Monday 2 February 2015

कुंदा मावशी

दोन आठवडयापूर्वी औरंगाबाद ला गेलो होतो, एका वृद्धाश्रमात. देणगी द्यायची होती आणि मावशीला भेटायचं होतं मला. तसं मी यापूर्वी वृद्धाश्रमात गेलो होतो पण ते फक्त देणगीच द्यायला. कोणत्या नातेवाईकांना भेटायची हि माझी पहिलीच वेळ. सख्खी मावशी. कुंदा मुन्शी.

एखाद्याला एकाच आयुष्यात किती दुःखाचे भोग पाहायला मिळावेत, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुंदा मावशी. दिसायला नीटस. किंबहुना चार बहिणीमध्ये जरा उजवीच. परत शेंडेफळ. साठीच्या दशकात कधीतरी हैदराबाद च्या नाथराव मुन्शी या गृहस्थाच स्थळ आलं. असं म्हणतात कि ते त्या काळी फारच गडगंज श्रीमंत होते. मला मात्र तो माणूस कधीच पटला नाही. लहान असताना ऐकीव माहिती पडायची कानावर, कि मावशीला सासरचा कसा जाच आहे ते. तेव्हाच कधीतरी असंही ऐकलं कि काही कारणामुळे त्यांनी मावशीला कानाखाली मारली आणि ती इतकी जोरात होती कि मावशी बहिरी झाली. तरुण वयात. माझ्या मनात मुन्शी या गृहस्थाबद्दल विलक्षण तिडीक बसली.  इतकी कि ते गेल्यावर, माझ्या डोळ्यात पाण्याचं टिपूस म्हणून आलं नाही.

दिवस सरत गेले. मुन्शी कुटुंबाची धूळधाण कानावरती पडत होती. पण माझं वय लहान, समज कमी. मुख्य म्हणजे ते हैदराबाद ला, आम्ही पुण्याला. मी SKF ला असताना मुन्शी कधीतरी भेटले अन म्हणाले आपल्याला बेअरिंग बनवायचा प्लांट टाकायचा आहे. ५ कोटी उभे करू शकतो. मला माहित होतं मुन्शिंच्या खिशात ५०० रु नाही आहेत. कुठल्या तरी बुवाच्या नादी लागून सगळी संपत्ती घालवली होती आणि एके काळी ऐसपैस घर असलेले माझी मावशी अन काका रस्त्यावर आले असावेत.

काळाची चक्र फिरत गेली. परभणीच्या मुक्ताजीन नावाच्या संस्थानाची लक्ष्मी असलेली माझी आजी लक्ष्मीबाई हिच्यापण दुर्दैवाचे फेरे चालू झाले. पहिले आजोबा गेले ८८-८९ साली. मग मामा गेला ९१-९२ मधे. जिथे एकेकाळी २५ जणांचा स्वयंपाक व्हायचा तिथे माझी आजी एकटी जेवू लागली. लिहीतानाही गलबलतोय. एक मधु मामा, आईंचा चुलत भाऊ, होता. अट्टल दारूड्या ही त्याची सर्वसाधारण जगाला ओळख, पण तोच आजीला आधार. तो सुद्धा गेला. मुक्ता जीनच्या मालकाने ती जागा समदला विकली. (आज परभणी बस स्टँडच्या शेजारी जी खंडहर उभी आहेत तिथला एकेकाळचा थाट वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत)

आजीचं वय ८०. काळजी घेणारं कुणी नाही. काही महिने आमच्याकडे होती, पुण्याला. ह्या मोठ्या लोकांचं काही कळत नाही. मी बोलायचो आईला की राहू दे आजीला आपल्याकडे, पण बहिणीत काय गुळपीट चालायचं मला कळायचं नाही. मग एक दिवशी कळलं की आजीला हैद्राबादला मुन्शींकडे ठेवायचं. या काळात नाथराव मुन्शी चांगले वागायला लागले होते. जुन्या पापांचं प्रायश्चित बहुधा घेऊन पुण्य गोळा करत असावेत. काहीही असो, पण आजीला आमच्या कुटुंबानेच आधार द्यायला हवा होता असं आजही मला वाटतं.

आजीच्या शेवटच्या काळात मी गेलो होतो हैद्राबादला मुन्शींच्या घरी. हं, घर कुठलं, कबाड़ख़ाना होता तो. बाहेर कसला तरी स्क्रँपचा उद्योग आणि इनमिन दोन रूम. बाहेर च्या खोलीत मुटकुळं होऊन पडलेली आजी, अतिशय गचाळ असं घर. आजी तब्येतीपेक्षा मी ती परिस्थिती बघून बाहेर जाऊन मनसोक्त रडून आलो. पण bed ridden व्यक्तिला करायचे सगळे सोपस्कार कुंदा मावशी करायची. शेवटची दोन एक वर्षे आजीला, कुंदा मावशी अन काकांनी सांभाळलं. शेवटी आजी गेली, जराजर्जर होऊन गेली. जर मुन्शीकाकांबद्दल थोडा आदर असेल तर तो या काळामुळे.

मग मधे मुन्शीही गेले, अचानक. मावशी परत एकटी. आजीचीच स्टोरी जणू परत. मुलबाळ नाही. सासरच्या नातेवाईकांशी संबंध नाही. परत तीच परवड. काही महिने आमच्याकडे, कधी औरंगाबादला दुसर्या मावशीकडे. एक नणंद होती. तिच्याकडे रहायची. वर्षभरात भावापाठोपाठ तीही गेली. शेवटी आमच्या आईने हिय्या केला आणि मावशीला सांगितलं "तु सरळ वृद्धाश्रमात रहा आणि स्वत:ची तगमग थांबव." आणि मग मुक्तीसोपान न्यासात तिची रवानगी झाली. (कसं तरीच वाटतंय ना तुरूंगात रवानगी झाली, लिहील्यासारखं).

तिथेच भेटलो मावशीला. देणगी दिल्यावर करंदीकर बाई बोलल्या "तुमची मावशी म्हणजे सोशिकतेचा पुतळा आहे. बाकी सगळे आजी आजोबा विक्षिप्त हो. पण जर मला कुणाची मदत होत असेल तर कुंदाताईंची. अगदी स्वयंपाकाची बाई आली नाही तर कुंदाताई उभी राहते आणि बाकींच्याच्या मदतीने स्वयंपाक करून टाकते. इतक्या सोन्यासारख्या बाईच्या आयुष्यात असे दुर्दैवी भोग यावेत तेव्हा विधात्याला म्हणावं तरी काय." कानाचं मशीन नव्हतं त्यामुळे मावशीला काही कळत नव्हतं. बरंच होतं ते. मी आवंढा गिळत, हुंदका तोंडाबाहेर न येण्याचा मस्त अभिनय केला. मी तसा भिडस्त. म्हणजे अगदी बहिणी, मावश्या, काकू यांना मिठी वैगेरे मारत नाही कधी. आकसतो. पहिल्यांदाच वाटलं की मावशीला मिठी मारावी अन म्हणावं "किती सोसलंस गं तु आयुष्यात."

मला लाख वाटतं की मी मावशीला घरी आणावं, पण मी घरी आणणार अन गावभर उंडारणार. बाकीचे कसं घेतील हे सगळं म्हणून गप्प बसलोय. पण cheque philanthropy आहे. त्या फ्रंटवर तरी काही कमी पडणार नाही याची शप्पथ घेतोय.

ते बँक नाही का सालं ज्याला लोनची गरज नाही त्याच्या मागे लागते पैसे घ्या म्हणून. मी सुद्धा म्हातार्यांना जो पर्यंत आपली गरज नाही तोपर्यंत जवळ ठेवतो. जेव्हा दिसतं की त्यांना आपली गरज आहे तेव्हा वृद्धाश्रम.

No comments:

Post a Comment