Friday 10 July 2015

भूतकाळ

सकाळी सकाळीच नांदेड सिटीत दुध घ्यायला जातो मी. एक लिटर, म्हशीचं, चितळेंच्या. आज मालक आला होता, पण दुध पोहोचलं नव्हतं. मग काय भोचक प्रश्न आणि विस्तारीत उत्तरांची जुगलबंदी.

मी: काय कसा आहे धंदा

मालक: फर्स्टक्लास

मी: काय गावातच राहता का

मा: नाय, इकडंच ललितमधे. दोन फ्लॅट एकत्र केले आहेत.

माझ्या चेहर्यावर आश्चर्ययुक्त प्रश्नचिन्ह.

मा: बाकीपण आहेत दोन चार फ्लॅट इथंच.

आता माझ्या प्रश्नचिन्हाच्या बरोबर आ पण वासला.

मा: अहो, हे ललित अन मंगलभैरवची जमीन माझीच आहे. (एकूण दहा एक एकर)

माझं तोंड बंद झालं. पण मनात विचार आला

आता कसली घंटा तुझी जमीन. कापलीस तु कोंबडी सोन्याचं अंडं देणारी. आता अंडी मगर साहेब खाणार. विसरा आता की ही जमीन तुमची होती ते.

हे असंच होतं ना बर्याचदा. आपण आपला भूतकाळ असा कवटाळून बसतो ना. कुरवाळत. बाबा एम एस ई बी त होते.  त्यांचे कित्येक मित्र रिटायर्ड झाल्यावर पाच वर्षाने पण ओळख करून दिली की "एमएसईबी होतो चीफ इंजिनियर" हे बोलूनच जायचे. पण ते बोलताना त्यांच्या चेहर्यावरचे भाव फारच केविलवाणे वाटायचे मला.

एका औद्योगिक प्रदर्शनात एक पासष्टीचे गृहस्थ आले स्टॉलवर. कार्ड दिलं, लार्सन अँड टुब्रोचं. वर नाव लिहीलं होतं आणि खाली हुद्दा, रिटायर्ड जनरल मॅनेजर. आणि ते रिटायर्ड पेनाने लिहीलेलं. मी विचारलं "कधी सोडला जॉब" तर म्हणाले "झाले सहा वर्षं" मी बोललो "मग काय कन्सल्टन्सी वैगेरे" तर म्हणाले "नाही, काही नाही. पण जवळपास अशी प्रदर्शनं असतील तर फक्त जाऊन येतो. तेवढाच इंडस्ट्रीचा फील" फारच करूण वाटले होते त्यांचे डोळे.

आमच्या स्पिंडल रिपेयरमधे अनेक पन्नाशीच्या पुढचे मेंटनन्स मॅनेजर्स, त्यांच्या तरूणपणी ते कसे स्पिंडल रिपेयर करायचे हे रंगवून सांगतात आणि त्या धर्तीवरचे प्रश्न विचारतात. खरं तर सगळीकडे बदल झाला आहे तसाच स्पिंडल रिपेयरची पद्धतीत पण झाला आहे. पण भूतकाळातच रमलेल्या या एकेकाळच्या हुशार इंजिनियरला त्याची कल्पनाही नसते. आणि मग विचित्र वाटतं, हसू पण येतं. नंतर वाईटही वाटतं.

आता हेच बघा ना, भविष्यात मगर साहेबांच्या घरी हे कालचे मालक दुध टाकताना त्यांच्या नातवांना म्हणाले "पोरांनो, ही जमीन माझी आहे" तर ते ज्युनियर मगर काय विचार करतील?

आईच्यान सांगतो, देवाने भूतकाळ विसरण्याचा प्रोग्राम मेंदूत फीड करावा, लवकरात लवकर.

No comments:

Post a Comment