्षा भरीव काम काही मी करू नाही शकलो. पण एकुणात समाजसेवी संस्थांचं काम कसं चालतं याची जाणीव झाली. परत फळणीकर म्हणजे परफेक्शन चे भोक्ते. शासनाची कुठलीही मदत घ्यायची नाही हा खाक्या. शिस्तीचे दुसरे नाव.

वर्षभरातील काही नोंदी आणि आवाहन.

१. ना नफा ना तोटा तत्वावर समाजसेवी संस्था चालवणं हे एखादा नफा कमावणारा बिझिनेस चालवण्यापेक्षा खूप अवघड असतं.

२. आधी नि:स्पृहपणे काम करायचं, तेच संतपणाचं काम. ते केल्यावर काही असे काही अनुभव येतात की "हे ची फळ काय मम तपाला" अशी परिस्थिती फाळणीकरांनी खूप वेळा अनुभवली. जिवंतपणी मोक्ष प्राप्ती घ्यावी वाटली.

३. या समाजसेवी संस्था चालवताना डोनेशनची गरज असतेच, पण मनुष्यबळ ही लागतं.

४. समाजसेवेसाठी दुसरी फळी तयार करणं हे फार जिकिरीचं काम.

५. कुणाला डोनेशन द्यायची किंवा संस्थेत काम करायची इच्छा असेल तर जरूर संपर्क साधावा.

Monday, 18 March 2019

पाचवी पणती

ती आली होती माझ्याकडे फेसबुकच्या माध्यमातून. कुणीतरी रेफरन्स दिला होता. जॉब साठी. त्या वेळेस माझ्याकडे तिच्या प्रोफाईलचा जॉब नव्हता. मुलगी थोडी विस्कळीत वाटली होती मला. नकारात्मकता तर अगदी ठासून भरली होती तिच्यामध्ये. मी सांगितलं तिला की सध्या तरी जॉब नाही.

साधारण पाच महिन्यात तिच्या प्रोफाईलचा जॉब माझ्याकडे तयार झाला. मी तिला कॉंन्टॅक्ट केला तर ती कुठलासा कोर्स करायला बंगलोर का कुठेशी गेली असं कळलं. मग मी ती जागा भरली. तेव्हापासून एकाच महिन्यात ती परत आली जॉब मागायला. मी तर जागा भरली होती.

मला काळजी वाटली त्या मुलीची. तिच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. होती मराठवाड्यातील. एकटीच पुण्याला. वय ही २८-२९. लग्नाचा पत्ता नाही. निगेटिव्हिटी सदैव टपकायची तिच्या बोलण्यातून. मी विचार केला ही पोरगी जर रस्त्यावर आली नाही तर आयुष्यातून उठेल.

मी तिला पहिले सांगितलं "तुला पहिले आर्थिक स्थैर्य आणावं लागेल आयुष्यात. मग आपण तुझे बाकीचे प्रॉब्लेम बघू. जॉब शोधतो तुझ्यासाठी."

सुदैवाने एक जॉब मिळाला, तिच्या प्रोफाईल ला सूट होणारा. मुख्य म्हणजे ऑफिस मला माहित होतं. तिथला मालक आणि इतर अनेक एम्प्लॉईजला मी ओळखत होतो. तिथं तिच्या व्यक्तिमत्वात बदल होईल असं मला वाटायचं.

ती जॉईन झाली तिथं. काम चालू झालं. पण ही  दर  महिन्याला कटकट करायची. मला जमत नाही, आवडत नाही, मला तुमच्या कंपनीत घ्या. मी जॉब सोडते. एकदा आली आणि म्हणाली "मी ब्युटी पार्लर काढते." आता मात्र तडकलो. तिला म्हणालो "डोकं जागेवर असेल तर एक वर्ष हा जॉब सोडू नको. चार पैसे कमव. एक वर्षाच्या आधी जर जॉब सोडलास तर परत मला कुठल्याही कारणांसाठी कॉन्टॅक्ट करायचा नाही. आणि जरा अवतार बदल. थोडी जिम वगैरे लाव, वॉर्डरोब चेंज कर."

पोरीने ऐकलं. खुश राहू लागली. सव्वा वर्षे काम केलं.

आणि एक दिवशी तिचा फोन आला. स्थळ आलं आहे, मुलगा जर्मनीत असतो. पोराचं प्रोफाईल झकास. आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं घडतं म्हणजे काही तरी प्रॉब्लेम या धारणेने ती मुलगी परत काही त्यात खोट काढत होती. मी तिला सांगितलं "जास्त फाटे फोडू नकोस. जशा गोष्टी सामोऱ्या येतील तशा फेस कर. चांगलं होईल."

यथावकाश तिचं लग्न झालं.

दहा दिवसांपूर्वी भेटली मला. खूप खुश दिसत होती. सुखात्मकता आणि सकारात्मकता ठायी ठायी दिसत होती. जी मुलगी फक्त माझ्याशी प्रॉब्लेम्स शेअर करायची, तिने सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं. काही दिवसात जाईल ती जर्मनीला. तिला हार्दिक शुभेच्छा.

मी वर पोहोचल्यावर चित्रगुप्त सांगेल मला की तुझी जागा तशी नरकातच आहे. पण अशी काही गोष्ट सांगितली की ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचा ट्रॅक बदलण्यात तुझा थोडा हातभार आहे, तर मी तुला दोन एक दिवस स्वर्गात राहायला देईल. तर मी ही घटना सांगेन.

(स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या मी पोस्ट टाकतोच. पण ही पकडून आधीच्या पाच पोस्ट या केवळ फेसबुकच्या माध्यमातून काही चांगलं घडू शकतं हे सांगण्यासाठी आहेत.)

पाचवी पणती 

R K Laxman

२००३ साली टाटा सन्स मध्ये हरखलो होतो. लंडन मध्ये ललिता जेम्स मला तिच्या ऑफिस मध्ये घेऊन गेली होती. तिने मला एक केबिन दाखवली होती, एम एस ओबेरॉय यांची. फार भारी वाटलं होतं. असाच एक अनुभव नुकताच आयुष्यात आला. तो म्हणजे आर के लक्ष्मण यांच्या घरी जाण्याचा. हो तेच “Creator of common man with uncommon sense of humor”.

फेसबुकने मला काही रत्ने दिली आहेत. त्यापैकी एक आहे  तिच्या वयाला न शोभणारी संवेदनशीलता बाळगणारी, शास्त्रज्ञ होण्याच्या दिशेने हळूहळू पण दमदार पावलं टाकणारी. तिची अन माझी ओळख झाली तेव्हा मला तिचं फेक अकौंट वाटलेलं. अनेकानेक प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. (तिच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतातच). तिच्याच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबाबद्दल मला आत्मीयता आहे अशी रुचिरा.

तर ही सारखी मला सांगायची श्रीनि सर आणि तुम्ही भेटावेत असं खूप वाटतं. तर हे श्रीनि सर म्हणजे आर कें चे चिरंजीव. मी विचार करायचो, इतक्या मोठ्या माणसाचा वारसा. मी भेटून काय बोलणार? त्यांना आवडेल का? बरं ते स्पेस जर्नलिस्ट. माझं त्या बद्दलचं नॉलेज अगदी उथळ. मी आपलं हो म्हणायचो. १४ फेब्रुवारीला ने रुचिरा ने परत चिवचिव केल्यावर आम्ही तारीख ठरवली. ९ मार्च.

प्रिया प्रभुदेसाई बरोबर आस्वाद मध्ये नाश्ता केला. आणि मॅजेस्टिक मध्ये काही पुस्तकं घेतली एक श्रीनिसाठी आणि एक माझ्यासाठी. श्रीनि सरांना द्यायचं पुस्तक अर्थात रुचिरा ने ठरवलेलं. मग लोअर परेल च्या फिनिक्स मॉल मध्ये भेटलो श्रीनि सरांना. तुम्हाला सांगतो साधेपणाची कमाल मर्यादा म्हणजे श्रीनिवास लक्ष्मण. गर्व, अहंकार, दिखाऊपणा हे अवगुण त्यांच्या जवळपास पण नाहीत. दोन एक तास गप्पा मारल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो. पेडर रोडला.

दरवाजावर पाटी वाचली. R K Laxman. अंतर्बाह्य थरारलो. आत गेलो आणि भारावल्यासारखं त्या हॉल मध्ये भिरभिरत होतो. आर कें नी स्वहस्ते काढलेली अनेक चित्रे मी पाहिली. यातली तीन मला चित्रं फार आवडली. पण सगळ्यात भारी १९६२ साली काढलेलं, ज्यात त्यांनी त्यांचा मुलगा चांद्रभूमीवरून पृथ्वीकडे पाहतो. १९६९ साली मानवाने चंद्रावर पाय ठेवला आणि श्रीनि पुढे स्पेस जर्नलिस्ट झाले. हा दिवस आहे की स्वप्न याची मी पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेत होतो.

श्रीनिवास सरांची स्वतःची रूम म्हणजे अंतराळातल्या माहितीचा खजाना आहे. आपल्या आवडीच्या कामासोबत जगणे म्हणजे काय हे तिथं जाऊन कळतं. दुपारभर सर आणि त्यांची पत्नी उषा यांच्याशी गप्पा आणि सोबतीला रुचिरा ची टीवटीव.

निघालो. राहवलं नाही. R K Laxman या पाटीच्या शेजारी उभा राहून फोटो काढून घेतला. कुणाबद्दल असणारी आदराची भावना उचंबळून येणे याची अनुभूती झाली.

एका स्वप्नवत दिवस अंजली आळेकर यांना भेटून संपला.

सांगायचं म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदा कुणाला भेटण्यासाठी कामावरून सुट्टी घेतली.

Thursday, 14 March 2019

जॉब

फोन आला. फोनकर्त्याच्या मित्राला जॉब हवा होता. जॉब सिकर चं नाव होतं सचिन. 

सचिनचा बायोडाटा आला. खणखणीत करियर होतं. मल्टिनॅशनल कंपनीत दहा बारा वर्षे काम केलं होतं. नंतर आवड म्हणून टिचिंग प्रोफेशन मध्ये शिरले. पण एकुणात शिक्षण महर्षींनी केलेला बाजार पाहून आणि एकुणात अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्वालिटी ची वाट लागलेली पाहून तीन चार वर्षात पस्तावले. 

माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं पोटतिडकीने बोलले. त्यांची या विषयाची तळमळ पाहून मी त्यांना विचारलं की फायनली काय करायचं ठरवलं आहे. तर म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये परत यायचं. मी विचारलं, पण तुमची आवड अध्यापन असेल तरीही. तर हो म्हणाले. 

मी म्हणालो "असं समजा की माझ्याकडे मॅन्युफक्चरिंग च्या हेड ची पोझिशन आहे आणि एक माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे मला एका चांगल्या प्रोफेसरची गरज आहे. हे कॉइन आहे. टॉस करू. हेड पडलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि टेल पडलं तर ट्रेनिंग मध्ये. आता मी टॉस केलं तर कॉइन हवेत असताना, तुमच्या मनाला काय वाटेल? हेड पडावं की टेल?"

सचिन संभ्रमात पडला. अन हळूच म्हणाला "टेल. पण तरीही......"

मी सांगितलं "कॉइन पडल्यावर जे येईल ते स्वीकारणं ही तडजोड झाली. आणि कॉइन हवेत असताना काय पडावं असं वाटणं ते निवडणं हे आयुष्य. तुम्ही अध्यापन क्षेत्र सोडू नका. तुमच्या सारखी लोक अभियांत्रिकी क्षेत्राची गरज आहे. दुर्दैव हे की आज सगळ्यात जास्त विनोद हे इंजिनियर्स वर होत आहेत. चहाचा धंदा चांगलाच पण इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून त्याची खिल्ली उडवण्याचा नतद्रष्ट पणा डोक्यात जातो. लॅब मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाला लोकाभिमुख करण्याचं काम तंत्रज्ञांचं आणि ते ताकदीने व्हावं यासाठी तुमच्या सारख्या लोकांनी हे क्षेत्र सोडू नये". 

इतकं बोलून अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवडली जी प्रोफेशनल पद्धतीने चालवली जाते. तिथे त्यांचा रेफरन्स दिला. इंटरव्ह्यू बहुतेक शेड्युल झाला आहे. सचिनला जॉब मिळाला तर तो त्याचं सोनं करेल याबाबत शंका नाही. त्याला हार्दिक शुभेच्छा. 

अ...... अभियंत्याचा हे फक्त पुस्तकाचं नाव नाही आहे, ती माझी जीवन प्रणाली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हो, अभिमान आहे, गर्व नव्हे.