Friday, 13 February 2015

नमस्कार

जो नमस्कार आपसूक घडतो तो खरा नमस्कार. तो करावा नाही लागला पाहिजे. प्रेम, जिव्हाळा, आदर, कर्तृत्व, भव्यता यांच्याशी मनाची तार जेव्हा झंकारते तेव्हा नमस्काराची जादूई क्रिया घडते.

पहेलगामला वर चढून गेल्यावर सह्याद्रीपण टेकडी वाटावी असे उत्तुंग डोंगर पाहिल्यावर आलेलाअनुभव.

एका पावसाळी सकाळी रायरेश्वरावर धुक्यात कोंडलेल्या तळ्याच्या काठी डोलणारी फुले पाहिल्यावर आलेली अनुभूती.

रायगडावर महालाच्या पायरीवर "महाराजांचे सेवेसी तत्पर, हिरोजी इंदुलकर" हे वाचल्यावर मनात आलेली आदराची भावना.

पुणे एयरपोर्टला वृद्ध भीमसेनजीना पाहिल्यावर पटकन उभा राहिलेलो मी. मनोहर जोशी होते त्यामुळे लवाजमा. मी उभा पण माझं डोकं पंडितजींच्या पायावरच.

औरंगाबादला पुल आले होते. ही गर्दी. शक्यच नव्हतं त्यांच्यापर्यंत पोहोचणं. माझ्यासारखे बरेच जण नजरेतुन नमस्कार करत होते आणि ते आशिर्वाद वर्षावत होते.

अपंगशाळेत कलाम सर आले होते. तुम्ही बघितलं कधी कलामांना निरखून. बालसुलभ निर्व्याजता दिसते त्यांच्या डोळ्यात आणि स्मितहास्यात. ते आमच्याकडे बघून हात हलवत होते अन मी उभ्याजागी नतमस्तक होत होतो.

देवदास मधील डोला रे आठवतं का. माधुरी आणि ऐश्वर्या. मुर्तीमंत सौंदर्य आणि त्या नाचातली उर्जा. थिजतो बुवा.

सीडीओ मेरी शाळेतील कोणतेही सर/बाई. कुठेही भेटू द्या हो. मेंदूला सिग्नल मिळतोच, "ए वाक लेका"

आईबाबा, त्यांना नमस्कार करायला तर सांगावं लागत नाही. पण काही आज्या, मावश्या, काका काकू, बहिणी यांचं प्रेम इतक्या जिव्हाळ्याचं असतं की ताठ कणा केव्हा वाकतो हे कळतही नाही. "भेटलास, फार बरं वाटलं" असं कुणी म्हणालं किंवा आजीचा खरखरता हात थरथरत गालावर फिरत "बस गो माय जेवायला" असं ती म्हणते तेव्हा अमूल्य आशिर्वाद गाठीला जमा होतात.

म्हणूनच म्हणतो जो घडतो तो नमस्कार अन जेव्हा तो जबरदस्तीने करावा लागतो तेव्हा फक्त पाठीला व्यायाम,  बस!

No comments:

Post a Comment