Thursday, 21 December 2017

नवउद्योजक

काल स्टार्ट अप चालू करणारा एक नवउद्योजक भेटायला आला. खूप सिन्सीअर पणे त्याने माझं सगळं ऐकून घेतलं. लिहून पण घेतलं. मला कौतुक वाटलं.

मी त्याला बोललो "तुम्ही नवीन लोकं किती हुशार आहात. विचार करून उद्योगात उतरता. आम्ही डायरेक्ट उद्योगात उडी मारली. हातपाय ठीक बसले म्हणून तरलो, नाहीतर काही खरं नव्हतं"

मी त्याला स्ट्रक्चर्ड पद्धतीने बिझिनेस करण्याचे ट्रेनिंग कोर्स असतात, त्याबद्दल सांगितलं. माझं सांगणं म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं, त्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही.

तर तो म्हणाला "महिन्यातून एक तास द्या. मला तितका पुरेसा आहे"

जाताना म्हणाला "तुम्ही माझे मेंटर असल्यासारखे आहात. तर या तुमच्या वेळ देण्याबद्दल मी रिटर्न मध्ये तुम्हाला काय देऊ शकतो?"

मी त्याला सांगितलं "एकतर आपण आता सहाध्यायी. मेंटर वगैरे म्हणू नकोस. आणि मला जाणवतंय की तू जर या पद्धतीने काम केलंस तर एक चांगला उद्योजक होशील. पाच वर्षांनी तुझ्याकडे कोणी असा सल्ला मागायला आला तर त्याला नाही म्हणू नकोस. जे तुला माहिती आहे ते त्याच्याशी शेअर कर. रिटर्न मध्ये मला जर काही द्यायचं असेल तर हे दे"

खुश होऊन त्याने माझा हात पकडला.

एक आश्वासक हॅन्ड शेक होता तो.

हार्दिक शुभेच्छा मित्रा. तुला आणि तुझ्यासारख्या नवउद्योजकांना.

जगातल्या ४% वेड्या लोकांमध्ये आपले स्वागत आहे.

साहित्यलक्ष्मी देशपांडे.

५७ हे तसं बिझिनेस चालू करण्याचं वय नाही. त्यातला त्यात ह्या वयात उद्योग क्षेत्रात उडी मारणारी स्त्री असेल तर अजून कौतुकास्पद.

आपलं वाचून कुणी बिझिनेस चालू करणं हे तसं दुरापास्त. परत सोशल मीडिया सारख्या उथळ माध्यमातून अशी प्रेरणा वगैरे घेणं म्हणजे अजून चमत्कारिक.

एकूण घरातील वातावरण हे साहित्यिक. त्या मध्ये राहून काही बनवून ते विकणं म्हणजे तसं अवघडच. परत स्वतः वकील. वकिली सोडूनही बरीच वर्षे झालेली. वकीली झगा सोडून विक्रेत्याचा ड्रेस चढवणं हे लौकिकाला आव्हान देणारं.

पण हे सगळं घडलं आणि अनुभवलं. "तुमचं आयुष्य बघून उद्योग उभा करण्याची प्रेरणा मिळाली आणि दिवाळीत मी पाकातले चिरोटे बनवून विकणार आहे" असा मेसेज आला. काही दिवसांनी मॅडम चा हा पण मेसेज आला की दिवाळीत ७० बॉक्स विकले आणि आता ७०० बॉक्स ची कॉर्पोरेट ऑर्डर सप्लाय करत आहे. मी अवाक.

त्यांचं अभिनंदन वगैरे केलं पण मनात वाटलं नव्याचे नऊ दिवस, सिझनल बिझिनेस वगैरे होईल. पण नाही, मॅडम रविवारी मुंबईहून  पुण्याला घरी आल्या.

अफलातून क्वालिटीचे पाकातले चिरोटे दिले. आणि उगाच म्हणायचं म्हणून म्हणत नाही, पण असे चिरोटे मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले. बरोबर वैदर्भीय पद्धतीने बनवलेली पुडाची वडी आणि तिळगुळाचे लाडू. आणि हे सगळं एका सुबक बॉक्स मध्ये. सर्व पदार्थ छान पण चिरोटे आऊट ऑफ वर्ल्ड. थोडक्यात बिझिनेस प्लॅन सांगितला आणि तो येणाऱ्या वर्षात मोठा कसा होईल याचं दमदार चित्र उभं केलं.

प्रेझेंटिंग लक्ष्मीज इंडियन डेलिकसी

आणि सादरकर्त्या साहित्यलक्ष्मी देशपांडे.

नवीन उद्योगासाठी भरभरून शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन.

Document on how to handle sales calls

Document on how to handle sales calls

1.    Communication Skills:

It is very imperative to master communication skills, whether written or verbal. It includes all forms of communication like letter drafting, telephonic calls, e mail etiquettes. 
Master presentation skills for internal and external meetings. It is must to express your achievements in facts and figures with ability to analyze data. This allows management to take decisions for growth.
Keep positivity in any mode of communications. Irrespective of language and content of conversation, customer should get message that you are interested in his work.

2.    Response time:

Be quick. Good communication skills are waste if you are not swift in responding. New enquiries, quotes, its follow up, after sales calls are to be handled with utmost accuracy. If you don’t, you are normally termed as “over smart” person. Avoiding phone calls, keeping it switch off, not responding to e mails in time are crimes. Refrain from committing it.


3.    Customers calls, a new way to handle them:

Do not keep your communication limited to one deal. Try to create references. Create it by talking about his company, products, competitors. And do not discuss these points just for the heck of it. Be genuinely interested. Ask questions, try to relate his thought process. This will help you to create many references while talking to specific customer and then in market.

You will get very valuable information and it is free of cost.


4.    Triangular working

In todays management jargon, this is called as connecting dots. With point 3, you create plenty of references. Use them for benefit for your spectrum of customers by suggesting them solutions, suppliers. The other two parties will have win-win situation. But you will be the most benefitted. You will have connections with long lasting business relations. You will not only have customers but friends too.

Keep holistic approach.

5.    Be a solution provider

Try to be solution provider than to be a goods or services supplier. In the process, you might lose a PO but you will win customer.

Customer satisfaction to customer delight is tough journey. Being a solution provider makes it easy.

6.    Clear understanding of what customer wants

Ask questions till you are clear of what customer needs, his requirements. Ask questions which are relevant to the subject. Listen to his viewpoints carefully. Answer his questions with fair accuracy. If not aware, stop. Take advice from
others who know about it. And then revert.

Conversation with customer is serious business. Give respect to it.




7.    Perseverance

As someone said, perseverance can win over genius. Be open to refusals from customer. Keep ability to absorb them and also have mindset to turn out refusals in agreement. Don’t give up……ever.
Welcome customers irrespective of his past behavior with you. Probably, you will win this contract on your terms and conditions. Don’t be revengeful, but be affirmative.


Selling goods or services is an art.

There are tools available to enhance skills.

Use skills consistently and inculcate art of selling………even if you are not gifted with this, it can be learnt.

Best luck……….Do not wait for changes to happen in life…….Be a change.



जिम

जिमला जाण्याची माझी आणि वैभवीची वेळ वेगवेगळी आहे. मी सकाळी सहाला तर मॅडम ८:३० ला जातात. आज सकाळी आम्ही दोघे एकाच वेळी गेलो.

जिममध्ये माझ्या बरोबर संजय नावाचा अजूबा आहे. तो नॉनव्हेज खात नाही, अंडंही खात नाही. एकोणीस वर्ष वय आहे. सणसणीत बॉडी बनवली आहे त्याने. कुठलंही सप्लिमेंट न घेता. आणि तुफान बडबड्या. तो जिममध्ये असला की त्याची टकळी सतत चालू असते. मला कधी अंकल म्हणतो, कधी सर, कधी दोस्त पण.

आज त्याची वैभवीबरोबर ओळख करून दिली. नंतर तिघे आपापल्या ट्रेनर बरोबर वजनाला जुंपलो.

थोड्या वेळाने संजय माझ्या जवळ आला अन म्हणाला

"वो मॅडम आपकी वाईफ ही है ना!"

मी चमकून त्याच्या कडे बघितलं आणि म्हणालो "ऑफ कोर्स. आपको क्या लगा"

तर तो म्हणाला "नही, मुझे लगा, ऐसीही कोई फ्रेंड है क्या!"

त्याच्या बोलण्याचे मी दोन अर्थ काढले

एकतर आम्ही दोघे नवरा बायको हे एखाद्या मित्र मैत्रिणीसारखे दिसतो. हा फारच अगदी आदर्शवादी स्वप्नाळू विचार झाला.

किंवा मी वयाच्या पन्नाशीत मैत्रीण गाठू वगैरे शकतो हा संजयचा अफलातून ओव्हर कॉन्फिडन्स आहे.

(हा दुसरा अर्थ पचायला अवघड आहे पण त्याने मनाला गुदगुल्या झाल्या हे अत्यंत नम्रपणे नमूद करण्याचा मोह आवरत नाही आहे.)

बदल

पुढील वीस एक वर्षात आमच्या इंजिनियरिंग क्षेत्रात काही मोठ्या घडामोडी होणार आहेत.

कुणाची इच्छा असो वा नसो, पण इंटर्नल कंबश्चन इंजिन जाऊन इलेक्ट्रिक मोटार वर धावणाऱ्या कार येणार आहेत. ज्या नावावरून इंजिनियर हा शब्द तयार झाला तो इंजिन हा प्रकारच अस्तंगत व्हायच्या मार्गावर आहे. त्यात भर म्हणून की काय पण गाडीतून गियर बॉक्स पण जाणार आहे.

त्याबरोबरच सबस्ट्रँक्टिव्ह मशिनिंग वर भिस्त कमी होऊन अडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग वाढीस लागणार आहे.

या दोन गोष्टी डिसरपटीव्ह इनोव्हेशन करत लोकप्रिय झाल्या आणि त्याला राजाश्रय मिळाल्या तर खूप उलथापालथ होणार आहे.

- क्रूड वर आपण अवलंबून असणार नाही. मिडल ईस्ट देशाचं महत्व कमी होईल. कुणास ठाव पण त्याने दहशतवाद पण कमी होईल.

- बॅटरी उत्पादन आणि त्याला लागणाऱ्या मटेरियल चं नवीन पर्व चालू होईल. लिथियम, कँडमियम हे मटेरियल ज्या देशात आहे त्याची सद्दी चालू होईल.

- इलेक्ट्रिक मोटार या प्रकाराला खूप डिमांड येईल

- इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला झळाळीचे दिवस येतील.

- सोलार आणि विंड एनर्जी या क्षेत्रात तुफान डेव्हलपमेंट होईल.

- आटोमेशन क्षेत्रात इतकी प्रगती होईल की भारत देशाचा लो कॉस्ट असण्याचा फायदा लयाला जाईल. प्रगत देशातील लेबर कॉस्ट आटोमेशन च्या साहाय्याने खूप कमी होईल.

- इंटरनेटचा वापर मल्टिफोल्ड वाढेल.

एकंदरीत जगलो तर पुढची पंचवीस वर्षे अजून आगळेवेगळे बदल घडवून आणतील. आताच अपरिमित बदल पाहिलेली सत्तरीत जन्मलेली माझी पिढी एका मोठ्या बदलाची साक्षीदार असणार आहे.

व्याज

सध्या तैवानला आलो आहे. आमची सेटको इथे पण आहे. ती कंपनी आणि एकूणच बाहेरच्या इंडस्ट्री चा अनुभव यावा म्हणून मोठ्या मुलाला, यशला, बरोबर घेउन आलो आहे.

काल रात्री डिनरला इथला प्लांट हेड सनी घेऊन गेला. गप्पा चालू झाल्या. सनीने यशला विचारलं "काही गर्ल फ्रेंड वगैरे!"

यशने नाही म्हणून सांगितलं. मी सनीला बोललो "जरी असेल तरी माझ्यासमोर तो आहे असं सांगणार नाही" हे ऐकल्यावर यश एकदम गोड हसला. ते पाहून मला धस्स झालं.

पुढे जाऊन सनीने यशची शाळाच घेतली. म्हणाला "काल रात्री मी याच रेस्टॉरंट मध्ये आलो होतो. माझ्या मुलाचं ब्रेक अप झालं होतं. तो खूपच डिप्रेस्ड होता. त्याला चिअर अप करण्यासाठी मी त्याला इथे घेऊन आलो होतो. त्याचं हे चौथं ब्रेक अप आहे, पण अजूनही तो दुःखी होतो"

पुढे यश च्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला "हे गर्ल फ्रेंड बरोबर ब्रेक अप वगैरे झालं की अजिबात दुःखी व्हायचं नाही. उलटं हॅपी व्हायचं. नवीन पाखरू शोधायला मोकळे होतो आपण. लक्षात ठेव माझा सल्ला"

च्यामारी मी पोराला बिझिनेस, स्पिन्डल वगैरे शिकवायला घेऊन आलो अन त्याला तर वेगळंच ज्ञानामृत इकडे मिळतंय.

आज डिनरला सनीने यशला वाईन किंवा बियर पिण्याचा आग्रह केला. यशने नकार दिला. सनीने विचारलं "वडिलांसमोर घाबरतो का?" उत्तरादाखल यश परत गोड हसला. माझ्या छातीत परत धस्स झालं.

मी माझ्या आई वडिलांशी तरुणपणी जसं वागलो ते बहुधा व्याजासकट परत मिळायची वेळ आली आहे.

शून्यापासून सुरुवात

काही दिवसांपूर्वी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे यावर पोस्ट टाकली होती. इथे आणि लिंक्ड इन वर सुद्धा, त्यामुळे बेरोजगारी वाढेल अशा प्रतिक्रिया आल्या होत्या.

माझं निरीक्षण वेगळं आहे.

ज्या ज्या वेळी टेक्नॉलॉजी म्हणून काही नवीन आलं, त्यावेळी त्याने उद्योगाच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. १९०५ साली जेव्हा फोर्ड ने कार बनवायला घेतली तेव्हा घोडागाडी चालवणाऱ्या लोकांनी बोंब मारलीच असेल. एकुणात १२ वर्षात अमेरिकेत घोडा गाडी हद्दपार झाली आणि कारने शिरकाव केला. पण तो होताना प्रचंड रोजगार हा बिझिनेस घेऊन आला. इतका की अमेरिकेला त्याने जागतिक महासत्ता बनायला मदत केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अगदी तीस पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर्स भारतात अवतीर्ण झाले, तेव्हा बेरोजगारीचं भयावह चित्र उभं केलं गेलं. पण झालं काय पुढे? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात लोकांना नवनवीन उद्योगाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या. एका खूप मोठ्या प्रवर्गाला श्रीमंतीच्या पुढच्या लेव्हल ला या उद्योगाने नेवून ठेवलं. जगात प्रत्येक देशात जाण्याची संधी लाखो लोकांना मिळाली. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल सारख्या नामवंत कंपन्यांचा उदय झाला आणि त्या भरभराटीला आल्या.

त्यामुळे आताही इलेक्ट्रिक कार्स, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), ऑटोमेशन सारख्या उभरत्या टेक्नॉलॉजीज जन्माला येऊ घातल्या आहेत. हे जगाला बेरोजगारीकडे घेऊन जाणार अशी हाळी ठोकण्यात मजा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. माझ्या मते ह्या टेक्नॉलॉजी नवीन उद्योग आणि रोजगार घेऊन येतील. आणि वर सांगितलेल्या उदाहरणासारखे ते एका मोठ्या वर्गाला आपल्या कवेत सामावून घेतील.

एक मात्र आहे. आजच्या आघाडीच्या उद्योगाने जर बदलाकडे लक्ष दिलं  नाही तर "शिफ्ट ऑफ पॉवर" होण्याची शक्यता आहे. काही नवीन उद्योग जन्माला येतील. काही सध्याचे उद्योग अजून ताकदवर होतील. काही आतापर्यंत लो प्रोफाइल असणाऱ्या उद्योगांना उर्जितावस्था प्राप्त होईल. आणि काही उद्योग अँड टेक्नॉलजी भूतलावरून नष्टही होतील. पण गोळाबेरीज केली तर माणूसजातीचा फायदाच होईल असं वाटतं.

तसंही माणूस फार बुद्धिमान प्राणी आहे. आपल्या अस्तित्वाला धोका पोहोचेल असं ज्या दिवशी जाणवेल तेव्हा जगात परत रिव्हर्स गियर पडेल. ऍटमबॉम्ब चा संहार एकदा बघितल्या नंतर आख्ख जग त्याच्या विरोधात एकवटलं  आहे. किंवा काही वर्षांपूर्वी क्लोनिंग ची लाट आली होती. त्याचा घातकपणा लक्षात आल्यानंतर त्यावर फारसं काही पुढं घडल्याचं वाचनात नाही. ज्या दिवशी म्हणून माणसाला समजेल की या ग्रहावरचं आपलं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे, त्यावेळी पुन्हा आपण जुन्या तंत्रज्ञानाकडे वळू.

असं झालं नाही तर जगनियंता आहेच की! काही कळायच्या आत प्रचंड उलथापालथ होईल, होत्याचं नव्हतं होईल, अविरत चालणाऱ्या जीवनचक्राचा वेग शून्य होईल........

आणि मग पुन्हा शून्यापासून सुरुवात होईल.