Sunday, 30 April 2023

दैनंदिन आयुष्यात अनेक गैरसमज घेऊन आपण वावरत असतो. 

- अपघात होऊन रस्त्यावर वाहनाच्या काचा पडल्या असतील आणि त्यावरून जर आपण आपली स्कुटर किंवा कार नेली तर आपल्या गाडीचे चाक पंक्चर होईल. 

किंवा 

- शॉवर ने अंघोळ करताना बादलीने जितकं लागेल त्यापेक्षा जास्त पाणी लागतं. 

किंवा 

- विमान थांबल्या थांबल्या आपण उभे राहिलो तर विमानतळाच्या बाहेर पहिल्यांदा बाहेर पडू. 

हे सगळं ठीक आहे. पण सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे 

- लिफ्ट कॉल  करण्याचं बटन दाबल्यावर ते अजून दोन चार वेळा प्रेस केलं तर लिफ्टचा स्पीड वाढून ती लवकर आपल्या मजल्यावर येईल. 


ना मी ग्लास टेक्नॉलॉजिस्ट आहे ना रबर किंवा टायर टेक्नॉलॉजिस्ट. तरी मी ही पोस्ट लिहिण्याचं डेअरिंग करतोय. 

आज सकाळी मी पोस्ट टाकली ज्यात एक मुद्दा असा होता की अपघातामुळे जर रस्त्यावर वाहनाच्या काचा पडल्या असतात त्यावरून आपलं वाहन गेलं तर आपल्या गाडीचं चाक पंक्चर होत नाही. यावर काही जणांनी शंका उपस्थित केली जी अतिशय रास्त आहे. त्याला उत्तर म्हणून ही पोस्ट जी अगदी सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट या न्यायाने नव्हे तर एक तंत्रज्ञ म्हणून लिहितो आहे. 

पूर्वी जेव्हा कार किंवा ट्रकच्या काचा ज्याला इंग्रजीत शक्यतो विंडशिल्ड म्हणतात त्या साध्य काचांपासून बनवलेल्या असत. त्यामुळे अपघात झाला की त्या काचेचे अणकुचीदार तुकडे होऊन शरीरात शिरून ड्रायव्हर आणि पॅसेंजरचा मृत्यू ओढवायचा. हे आपण अनेक जुन्या चित्रपटात पाहिलं आहे आणि माझ्या वयाच्या लोकांनी लहान असताना अपघाताच्या बातम्यामध्ये वाचलं आहे. 

या फॅक्टर वर रिसर्च होत गेला आणि विंडशिल्डची ग्लास यामध्ये कालानुरूप बदल होत गेला. ती ग्लास टफन्ड बनली म्हणजे त्याची ताकदपण वाढली. त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि त्यातील इन्ग्रेडीअन्त असे आले की अपघात झाल्यावर आता त्या काचेचे तुकडे बनून हवेत उडत नाहीत तर काच तिथे जागेवरच स्क्वीझ होते. हे तुम्ही आता रस्त्यावर अपघात झाला तर बघू शकता. अपघात फारच भयानक असेल तर आणि काचेचे तुकडे झालेच तर ते पेबल्स (म्हणजे खडे) प्रमाणे होतात. म्हणजे त्यात अणकुचीदार पणा येत नाही. आणि ते तुकडे जर रस्त्यावर पडलेच तर ते छोटे छोटे खड्याप्रमाणे होतात. 

ही झाली काचेची बाजू. 

याशिवाय टायर टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा बदल होत गेले. आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये रबर ट्रेडिंग च्या खाली स्टील वायर असतात. त्यामुळे एकुणात टायर पिअर्स होऊन ते पंक्चर होण्याची शक्यता आता रिलेटिव्हली फार काम झाली आहे. 

त्यामुळे रस्त्यात विंडशिल्ड चे म्हणजे वाहनाच्या काचेचे तुकडे रस्त्यावर पडले आहेत तर त्याला चुकवण्यासाठी रस्ता वाकडा करण्याची गरज नाही आहे. इन फॅक्ट तसं केलं तर मागून येणाऱ्या वाहनाची आपल्याला टक्कर देण्याची शक्यता जास्त असते. 

(अर्थात आपल्या नेहमीच्या काचेपासून बनलेल्या गोष्टी, जसं की बियर बॉटल, जर रस्त्यावर फुटून पडल्या असतील आणि त्याचे अणकुचीदार टोक अँगल मध्ये रस्त्यावर पडले असेल तर ते टायर साठी त्रासदायक ठरू शकतं)




Saturday, 25 March 2023

शिक्षण

बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की कमी शिक्षण मिळाल्यामुळे न्यूनगंडत्व हा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव बनवतं. आणि तो न्यूनगंड, त्यांना व्यावसायिक यश मिळाल्यावर कधी अहंकारात परावर्तित होतो हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. मग व्यवसायामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी आलाच तर त्याचा पाणउतारा करण्याची हे लोक एकही संधी सोडत नाहीत. एखादं भरीव काम लौकिकार्थाने कमी शिक्षित लोकांकडून झालंच तर "बघा,  जास्त शिक्षण न घेऊन सुद्धा मी हे काम केलं की नाही?" असा अहंभाव त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. 

याउलट कमी शिक्षणाचा न्यूनगंड न ठेवता, उच्चशिक्षित लोकांशी कुठलाही बाऊ किंवा आव ने ठेवता हे लोक जेव्हा व्यवहार करतात, तेव्हा कमालीचे प्रोजेक्ट साकार झालेले मी पाहिले आहेत. कोल्हापूर मध्ये सरोज कास्टिंग नावाची कंपनी आहे. त्याचे संस्थापक बापू जाधव हे खूप कमी शिकलेले. पण त्याचा न्यूनगंड ना बाळगता त्यांनी जो मर्सिडीझ आणि कमिन्स ला इंजिन कॉम्पोनंट सप्लाय करण्याचा व्यवसाय उभा केला हे उदाहरण अभ्यास करण्यासारखं. माझे  बिझिनेस मेंटर हे तसे फार शिकलेले नाही आहेत, पण त्यांनी आपल्या पॅशन च्या जोरावर वाचन केलं, स्वतःची थॉट प्रोसेस अप्लाय केली आणि एक स्वतःची स्ट्रॉंग थेअरी बनवली की जी आम्हाला बिझिनेस कसा करायचा ते शिकवते.

जास्त शिकलेल्या लोकांमध्ये जर विनयशीलता असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लागतात. मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे की उच्च शिक्षण हे त्या लोकांना लीन बनवते, त्यांच्या मनात दुसऱ्या बद्दल एम्पँथी तयार करते, ह्युमन इक्वालिटी हे जीवनाचं तत्व बनवतात.  ही लोक कमालीची यशस्वी होतात.

शिक्षण कमी असेल तर तुम्ही "नॉलेज सीकर" बनू शकता आणि भवतालात हे नॉलेज देणारे असंख्य लोक आहेत. त्यांची मदत घ्यायला लाज वाटायचं काही कारण नाही. उच्च शिक्षित असाल तर "नॉलेज गिव्हर" बना. तिथं माज असण्याचं काही कारण नाही.  नॉलेज सीकर आणि नॉलेज गिव्हर यांचं यथोचित कोलॅबोरेशन झालं तर एक अत्यंत सशक्त आस्थापना उभी राहू शकते.  

शिक्षणाबद्दल असा भाव हवा असं माझं मत आहे. त्याचं महत्व वादातीत आहे. पण ते जर नसलं तरी आयुष्य बनवता येतं याबद्दल मनात कुठलीही शंका ठेवू नये असं माझं मत आहे. 

Saturday, 18 February 2023

सनराईज उद्योग

२०१७ ची गोष्ट आहे. ब्रिटन गॉट टॅलेंट मध्ये एक विनोदवीर आला होता. डॅलिसो चोपंडा नावाचा. भारी कॉमेडियन आहे. तिथे ४-५ मिनिटाच्या स्किटमध्ये त्याने धमाल उडवून दिली होती. त्या स्किट मध्ये ब्रिटन मधील मंदी बद्दल तो विनोदाने म्हणाला होता "इंग्लंड मध्ये रेसेशन आलं आहे असं मी तेव्हा मानेल जेव्हा एखादी भारतीय कंपनी इंग्लंड मध्ये कॉल सेंटर उघडेल." खोटं कशाला सांगू, पण मी सुद्धा त्या विनोदावर हसलो होतो. त्याला कारण होतं. त्याची विनोदाची जातकुळी भन्नाट आहे. डिलिव्हरी क्लास आहे. पण थोडं वाईट वाटलं होतं. ते टाटांनी जे एल आर, टेटली, कोरस स्टील  घेऊन सुद्धा, भारतीय असलेल्या पण इंग्लंडस्थित राहून भारतात पोलाद साम्राज्य उभे करणाऱ्या मित्तलांनी यूरोपातील अर्सेलर घेऊनही असे जोक केले जातात, यासाठी. 

तीन चार दिवसांखाली एअर इंडिया ने बोईंग आणि एअरबस वर ला  ४७० विमानांची ऑर्डर दिली त्याने कदाचित असे जोक करताना कॉमेडियन चार वेळा विचार करतील असं मनाला चाटून गेलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रांस चे अध्यक्ष मॅक्रो आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्या ऑर्डर बद्दल काय स्टेटमेंट दिलं आहे हे आपण पेपर मध्ये वाचलंच आहे. पण भारताला सुद्धा या ऑर्डरमुळे दूरगामी फायदा होणार आहे असं दिसतं, ज्याबद्दल रिलेटिव्हली कमी बोललं गेलं असं वाटतं. (याआधी अशी मोठी ऑर्डर अमेरिकन एअरलाईन्स ने २०११ साली दिली होती)

भारतात काही सनराईज उद्योग उदयाला येत आहेत आणि एव्हिएशन त्यापैकी एक आहे हे एव्हाना अनेकांना माहिती झालं आहे. असं म्हंटलं जातं की या ऑर्डरपासून प्रेरित होऊन इंडिगो जी, कोविड आधी ३०० विमानांची ऑर्डर देणार होती, ती रिलीज करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. आणि कुणास ठाऊक ती कदाचित ५०० ची असेल अशी वदंता आहे. स्वतः टाटांनी आताच्या ऑर्डरची प्राईस हेज करण्यासाठी अजून ३४० विमानांची ऑर्डर देऊन ठेवली आहे असं बोललं जातं. टाटा ग्रुप मधल्या उच्चपदस्थाने ही माहिती शेअर केली होती, जी बहुतेक गोपनीयतेचा भंग झाला म्हणून मागे घेण्यात आली. नुकत्याच चालू झालेल्या अकासा ची सुद्धा ७२ विमानाची डिलिव्हरी पुढील दोन वर्षात अपेक्षित आहे. येणाऱ्या काही वर्षात सगळे मिळून २००० नवीन विमाने भारतात येण्याची शक्यता आहे. 

या उद्योगाला येणाऱ्या काही वर्षात पायलट्स, केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ, मेंटेनन्स क्रू या क्षेत्रात रोजगार तयार होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विमानातील वेगवेगळ्या सब असेम्ब्ली चा मेंटेनन्स करणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस यावेत. गेल्या अनेक वर्षात टाटा, महिंद्रा, क्वेस्ट यांनी उद्योगांनी बंगलोर, हैद्राबाद, नागपूर, वडोदरा इथे एव्हिएशन इंडस्ट्रीच्या निगडित उद्योग थाटले आहेत, जे बोईंग, एअरबस, लॉकहीड मार्टिन सारख्या कंपन्यांना विमानांचे स्पेअर पार्टस पुरवतात. त्या उद्योगांना आणि तसेच त्यांच्या व्हेंडर्स ला व्यवसायपूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. एव्हिएशन इंडस्ट्री मध्ये व्हेंडर म्हणून पात्र होण्यासाठी क्वालिटी चे एंट्री बॅरिअर खूप कडक आहेत. पण त्यांची जर यशस्वीरीत्या पूर्तता केली तर खूप प्रॉस्पेक्ट्स आहेत इतकं नक्की. येणाऱ्या काही वर्षात या सगळ्या व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत हे नक्की. 

बाय द वे, या डीलची घोषणा करताना टाटा ग्रुप चे एन चंद्रा, बोईंग चे डेव्हिड कॅलहून, एअरबस चे जेफ निटेल यांना वर्ल्ड मीडिया ने जास्त कव्हर केलं नाही हे आजच्या प्रथेला धरूनच आहे. 

व्यंकटेश

 काल व्यंकटेशला भेटलो. वेंकी म्हणतात त्याला. वय साधारण पस्तीस चाळीसच्या मध्ये. कंपनी पण तशी लहानच, पिनिया बंगलोर मध्ये. सहा सात हजार स्क्वे फूट मध्ये. वयोपरत्वे आणि व्यवसायाच्या साईझच्या दृष्टीने मी मोठा. म्हणून थोडा ताठ्यात गेलो होतो शॉप मध्ये.

वेंकीची स्टोरी अजब, ते मला तिथं दोन एक तास थांबल्यावर कळलं.
२००१-२ च्या सुमारास वेंकी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. एम एस झालं, वेंकी ला जॉब लागला. जनरल मोटर्स ची एन व्ही एच मध्ये काम करणारी छोटी, पण हाय टेक कंपनीत. त्या कंपनीत वेंकी चमकला. कंपनीने त्याची ग्रीन कार्ड ची प्रोसेस चालू केली. आणि वेंकी ने तिथं जाहीर केलं की ग्रीन कार्ड बनवू नका कारण सहा महिन्यात मी भारतात जाऊन वडिलांच्या व्यवसायात जॉईन होणार आहे. त्याच्या भारतीय आणि अमेरिकन कलीग्ज ने "द ग्रेट अमेरिकन लाईफ स्टाईल" न सोडण्याचा आग्रह केला. पण वेंकीचा निर्णय फायनल होता.
२००५ ला वेंकी भारतात परतला, आणि जॉईन झाला वडिलांच्या प्रस्थापित इंजियरिंग व्यवसायात. पंचवीस वर्षे जुना व्यवसाय, मार्केट लिडर, कंपनीत शंभर पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. वेंकीला सेकंड जनरेशन व्यावसायिक म्हणून यापेक्षा चांगलं पिच काय असणार? त्याने धडाक्यात काम चालू केलं.
कंपनीत काही सिनियर पार्टनर्स होते. त्यांना वेंकीची नवीन मॅनेजमेंट स्टाईल झेपत नव्हती. त्याच्यावर बंधनं यायला लागली. बदलत्या काळानुसार लागणारे निर्णय वेंकी घ्यायचा पण सिनियर पार्टनर्सचं त्याला अनुमोदन नसायचं.
शेवटी वेंकीने निर्णय घेतला. वडील आणि त्यांच्या पार्टनर्स पासून वेगळं होण्याचा. त्याने स्वतःचा व्यवसाय थाटला, जिथं मी उभा होतो. व्यंकटेश ने हाय एन्ड रोबोटिक्स मध्ये बिझिनेस चालू केला. मी पोहोचलो तेव्हा तिथे २० लोक काम करत होते. अल्युमिनियम प्रोफाइल मध्ये छोटं ऑफिस थाटलं होतं. डिझाईनचे दोन वर्क स्टेशन. वडिलांच्या प्रस्थापित बिझिनेस मध्ये राहिला असता तर राजा असला असता, पण प्रोग्रेसिव्ह मानसिकतेला खतपाणी जिथं मिळत नव्हतं त्या इझी लाइफस्टाइल ला वेंकी ने तिलांजली द्यायचं ठरवलं आणि स्वतःचा छोटा का होईना पण बिझिनेस चालू केला. प्रतिकुलता येतेच, पण अनुकूलतेतून अशी प्रतिकुलता येण्याचं उदाहरण मी पहिल्यांदा पाहत होतो. पण वेंकीची क्लिअर थॉट प्रोसेस पाहता तो त्यावर मात करेल यात शंका नाही.

तसं बघायला गेलं तर वेंकी दुसऱ्या पिढीचा व्यावसायिक. पण ज्या पद्धतीने त्याने व्यवसाय थाटला, त्याची तुलना फर्स्ट जनरेशन उद्योजकाशी केली तर वावगं ठरणार नाही.
वेंकीच्या युनिट मध्ये जाताना थोडा अहंकार होता माझ्या मनात. तिथून बाहेर पडताना स्वतःलाच वेंकीपेक्षा मी छोटा वाटू लागलो....... सर्वार्थाने.

Tuesday, 14 February 2023

दोन प्रकारचे लीडर्स

मी दोन प्रकारचे व्यावसायिक लीडर्स बघितले आहेत. 

पहिला प्रकार म्हणजे जे लोकांसाठी काम करतात. म्हणजे लोकांची ग्रोथ ही त्यांच्या केंद्रस्थानी असते. ग्रोथ म्हणजे फक्त आर्थिक ग्रोथ नव्हे, तर सर्वांगीण विकास. त्यासाठी हे लीडर्स आपल्या लोकांना एम्पॉवर करण्यात विश्वास ठेवतात. त्यासाठी ते त्यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करतात.  ते स्वतःची पोझिशन बाजूला ठेवतात आणि फक्त कंपनीचं हित डोळ्यसमोर ठेवतात. 

आमचा रिटायर झालेला प्रेसिडेंट जेफ क्लार्क याबाबत माहीर होता. तो कधीही आपले निर्णय कंपनीवर लादायचा नाही. खरंतर "हे असं करा/करू नका" हे म्हणायची त्याच्याकडे पॉवर होती. पण असे अनेक निर्णय, भले त्याच्या मनाविरुद्ध असतील पण कंपनीच्या हिताचे असतील तर त्याने खुल्या मनाने स्वीकारले. आणि हो, हे करताना अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा केली, समोरच्याला बोलू दिलं, त्याच्या मताचा आदर केला, काउंटर अर्ग्युमेंट करताना व्हेटो कधी वापरला नाही. काही वेळा त्याने त्याच्या निर्णया बद्दल कन्व्हिन्स केलं आम्हाला पण तो लादला नाही. याचा फायदा असा झाला कि प्रत्येकाचा सेल्फ एस्टीम हा जोपासला गेला. शेवटी एकमेकांना आदर देणं म्हणजे हेच नाही का?

जेफ सारखे लोक ही पहिली कॅटेगरी. 

याउलट मी असे काही लोक बघितले आहेत की त्यांचा आपल्या टीमवर अजिबात विश्वास नसतो. (तो जर नसेल तर ही लोक टीम वाढवतात कशाला हा मला नेहमी पडणारा प्रश्न). सतत त्यांना आरोपीच्या कटघर्यात. निर्णय त्यांच्यावर लादायचे आणि ते वर्क आउट नाही झाले तर त्यासाठी टीमला जबाबदार धरायचं. व्यवसायात स्वतः निर्णय घेऊन टाकायचा टीमला विचारायचं नाटक करायचं. म्हणजे सहसा त्यांचा डायलॉग असा असतो "मी अमुक तमुक करायचं ठरवलं आहे. तुम्हाला काय वाटतं?" आता तुम्ही व्यवसायाचे प्रीमियर. तुम्ही ठरवलंच आहे तर आम्ही कशाला विरोध करू? असा लोक विचार करतात. आणि यापुढे जाऊन कुणी काही सुचवलं तर आपल्या पोझिशनचा वापर करून ते म्हणणं हाणून पडायचं. लोक सुद्धा आपल्या कोशात जातात. ते निर्णय घेत नाहीत आणि मग होयबा, किंवा प्राकृत भाषेतील चमचा लोकांची गॅंग आपल्या भोवताली जमा करण्यात तो लीडर धन्यता मानतो. या प्रकारच्या लीडर बरोबर काम करणाऱ्या लोकांची वाढ खुरटते, पर्यायाने व्यवसायाची. 

काळाच्या कसोटीवर सिद्ध होणारं एंटरप्राइज, मग ते कुठल्याही साईझ चं असो, बनवायचं असेल तर पहिल्या प्रकारचे नेतृत्वगुण अंगात बाणवायला हवेत असं माझ्या लक्षात आलं. 

लोकांना भेटलं की हे असं नव्याने काही तरी शिकायला मिळतं. 


व्यवसायाने बाळसं धरल्यावर एका प्रक्रियेत मोठा फरक होतो. फरक बऱ्याच गोष्टीत होतो. पण सगळ्यात मोठा फरक होतो तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत. 

व्यवसाय लहान असताना सर्व निर्णय तुम्हाला एकट्याने घ्यायचे असतात. त्यातून परिस्थितीला अनुसरून निर्णय घ्यायची सवय लागते खरी, पण त्या प्रोसेस मध्ये अजून एक घडतं. एकधिकारशाहीचा जन्म होतो. एखाद्या सिच्युएशन कडे आपण जसं बघतो तीच पद्धत बरोबर असा एक फाजील आत्मविश्वास अंगात भिनतो. 

कालानुरूप व्यवसाय वाढतो. त्याला संयुक्तिक असं एक बोर्ड कंपनीत तयार होतं, डायरेक्टर बोर्ड. अगदीच फॉर्मल बोर्ड तयार नाही झालं तरी मग सिनियर लोकांची टीम तयार होते. असं अपेक्षित असतं की आता यापुढे घेतले जाणारे निर्णय हे त्या बोर्ड च्या किंवा कोअर टीमच्या संमतीने घेतले जावेत. मग ते कुठलेही असोत.

इथं खरी गंमत चालू होते. इतके दिवस एकट्याने निर्णय घेण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सवय लागलेल्या प्रमुखाला अपल्यावरती आता बोर्ड आहे आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त पॉवर आहे हेच मान्य होत नाही. 

तीच गोष्ट सिनियर लोकांच्या टीमची. या टीमला जर निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही तर कुठलाही निर्णय घेताना एकांगी विचार केला जातो, फक्त प्रमुखाच्या मेंदूने, जो व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक असेलच असे नाही. रादर दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टीने तो चुकीचा पण असू शकतो.

Saturday, 21 January 2023

सोशल मीडिया

 सोशल मीडिया म्हणजे माझ्यापुरतं फेसबुक, लिंक्ड इन, व्हाट्स अप इतक्या पुरतं मर्यादित आहे. या संदर्भांत

मला साधारण तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. 

"राजेश काय चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो" ही बहुतेकदा माझे नातेवाईक आणि काही प्रत्यक्षातल्या मित्रांची प्रतिक्रिया असते. यात वास्तविकतेपेक्षा हेटाई जास्त असते.

"तुम्ही जे काही लिहिता ते आम्हाला आवडतं." हे फेसबुकवरील मित्र मैत्रिणी आणि लिंक्ड इन चे कनेक्शन व्यक्त होतात. यातही काही जेन्यूईन असतात तर काहींना नाईलाज असतो. 

"इतका वेळ कसा काय मिळतो तुला/तुम्हाला?" ही एक बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न. यातही काहींना कुतूहल असतं, काहींना अविश्वास असतो. परवा श्रीपाद घोडके कडे मला तरुणांनी मला हा प्रश्न विचारला. 

सोशल मीडिया मॅनेज कसा करतो, यावर लिहा असं काही जणांनी सांगितलं, त्यावर लिहितो. व्हाट्स अप आणि लिंक्ड इन मॅनेज करायला फार अवघड नाही. 

व्हाट्स अप वर सहसा चॅटिंग करत नाही. बोलायला अगदीच जमत नसेल तर करतो, ते ही अगदी मोजकं. चॅटिंगचा थ्रेड लांबू लागला की फोन करतो. 

वाढदिवस, श्रद्धांजली, सणावाराच्या शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी यावर स्वतःहून कुठल्याही ग्रुप वर कधीही लिहीत नाही. पर्सनल मेसेजद्वारे भावना पोहचवतो. 

कितीही भारी मेसेज असेल तरीही फॉरवर्ड करत नाही. अगदीच वाटलं तर ओरिजिनल सोर्स वर जातो आणि तिथली लिंक शेअर करतो. 

व्यावसायिक असे नऊ ग्रुप आहेत (३ क्रिसलीस, ३ आय एम टी एम ए, १ असोसिएशन, १ ट्रस्टी, १ कंपनी), पर्सनल ६ ग्रुप आहेत. त्यातले तीन फॅमिली चे आहेत ज्याची जास्तीत जास्त मेम्बर संख्या ८ आहे. दोघांचे नंबर वेगळे आहेत. सर्व ग्रुप वर राजकीय, धार्मिक, जातीय धुळवड खेळायला सक्त मनाई आहे. कुठं झालीच तर माझ्या शब्दात सुनावतो आणि ते जर बंद झालं तरच ग्रुपवर थांबतो. नाहीतर ग्रुप सोडतो. 

रिझल्ट: सकाळी मोबाईलवर दोन्ही नंबर मिळून साधारणपणे फक्त दहा ते बारा मेसेज असतात. 

लिंक्ड इन: 

लिंक्ड इन चा वापर फेसबुकपेक्षा रिलेटिव्हली कमी. ते ऑफिसमध्ये बघायची लिबर्टी घेतो. कारण ते बहुधा व्यावसायिक कारणासाठी निगडित असतं. तिथे तसाही फारसा टाईमपास होत नाही. 

आता राहता राहिलं फेसबुक: 

फेसबुकवर फक्त दोनच ऍक्टिव्हिटी इमानेइतबारे करतो. एक वॉल वर लिहिणे. अगदीच संयुक्तिक कॉमेंट असतील तर त्यांना उत्तर देणे. 

फेसबुकच्या दिवसभरातील माझ्या दोन वेळा फिक्स आहेत. एक घरून कंपनीत येईपर्यंत आणि दुसरी कंपनीतून निघाल्यावर घर येईपर्यंत.  साधारण दीड पावणेदोन तास. याशिवाय घरातील ऍडिशनल अर्धा ते पाऊण तास. कंपनीतील सव्वानऊ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत फेसबुक वापरत नाही. सुट्टीच्या दिवशी घरी फेसबुक जास्त वापरलं जातं. बाकी प्रवासात असेल तर बेधुंद फेसबुक वापरतो. एअरपोर्ट, कार किंवा ट्रेन मध्ये असेल तर कधी पुस्तक तर कधी फेसबुक.  

फेसबुकवर सुद्धा कुठल्याही राजकीय, धार्मिक आणि जातीय धुळवडीत सहभाग नसतो. कुठल्याही ट्रेंड मध्ये सहसा सहभागी नसतो. फेसबुकवर कुणी काय लिहावं, कुठले फोटो लावावे, कोण शहाणपणा करतो, मूर्खपणें वागतं याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. (दोन-तीन पोस्ट पूर्वी लिहिल्या होत्या, त्यानंतर कानाला खडा). 

माझा सोशल मीडिया वापरायचा अजेंडा फिक्स आहे. मी टाईमपास साठी येत नाही. समाज प्रबोधन, दुसर्यांना इन्स्पिरेशन वगैरे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. तो अजेंडा काय आहे, त्याचा वापर काय आणि कसा करायचा याबाबत माझे आराखडे फिक्स आहेत. माझ्या वेळेची किंमत काय आहे मला चांगलं माहित आहे. त्यामुळे इथं जो वेळ व्यतीत करतो, तो फुकट नाही आहे. सध्या इतकंच सांगतो. 





Wednesday, 4 January 2023

माझं मन.

आता तसाही शेवट जवळ आलाच आहे. सगळ्या प्रकरणावर एकदाचा पडदा पडणार असं दिसतं आहे. तेव्हा मित्रा, मला जे सांगायचं आहे ते मी स्पष्टपणे सांगून टाकतोच. आणि हे जे मी सांगणार आहे ते पूर्णपणे सजगतेने सांगणार आहे, ज्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही. 

मी सर्वार्थाने परिपूर्ण असं आयुष्य जगलो आहे. इथवर पोहोचण्यासाठी प्रसंगानुरूप अनेक काटेरी मार्गांचा उपयोग केला. आणि त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे जे मी वागलो ते माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, जे मला पटतं, तसाच वागलो.

पश्चातापाचे क्षण मी पण भोगले. फारसे नाही आणि ज्याचा आवर्जून उल्लेख करावा असे तर फारच  कमी.  त्या प्रसंगी मला कृतिशील राहणं हे अतीव गरजेचं होतं. सुटका नव्हतीच. मी त्यावर विचारपूर्वक निर्णय घेतले. काळजीपूर्वक एकेक गुंता सोडवत गेलो. त्या उपरही सांगतो, हे सगळं करताना मी फक्त माझ्या मनाचं ऐकलं. 

हो, काही प्रसंग आलेही आयुष्यात, आणि मला माहिती आहे की ते तुझ्याही लक्षात असतील. माझ्या क्षमतेपेक्षा मी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे फटके ही बसले. पण त्याच्या परिणामांना मी सामोरे गेलो आणि काहींना काळाच्या ओघात मी विस्मृतीत ढकललं. पडलो, धडलो पण पुन्हा उभा राहिलो अन नव्याने घडलो. हे सगळं करताना कौल घेतला तो माझ्याच मनाचा. 

मी जगण्यावर असोशीने प्रेम केलं. कधी हसलो तर कधी रडलो. कधी पराभूताची मानसिकता अनुभवली. कोषात गेलो. पण आता जेव्हा अश्रूच गोठले आहेत तेव्हा तो भूतकाळ मला मोठा विस्मयकारी वाटतो आहे. मला त्यावेळेस घेतलेल्या निर्णयाचा गम अजिबात वाटत नाही आहे. कारण मी केलेल्या कृतीची दिशा माझ्याच मनाने तर दाखवली होती. 

शेवटी मनुष्ययोनीत जन्माला आलोच आहे तर त्यातून काहीतरी भरीव निष्पन्न घडायला नको का? जर भरभरून जगलोच नाही तर अस्तित्वहीन असण्याचा काय उपयोग? लाचारीतून जन्माला आलेल्या शब्दांचा मला सहारा नकोच आहे. सत्य आणि सत्यच बोलण्याचं धैर्य माझ्यात हवं. आणि मला माहिती आहे, याचा मला प्रचंड त्रास झाला आहे, होणार आहे. पण शेवटी माझं मन मला जे सांगतं आहे तेच ऐकायला हवं.  

माझं मन.....त्याचंच बोट धरून तर मी अनेक आव्हानांना सामोरे गेलो आहे. 

फ्रॅंक सिनात्रा च्या माय वे या गाण्याचा गद्य भावानुवाद