Thursday, 21 December 2017

काव्यदिंडी

तन्वीर सिद्दिकी ची ओळख इथे मी करून द्यायची गरज नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तन्वीर ने प्रोफेशनल आयुष्यात एक स्थान निर्माण केलं आहे. त्यायोगे येणाऱ्या भौतिकतेची चव घेताना आपली संवेदनशीलता बरकरार ठेवली आहे. खरंतर तिला अजून आगळी किनार लाभली आहे.

त्याच्या खाली दिलेल्या कवितेत गजबची कल्पनाशक्ती आहे. आजच्या समाजव्यवस्थेचं इतकं यथार्थ चित्रण, वास्तववादी असलं तरी कुणाचीही मन न दुखावता त्याने सहज केलं आहे.
ते वाचल्यावर भावना वगैरे न दुखावता आपण खालमानेंने अपराधी म्हणून उभे राहतो त्या जगनियंत्यासमोर कटघरात. शेवट वाचताना तो प्रश्न आणि त्याचं भन्नाट उत्तर असं पटकन समोर येतं की आपण चकित व्हावं.

माझ्या खूप आवडत्या कवितांपैकी एक. तन्वीर कवितेचा गझल हा फॉर्म ज्या सहजतेने हाताळतो तितकंच मुक्तछंद सुद्धा.

तुमच्या माहितीसाठी सांगतो

एक कवीसंमेलन जमले होते
त्यात
अल्लाने क़ुरान नावाची कविता वाचली
कृष्णाने गीता
येशुने बायबल
बुद्धाने त्रिपिटक
नानक ने आदिग्रंथ
वाचल्यावर सगळ्यांना वाटले की 
सगळ्या कविता सारख्याच आहेत
- चोरली की काय संकल्पना बाकी सर्वांनी 
- कमी, आधिक ?
काय झाले असेल नंतर?
शंका, राग, अपमान, घृणा ?
च्छे, सगळे नुसतेच हसले
कवितेचे कागद बाजूला सारले 
टाकून दिले पायाशी - पृथ्वीवर 
आणि सगळे मित्र गप्पा मारू लागले

पण
आता रोज त्यांच्या गप्पात भंग होतोय 
खाली पाहुन - पृथ्वीवर 
हसणारे, आनंदी मित्र एकदुसरयाकड़े पाहतात
संशयाने, रागाने, अपमानित नजरेने, घृणेने, कीव येऊन

आणि विचारतात 
स्वतःला
एक दूसरयाला 
खाली पृथ्वीला उद्देशुन ही 
की 
चूक केली का हो कविता लिहून ?

मला त्यांचा प्रश्न रोज ऐकू येतो 
मी रोज म्हणतो त्यांना,

नाही ! 
तुम्ही फ़क्त
कवितेखाली आपलं नाव टाकायला नको हवे होते

हेच चुकलयं तुम्हा सर्वांच ! 

कविता वाईट नाहीये ! 

तुम्हालाही एक दिवस ऐकू येईल प्रश्न
उत्तर तयार ठेवा 

तुम्हाला कवितांची जाण आहे अस ऐकले आहे मी.....

उत्तर तयार ठेवा !

तनवीर सिद्दिकी
________________________________________________________________________________


फेसबुकवर काही कवी फारच ताकदीचे आहेत. त्यात एक नाव आहे शुभानन चिंचकर. त्यांनी रस्ता ही थीम ठेवून ज्या रचना रचला तो एक अफलातून प्रकार होता. 

गद्यात लिहायला जिथे पानं खर्ची पडतील तिथे बऱ्याचदा ही कवी मंडळी पाच सहा कडव्यात सगळं उतरवतात. शुभाननची एक कविता मला बंगलोर मध्ये अचानक वाचायला मिळाली. आणि वाचतानाच मी चकित झालो. अत्यंत आशयघन, आणि शेवटचे दोन कडवी तर संवेदनशीलतेच्या कळस आहेत. ती वाचल्या वाचल्या मी संग्रही ठेवली. आणि जितक्या वेळेस मी वाचली, त्या प्रत्येक वेळेस मी स्तिमित झालो. 

तुम्हालाही आवडेल. 

तू जन्मतोकडी कविता, 
मी व्यापक आशय नाही
या जन्माआधी अपुला
 का झाला परिचय नाही

का धुंद पाप मी टाळू 
ते जर का क्षणीक आहे
का पुण्य करू मी फसवे 
ते जर का अक्षय नाही

पदरात झेलला तू हा 
प्राजक्त विरागी भोळा
अन कळले- माझी नियती 
तितकीही निर्दय नाही

पावले दवाने भिजली 
अन झाले हे मन ओले
जीवना तुझ्या वणव्याचे 
उरलेच मला भय नाही

तू नेत्रबोलक्या ओळी... 
मी अर्थआंधळा जोगी
हे दोन ध्रूव जोडाया 
कुठलेही अव्यय नाही

त्या अगतिक जनुकांमधुनी 
ऐकला क्षीणसा टाहो
ज्योतीचे बीज रुजाया 
उरले गर्भाशय नाही

डोळ्यात गरीबी पाहुन 
नुसतेच दिले मी पैसे...
नेणत्या कळीला म्हटलो, 
"अद्याप तुझे वय नाही!"

शुभानन चिंचकर (Shubhanan Chinchkar )
______________________________________________________________________________



काव्यदिंडीत पुढच्या कवितेला टॅग करायचं म्हणजे Swaroopa ला. पर्याय नाही. ही कविता का कुणास ठाऊक मला पाठ आहे. ती म्हणताना खूप मजा येते. पण त्याचा आनंद खऱ्या अर्थाने स्वरूपा ती ऐकताना घेते. 

वरवर दिसताना विंदा करंदीकर यांनी दररोजच्या जीवनाच्या त्याच त्याच पणाला कंटाळून ती लिहिली असं वाटतं. मी अर्थ लावायचा प्रयत्न केला, पण अण्णा म्हणाले की प्रत्येक कवितेचा अर्थ शोधायलाच पाहिजे असं नाही. (अण्णा म्हणजे वैराळकर, नाहीतर तुम्हाला हजारे वाटायचे). मग मी त्या दिवसांनंतर त्या भानगडीत पडलोच नाही. 

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! 
माकडछाप दंतमंजन, 
तोच चहा तेच रंजन 
तीच गाणी तेच तराणे, 
तेच मूर्ख तेच शहाणे 
सकाळपासुन रात्रीपर्यंत 
तेच ते तेच ते 

खानावळीही बदलून पाहिल्या 
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. 
काकू पासून ताजमहाल, 
सगळीकडे सारखेच हाल 
नरम मसाला, गरम मसाला, 
तोच तो भाजीपाला 
तीच ती खवट चटणी, 
तेच ते आंबट सार 
सुख थोडे दु:ख फार 

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे 
त्या स्वप्नाचे शिल्पकार, 
कवि थोडे कवडे फार 
पडद्यावरच्या भूतचेष्टा; 
शिळा शोक, बुळा बोध 
नऊ धगे एक रंग, 
व्यभिचाराचे सारे ढंग 

पुन्हा पुन्हा तेच भोग 
आसक्तीचा तोच रोग 
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती ' 
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती ' 
तेच ओठ तेच डोळे 
तेच मुरके तेच चाळे 
तोच पलंग तीच नारी 
सतार नव्हे एकतारी 

करीन म्हटले आत्महत्त्या 
रोमिओची आत्महत्त्या 
दधीचिची आत्महत्त्या 
आत्महत्त्याही तीच ती 
आत्मा ही तोच तो 
हत्त्याही तीच ती 
कारण जीवनही तेच ते 
आणि मरणही तेच ते

- श्री विंदा करंदीकर

_________________________________________________________________________________


काव्यदिंडीत Megha यांनी मला चार आवडत्या कविता पोस्ट करायला सांगितल्या. त्यापैकी ही पहिली

मध्ये एकदा साने सर (Rajan Sane) म्हणाले की सोशल मीडियात ताकदीच्या कविता वाचायला मिळत नाहीत. म्हणून मग त्यांना खाली लिहिलेली कविता पाठवली. त्याचे कवी ऋत्विज फाटक माझ्या मित्र यादीत नाही आहेत. मला ही कविता आर बी डी (Renukadas Balkrishna Deshpande) यांनी पाठवली होती. 

वाचल्या वाचल्या ती मनात रुतली. अत्यंत चपखल शब्दरचना, आणि तितकाच वेग प्रत्येक कडव्यात आहे अन आवेगही. 

फार विचारगहन कविता मला झेपत नाही. ही तसं म्हंटलं तर अगदी सोपी आणि म्हंटलं तर अर्थ शोधायला लावणारी. 

मला तर आवडली, तुम्हालाही आवडेल. 

कुठे खोल शून्यात तो गुंतलेला..
तिने हात हातांमध्ये गुंफलेला
मिठीला उतावीळ होईल तोही
असे वाटलेले तुलाही, मलाही..

तिने पाठवावीत रंगीत पत्रे
लिहावीत त्यानेसुधा स्वप्नं काही
म्हणावे तिला 'मी तुझा फक्त आहे'
असे वाटलेले तुलाही, मलाही..

नसेना जरा चारचौघांप्रमाणे
दिसेना जरा रुक्ष, संन्यासयोगी
तरी चिंब प्रेमात रंगेल तोही
असे वाटलेले तुलाही, मलाही..

कधी चांदण्यातील एकांत रात्री
निराकार वैराग्य संपेल सारे
नव्या स्पंदनांनी शहारेल तोही
असे वाटलेले तुलाही, मलाही..


निघालाच होता घरातून तेव्हा
तिला शांत झोपेत सोडून मागे
दिशाहीन व्हावे दिशांनीच दाही
तसे वाटलेले तुलाही, मलाही..

- ऋत्विक् फाटक

_______________________________________________________________________________

No comments:

Post a Comment