Monday, 23 February 2015

गिरणी वाला

लहानपणी मी गिरणीवर दळण आणायला जायचो. दुकानात फिरणाऱ्या पिठाच्या कणामुळे गिरण दळणाऱ्या मालकाने चेहरा रुमालाने झाकलेला असायचा. त्या गिरणी वाल्याची,  प्रत्येक हालचाल मी अगदी टक लावून पाहायचो. ते गहू किंवा ज्वारी वरून टाकणे, पडणाऱ्या पिठाचा जाड कि बारीक अंदाज घेणे, त्यावरून ते handle टाईट किंवा लूज करणे, सगळ्यात मजा वाटायची तो हातात लोखंडी पीस घेऊन चार ठिकाणी यंत्र बडवायचा ते. एकदम ऱ्हिदम मध्ये. time स्टडी घेतला तर micro सेकंदाचा फरक पडणार नाही. हे सगळं झाल्यावर त्याचा हात त्या hopper मध्ये. किती धान्य उरलं त्याचा अंदाज घेत. थोडं कमी झालं कि outlet वर लक्ष. उजव्या हातानी हात त्या outlet मध्ये टाकल्यावर भस्स करून कधी पीठ पाडायचं तेव्हा मी हरखून जायचो. मग पीठ पडणं संपत आल्याचं त्याला कळलं कि तो गिरणी वाला पुढचं दळण ओतायचा. परत गिरण चालू.

गिरणी वाल्याच्या ते दळण काढण्याच्या पद्धतीचा माझ्या मनावर खूप पगडा आहे. इतका कि, फेसबुक वर पोस्टी टाकताना मी त्या चेहरा झाकून घातलेल्या गिरणी वाल्याची नक्कल करतो. 

गिरणी वाला 

हे आपलं असं आहे

सकाळचे पाच वाजलेत. पुणे एयरपोर्टला बसलो आहे. 

या एयरपोर्टवर मला वेगवेगळे स्त्री पुरूष नेहमीच दिसतात. त्यात माझं लक्ष वेधून घेतात म्हणजे.......................
नाही नाही, आज कोणतीही कन्यका नाही, सुंदरी नाही किंवा बर्फ़ी नाही. आज फक्त पुरूष. (राजेश, इतका बिघडला असशील असं वाटलं नव्हतं हो.)

तर सकाळी ४:३० किंवा ५ वाजता मोबाईलमधे तोंड घालून गुलूगुलू बोलणार्या लोकांबद्दल मला विलक्षण कुतूहल वाटतं. पण त्यापेक्षा या भोरप्रहरी लँपटॉपवर कीबोर्ड बडवून एक्सेल वर काम करणारे किंवा इमेल ला उत्तर देणारे बघितले की मला आदराचं भरतं येतं. हा प्रकार काही मला आयुष्यात जमला नाही.

सेल्सच्या कामाला जुंपल्यानंतर माझे प्रवास एकतर बसने व्हायचे किंवा मग रेल्वेने. त्यावेळेला पहिला छंद होता लोकांशी गप्पा मारणे. "काय मग, कुठे निघाले" साधारण या प्रश्नाने सुरूवात होणारी गप्पाची मैफल, दुसर्या दिवशी सकाळी "चला, भेटू मग कधीतरी" या निरोपाने व्हायची. या प्रवासात मला एशियन गेम रौप्यपदक विजेता भेटला, केवळ रेल्वेप्रवासात आराम मिळतो म्हणून विमानप्रवास टाळणारे कंपनीचे मालक भेटले, काही कथा भेटल्या तशाच व्यथाही, काही विदेशी मंडळी भेटली ज्यांना भारताबद्दल सांगताना रंगून जायचो.

दुसरी मला साथ दिली ती वाचनाने. या प्रवासात मी इतकी पुस्तकं वाचली आहेत की गणना नाही. ३-४ पुस्तकं मी घेऊनच जायचो. एकदा मी महानायक वाचत होतो. नेताजींचा युनिफॉर्मचा फोटो त्यावर अन माझा मिलीटरी कट. एक कन्यका बाजूलाच होती बर्थवर, म्हणजे बसली होती. पापण्या फडफडवत ती म्हणाली "Are you in defense?" आता हो म्हणावं तर पुढचे प्रश्न "कुठे पोस्टींग, काय पोस्ट, बॉर्डरवर कधी होता का" यावर थापा तर मारता आल्या असत्याही. पण मग स्टेशनवर उतरून पाण्याची बॉटल आणा. आणि हे सगळं करताना ती मधेच म्हणायची "भैया, जरा वडापाव लाना मेरे लिये प्लीज़" झालं, भैया, म्हणजे मग थापा सगळ्या पाण्यात. मी आपलं नाही म्हणून टाकलं. तिचा हिरमुसलेला चेहरा आजही लक्षात आहे.

तर लँपटॉप चा प्रवेश  माझ्या आयुष्यात झाला. १९९९-२००० साली. ती लँपटॉपची बँग गळ्यात अडकवून फिरताना खांदे भरायचे, पण लोकांच्या कुतुहुलमिश्रीत नजराच ते उचलायचं बळ द्यायच्या. मी पण इतर लोकांसारखं रेल्वेत किंवा विमानतळावर मेल ला उत्तर द्यायचा अभिनय करायचो पण का कोण जाणे मला ते कधीच जमलं नाही. लोकांचं बघून मी एकदा चेन्नै हून येताना मालिका शेरावत च्या मर्डर ची सीडी घेतली. ५० रुपयाला. खूप excited होतो. जेवण वगैरे झाल्यावर मस्त मांडी घालून सरसावून बसलो. तर च्यामायला सेन्सॉर बोर्डाने महेश भट ला negotiations मध्ये पाठवलेली पहिली सीडी असावी. कारण चुंबनविशारद इम्रान हाशमी आणि अल्पावस्त्रांकिता मलिका यांचा एकही प्रणय सीन नसणारी ती महाभयानक सीडी होती. (मग नंतर मांडवली झाल्यावर पूर्ण पिक्चर बाहेर आला). इतका हिरमोड झाला कि तेव्हापासून आजतागायत सीडी म्हणून पहिली नाही कि ऐकली नाही. त्यावर मागच्या बाजूला तमिळ मध्ये काहीतरी लिहिलं होतं. "मुर्खा, ५० रुपयात यापेक्षा जास्त नाही बघायला मिळणार" असे लिहिले असेल असं मला वाटलं.  

आता तर मी प्रवासात आय पॅड वापरतो. दोन चार वाक्यात मेल ला उत्तर असेल तर उजवतो, नाहीतर सांगतो नंतर लिहितो म्हणून. बाकी वेळेस हेच ब्लॉग लिहिणे. १६७ पैकी किमान सत्तर ब्लॉग्स चं बाळंतपण विमानतळावर झालं आहे नाहीतर रेल्वेत. 

हे आपलं असं आहे 

बाकी निवांत 

Monday, 16 February 2015

आजोबा

काय असतं, की वयानुरूप आपल्या मृत्युबद्दलच्या जाणीवा बदलत जातात. म्हणजे ७-८ वर्ष वय होईपर्यंत आपल्याला काहीच कळत नसतं. मुळात आपण जगतोय हेच माहित नसतं, नाही का. त्यानंतर होणारे मृत्यु मात्र आघात करायला चालू करतात. मधे एक वय येतं साधारणपणे १७ ते २४. जाणतेपण आलं असतं, पण आपल्याच मस्तीत मश्गुल असतो. तारूण्याचा उन्माद म्हणा, दोस्तीची किंवा प्रेमाची नशा म्हणा पण आपल्याला आपलंच जग खुणावत असतं. अगदी खरं सांगू का, हे आपलं आपलं म्हणून मी माझ्याकडून झालेल्या चुकांची बोच जरा बोथट करतोय. मी असा वागलो हे खरं.

म्हणजे माझे आजोबा. अनंतराव मंडलिक. निवांत माणूस. माझ्यावर सॉलीड जीव. सॉलीड म्हणजे अगदी जाणवेपर्यंत. गोड द्यायचं की मलाच देणार. मी काय की ते नवसाबिवसाचा म्हणे. परत वंशाचा दिवा. त्यामुळे लहान भावाकडे ते बघायचेच नाही. लहान म्हणजे काय १ वर्षाचा फरक. पण उन्मेष फारच रडक्या होता म्हणे लहानपणी, अन मी उडक्या. उडक्या म्हणजे, क़ायम फिरायला तयार. आजोबा न्यायचे मला.

इंजिनियरिंगला पुण्याला आलो. ८८ ला आजोबांना कँन्सर झाला, घशाचा. ससून मधे admit असायचे आजोबा. कर्तव्य भावनेने जायचो मी ससूनला. शेवटी शासकीय दवाखाना तो. खाली झोपायचो. पण ते सगळं जनरल वॉर्डचं वातावरण. अस्वच्छता. आवडायचं नाही मला, किंवा माझ्या त्या वयाला म्हणा. आजोबांचं माझ्यावर असलेलं प्रेमही त्या माझ्या नाराजीला दूर नाही करू शकलं. शेवटी आजोबा गेले ससूनमधेच. वाईट तर वाटणारच, पण ससूनमधे आता झोपावं लागणार नाही याचा थोडा का होईना आनंद झालाच.

पण क़हर झाला तो आईचे वडील गेले तेव्हा. केशवराव डंक. आजही परभणीत त्यांचं नाव काढतात. भारदस्त अन कडक. उन्हाळ्याच्या सुट्टीला त्यांना कचेरीतून बोलवायची टाप फक्त नातवांचीच. आजोळी असणार्या १५-१६ पिलावळीत तो मान बहुधा मलाच मिळायचा. ते पण गेले १९८९ ला. मी विशीचा टोणगा. गणपतीचे दिवस. आई बाबा परभणीलीच होते, ते सिरीयस होते म्हणून. वय, परिस्थिती बघता काय होणार ते कळलं होतं. अन झालंही तेच. पण आजोबांचं जाणं, त्यांचं प्रेम हे काही माझ्या तारूण्याच्या उन्मादाला रोखू नाही शकलं. गणपती मंडळाचा सक्रीय कार्यकर्ता, सर्वेसर्वाच. मग तिकडे आजोबा अनंतात विलीन होत असताना मी इकडे "धत्ताड, धत्ताड"

पण मग लग्न झालं, नोकरी चालू झाली. संसारी झालो. माणसांची किंमत कळू लागली. जवळच्यांचे होणारे मृत्यु त्रास देऊ लागले, मग त्यांचं वय काहीही असू दे. माझे अजून एक आजोबा, सीतारामपंत पाठक. आधी हैदराबाद स्टेटमधील आणि नंतर मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार. ते तरूण असताना कसे कडक होते याचे खुप किस्से. मी कळता झालो तेव्हा ते रिटायर झालेले. व्यवहारी पण पोटातून प्रेम. सदविचारी, सदवर्तनी. ते घरात असायचे तेव्हा सगळं काम स्वहस्ते. गादीची चादर अशी टाकायचे जणू इस्त्री फिरवली आहे. अक्षर मोत्यासारखं. पत्र बहुधा पोस्टकार्डावरच. पण सगळा मजकूर लिहूनही, शेवटी जागा असायचीच. खाणं आटोपशीर. रेल्वेने ते आणि मी एकदा चाललो होतो. रिज़र्वेशन क्लार्कला फ़ॉर्म लिहून दिला, S R Pathak.  M.   87. क्लार्क बोलला "काय तब्येत बरी आहे ना? की मुंबईच्या हॉस्पीटल............" मी बोललो "ते बघ उभे आहेत, परीटघडीचा पांढरा शर्ट अन पँट घालून" त्याने खिडकीतूनच हात जोडले.

मी कधीही ठाण्याला गेलो की relevant प्रश्न विचारणार. एप्रिल मधे गेलो की टर्न ओव्हर किती झाला, सप्टेंबर मधे रिटर्न फ़ाईल केला का, डिसेंबर मधे ऑर्डर पोझीशन कशी आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी "तुझी कंपनी कशी आहे ते दाखव मला" म्हणून आले. आणि लुप्त उठवणार, उगीच बघायची म्हणून नाही. मेमरी अशी की साला माझे मित्र, बिझीनेस पार्टनर, बायकोचे नातेवाईक सगळेच लक्षात. आणि त्यांच्याबद्दल विचारणार. आपुलकीने.

 २००० ला सँट्रो घेतली तेव्हा गेलो होतो ठाण्याला. मला म्हणाले, वय ८३, "जरा चक्कर मारून आण" दिसत नव्हतं व्यवस्थित तर गाडीवरून हात फिरवून फ़ील घेतला. वृंदावन च्या मागे गेल्यावर म्हणाले "मला खूप आनंद झाला आहे, मी तुला कॉफ़ी पाजतो" मी तुम्हाला सांगतो, आंवढ्याबरोबर कॉफ़ी गिळताना मस्त लागते.

तीन वर्षापूर्वी गेले ते वयाच्या ९७-९८ व्या वर्षी. तो अस्थिपंजर झालेला अचेतन देह बघितल्यावर उन्मळून पडलो. आधीच्या दोन आजोबांच्या वेळेसचा रडण्याचा बँकलॉग भरून काढला.


Friday, 13 February 2015

नमस्कार

जो नमस्कार आपसूक घडतो तो खरा नमस्कार. तो करावा नाही लागला पाहिजे. प्रेम, जिव्हाळा, आदर, कर्तृत्व, भव्यता यांच्याशी मनाची तार जेव्हा झंकारते तेव्हा नमस्काराची जादूई क्रिया घडते.

पहेलगामला वर चढून गेल्यावर सह्याद्रीपण टेकडी वाटावी असे उत्तुंग डोंगर पाहिल्यावर आलेलाअनुभव.

एका पावसाळी सकाळी रायरेश्वरावर धुक्यात कोंडलेल्या तळ्याच्या काठी डोलणारी फुले पाहिल्यावर आलेली अनुभूती.

रायगडावर महालाच्या पायरीवर "महाराजांचे सेवेसी तत्पर, हिरोजी इंदुलकर" हे वाचल्यावर मनात आलेली आदराची भावना.

पुणे एयरपोर्टला वृद्ध भीमसेनजीना पाहिल्यावर पटकन उभा राहिलेलो मी. मनोहर जोशी होते त्यामुळे लवाजमा. मी उभा पण माझं डोकं पंडितजींच्या पायावरच.

औरंगाबादला पुल आले होते. ही गर्दी. शक्यच नव्हतं त्यांच्यापर्यंत पोहोचणं. माझ्यासारखे बरेच जण नजरेतुन नमस्कार करत होते आणि ते आशिर्वाद वर्षावत होते.

अपंगशाळेत कलाम सर आले होते. तुम्ही बघितलं कधी कलामांना निरखून. बालसुलभ निर्व्याजता दिसते त्यांच्या डोळ्यात आणि स्मितहास्यात. ते आमच्याकडे बघून हात हलवत होते अन मी उभ्याजागी नतमस्तक होत होतो.

देवदास मधील डोला रे आठवतं का. माधुरी आणि ऐश्वर्या. मुर्तीमंत सौंदर्य आणि त्या नाचातली उर्जा. थिजतो बुवा.

सीडीओ मेरी शाळेतील कोणतेही सर/बाई. कुठेही भेटू द्या हो. मेंदूला सिग्नल मिळतोच, "ए वाक लेका"

आईबाबा, त्यांना नमस्कार करायला तर सांगावं लागत नाही. पण काही आज्या, मावश्या, काका काकू, बहिणी यांचं प्रेम इतक्या जिव्हाळ्याचं असतं की ताठ कणा केव्हा वाकतो हे कळतही नाही. "भेटलास, फार बरं वाटलं" असं कुणी म्हणालं किंवा आजीचा खरखरता हात थरथरत गालावर फिरत "बस गो माय जेवायला" असं ती म्हणते तेव्हा अमूल्य आशिर्वाद गाठीला जमा होतात.

म्हणूनच म्हणतो जो घडतो तो नमस्कार अन जेव्हा तो जबरदस्तीने करावा लागतो तेव्हा फक्त पाठीला व्यायाम,  बस!

Wednesday, 11 February 2015

आप पक्षाचं अभिनंदन

आप पक्षाचं हार्दिक अभिनंदन. केजरीवाल यांचंही.
फेसबुकवर आपण विविध विषय बोलतो, मत प्रदर्शित करतो. कधी विरोध होतात. कुणी वैचारिक विरोध करतात. कुणी वैयक्तिक आघात करतात. हे सगळं असलं तरीही हि वरची चार शब्दांची ओळ फारच महाग झाली बुवा आज. म्हणजे काही मोजक्या पोस्ट सोडल्या तर अभिनंदन करायचं लोकांना सुचू नये हे म्हणजे फारच थोर. माझ्यासारखे कित्येक जण बीजेपी ला विरोध करतात, पण तो करताना ना आम्ही कुणाला फेकू म्हणत ना भक्त. (हे दोन शब्द पहिल्यांदा लिहिले असतील मी पोस्ट वर). पण जेव्हा जेव्हा मी आप ला पाठींबा देणारी पोस्ट लिहिली तेव्हा तेव्हा माझी अक्कल निघाली. अगदी " तू होपलेस माणूस आहेस" "तुझ्याकडून असली भंगार अपेक्षा नव्हती" "या माणसाला अजेंडा नाही आहे." वैगेरे. खरं तर विरोधाला विरोध न कधी जमला न कुणाचं आंधळं समर्थन केलं. जे चांगलं दिसलं ते शेयर केलं, जे चुकीचं दिसलं ते लिहिलं मनात आडपडदा न ठेवता. मग ते कॉंग्रेस असो, बीजेपी असो किंवा आप असो.
मोदींचा विजय झाला तेव्हाची मी लिहिलेली पोस्ट.
"अभूतपूर्व विजय. मोदींचं हार्दिक अभिनंदन. सगळ्यात मुख्य म्हणजे सार्या जगात coalition govt ची चलती असताना भारतात मात्र भाजप ला निर्भेळ बहुमत मिळणं हे त्या पक्षाला जितकं सुखावह आहे तितकंच जनतेसाठी महत्वाचं आहे. काॅंग्रेसच्या non decisive धोरणामुळे इतके दिवस अडलेली विकासाची गाडी आता पुढं सरकावी.
Btw आम आदमी पार्टीचा काही अतापता आहे का लापता झाली आहे. कंपनीत कामाच्या गडबडीत भिंग लावून शोधलं पण काही सापडतच नव्हतं.घरी tv पण नाही. आता शोधतो, चार लागल्या आहेत म्हणे. (बाकी ठिकाणी लागली आहे). आपली पार्टी होती हो, वाईट तर वाटणारंच." 16-05-2014
आणि निर्भय, अविनाश वीर, शरद पाटील, गजुदा, पोखरकर जे बीजेपी विरोधक म्हणून ज्ञात आहेत यांच्या १६ मे च्या पोस्ट पहिल्या तर त्याची भाषा अशीच असेल याबद्दल मला शंका नाही. पण असं निखळ अभिनंदन आप च्या विरोधकांनी केलं असं दिसलं नाही. उलट केजरीवाल समर्थकांची यथेच्छ टिंगल हा एक सार्वत्रिक विषय दिसला. खरं तर absolute majority आणि ती पण पूर्ण पणे लोकशाही मार्गाने. He deserves round of applause.
बघा बुवा तुम्हीच.
बाकी निवांत

Sunday, 8 February 2015

संभ्रमिष्ट


परवा माझे एक जवळचे मित्र म्हणाले  की या स्पिंडलवाल्याकडे काही अजेंडा नाही. बहुधा राजकीय विषयावरचा लिहायला विसरले ते. कारण माझ्या जगण्याचा अजेंडा स्पिंडलवाला या नावातच दडलेला आहे. स्पिंडल. हां, राजकीय मतावर अजेंडा नाही हे मात्र खरं बर का! तिथे म्हणजे फुल तो संभ्रमित. हो, म्हणजे का असू नये संभ्रमित.

 ज्या निधर्मीवादाची कास कॉंग्रेसने धरली त्याला सर्वधर्मसमभाव असं गोंडस च्युत्या नाव देऊन पुर्ण संकल्पनेला तिलांजली दिली. गेल्या दशकात मनमोहनसिंग सारखा मोहरा घराणेशाही पायी वाया घालवला. देशाची प्रगती हाडकवली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी. त्याचे सर्वेसर्वा एकेकाळी प्रोग्रेसिव्ह विचाराचे. पण साठी आली आणि पक्षाची बुद्धी नाठी झाली. अनिर्बंध भ्रष्टाचार केला. गुंडगिरी केली. या दोघांनी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली जातीपातीचे अन धर्माचे राजकारण केले. कटूता वाढवली.

त्यानंतर आला भाजप. हिंदूधर्माचे पुरस्कर्ते. मोदींचा उदय होण्यापूर्वी काय हास्यास्पद पद्धती त्यांची. मोदींनी ओळखलं की हे राममंदिर वैगेरे काही कामाचं नाही भो. त्यांनी स्वत: विकासाचा नारा दिला अन बाकीची मंडळी सोडली बडबड करायला. कामात Surgical precision असलेला संघ सरकारच्या आडून बाण सोडू लागले. शंकराचार्यांना अचानक वाचा फुटली. कुणी चार काढा बोललं तर कुणी दहा. विकासाचं वेष्टन गुंडाळलेल्या बाटलीत धर्मांधता ठासून भरलेली नाही आहे असा विश्वास देण्यात ते तरी अपयशी ठरले आहेत. खरंतर सर्व विकसित देश एकधर्मांकित आहेत हे वास्तव असलं तरी ते आपलं नाही ही मानसिकता या लोकांच्या मनात नाही आहे.  ज्या माथेफिरूने महात्म्याच्या केलेल्या  खुनामुळे कलंक लागला, राजकारणाची उलथापालथ झाली त्याचं स्मारक पुलाच्या रुपाने राजस्थानात उभं राहतंय हे कशाचं द्योतक आहे.

आणि राहता राहिला आप, ज्याचा उल्लेख केल्यामुळे माझा अजेंडा निघाला. Rise- fall- rise of Kejriwal. केवळ वर्षापूर्वी अपरिपक्वतेचं दर्शन करत स्वत:चं हसं करून घेतलेला आयआयटीयन. कँप्टन गोपीनाथपासून ते मेधा पाटकर पर्यंत ४२३ लोकांचं डिपॉझिट जप्त करवलेला, पाण्याची खोली दोन्ही पायाने चेक करण्याची महाचूक करत गंटांगाळ्या खाणारा. पण उभा राहिला सगळ्यांना टक्कर देत. महा संभ्रमित.

प्रश्न हा आहे कि कॉंग्रेस, बीजेपी सारख्या पक्षाचं आंधळं समर्थन किंवा विरोध करायचा  कि आप सारख्या पक्षाकडे आस लावून संभ्रमिष्ट व्हायचं. अवघड choice आहे. पण आप पक्षाची बांधणी ही भ्रष्टाचार हा शिष्टाचार  न मानणाऱ्या लोकांनी केली आहे हा एक भाग. जातीपातीपासून अजून तरी दूर आहे. बाकी राहिले संत, महंत, बाबा, धर्म, अधर्म हे आप च्या आजू बाजूलाही फिरकत नाही आहे. त्यांच्या झेंड्याला रंग नाही आहे, किंबहुना तिरंग्याशिवाय त्यांचा झेंडाच नाही आहे.

आप चं हे संभ्रमित स्टेटस च माझ्यासारख्या ला त्यांच्याकडे आकर्षित करत असावं.





ड्रायव्हर

लहानपणापासून मला कुठल्या गोष्टींचं जर आकर्षण वाटलं असेल तर ते ड्रायव्हिंगचं. मग वयानुरूप वेगवेगळी आकर्षणं येत गेली पण त्याचं आयुष्य काही वर्षं. पण कळत्या वयापासून ते आजपावेतो जर कुणी माझ्या मनावर कुणी गारूड केलं असेल तर ते ड्रायव्हिंगने. लहानपणी आमच्याकडे व्हेस्पा होती MHR 6295. मी समोर उभा रहायचो अन बाबा गियर टाकायचे. मला फारच गंमत वाटायची. एमएसईबी तल्या कारने प्रवास करण्याची चैन व्हायची. महिंद्रा ५४० डीपी नाहीतर अँम्बेसेडर. पुढे बसायला मिळालं तर त्याचा आनंद निव्वळ अवर्णनीय. कित्येकदा मी ड्रायव्हर सीटवर बसून गाडी चालवताना स्वत:ला imagine करायचो. आणि हळूच त्या गियरच्या बोंडक्यावर हात फिरवून घ्यायचो. अर्थात स्वप्नातील ग़ाडी एमएसईबीचीच. स्वत:ची गाडी आम्हाला स्वप्नातही परवडयाचं नाही.


पुढे मोठा झाल्यावर एस टी ने प्रवास करू लागलो. तेव्हा मला ड्रायव्हरच्या केबिनच्या मागच्या सीटवर जागा मिळाली तर कोण आनंद व्हायचा. तो वाकडा गियरचा दांडका जेव्हा चालक, चालक कुठला मालकच, टाकायचा तेव्हा मला खूप अप्रूप वाटायचं. त्यात जर ड्रायव्हर ने इंजिनचं बोनेट उघडं ठेवून बस चालवत निघाला तर इंजिनच्या धडधडीबरोबरंच माझं हृदय ही धडधड करायचं. टाटा अन लेलँडने वर्षानुवर्षे एकच बस मॉडेल थोपल्यावर दशकापूर्वी जेव्हा व्हॉल्वो मार्केटमधे  आली तेव्हा डिझाईन वैगेरेपेक्षा मला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं होतं त्या डँशबोर्डचं अन हे भलंमोठं धूड चालवणार्या ड्रायव्हरचंच.

पुढे माझा रेल्वे ने प्रवास होऊ लागला. सेकंड क्लास असू दे की AC डब्बा, गाडी प्लँटफॉर्मवर येताना ते इंजिनचं अजस्त्र धूड जेव्हा शिट्टी वाजवत स्टेशनात प्रवेश करतं, मला तर ललकारीच द्यावीशी वाटते "बाआदब, बा मुलाहिजा.....होशियार" आणि माझी नज़र invariably त्या इंजिनच्या आत दिसणार्या विविध गोष्टींकडे ओढ़ली जाते. त्यात तो बहुतेकदा डोक्याला रूमाल बांधलेला इंजिन ड्रायव्हर, छे बादशहाच तो, मी त्याला मनोमन कुर्निसात करतो. कधीकाळी इंजिनच्या जवळ डब्बा आलाच तर वडापाव खाण्याच्या निमित्ताने त्या अगडबंब मशीनचं दर्शन घेऊनच येतो.

कामाच्या निमित्ताने शेकडो विमान प्रवास झाले. पुर्वी इकॉनॉमी क्लास अन पायलट केबिनच्या मधे फर्स्ट क्लास असायचा. पण आता नो फ्रील विमानात आपली एंट्री होतानाच डावीकडे पायलट केबिन दिसतेच. कधी काळी चुकून त्या केबिनचा दरवाजा किलकिला उघडा राहिला तर त्या वेलकम ऑन बोर्ड म्हणणार्या सुंदरीकडे बघून हृद्य धडधडण्यापेक्षा त्या केबिनकडे बघूनच मी खुश होतो. तीच अनूभूती मी  ATR मधे हवाई सेविका रिफ्रेशमेंट सर्व्ह करायला केबिनचा दरवाजा उघडते तेव्हाही घेतो. सहसा मी पुरूषांकडे वाईट नजरेने बघत नाही, पण कडक इस्त्रीचे कपडे घातलेले अन दाढी घोटलेले पायलट बघितले की मनात असूयामिश्रित आदर वाटतो. त्यातल्या त्यात बाजूला air hostess चालत असतील तर थोडं असूयेचं प्रमाण जास्त असतं ती गोष्ट वेगळी. आधुनिक जगातल्या या इंजिनियरिंग मार्व्हेल ला उडवणारे हे पायलट माझ्या लेखी गंधर्वच जणू.

मधे माझ्या एका मित्राने ऑडी घेतली. ती चालवली, तेव्हा तिच्या पिकअप ने अंगात शी गोड शिरशिरी उमटवली त्याची तुलना.......तुम्हाला माहिती आहे ते. तसंच कंपनीत एकाने २०० सीसी ची मोटरसायकल, अहो बाईक म्हणा, गावठी कुठले. तर ती बाईक चालवायला दिली. साला ०-६०, ६ सेकंदात. उगाचच मला १० वर्षाने तरूण झाल्यासारखं वाटलं.

शप्पथ सांगतो या मार्केटिंग जॉबमुळे सिटीत गाडी चालवून थोडा का होईना कंटाळा आला, पण परवाच वैभवीला बोललो, की जर ऑफ़ीस जॉब असला असता तर एकदा तरी कारने काश्मिर-कन्याकुमारी ट्रीप मारलीच असती. आजकाल सारथी असतो कारवर, पण लंबी ट्रीप असेल तर १०० एक किमी च्या टप्प्यात मी स्टिअरिंगवर हात साफ करूनच घेतो.

या ड्रायव्हिंगचं वेड माझं इतकं पराकोटीचं आहे, की एखादी मर्क किंवा BMW जवळून गेली तर त्या गाडीचं मालक असण्याचा महत्वाकांक्षी विचार येण्याऐवजी, तिचे आपण ड्रायव्हर होऊ शकू का हाच विचार मनात तरळतो. (तुझी लायकी तीच लेका, असा विचार कुणाच्या मनात आला असेल, तर सांगून ठेवतो..............तो बरोबर आहे).

फिरता फिरता ही सफ़र घडवणार्या या ड्रायव्हिंगच्या कलेला अन या ड्रायव्हर्स जमातीला माझा मानाचा मुजरा. 

Friday, 6 February 2015

बर्थ स्वँपींग

इतके दिवस मला डाऊट होता आज खात्रीच पटली. रेल्वेकडे बहुधा माझ्यासारख्या लोकांचा डेटाबेस तयार आहे की ज्यांना बर्थ/सीट exchange करायची विनंती केली असता तात्काळ मान्य होते. माझ्या २० वर्षाच्या सेल्सच्या करियरमधे शेकडो रेल्वे प्रवासात अशी विनंती कितीदा मी स्वीकारली याची गणतीच नाही.

एकदा मी अहमदाबादला चाललो होतो, मुंबईहून. सकाळी ६.२५ ची शताब्दी. C9 की C 10 मधे सीट होती. गेलो तेव्हा साधारण ४५ ची म्हातारी बसली होती. हो, तेव्हा मी २८ चा. बसली होती निवांत. मी विचार केला सहा सात तासाचा प्रवास. नाही बस, तितकाच विचार केला. तर असा बसून सेटल होतोय, इतक्यात तिचे यजमान आले. US return असावेत. मला अत्यंतलोचटपणे म्हणाले "she is my wife. Would you mind to exchange......... मी अविश्वासाने बोललो "what?" तर त्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला my seat. मी बोललो " ok, what is your seat no?" "35" मी वळलो तर तो गुज्जु बोलला "बोगी नं C 2" आयची कटकट. C9 मधून C2. तर म्हणतो कसा "I will help to get your bag there" मी म्हणालो "राहू दे" गेलो तणतणत. (आता कळलं ना ४५ वालीला म्हातारी का संबोधले ते). नशीब बोलला नाही "जरा इंजिनमधे बसुन या ना!"

मधे दिल्लीहून येत होतो. ४-५ बायका आपल्या चिल्ल्यापिल्ल्यां सोबत. १२-१३ बर्थ होते त्यांचे. त्या ग्रूपमधल्या एका बाईने बर्थ exchange मधे इतका गोंधळ घातला होता की तो निस्तरताना असं वाटलं टीसी आता काळा कोट खुंटीला लावून "ऐ, वडा पाव" करत ओरडत फिरेल. एक वेळ तर मला अशी शंकाही आली की ही माझ्या गळ्यात हात घालून म्हणेल (कल्पना करायला काय हरकत आहे) " भाईसाब, आज आप राजधानी छोड़कर बससे क्यूँ नहीं जाते, मुंबई?"

हे आठवायचं कारण म्हणजे आता आहे पुणे-इंदोर ट्रेन मधे. बर्याच दिवसाने ट्रेनचा प्रवास. (Now a days I normally fly, you know. च्यामारी होऊ दे खर्च). सेकंड एसी. बर्थ ३६, साईड अप्पर. बाजूला एक म्हातारा गृहस्थ. संवाद बघा.

"भाईसाब, आप ये सामने का ३४ नंबर बर्थ लेंगे" मला आनंद झाला, हे मेन बर्थ जरा सोयीस्कर असतात.

मी: "क्यूँ exchange करना है" तर स्टोरी अशी होती. त्या म्हातार्याच्या मुलाचं आणि सुनेचं reservation होतं ३४-३५ नंबर. कालंच लग्न झालं होतं. गोध्राला निघालं. बाकी बिर्हाड सेकंड क्लासमधे. मी म्हणालो "दिवसभर बसू देत की गप्पा मारत. समोरच आहे दुसरा बर्थ. झोपतील मग" लोकं पण काय बोलतील सांगता येत नाही. गृहस्थ म्हणाले "ये पडदे क्यु लगाते है रेल्वेवाले, समझ मे नही आता" नाही, म्हणजे मी धडधाकट आहे, पण ते दोन बर्थमधे अडीच फूटाचं अंतर असतं हे काका का विसरत होते ते काही कळत नव्हतं. पुढं जाऊन ते जे बोलले ते भीषण होतं. "साब, नया शादी हुआ है. नयी बहु नीचे, आप उपर. अच्छा नहीं लगता" नशीब त्याचं पोरगं नव्हतं बाजूला. कपाळ बडवलं असतं त्याने. मी म्हणालो "अंकल, आप जाइये, और जिनका बर्थ है उन्हे भेज दिजीये"

मी नेहमीप्रमाणे exchange केलेल्या ३४ नंबर बर्थवर पडून ही पोस्ट लिहीत आहे. अन त्या दोघांना ३५-३६ मधील अडीच फूटाचं अंतर दूर करून एकबेड रूम बनवली आहे. अर्थात ते नैसर्गिकच आहे म्हणा.

मला प्रश्न पडला आहे अंकलला ते काय बकले हे कळलं का अन कळलं असेल तर गालावर फाडफाड मारून घेत असतील बिचारे!

Make in India

आज भारतासमोर खरं आव्हान आहे ते ९-१०% ने GDP ची वाढ करायची, अन ती कुठपर्यंत? तर लोकसंख्येचा मोठा भाग हा दारिद्र्यरेषेच्या वर येईपर्यंत. नाही म्हणायला आपली घोडदौड चालू आहे पण ४-५ वर्ष, नंतर आनंद आहे. त्यामुळे हि ग्रोथ सतत दोन-तीन  दशकं करणं हेच गरजेचं आहे. आणि ते खरं आव्हान आहे. आणि ते आ वासून समोर तेव्हा आहे जेव्हा जवळपास ७० कोटी लोकांचे  पुढील ३०-४० वर्षात शहरीकरण होणार आहे. हो हो तेच शहरीकरण, नागरीकरण हे अटळ आहे. आणि हे होत आहे ते डेमोग्राफिक transition, जे देशाच्या इतिहासात दुर्मिळ होय. असं म्हणतात कि भारताची तरुण लोकसंख्या हि २०४० पर्यंत अजून तरुणच होणार आहे. त्याचवेळेस पाश्चात्य देशांत वृद्धांची वाढ होणार. आणि हे डेमोग्राफिक transition च सामाजिक बदलला कारणीभूत ठरणार आहे.

यात कळीचा मुद्दा हा कि हे सगळं घडण्यासाठी manufacturing सेक्टर चा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्विस इंडस्ट्रीचा  GDP मध्ये ५५% सहभाग आहे. त्याच वेळेला manufacturing चा मात्र फक्त १६%. आणि हि १६% इंडस्ट्री फक्त १२% employment देते. जो पर्यंत manufacturing इंडस्ट्री २५% पर्यंत जात नाही आणि अजून १० कोटी लोकांना जॉब्स देत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होणार हे फक्त स्वप्नच राहणार आहे. शेती आणि सर्विस इंडस्ट्री हि महत्वाची आहेच, पण manufacturing मध्ये जी supply चेन आहे त्यामुळे तिथे मल्टीफोल्ड ग्रोथ शक्य आहे. त्यामुळे manufacturing सेक्टर ला आता बाह्या सरसावून कामाला लागणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही आजचा कुठलाही प्रगत देश घ्या, हवं तर फक्त आशिया घ्या, पण जपान, कोरिया, चायना ह्या सगळ्यांच्या आजच्या आर्थिक संपन्नतेच कारण manufacturing आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि हे नक्कीच शक्य आहे कारण भारताजवळ उत्पादनक्षम होण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत.

इतकी वर्ष आपण सर्वच गोष्टी आयात करत आहोत अन त्यामुळे आपलं import bill अफाट आहे. इतकं की इथे development च्या गोष्टी केल्या की तिजोरीचा खडखडाट वाजतो. त्यामुळे ८-९ % GDP growth ही wish list नसून गरज आहे. Manufacturing सेक्टर ची वृद्धी करणे, त्या सेक्टरला लागणारं स्किल्ड मनुष्यबळ उभे करणे आणि मग त्यातून एकमेकांना पूरक employment generation करणे आणि ह्या सगळ्या प्रेसेसमधून economic development करणे अशी साखळी आहे. त्यात मग शहरीकरण अपरिहार्य आहे. जगात हे घडत आलं आहे. चीन मला देश म्हणून आवडत नाही पण त्यांच्या तथाकथित सक्सेसचा विचार केला तर असंच घडलं आहे. १९७५ पासून तिथे प्रचंड नागरीकरण झालं आहे अन ते होताना जवळपास ८० कोटी लोकांना त्यांनी दारिद्र्यरेषेच्या वर खेचलं आहे.

त्यामुळे हे जे Make in India प्रकरण चालू झालं आहे त्याला across spectrum लोकांनी अंगीकारलं पाहिजे. भारत देश हा जॉब seeker न राहता जॉब creator म्हणून उदयास यावा. Design, innovation आणि सगळ्यात मुख्य म्हणजे frugal engineering, जी भारताची strength आहे, तिच्या मदतीने manufacturing sector ची exponential growth होऊ शकते. आणि मागे एकदा लिहील्याप्रमाणे, ग्लोबल स्टँडर्ड जर अंगिकारले तर competitive manufacturing मुळे आपण आंतरराष्ट्रीय सप्लाय चेनचा नक्कीच भाग होऊ शकतो.

या सगळ्या प्रकारात जर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शहरीकरणाचं, urbanization. पण solid waste management, recycling, मग ते पाण्याचं असो,पेपरचं असो किंवा अजून कुठलं पण त्याचा कल्पकतेने वापर करून शहराचा चेहरा बदलणे अन नवीन जन्माला येणार्या शहरांचं नियोजन करणे यावर देशाची पत अवलंबून आहे.

२२-२८ जानेवारीला Imtex होतं बंगलोरला. देश विदेशातून लाखाच्यावर लोकं आले होते. भरपूर लोकांशी बोललो अन त्याच काळात एक इंग्रजी लेख वाचला याच विषयावर. त्या लेखांचा बराच भाग आहे इथे. मधे पण शहरीकरण/नागरीकरण यावर लिहीलं तेव्हा बरीच टीका झाली होती. पण हे अपरिहार्य आहे.

उर्जा तर इथे ठासून भरली आहे, तिचा योग्य वापर करण्याचा उत्साह exhibition मधे दिसला. आणि जगाच्या नजरेत इथे काही घडणार हा आशावाद ही दिसला.



Tuesday, 3 February 2015

फिरता फिरता

खरंतर एक डिप्लोमा सोडला, तर माझ्या आयुष्यातील पुढची प्रत्येक गोष्ट अपघातानेच झाली आहे. बी ई होणं, मग एसकेएफ ची नोकरी, धंद्यात पडणं. त्या न्यायाने सामनाचा स्तंभलेखक ही अपघातानेच झालो. तन्वीरभाई ने ब्लॉग वाचणे आणि प्रसाद पोतदारांना कळवणे, मग फोन आणि मग केले सात महिने शनिवारी लेख. निव्वळ स्वप्नातीत. कारण लौकिकार्थाने मी काही लेखक नाही. किंबहुना दोन वर्षापूर्वी जर कुणी मला म्हणाला असता की २०१४ साली तुझे लेख पेपरमधे छापून येणार आहेत, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. एका मुंबईवारीत अनाहूत पणे मी एक लेख लिहीतो काय, आणि मग तो सिलसिला चालू झाला. सुदैवाने प्रसादसरांना ते छापण्यायोग्य वाटले हे नशीब. कारण त्या लिहीण्याचं साहित्यिकमूल्य काय याबद्दल मी साशंक होतो, आणि होतो का, आजही आहे.

मला बरेच जणं विचारतात की तु का लिहीतोस? (का आमच्या डोक्याला ताप देतोस). तुला प्रसिद्ध व्हायचं का, असाही प्रश्न आला. तर नाही मित्रांनो, मला प्रसिद्ध करायला माझा धंदा पुरेसा आहे. माझ्या कंपनीचं नाव भारतात काना कोपर्यात पोहोचलं आहे. आत्मप्रौढी वाटेल, पण जगात पोहोचलं आहे अन पर्यायाने त्यामुळे माझंही. पण मग हा बिझीनेस करताना येणारे ताणतणाव, यातून सुटका तर व्हायला पाहिजे. सगळे प्रयत्न केले. स्विमींग, वाचन, ट्रेकिंग, कविता पाठ करणे, चित्रपट पहाणे, इत्यादि. त्या विचारांने रात्रभर तळमळायचो. मानसिक त्रास व्हायचा अन काय काय. पण कंपनीतले प्रॉब्लेम्स मला विसरायला लावले ते या ब्लॉग लिहीण्याच्या सवयीने. आणि या ब्लॉग ला मोठा कँनव्हास दिला सामनाने. एक सुहृद तर मला म्हणालेही "या लिखाणावर तुमचा प्रपंच चालत नाही" रूढार्थाने चालत नसेलही तो. पण जर लिहीणं ही सवय जर मला माझ्या भौतिक जगापासून दुर नेऊन आत्मिक समाधान देत असेल तर माझा प्रपंच चालवण्यात ते मदत करतं असं मला वाटतं.

आणि दुसरं असं की बिझीनेसमधे पडलेली आमच्या कुटुंबाची पहिली जनरेशन. अगदी खिशात काही पैसे नसताना धंदा चालू केला. यात काही फार कौतुक नाही. बर्याच बिझीनेस ची मूहुर्तमेढ अशीच होते. पण जी नवीन मंडळी बिझीनेस मधे जाऊ इच्छितात, त्यांच्या हे लक्षात येईल की ही एकदम नॉर्मल प्रोसेस आहे अन त्यामुळे पैसे नाहीत म्हणून धंद्यात पडायचं नाही किंवा प्रॉब्लेम आले तर धंदाच बंद करायचा असं करू नये अशी एक प्रामाणिक इच्छा होती. आणि हो, मागे एका लेखात लिहील्याप्रमाणे नोकरी करणार्या लोकांबद्दलही माझ्या मनात अतीव आदर आहे. माणसाची उद्यमशीलता ही नोकरीतही क़ायम राहू शकते आणि त्यातूनही अचाट कर्तृत्व घडतात यावर माझा दृढ़ विश्वास आहे.

हे माझे जे काही तुटकेफुटके अनुभव आहेत, त्यामुळे एखाद्याला उमेद मिळत असेल तर त्याच्या इतका आनंदाचा क्षण दुसरा नाही. वानगीदाखल एक मेसेज देतो

 " मी लहानसा software व्यावसायिक आहे. गेल्या दहा वर्षात प्रचंड चढ उतार अनुभवलेत . रू ८ कोटी वार्षिक उलाढाल पर्यंत पोहचून परत प्रचंड  अपयश हि पाहतोय. अनेक professional motivation आणि managment सेमीनार्स ,पुस्तके , चिंतन , psychiatrist  सगळे झाले. पण तुमच्या साध्या सरळ अनुभव सिध्द लिखाणाने जितक बळ मिळालं तितक कशानेच नाही मिळाल ! धन्यवाद ! नाही तर शेतकरया सारखी उद्योकाकाची आत्महत्या का असू  नये ..असे  विचार भुंगा करीत डोके कुरतडत असतात. अर्थातच मी इतका दुर्बल नाहीच !पण थकतो हे मात्र खर !
कुठल्याही व्यावसायिक ,अथवा आर्थिक लालसे शिवाय एकदा तुम्हाला भेटुन  , बोलून स्वतः ला अधिक channelised करता येईल असे वाटतंय. कारण आज सर्वाधिक गरज आहे ती एका freind, philosopher आणि guide ची . आपण थोडा वेळ दिलात तर आनंद होईल. धन्यवाद !"

आता थांबतो. कोणताही निरोप घेताना मी कातर होतो, तसाच आताही झालो आहे. अनेक अनुभव तुमच्याबरोबर शेयर केले, तुम्हाला आवडले. मजा आली. कुणीतरी ढकललं म्हणून यात पडलो. आता परत काठाने चालत राहिल. कुणी सांगावं, परत कुणी तन्वीरभाई येईल, प्रसाद येईल अन ढकलेलही पुन्हा एकदा भेटण्यासाठी............फिरता फिरता

Monday, 2 February 2015

रूबिक क्युब

हे प्रकरण आलं होतं कधीतरी दहावीला असताना. खुप प्रयत्न करायचो. पण एक साईड यायची. कधी मटका लागला तर दोन. बास. त्यापुढे नाही. पुस्तकं आली. ती वाचून प्रयत्न करायचो. पण शेवटपर्यंत जमलं नाही. मी नाद सोडला रूबिक क्युबचा मग. काळाच्या ओघात विसरलो होतो. मग वर्षापूर्वी रूबिकची परत घरात एंट्री झाली. यशने आणलं. इंजिनियरिंगचं पोरगं. Techsavy. शोधलं त्याने इंटरनेटवर फुल्ल रूबिक क्युब कसा मारायचा ते. मला जे कधीच जमलं नाही ते पोराने करून दाखवलं. माझ्याच पोराबद्दल मला असूया वाटली. (मी बाबांबरोबर कँरम किंवा पत्त्यात जिंकलो की दोन एक तास उगाच घरात चिडचिड करायचे). मी यशला बोललो, "मला शिकव ना रूबिक क्युब" तो हो म्हणायचा पण वेळ टाळून न्यायचा.

हळहळू मी परत नाद सोडला. नंतर कधीतरी लहान मुलगा नीलच्या हातात ते पडलं. मग तो पण प्रयत्न करू लागला. दोन तर कधी तीन साईड तो कुणाच्या मदतीशिवाय करू लागला. तो पण यशच्या मागे लागायचा "दादू, शिकव ना मला प्लीज" दादू कॉलेजमधे नाहीतर बिल्डींगच्या पोराममधे बिझी.  शेवटी नील माझ्याकडे आला अन म्हणाला "मला तुम्ही शिकवा" आता आली का पंचाईत. मी बोललो "इंटरनेटवर ट्राय मारू" एक चांगला व्हिडीओ सापडला. नीलचं नॉलेज तसं चांगलं होतं रूबिक क्युब बद्दल. व्हिडीओच्या स्टेप्स चांगल्या समजायच्या त्याला. मला नाही कळायच्या. एक संध्याकाळ ट्राय झाला, जमलं नाही पण नीलच्या बोलण्यातून कळायचं की त्याला जमतय. 

दुसर्या दिवशी संध्याकाळी मी नीलला परत व्हिडीयो लावून दिला. काही स्टेप्स मला कळल्या असं दाखवून त्याला "असं कर, तसं कर" सांगितलं. त्याला वाटायचं मीच शिकवतो म्हणून. सात वाजता मला पार्टीला जायचं होतं. नील खिळून बसला होता. मनात आलं, पोराबरोबर थांबावं. भौतिक मनाचा विजय झाला. मी पार्टीला गेलो. 

रात्री साडेदहाला आलो. तर नीलने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यावर झोप तरळत होती. तशा अवस्थेत त्याने माझ्या अंगावर झेप घेतली, आणि पोटात शिरून म्हणाला "thank you पप्पा, तुम्ही मला रुबिक क्यूब शिकवलात" एका हातात पूर्ण झालेला रुबिक क्यूब. खोटं श्रेय घेताना मला खूप मजा आली. 

गेले पंधरा दिवसापासून नील माझ्या मागे लागला आहे. तुम्ही पण रुबिक क्युब शिका म्हणून. तो बिचारा मला स्टेप्स समजावून सांगतो, पण मलाच काही कळत नाही. परवा तो शिकवत असताना यश पण दुसरा क्युब जमवत होता. मी यशला बोललो "दादू बघ, नील कसा शांतपणे शिकवतो आहे मला. तू तर मला टांग मारलीस." तर नील म्हणाला "पप्पा, दादुला काय बोलता. मी कसं शिकवतो ते तुम्हीच बघा. तुमच्यासारखं रागवत नाही आहे मी, तुम्हाला काही येत नाही आहे तरी." 

दोघं पोरं एकमेकांना टाळ्या देत खुदुखुदु हसले. 

आणि मी विचार केला कि रुबिक क्युब जमत नाही ते ठीक आहे पण बाप म्हणून तरी जमतंय का काही हा विचार करत पडून राहिलो……… ढिम्म
 

कुंदा मावशी

दोन आठवडयापूर्वी औरंगाबाद ला गेलो होतो, एका वृद्धाश्रमात. देणगी द्यायची होती आणि मावशीला भेटायचं होतं मला. तसं मी यापूर्वी वृद्धाश्रमात गेलो होतो पण ते फक्त देणगीच द्यायला. कोणत्या नातेवाईकांना भेटायची हि माझी पहिलीच वेळ. सख्खी मावशी. कुंदा मुन्शी.

एखाद्याला एकाच आयुष्यात किती दुःखाचे भोग पाहायला मिळावेत, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुंदा मावशी. दिसायला नीटस. किंबहुना चार बहिणीमध्ये जरा उजवीच. परत शेंडेफळ. साठीच्या दशकात कधीतरी हैदराबाद च्या नाथराव मुन्शी या गृहस्थाच स्थळ आलं. असं म्हणतात कि ते त्या काळी फारच गडगंज श्रीमंत होते. मला मात्र तो माणूस कधीच पटला नाही. लहान असताना ऐकीव माहिती पडायची कानावर, कि मावशीला सासरचा कसा जाच आहे ते. तेव्हाच कधीतरी असंही ऐकलं कि काही कारणामुळे त्यांनी मावशीला कानाखाली मारली आणि ती इतकी जोरात होती कि मावशी बहिरी झाली. तरुण वयात. माझ्या मनात मुन्शी या गृहस्थाबद्दल विलक्षण तिडीक बसली.  इतकी कि ते गेल्यावर, माझ्या डोळ्यात पाण्याचं टिपूस म्हणून आलं नाही.

दिवस सरत गेले. मुन्शी कुटुंबाची धूळधाण कानावरती पडत होती. पण माझं वय लहान, समज कमी. मुख्य म्हणजे ते हैदराबाद ला, आम्ही पुण्याला. मी SKF ला असताना मुन्शी कधीतरी भेटले अन म्हणाले आपल्याला बेअरिंग बनवायचा प्लांट टाकायचा आहे. ५ कोटी उभे करू शकतो. मला माहित होतं मुन्शिंच्या खिशात ५०० रु नाही आहेत. कुठल्या तरी बुवाच्या नादी लागून सगळी संपत्ती घालवली होती आणि एके काळी ऐसपैस घर असलेले माझी मावशी अन काका रस्त्यावर आले असावेत.

काळाची चक्र फिरत गेली. परभणीच्या मुक्ताजीन नावाच्या संस्थानाची लक्ष्मी असलेली माझी आजी लक्ष्मीबाई हिच्यापण दुर्दैवाचे फेरे चालू झाले. पहिले आजोबा गेले ८८-८९ साली. मग मामा गेला ९१-९२ मधे. जिथे एकेकाळी २५ जणांचा स्वयंपाक व्हायचा तिथे माझी आजी एकटी जेवू लागली. लिहीतानाही गलबलतोय. एक मधु मामा, आईंचा चुलत भाऊ, होता. अट्टल दारूड्या ही त्याची सर्वसाधारण जगाला ओळख, पण तोच आजीला आधार. तो सुद्धा गेला. मुक्ता जीनच्या मालकाने ती जागा समदला विकली. (आज परभणी बस स्टँडच्या शेजारी जी खंडहर उभी आहेत तिथला एकेकाळचा थाट वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत)

आजीचं वय ८०. काळजी घेणारं कुणी नाही. काही महिने आमच्याकडे होती, पुण्याला. ह्या मोठ्या लोकांचं काही कळत नाही. मी बोलायचो आईला की राहू दे आजीला आपल्याकडे, पण बहिणीत काय गुळपीट चालायचं मला कळायचं नाही. मग एक दिवशी कळलं की आजीला हैद्राबादला मुन्शींकडे ठेवायचं. या काळात नाथराव मुन्शी चांगले वागायला लागले होते. जुन्या पापांचं प्रायश्चित बहुधा घेऊन पुण्य गोळा करत असावेत. काहीही असो, पण आजीला आमच्या कुटुंबानेच आधार द्यायला हवा होता असं आजही मला वाटतं.

आजीच्या शेवटच्या काळात मी गेलो होतो हैद्राबादला मुन्शींच्या घरी. हं, घर कुठलं, कबाड़ख़ाना होता तो. बाहेर कसला तरी स्क्रँपचा उद्योग आणि इनमिन दोन रूम. बाहेर च्या खोलीत मुटकुळं होऊन पडलेली आजी, अतिशय गचाळ असं घर. आजी तब्येतीपेक्षा मी ती परिस्थिती बघून बाहेर जाऊन मनसोक्त रडून आलो. पण bed ridden व्यक्तिला करायचे सगळे सोपस्कार कुंदा मावशी करायची. शेवटची दोन एक वर्षे आजीला, कुंदा मावशी अन काकांनी सांभाळलं. शेवटी आजी गेली, जराजर्जर होऊन गेली. जर मुन्शीकाकांबद्दल थोडा आदर असेल तर तो या काळामुळे.

मग मधे मुन्शीही गेले, अचानक. मावशी परत एकटी. आजीचीच स्टोरी जणू परत. मुलबाळ नाही. सासरच्या नातेवाईकांशी संबंध नाही. परत तीच परवड. काही महिने आमच्याकडे, कधी औरंगाबादला दुसर्या मावशीकडे. एक नणंद होती. तिच्याकडे रहायची. वर्षभरात भावापाठोपाठ तीही गेली. शेवटी आमच्या आईने हिय्या केला आणि मावशीला सांगितलं "तु सरळ वृद्धाश्रमात रहा आणि स्वत:ची तगमग थांबव." आणि मग मुक्तीसोपान न्यासात तिची रवानगी झाली. (कसं तरीच वाटतंय ना तुरूंगात रवानगी झाली, लिहील्यासारखं).

तिथेच भेटलो मावशीला. देणगी दिल्यावर करंदीकर बाई बोलल्या "तुमची मावशी म्हणजे सोशिकतेचा पुतळा आहे. बाकी सगळे आजी आजोबा विक्षिप्त हो. पण जर मला कुणाची मदत होत असेल तर कुंदाताईंची. अगदी स्वयंपाकाची बाई आली नाही तर कुंदाताई उभी राहते आणि बाकींच्याच्या मदतीने स्वयंपाक करून टाकते. इतक्या सोन्यासारख्या बाईच्या आयुष्यात असे दुर्दैवी भोग यावेत तेव्हा विधात्याला म्हणावं तरी काय." कानाचं मशीन नव्हतं त्यामुळे मावशीला काही कळत नव्हतं. बरंच होतं ते. मी आवंढा गिळत, हुंदका तोंडाबाहेर न येण्याचा मस्त अभिनय केला. मी तसा भिडस्त. म्हणजे अगदी बहिणी, मावश्या, काकू यांना मिठी वैगेरे मारत नाही कधी. आकसतो. पहिल्यांदाच वाटलं की मावशीला मिठी मारावी अन म्हणावं "किती सोसलंस गं तु आयुष्यात."

मला लाख वाटतं की मी मावशीला घरी आणावं, पण मी घरी आणणार अन गावभर उंडारणार. बाकीचे कसं घेतील हे सगळं म्हणून गप्प बसलोय. पण cheque philanthropy आहे. त्या फ्रंटवर तरी काही कमी पडणार नाही याची शप्पथ घेतोय.

ते बँक नाही का सालं ज्याला लोनची गरज नाही त्याच्या मागे लागते पैसे घ्या म्हणून. मी सुद्धा म्हातार्यांना जो पर्यंत आपली गरज नाही तोपर्यंत जवळ ठेवतो. जेव्हा दिसतं की त्यांना आपली गरज आहे तेव्हा वृद्धाश्रम.