Sunday 8 February 2015

ड्रायव्हर

लहानपणापासून मला कुठल्या गोष्टींचं जर आकर्षण वाटलं असेल तर ते ड्रायव्हिंगचं. मग वयानुरूप वेगवेगळी आकर्षणं येत गेली पण त्याचं आयुष्य काही वर्षं. पण कळत्या वयापासून ते आजपावेतो जर कुणी माझ्या मनावर कुणी गारूड केलं असेल तर ते ड्रायव्हिंगने. लहानपणी आमच्याकडे व्हेस्पा होती MHR 6295. मी समोर उभा रहायचो अन बाबा गियर टाकायचे. मला फारच गंमत वाटायची. एमएसईबी तल्या कारने प्रवास करण्याची चैन व्हायची. महिंद्रा ५४० डीपी नाहीतर अँम्बेसेडर. पुढे बसायला मिळालं तर त्याचा आनंद निव्वळ अवर्णनीय. कित्येकदा मी ड्रायव्हर सीटवर बसून गाडी चालवताना स्वत:ला imagine करायचो. आणि हळूच त्या गियरच्या बोंडक्यावर हात फिरवून घ्यायचो. अर्थात स्वप्नातील ग़ाडी एमएसईबीचीच. स्वत:ची गाडी आम्हाला स्वप्नातही परवडयाचं नाही.


पुढे मोठा झाल्यावर एस टी ने प्रवास करू लागलो. तेव्हा मला ड्रायव्हरच्या केबिनच्या मागच्या सीटवर जागा मिळाली तर कोण आनंद व्हायचा. तो वाकडा गियरचा दांडका जेव्हा चालक, चालक कुठला मालकच, टाकायचा तेव्हा मला खूप अप्रूप वाटायचं. त्यात जर ड्रायव्हर ने इंजिनचं बोनेट उघडं ठेवून बस चालवत निघाला तर इंजिनच्या धडधडीबरोबरंच माझं हृदय ही धडधड करायचं. टाटा अन लेलँडने वर्षानुवर्षे एकच बस मॉडेल थोपल्यावर दशकापूर्वी जेव्हा व्हॉल्वो मार्केटमधे  आली तेव्हा डिझाईन वैगेरेपेक्षा मला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं होतं त्या डँशबोर्डचं अन हे भलंमोठं धूड चालवणार्या ड्रायव्हरचंच.

पुढे माझा रेल्वे ने प्रवास होऊ लागला. सेकंड क्लास असू दे की AC डब्बा, गाडी प्लँटफॉर्मवर येताना ते इंजिनचं अजस्त्र धूड जेव्हा शिट्टी वाजवत स्टेशनात प्रवेश करतं, मला तर ललकारीच द्यावीशी वाटते "बाआदब, बा मुलाहिजा.....होशियार" आणि माझी नज़र invariably त्या इंजिनच्या आत दिसणार्या विविध गोष्टींकडे ओढ़ली जाते. त्यात तो बहुतेकदा डोक्याला रूमाल बांधलेला इंजिन ड्रायव्हर, छे बादशहाच तो, मी त्याला मनोमन कुर्निसात करतो. कधीकाळी इंजिनच्या जवळ डब्बा आलाच तर वडापाव खाण्याच्या निमित्ताने त्या अगडबंब मशीनचं दर्शन घेऊनच येतो.

कामाच्या निमित्ताने शेकडो विमान प्रवास झाले. पुर्वी इकॉनॉमी क्लास अन पायलट केबिनच्या मधे फर्स्ट क्लास असायचा. पण आता नो फ्रील विमानात आपली एंट्री होतानाच डावीकडे पायलट केबिन दिसतेच. कधी काळी चुकून त्या केबिनचा दरवाजा किलकिला उघडा राहिला तर त्या वेलकम ऑन बोर्ड म्हणणार्या सुंदरीकडे बघून हृद्य धडधडण्यापेक्षा त्या केबिनकडे बघूनच मी खुश होतो. तीच अनूभूती मी  ATR मधे हवाई सेविका रिफ्रेशमेंट सर्व्ह करायला केबिनचा दरवाजा उघडते तेव्हाही घेतो. सहसा मी पुरूषांकडे वाईट नजरेने बघत नाही, पण कडक इस्त्रीचे कपडे घातलेले अन दाढी घोटलेले पायलट बघितले की मनात असूयामिश्रित आदर वाटतो. त्यातल्या त्यात बाजूला air hostess चालत असतील तर थोडं असूयेचं प्रमाण जास्त असतं ती गोष्ट वेगळी. आधुनिक जगातल्या या इंजिनियरिंग मार्व्हेल ला उडवणारे हे पायलट माझ्या लेखी गंधर्वच जणू.

मधे माझ्या एका मित्राने ऑडी घेतली. ती चालवली, तेव्हा तिच्या पिकअप ने अंगात शी गोड शिरशिरी उमटवली त्याची तुलना.......तुम्हाला माहिती आहे ते. तसंच कंपनीत एकाने २०० सीसी ची मोटरसायकल, अहो बाईक म्हणा, गावठी कुठले. तर ती बाईक चालवायला दिली. साला ०-६०, ६ सेकंदात. उगाचच मला १० वर्षाने तरूण झाल्यासारखं वाटलं.

शप्पथ सांगतो या मार्केटिंग जॉबमुळे सिटीत गाडी चालवून थोडा का होईना कंटाळा आला, पण परवाच वैभवीला बोललो, की जर ऑफ़ीस जॉब असला असता तर एकदा तरी कारने काश्मिर-कन्याकुमारी ट्रीप मारलीच असती. आजकाल सारथी असतो कारवर, पण लंबी ट्रीप असेल तर १०० एक किमी च्या टप्प्यात मी स्टिअरिंगवर हात साफ करूनच घेतो.

या ड्रायव्हिंगचं वेड माझं इतकं पराकोटीचं आहे, की एखादी मर्क किंवा BMW जवळून गेली तर त्या गाडीचं मालक असण्याचा महत्वाकांक्षी विचार येण्याऐवजी, तिचे आपण ड्रायव्हर होऊ शकू का हाच विचार मनात तरळतो. (तुझी लायकी तीच लेका, असा विचार कुणाच्या मनात आला असेल, तर सांगून ठेवतो..............तो बरोबर आहे).

फिरता फिरता ही सफ़र घडवणार्या या ड्रायव्हिंगच्या कलेला अन या ड्रायव्हर्स जमातीला माझा मानाचा मुजरा. 

No comments:

Post a Comment