हे प्रकरण आलं होतं कधीतरी दहावीला असताना. खुप प्रयत्न
करायचो. पण एक साईड यायची. कधी मटका लागला तर दोन. बास. त्यापुढे नाही.
पुस्तकं आली. ती वाचून प्रयत्न करायचो. पण शेवटपर्यंत जमलं नाही. मी नाद
सोडला रूबिक क्युबचा मग. काळाच्या ओघात विसरलो होतो. मग वर्षापूर्वी
रूबिकची परत घरात एंट्री झाली. यशने आणलं. इंजिनियरिंगचं पोरगं. Techsavy.
शोधलं त्याने इंटरनेटवर फुल्ल रूबिक क्युब कसा मारायचा ते. मला जे कधीच
जमलं नाही ते पोराने करून दाखवलं. माझ्याच पोराबद्दल मला असूया वाटली. (मी
बाबांबरोबर कँरम किंवा पत्त्यात जिंकलो की दोन एक तास उगाच घरात चिडचिड
करायचे). मी यशला बोललो, "मला शिकव ना रूबिक क्युब" तो हो म्हणायचा पण वेळ
टाळून न्यायचा.
हळहळू मी परत नाद सोडला. नंतर कधीतरी लहान मुलगा नीलच्या
हातात ते पडलं. मग तो पण प्रयत्न करू लागला. दोन तर कधी तीन साईड तो
कुणाच्या मदतीशिवाय करू लागला. तो पण यशच्या मागे लागायचा "दादू, शिकव ना
मला प्लीज" दादू कॉलेजमधे नाहीतर बिल्डींगच्या पोराममधे बिझी. शेवटी नील
माझ्याकडे आला अन म्हणाला "मला तुम्ही शिकवा" आता आली का पंचाईत. मी बोललो
"इंटरनेटवर ट्राय मारू" एक चांगला व्हिडीओ सापडला. नीलचं नॉलेज तसं चांगलं
होतं रूबिक क्युब बद्दल. व्हिडीओच्या स्टेप्स चांगल्या समजायच्या त्याला.
मला नाही कळायच्या. एक संध्याकाळ ट्राय झाला, जमलं नाही पण नीलच्या
बोलण्यातून कळायचं की त्याला जमतय.
दुसर्या दिवशी संध्याकाळी मी नीलला परत व्हिडीयो
लावून दिला. काही स्टेप्स मला कळल्या असं दाखवून त्याला "असं कर, तसं कर"
सांगितलं. त्याला वाटायचं मीच शिकवतो म्हणून. सात वाजता मला पार्टीला जायचं होतं. नील खिळून बसला होता. मनात आलं, पोराबरोबर थांबावं. भौतिक मनाचा विजय झाला. मी पार्टीला गेलो.
रात्री साडेदहाला आलो. तर नीलने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यावर झोप तरळत होती. तशा अवस्थेत त्याने माझ्या अंगावर झेप घेतली, आणि पोटात शिरून म्हणाला "thank you पप्पा, तुम्ही मला रुबिक क्यूब शिकवलात" एका हातात पूर्ण झालेला रुबिक क्यूब. खोटं श्रेय घेताना मला खूप मजा आली.
गेले पंधरा दिवसापासून नील माझ्या मागे लागला आहे. तुम्ही पण रुबिक क्युब शिका म्हणून. तो बिचारा मला स्टेप्स समजावून सांगतो, पण मलाच काही कळत नाही. परवा तो शिकवत असताना यश पण दुसरा क्युब जमवत होता. मी यशला बोललो "दादू बघ, नील कसा शांतपणे शिकवतो आहे मला. तू तर मला टांग मारलीस." तर नील म्हणाला "पप्पा, दादुला काय बोलता. मी कसं शिकवतो ते तुम्हीच बघा. तुमच्यासारखं रागवत नाही आहे मी, तुम्हाला काही येत नाही आहे तरी."
दोघं पोरं एकमेकांना टाळ्या देत खुदुखुदु हसले.
आणि मी विचार केला कि रुबिक क्युब जमत नाही ते ठीक आहे पण बाप म्हणून तरी जमतंय का काही हा विचार करत पडून राहिलो……… ढिम्म
No comments:
Post a Comment