Friday, 24 July 2015

नॉनव्हेजेटेरियन

नॉनव्हेजेटेरियन

 कसलं घमासान चालू आहे शाकाहारी आणि मांसाहारी वरून. सॉलीड. 

 आमच्याकडे बाहेर जेवायला जाणे म्हणजे चिकन मटनच खायचं. शुद्ध, सात्विक नॉन व्हेज खाणारी लोकं आम्ही. मधे एकदा लंडनहून वाघेलाचे मेव्हणे आले होते. पूर्ण शाकाहारी. मी आणि आमचं कुटुंबिय त्यांना घेऊन श्रेयसमधे घेऊन गेलो होतो. श्रेयस हे शाकाहारी थाळी मिळ्ण्याच ठिकाण आहे हे वेगळं सांगत बसत नाही. तिथे थाळी आली समोर तर आमचा नील बोंबटला "ए, अरे चिकन चा लेग पिस कुठं आहे?"

२००५ साली मी मियां, बिबी बच्चोके साथ हॉटेलला जेवायला गेलो होतो. तंदुरीचा आस्वाद घेत होतो सगळेच. गंमत म्हणजे वैभवी, मी आणि नील समोर सोफ्यावर आणि यश aisle मधे खुर्चीवर बसला होता. त्या वाटेवरून जाणारं प्रत्येक कुटुंब यशच्या हातातलं तंदुरी चिकन बघायचं आणि शेजारच्याच्या कानात काहीतरी कुजबुजायचं. "काय हे" वैगेरे तत्सम असं. मला काही कळेना काय झालं ते. एक  बेन तर डोळे विस्फारून बघत होती यशकडे. मी बेनकडे विस्फारित डोळ्याने बघत असताना एकदम वीज पेटली.

झालं असं होतं, पंधरा दिवसापूर्वीच यश ची मुंज झाली होती. आता त्या आधीचे पंधरा दिवस आणि नंतरचे पंधरा दिवस गोडधोड खाऊन यश पकला असावा. खरतर त्याचे पालक ही पालक ची वैगेरे भाजी खाऊन कंटाळले असावेत. एका रविवारी यश ओरडला. आज नॉन व्हेज पाहिजे म्हणून. खरं तर तो आमच्या मनातलं बोलला होता. पण मी आपलं यशच्या नावाखाली चान्स मारला. बटुवामन यशच्या मुंजीच्या वेळेस डोक्यावरती केलेली संजापची वाटी अजून केसांनी पूर्ण झाकली नव्हती आणि हा पठ्ठ्या आणि त्याचे आईबाप मस्त चिकन हादडत होते. वेटरला सांगितलं एक टोपी आण. ती यशच्या डोक्यावर टाकली. हो मग, कुणाची दृष्ट लागायला नको…… खाण्याला.   आणि मग यश ने सुखनैव क्षुधाशांति केली.

बाकी आमच्या मंडळी सौ वैभवी या तर हाडाच्या, आय मीन काट्याच्या  मत्स्याहारी. बोंबिल, पापलेट, सुरमई वैगेरे जलचर प्राणी समोर दिसले की वैभवीच्या पाककलेला विशेष धुमारे फुटतात. एका संक्रांतीला वैभवीला आमच्या मातोश्रींनी बाजारातून काटेरी हलवा आणायला सांगितला आणि मग पुढे काय घडलं हे लिहायचं म्हंटल तर एक वेगळा लेख होईल.

आमच्या एस के एफ चा जेवणाचा थाट काय वर्णावा. पंचतारांकित हॉटेलच्या तोंडात मारेल असा. फोर कोर्स जेवण. दररोज नॉनव्हेज असायचं. सोमवारी मटन, मंगळवारी बोल्हाईचे, बुधवारी चिकन, शुक्रवारी मटन, शनिवारी अंडाकरी, रविवारी फिश. तुम्हाला म्हणून सांगतो, कुठं  सांगू नका, पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत जेव्हा केव्हा कंपनीने नॉनव्हेज बनवलं नाही तेव्हाच माझा जठराग्नि व्हेज खाऊन शांत झाला. कधी तरी कुणी मला कौतुकाने म्हणून जातं, कमीवेळा घडतं असं, की राजेश म्हणजे हाडाचा इंजिनियर आहे त्याचं मूळ हे एस के एफ च्या प्रोडक्शन डिपार्टमेंट च्या ट्रेनिंग मध्ये नसून कँटीन मध्ये आहे हे मी नम्रपणे नमूद करतो. 

आता तैवानला गेलो होतो, तेव्हा पोर्क, बीफ सगळं हाणलं. विचार केला, खाईन तर काहीही, नाही तर काहीही नाही. ठीक वाटलं. पण हृदयाची नळी एकदा तुंबल्यामुळे तसं ही ते खाणं तब्येतीला इष्ट नाही. त्यामुळे त्याचा फारसा आस्वाद पुन्हा घेणं संभवत नाही. पण या नळीच्या कारणामुळे मी चिकनचं ताट मागवलं की त्याबरोबर येणाऱ्या अंडाकरीतील अंड्याचं पिवळं बलक काढून फक्त एग व्हाईट खातो. तब्येतीबद्दल फारच जागरूक हो आमचा राजेश, असे नातेवाईक म्हणतात ते उगाच नाही. 

मांसाहार खाण्यामुळे जर संबंधात वितुष्ट येणार्या समाजात वाढलो असतो तर आईने चौथीत असतानाच बदड बदड बदडला असता आणि घराबाहेर हाकलून दिलं असतं.

बरं झालं च्यामायला जन्म लवकर झाला. आमच्याकाळी समाज प्रगत तरी होता. 


No comments:

Post a Comment