Thursday 2 July 2015

नागपूर पार्ट २

उन्हाळे अँड बुकसेलर्स किंवा ठाकुर आणि कंपनी, टिळक रोड, महाल नागपूर. नरसिंग टॉकीजच्या जवळ, घाटे दुग्धमंदिरासमोर. शालेय पुस्तकांचे रिटेल आणि होलसेल व्यापारी. नवनीत पुस्तकांचे प्रमुख वितरक. अगदी लख्ख आठवतंय मला सगळं, काल घडल्यासारखं. शाळा उघडण्याच्या महिन्यात, जुन जुलै मधे तोबा गर्दी. काऊंटरवर आणि मागे होलसेलला पण. सीझनमधे मुरारबाजीसारखे लढणारे बंडुभाऊ, तितक्याच शांतपणे पण सुवाच्च अक्षरात बिलं फाडणारे ठाकुर काका, त्यांचा मुलगा विलास, तेव्हापासून आजतागायत भरवशाचा माणूस गजानन, सगळ्यांचा आवडता आणि अधून मधून चक्कर टाकणारा हरीदादा  अशा अत्यंत विश्वासू हातांची गर्दी बाळासाहेबांबरोबर असली तरी कामच इतकं असायचं की दोन चार जणं सहज खपून जायचे सीझनला. हो, सीझन म्हणतात आजही. 

डिप्लोमा फर्स्ट इयर ची परीक्षा झाल्यावर मोठी सुट्टी होती. मामा (साधनाताईचे वडील) बाबांना म्हणाले "चला, या सुट्टीत राजेशला घेऊन जातो नागपूरला" मी पण साधनाताईला भेटायला मिळणार म्हणून खुश झालो. बाळासाहेबांची अन माझी जुजबी ओळख होती. दुकानाच्या वरतीच घर होतं. वाडाच तो, आणि मग तशीच घराची रचना. साधनताईला भेटलो. दोन एक वर्षातच तिच्या भाषेला नागपुरी बाज आला होता. 

पोहोचल्यावर गप्पांचा भर ओसरल्यावर मी खाली गेलो. "कधी आला बे माड्या तु?" म्हणत बंडुभाऊंनी पहिले मला खिशात टाकलं. आणि मग ताईचा भाऊ असं म्हणत दुकानातल्या सगळ्यांची माझ्याशी ओळख झाली. त्यात काही माझ्या वयाचे होते, सुधाकर सारखे काही सिनीयर होते आणि तीन म्हातारे ही होते, पांडोबा, रामजी काका आणि पांडुकाका. असं विविध वयोगटांच्या लोकांचं संमेलनच होतं ते. 

सकाळपासूनच गर्दी व्हायची दुकानात. इतकी लगबग असायची की मी तिथे स्टूलवर बसल्या जागी अस्वस्थ व्हायचो. आपसूक उठून सातवीच्या पुस्तकाचा सेट, नवनीत गाईड अशा गोष्टी मी गिऱ्हाईकना देऊ लागलो. तीन चार दिवसातच मला या कामात रस वाटू लागला. मी हिरीरीने काउंटर वर उभा राहून गिऱ्हाईक manage करू लागलो.

बाकी पण धमाल असायची. बाळासाहेब आणि साधना ताई मला सख्खा भाऊ असल्यासारखे वागवायचे. तसं त्यावेळेला त्याचं लग्न होऊन खूप वर्षही झाली नव्हती. पण नागपूरच्या वेगवेगळ्या हॉटेल मध्ये प्रत्येक वेळेला मी बरोबर असायचोच. स्कूटर होती. आम्ही तिघेही त्यावर. न्युडोज, नैवेद्यम, मोतिमहल तर कधी वर्धा रोडचा धाबा. लैच ऐश केली. तसं त्यांच्या अन माझ्या वयात सात आठ वर्षाचं अंतर असावं, पण ते मला कधीच जाणवलं नाही. (काही दिवसात सासू होणारी साधना ताई तर माझ्या हून लहान वाटते, दिसण्याने अन वागण्याने ही)

दुकानात पण जलसा असायचा. कधी मूड आला की घाटे चा समोसा, दुध, तर कधी समोरून जाणारे खारे दाणे, ओलं खोबरं. बरोबरीला मोठे आवाज. दिवस कुठला अन रात्र कुठली, कळायचंच नाही. माहोल च असा होता की आठ एक दिवसासाठी गेलेलो, ते महिना भर राहीलो. 

मला नागपूर, ते दुकान, तिथली लोकं हे सगळं इतकं आवडलं की मी मग पुढची चार पाच वर्षं परीक्षा झाली की नागपूरला पळायचो. आणि दीड एक महिना तिथेच राहायचो. पुढे रिटेल काउंटर वरून मी होलसेल मध्ये पण काम करू लागलो. कॉम्प्यूटर वैगेरे नसल्यामुळे बिलांचा सगळा हिशोब गुणाकार आणि बेरीज करून पूर्ण करावा लागायचा. दोन चार वेळा तर असं झालं की रात्रभर जागून सकाळी साडेसहा सातला दुकान बंद केलं आणि परत ९ ला हजर. सगळ्यात गमत म्हणजे "हे काम कर" असं मला कुणीही सांगायचं नाही, पण मीच आपसूक करत जायचो. आणि मी ते करतो ह्याचं पण कुणाला अप्रूप वाटायचं नाही इतका तिथे एकरूप होऊन गेलो होतो.

असे ते मंतरलेले दिवस होते. गुणाकार बेरजा आकडेमोडीत न राहता आयुष्याची किंमत वाढवणारे ते दिवस. ज्यांची ज्यांची मी नावं लिहिली आहेत त्यांना कदाचित माहितही नसेल की माझ्या मनाच्या कोपऱ्यात या नागपूरच्या आठवणी अशा बंदिस्त आहेत. कधीतरी मी त्यावर साठलेली जळमटं साफ करतो आणि अक्षरश: कातर होऊन जातो.

त्यानंतर ही मी नागपूरला अगणित वेळा गेलो. आणि दरवेळेस हे चाळीस वर्षापूर्वी जुळलेले ऋणानुबंध अजूनच दृढ होत गेले.

बाळासाहेब आणि साधनाताई यांची व्यवसायात भरभराट ही झाली, संसारात ही झाली. सौरभ आणि गौरी, आईबापाप्रमाणेच मनमिळाऊ पोरं. सौरभचं तर आता लग्न ही आहे.

त्या सगळ्यांना आभाळभर शुभेच्छा.


No comments:

Post a Comment