Wednesday, 15 July 2015

सोसायटी

संबंधांची लाईफ सायकल अगदी एखाद दुसर्या केसमधे जुळली पण आहे फेसबुकवर. परिचय, घसट, उतार इथपर्यंत बर्याच जणांबरोबर घडलं आहे. पण हेटाळणी, अद्वितिय अशी एकच केस आहे. पण आयुष्यात मात्र अशी सायकल घडली आहे माझ्याबरोबर. माझं राहतं घर, तिथली सोसायटी, सोसायटीतील माणसं. तिचं नाव आपण सुंदर सोसायटी ठेवू. नावाप्रमाणेच सुंदर. एका मजल्यावर दोनच फ्लॅट. ११ मजल्यावरील २२ फ्लॅटला दोन शिंडलरच्या प्रशस्त लिफ्ट. स्विमिंग पूल, मागे बाग, भरपूर पार्किंग. घरही प्रशस्त, हवेशीर, भरपूर प्रकाशदायी. तुम्ही आलात घरी की प्रेमातच पडाल. शिल्पा आणि अतुलने बघितलं आहे ते. ब इमारत.

या आमच्या बिल्डींगला बिल्डरने जोडली एक ५ वर्षं आधी बांधलेली बिल्डींग. सात मजली. २१ फ्लॅट एकूण. छोटी लिफ्ट, घराचे स्पेक्स पण अर्ध दशक जुने. अ इमारत.

आल्याआल्याच दोन बिल्डींगमधे संघर्ष चालू. अ मधे सगळ्यात छोटं घर ३५० स्क्वे फूटचं तर ब मधे १४०० चं. त्यामुळे सांपत्तिक स्थिती बद्दल दोघांच्याही अवास्तव कल्पना. अ वाल्याला वाटायचं ब वाल्याकडे बख्खळ पैसा आणि भरपूर पैसा म्हणजे तो माणूस हरामखोर. आणि ब वाल्याला  वाटायचं अ वाला गरीब. पण त्याला कुठं माहित होतं अ च्या लॉकरमधे किती सोनं दडवलं ते.

मग राम्या चालू झाला. दोन्ही बिल्डींगमधल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी. एकाच व्यासपीठावर बसवण्याची धडपड. आधी परिचय झाला, मग घसट वाढली. दोन्ही बिल्डींगचं पान राम्या शिवाय हलेना. राम्याला पण वाटलं, आपण कृष्णाचेच अवतार, शिष्टाई साठी पुढे. राम्या जीव तोडून सांगायचा. दोन दिवस झाले की पालथ्या घड्यावर पाणी.

राम्याचा दृढ विश्वास. की लोकं स्वत:ची विवेक बुद्धी वापरतील आणि भांडणार नाहीत. तो आपल्या भूमिकेवर दटून राहिला. दोन्ही बिल्डींगमधले लोक, ज्यांच्याशी राम्याची घसट वाढली होती, एकमेकात भांडू लागले.

राम्याच्या मनातून ही सगळी लोकं उतरू लागली. सात आठ वर्षं प्रयत्न केल्यावर मात्र त्याने हात टेकले. त्याने हात टेकल्यावर तो आता हेटाळणीचा विषय झाला. ज्यांच्याशी राम्याची घसट होती, त्यांच्याबद्दल राम्याच्याही मनात तिडीक उत्पन्न झाली. इतकी की राम्या तिथलं कुणी दिसलं की वाट चूकवू लागला. आणि राम्या दिसला की लोकंही दुसरी वाट धुंडाळू लागले.

गेली दोन वर्षं मी तसंही त्या सोसायटीत खूप कमी राहतो. मी, मोठा मुलगा आणि आई नांदेड सिटीत असतो. हा एक दगड मारून खुप पक्षी मारलेत मी. त्यापैकी हा पण एक.

अशी आमची सुंदर नावाची सोसायटी. जिथे एका कंपाऊंडमधे ४३ प्रोफेशनल कुटुंबं राहतात. हो, आणि कॉस्मो एकदम. मराठी आहेत, बोहरी आहेत, गुजु आहेत, ख्रिश्चनही आहेत. एक मयत सोडली तर एकमेकांशी भेटायला लोकांना कारण मिळत नाही.  विविधता मे एकता हे नुसतं वाचायला बरं वाटतं किंवा गोकुळधाम सोसायटीला टिव्ही वर बघून टाळ्या पिटू शकता. पण ते एक अपयशाचं मोठं कारण आहे हे बघायला अजून वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही. आमची सोसायटी पाहू शकता.

अतुल, तुझ्या लाईफ सायकलमुळे आठवलं. जखमच ती सुकलेली. खपली काढली की भळभळ वाहू लागते.

No comments:

Post a Comment