मी ६८ चा. म्हणजे जन्मवर्ष हो. साधारण या वयाचे बरेच जण शाळा या प्रकाराबद्दल नोस्टाल्जिक वैगेरे होतात. भावूक. बावळटासारखे. मी पण होतो. बावळटासारखाच.
हं, माझी शाळा सीडीओ मेरी हायस्कूल नाशिक. दिंडोरी रोडला या शासनाच्या वसाहती. सीडीओ मेरीच्या अधिकार्यांनी नाशिक एज्यु. सोसयटीला, पेठे हायस्कूलला, गळ घातली की आमच्या पोरापोरींना घडवण्यासाठी कॉलनीत शाळा चालू करा. आणि मग ती आपण क्रिकेटमधे ती वर्ल्ड टीम निवडतो ना तसं त्या कमिटीमधून उत्तमोतम सर अन बाई बाकीच्या शाळातून निवडून काढल्या अन आमची शाळा सुरू करायला पाठवल्या. सराफ सर, पुरा वैदय, कुलकर्णी सर हे मुख्याध्यापक म्हणून सुरूवातीच्या काळात लाभले. पण शाळेची सेकंड लाईन ची खरी कमाल होती. विद्यार्थीप्रिय दि कृ गोटखिंडीकर, य दा जोशी, भा रा सुर्यवंशी, महाजन सर, भिसे बाई, सी एम कुलकर्णी, शिंदे बाई, साठे बाई, हिरे सर अशा उत्तमोत्तम शिक्षकांची फौजच उभी राहिली.
सीडीओ मेरीच्या अलीकडे आमची वसाहत होती, विद्युतनगर. पण मग आजूबाजूच्या मुलांना अॅडमिशन द्यावी म्हणजे जरा मुलामुलींची संख्या वाढेल या प्रस्तावामुळे आमचा पण नंबर लागला.
शाळा नवीन, वर्ग पुर्ण बांधून व्हायचे होते. पटसंख्या पण खुप जास्त नाही. पहिले दोन एक महिने तर एकाच वर्गात अख्खी शाळा भरायची. एक रांग पाचवी, मग सहावी, सातवी आणि आठवी. समोर सर वा बाई. तिथेच पार्टीशन टाकून एक टेबल. टीचर्स रूम. भातुकलीची शाळा. पहिल्या वर्षीतर वर्ग तयार नव्हते तेव्हा वरांड्यात बसायचो बेंच टाकून. उजवीकडे पाऊस अन समोर वाड सर.
पण मग हळूहळू फुलू लागली शाळा. स्टेज आलं, प्रयोगशाळा आली, खेळाचं सामान आलं. मिहीरसेन, ध्यानचंद, सी के नायडू, तेनसिंग असे ग्रूप पडले. सगळे मुलं मुली यात विभागले गेले. त्यामुळे आमच्याकडे आंतरवर्गीय स्पर्धा नसायच्या तर या ग्रूपमधे खेळायचो. आणि खेळ कुठलाही वर्ज्य नव्हता. लगोरी, खो खो, कबड्डी, रिंग, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, उंच उडी, डबलबार, मॅरेथॉन, क्रिकेट, हॉकी, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ. (मी कधी बुद्धीबळ खेळलो नाही हे वेगळं सांगायला नको) तुम्ही नाव काढायचं की साहित्य, जागा हजर. एक तास खेळायचा कंपलसरी. गेल्या ४६ वर्षाच्या आयुष्यात, एक अँजियोप्लास्टी सोडली, तर आजारी म्हणून घरी बसल्याचं आठवत नाही मला. त्याचं कारण लहानपणी बेफाम खेळलो, त्यामधेच आहे यात शंका नाही.
वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि उपक्रमांची वर्षभर रेलचेल असायची. पहाटेचे सुर्यनमस्कार, कांदेनवमी, वर्गसजावट, वक्तृत्वस्पर्धा आणि गॅदरिंग. झुंबड नुसती. उसंत नसायची. आणि सगळ्यांचा सहभाग. सुटका नव्हती. माझ्या सारख्या मुखदुर्बळ पोराकडून वक्तृत्व किंवा नाटकातून काम काढून घेणं म्हणजे बैलाकडून दूध काढण्याइतकं अवघड. पण ते सुद्धा शाळेत घडलं, यातच काय ते समजा. परवाच बंगलोरमधे एका कॉन्फरन्सला तासाभराचं भाषण ठोकणार होतो. यशने विचारलं "तुम्हाला स्टेज फिअर नाही का?" त्याला शाळेची स्टोरी सांगावी लागेल.
शिकवण्याची हातोटीपण विलक्षण होती. गोटखिंडीकर सरांनी गणित आणि शास्त्र या विषयाची गोडी लावली. जोशीसर, वाडसर भाषा विषय खुप पोटतिडकीने शिकवायचे. सुर्यवंशी सरांनी ड्रॉईंग मधे रंग भरायला शिकवले. मी सोडून सगळ्यांची या विषयात प्रगती झाली. पुढे डिप्लोमाला सरळ लाईन मारावी लागली तेव्हाच मला ड्रॉईंग जमलं. भिसेबाईंनी संस्कृत सारखा विषय आवडीचा केला, तर शिंदेबाईंनी हिंदी. महाजन सरांनी सरळ उभं रहायची शिस्त लावली. वरच्या वर्गात सीएम कुलकर्णी बाई, पटेल बाई, देव सर यांनीही आमच्यासारख्या दगडांवर छिन्नी हातोडी चालवली. आणि अगदी सुबक नाही पण ओबडधोबड का असेना, अशी माणसं तयार केली. पु रा वैद्य आणि सराफ सरांनी शाळेवर आणि पर्यायाने आमच्यावर पुत्रवत प्रेम केलं.
सगळेच एकमेकांना ओळखत असू. सुधाकर आणि गवळी काका कुटुंबाचा भाग होते. या सुधाकरची गंमत आहे. प्रताप, माझा मित्र आठवी झाल्यावर नागपूरला गेला. म्हणजे ८१ ला. त्यानंतर आम्ही परत पुण्याला भेटलो. कामाला लागलो. साधारण ९९ साली नाशिकला शाळेत सगळ्यांनी जायचं ठरवलं. प्रताप १८ वर्षाने शाळेत जाणार होता. ८१ साली शामळू दिसणारा प्रताप आता एकदम हिरो झाला होता. स्टायलिश भांग वैगेरे. (आता टकलावरून हात फिरवतो). शाळेत गेलो. सुधाकर भेटला. आम्ही विचारलं "काय ओळखलं का". सुधाकर प्रत्येकाला नावानिशी ओळखू लागला. आम्ही प्रतापला पुढं केलं "याला ओळखलं का?" मी विचार केला, आता पडली याची विकेट. तर म्हणाला "याला कोण विसरणार?" मी बोललो "फेकू नकोस" तर म्हणाला "आपला मित्र आहे हा, प्रताप. प्रताप निकम" आम्ही येडपाटलो.
त्यामुळेच या शाळेत दोन वर्षं जरी बरोबर राहिलो तरी आजही संपर्कात बरेच जण आहोत. तसं आम्हा कुणाकडून अगदी दैदिप्यमान वैगेरे काही घडलं नाही पण लौकिकार्थाने यशस्वी वैगेरे ज्याला म्हणता येईल अशा मुला मुलींची पिढी घडली. त्यात डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, चार्टर्ड अकाऊंटंट आहेत, वकील आहेत. जॉबमधे मोठ्या हुद्द्यावर आहेत, काही स्वत:चा बिझीनेस सांभाळत आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी एकत्र भेटलोच तर स्वत:चा हुद्द्याचा मुखवटा फेकून एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून सामोरं जाण्याची संवेदनशीलता बाळगून आहेत.
१८ डिसेंबर २०१० रोजी आम्ही सगळे शाळेत भेटलो. तब्बल २७ वर्षांनी. बरेच सर आणि बाईपण आले होते. बाहेर कडाक्याची थंडी होती पण त्याच १० अ च्या खोलीत आमचा वर्ग भरला होता आणि तिथे मैत्रीच्या आणि आदराच्या भावनेचा उबदारपणा होता. आकार उकार बदलल्यामुळे बेंचवर शरीर घुसत नव्हतं, पण शरीराचं वय वाढतं, मनाचं नाही. आम्ही बेंचवरच बसलो. आकार उकार बदलल्यामुळे बेंचवर शरीर घुसत नव्हतं, पण शरीराचं वय वाढतं, मनाचं नाही. आम्ही बेंचवरच बसलो. बाई आणि सर भरभरून बोलत होते. वेळेचं बंधन होतं नाहीतर सगळ्यांनी रात्र जागवली असती. मागच्या रविवारी ८-९ जण भेटलो आणि परत त्या निर्व्याज मैत्रीची अनूभुती घेतली.
माणूस नावाच्या इमारतीचा पाया भक्कम करणारे हे सीडीओ मेरी शाळेचे दिवस आमच्या सगळ्यांसाठी आयुष्यभराचे संचित आहेत.कधीही मला शाळेची आणि २०१० च्या कार्यक्रमाची आठवण झाली की मी रोमांचित होतो आणि आनंदाच्या डोहात तरंगत राहतो, कितीही वेळ.
"आनंदाचे डोही आनंद तरंग"