Monday, 16 February 2015

आजोबा

काय असतं, की वयानुरूप आपल्या मृत्युबद्दलच्या जाणीवा बदलत जातात. म्हणजे ७-८ वर्ष वय होईपर्यंत आपल्याला काहीच कळत नसतं. मुळात आपण जगतोय हेच माहित नसतं, नाही का. त्यानंतर होणारे मृत्यु मात्र आघात करायला चालू करतात. मधे एक वय येतं साधारणपणे १७ ते २४. जाणतेपण आलं असतं, पण आपल्याच मस्तीत मश्गुल असतो. तारूण्याचा उन्माद म्हणा, दोस्तीची किंवा प्रेमाची नशा म्हणा पण आपल्याला आपलंच जग खुणावत असतं. अगदी खरं सांगू का, हे आपलं आपलं म्हणून मी माझ्याकडून झालेल्या चुकांची बोच जरा बोथट करतोय. मी असा वागलो हे खरं.

म्हणजे माझे आजोबा. अनंतराव मंडलिक. निवांत माणूस. माझ्यावर सॉलीड जीव. सॉलीड म्हणजे अगदी जाणवेपर्यंत. गोड द्यायचं की मलाच देणार. मी काय की ते नवसाबिवसाचा म्हणे. परत वंशाचा दिवा. त्यामुळे लहान भावाकडे ते बघायचेच नाही. लहान म्हणजे काय १ वर्षाचा फरक. पण उन्मेष फारच रडक्या होता म्हणे लहानपणी, अन मी उडक्या. उडक्या म्हणजे, क़ायम फिरायला तयार. आजोबा न्यायचे मला.

इंजिनियरिंगला पुण्याला आलो. ८८ ला आजोबांना कँन्सर झाला, घशाचा. ससून मधे admit असायचे आजोबा. कर्तव्य भावनेने जायचो मी ससूनला. शेवटी शासकीय दवाखाना तो. खाली झोपायचो. पण ते सगळं जनरल वॉर्डचं वातावरण. अस्वच्छता. आवडायचं नाही मला, किंवा माझ्या त्या वयाला म्हणा. आजोबांचं माझ्यावर असलेलं प्रेमही त्या माझ्या नाराजीला दूर नाही करू शकलं. शेवटी आजोबा गेले ससूनमधेच. वाईट तर वाटणारच, पण ससूनमधे आता झोपावं लागणार नाही याचा थोडा का होईना आनंद झालाच.

पण क़हर झाला तो आईचे वडील गेले तेव्हा. केशवराव डंक. आजही परभणीत त्यांचं नाव काढतात. भारदस्त अन कडक. उन्हाळ्याच्या सुट्टीला त्यांना कचेरीतून बोलवायची टाप फक्त नातवांचीच. आजोळी असणार्या १५-१६ पिलावळीत तो मान बहुधा मलाच मिळायचा. ते पण गेले १९८९ ला. मी विशीचा टोणगा. गणपतीचे दिवस. आई बाबा परभणीलीच होते, ते सिरीयस होते म्हणून. वय, परिस्थिती बघता काय होणार ते कळलं होतं. अन झालंही तेच. पण आजोबांचं जाणं, त्यांचं प्रेम हे काही माझ्या तारूण्याच्या उन्मादाला रोखू नाही शकलं. गणपती मंडळाचा सक्रीय कार्यकर्ता, सर्वेसर्वाच. मग तिकडे आजोबा अनंतात विलीन होत असताना मी इकडे "धत्ताड, धत्ताड"

पण मग लग्न झालं, नोकरी चालू झाली. संसारी झालो. माणसांची किंमत कळू लागली. जवळच्यांचे होणारे मृत्यु त्रास देऊ लागले, मग त्यांचं वय काहीही असू दे. माझे अजून एक आजोबा, सीतारामपंत पाठक. आधी हैदराबाद स्टेटमधील आणि नंतर मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार. ते तरूण असताना कसे कडक होते याचे खुप किस्से. मी कळता झालो तेव्हा ते रिटायर झालेले. व्यवहारी पण पोटातून प्रेम. सदविचारी, सदवर्तनी. ते घरात असायचे तेव्हा सगळं काम स्वहस्ते. गादीची चादर अशी टाकायचे जणू इस्त्री फिरवली आहे. अक्षर मोत्यासारखं. पत्र बहुधा पोस्टकार्डावरच. पण सगळा मजकूर लिहूनही, शेवटी जागा असायचीच. खाणं आटोपशीर. रेल्वेने ते आणि मी एकदा चाललो होतो. रिज़र्वेशन क्लार्कला फ़ॉर्म लिहून दिला, S R Pathak.  M.   87. क्लार्क बोलला "काय तब्येत बरी आहे ना? की मुंबईच्या हॉस्पीटल............" मी बोललो "ते बघ उभे आहेत, परीटघडीचा पांढरा शर्ट अन पँट घालून" त्याने खिडकीतूनच हात जोडले.

मी कधीही ठाण्याला गेलो की relevant प्रश्न विचारणार. एप्रिल मधे गेलो की टर्न ओव्हर किती झाला, सप्टेंबर मधे रिटर्न फ़ाईल केला का, डिसेंबर मधे ऑर्डर पोझीशन कशी आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी "तुझी कंपनी कशी आहे ते दाखव मला" म्हणून आले. आणि लुप्त उठवणार, उगीच बघायची म्हणून नाही. मेमरी अशी की साला माझे मित्र, बिझीनेस पार्टनर, बायकोचे नातेवाईक सगळेच लक्षात. आणि त्यांच्याबद्दल विचारणार. आपुलकीने.

 २००० ला सँट्रो घेतली तेव्हा गेलो होतो ठाण्याला. मला म्हणाले, वय ८३, "जरा चक्कर मारून आण" दिसत नव्हतं व्यवस्थित तर गाडीवरून हात फिरवून फ़ील घेतला. वृंदावन च्या मागे गेल्यावर म्हणाले "मला खूप आनंद झाला आहे, मी तुला कॉफ़ी पाजतो" मी तुम्हाला सांगतो, आंवढ्याबरोबर कॉफ़ी गिळताना मस्त लागते.

तीन वर्षापूर्वी गेले ते वयाच्या ९७-९८ व्या वर्षी. तो अस्थिपंजर झालेला अचेतन देह बघितल्यावर उन्मळून पडलो. आधीच्या दोन आजोबांच्या वेळेसचा रडण्याचा बँकलॉग भरून काढला.


No comments:

Post a Comment