Thursday 21 December 2017

नवउद्योजक

काल स्टार्ट अप चालू करणारा एक नवउद्योजक भेटायला आला. खूप सिन्सीअर पणे त्याने माझं सगळं ऐकून घेतलं. लिहून पण घेतलं. मला कौतुक वाटलं.

मी त्याला बोललो "तुम्ही नवीन लोकं किती हुशार आहात. विचार करून उद्योगात उतरता. आम्ही डायरेक्ट उद्योगात उडी मारली. हातपाय ठीक बसले म्हणून तरलो, नाहीतर काही खरं नव्हतं"

मी त्याला स्ट्रक्चर्ड पद्धतीने बिझिनेस करण्याचे ट्रेनिंग कोर्स असतात, त्याबद्दल सांगितलं. माझं सांगणं म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं, त्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही.

तर तो म्हणाला "महिन्यातून एक तास द्या. मला तितका पुरेसा आहे"

जाताना म्हणाला "तुम्ही माझे मेंटर असल्यासारखे आहात. तर या तुमच्या वेळ देण्याबद्दल मी रिटर्न मध्ये तुम्हाला काय देऊ शकतो?"

मी त्याला सांगितलं "एकतर आपण आता सहाध्यायी. मेंटर वगैरे म्हणू नकोस. आणि मला जाणवतंय की तू जर या पद्धतीने काम केलंस तर एक चांगला उद्योजक होशील. पाच वर्षांनी तुझ्याकडे कोणी असा सल्ला मागायला आला तर त्याला नाही म्हणू नकोस. जे तुला माहिती आहे ते त्याच्याशी शेअर कर. रिटर्न मध्ये मला जर काही द्यायचं असेल तर हे दे"

खुश होऊन त्याने माझा हात पकडला.

एक आश्वासक हॅन्ड शेक होता तो.

हार्दिक शुभेच्छा मित्रा. तुला आणि तुझ्यासारख्या नवउद्योजकांना.

जगातल्या ४% वेड्या लोकांमध्ये आपले स्वागत आहे.

No comments:

Post a Comment