Thursday 21 December 2017

व्याज

सध्या तैवानला आलो आहे. आमची सेटको इथे पण आहे. ती कंपनी आणि एकूणच बाहेरच्या इंडस्ट्री चा अनुभव यावा म्हणून मोठ्या मुलाला, यशला, बरोबर घेउन आलो आहे.

काल रात्री डिनरला इथला प्लांट हेड सनी घेऊन गेला. गप्पा चालू झाल्या. सनीने यशला विचारलं "काही गर्ल फ्रेंड वगैरे!"

यशने नाही म्हणून सांगितलं. मी सनीला बोललो "जरी असेल तरी माझ्यासमोर तो आहे असं सांगणार नाही" हे ऐकल्यावर यश एकदम गोड हसला. ते पाहून मला धस्स झालं.

पुढे जाऊन सनीने यशची शाळाच घेतली. म्हणाला "काल रात्री मी याच रेस्टॉरंट मध्ये आलो होतो. माझ्या मुलाचं ब्रेक अप झालं होतं. तो खूपच डिप्रेस्ड होता. त्याला चिअर अप करण्यासाठी मी त्याला इथे घेऊन आलो होतो. त्याचं हे चौथं ब्रेक अप आहे, पण अजूनही तो दुःखी होतो"

पुढे यश च्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला "हे गर्ल फ्रेंड बरोबर ब्रेक अप वगैरे झालं की अजिबात दुःखी व्हायचं नाही. उलटं हॅपी व्हायचं. नवीन पाखरू शोधायला मोकळे होतो आपण. लक्षात ठेव माझा सल्ला"

च्यामारी मी पोराला बिझिनेस, स्पिन्डल वगैरे शिकवायला घेऊन आलो अन त्याला तर वेगळंच ज्ञानामृत इकडे मिळतंय.

आज डिनरला सनीने यशला वाईन किंवा बियर पिण्याचा आग्रह केला. यशने नकार दिला. सनीने विचारलं "वडिलांसमोर घाबरतो का?" उत्तरादाखल यश परत गोड हसला. माझ्या छातीत परत धस्स झालं.

मी माझ्या आई वडिलांशी तरुणपणी जसं वागलो ते बहुधा व्याजासकट परत मिळायची वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment