Tuesday 28 July 2015

नादिष्ट

फेसबुकमुळे मी बराच नादिष्ट किंवा छंदिष्ट झालो होतो. दोन महिने बाहेर होतो तरी आजही सोशल मिडीयात मला फेसबुकच जास्त आवडतं. घरच्यांना पण सॉलीड पटलं होतं की या माणसाला फेसबुकचा नाद लागला आहे म्हणून.
माझ्यासारखाच नीलला क्लॅश ऑफ क्लॅनचा नाद लागला होता. आ़यपॅड दिसला की झडप मारलीच म्हणून समजा. आई बापाची बोलणी पण खायचा.
मी फेबु डिअॅक्टिवेट केलं अन अॅप फोन आणि आयपॅडवरून उडवून टाकलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं तसं नीललाही वाटलं.
एके दिवशी कंपनीतून घरी आल्यावर आयपॅडवर नील नेहमीप्रमाणे तुटून पडला आणि दोनच मिनीटात माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहत म्हणाला "पप्पा क्लॅश ऑफ क्लॅन उडवलं" मी विचारलं "का" तर म्हणाला "तुम्ही नाही का तुमचं फेसबुक अकाऊंट उडवलंत, मग मी पण......."
असला येडा आहे तो.
नीलला तसं म्हणायला सवय नाही पण पेप्सी बिप्सी ओढतो अधूनमधून. मी रागावतोही त्याला. आपण कुठलाही नाद सोडला की नीलही सोडतो असं नुकतंच कळलं होतं. मी मनात प्रश्न तयारही केला "मी काय प्यायचं सोडलं म्हणजे तु पेप्सी प्यायचं सोडशील?"
मला त्याचं उत्तरही माहित आहे.
प्रश्न मी अजून विचारला नाही आहे. मी घुटमळतो आहे मनात. अगदी कॉम्प्युटरवर फेसबुकमधे कर्सर डिअॅक्टिव्हेट वर नेऊन घुटमळत होतो तसाच.
माझ्या मनात जे उत्तर आहे तेच त्यानं दिलं तर परत वांदे. इथे रिअॅक्टिव्हेट होणं माझ्या हातात होतं. पण तिथे?
नकोच तो प्रश्न!

No comments:

Post a Comment