Thursday 21 December 2017

शून्यापासून सुरुवात

काही दिवसांपूर्वी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे यावर पोस्ट टाकली होती. इथे आणि लिंक्ड इन वर सुद्धा, त्यामुळे बेरोजगारी वाढेल अशा प्रतिक्रिया आल्या होत्या.

माझं निरीक्षण वेगळं आहे.

ज्या ज्या वेळी टेक्नॉलॉजी म्हणून काही नवीन आलं, त्यावेळी त्याने उद्योगाच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. १९०५ साली जेव्हा फोर्ड ने कार बनवायला घेतली तेव्हा घोडागाडी चालवणाऱ्या लोकांनी बोंब मारलीच असेल. एकुणात १२ वर्षात अमेरिकेत घोडा गाडी हद्दपार झाली आणि कारने शिरकाव केला. पण तो होताना प्रचंड रोजगार हा बिझिनेस घेऊन आला. इतका की अमेरिकेला त्याने जागतिक महासत्ता बनायला मदत केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अगदी तीस पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर्स भारतात अवतीर्ण झाले, तेव्हा बेरोजगारीचं भयावह चित्र उभं केलं गेलं. पण झालं काय पुढे? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात लोकांना नवनवीन उद्योगाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या. एका खूप मोठ्या प्रवर्गाला श्रीमंतीच्या पुढच्या लेव्हल ला या उद्योगाने नेवून ठेवलं. जगात प्रत्येक देशात जाण्याची संधी लाखो लोकांना मिळाली. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल सारख्या नामवंत कंपन्यांचा उदय झाला आणि त्या भरभराटीला आल्या.

त्यामुळे आताही इलेक्ट्रिक कार्स, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), ऑटोमेशन सारख्या उभरत्या टेक्नॉलॉजीज जन्माला येऊ घातल्या आहेत. हे जगाला बेरोजगारीकडे घेऊन जाणार अशी हाळी ठोकण्यात मजा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. माझ्या मते ह्या टेक्नॉलॉजी नवीन उद्योग आणि रोजगार घेऊन येतील. आणि वर सांगितलेल्या उदाहरणासारखे ते एका मोठ्या वर्गाला आपल्या कवेत सामावून घेतील.

एक मात्र आहे. आजच्या आघाडीच्या उद्योगाने जर बदलाकडे लक्ष दिलं  नाही तर "शिफ्ट ऑफ पॉवर" होण्याची शक्यता आहे. काही नवीन उद्योग जन्माला येतील. काही सध्याचे उद्योग अजून ताकदवर होतील. काही आतापर्यंत लो प्रोफाइल असणाऱ्या उद्योगांना उर्जितावस्था प्राप्त होईल. आणि काही उद्योग अँड टेक्नॉलजी भूतलावरून नष्टही होतील. पण गोळाबेरीज केली तर माणूसजातीचा फायदाच होईल असं वाटतं.

तसंही माणूस फार बुद्धिमान प्राणी आहे. आपल्या अस्तित्वाला धोका पोहोचेल असं ज्या दिवशी जाणवेल तेव्हा जगात परत रिव्हर्स गियर पडेल. ऍटमबॉम्ब चा संहार एकदा बघितल्या नंतर आख्ख जग त्याच्या विरोधात एकवटलं  आहे. किंवा काही वर्षांपूर्वी क्लोनिंग ची लाट आली होती. त्याचा घातकपणा लक्षात आल्यानंतर त्यावर फारसं काही पुढं घडल्याचं वाचनात नाही. ज्या दिवशी म्हणून माणसाला समजेल की या ग्रहावरचं आपलं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे, त्यावेळी पुन्हा आपण जुन्या तंत्रज्ञानाकडे वळू.

असं झालं नाही तर जगनियंता आहेच की! काही कळायच्या आत प्रचंड उलथापालथ होईल, होत्याचं नव्हतं होईल, अविरत चालणाऱ्या जीवनचक्राचा वेग शून्य होईल........

आणि मग पुन्हा शून्यापासून सुरुवात होईल. 

No comments:

Post a Comment