Thursday 2 July 2015

जोखड

मुळात आहे ना, ज्या ज्या गोष्टी भारी म्हणून मिरवतो ना, त्या सगळ्यांचं जोखड फेकून देऊ यात:

- लोकसंख्या, काय कौतुक ती जास्त आहे ते. निम्मे प्रॉब्लेम त्यामुळे आहेत.

- वेगवेगळ्या भाषा: बोला रे. पण ती अस्मिता वैगेरे गुंडाळून ठेवा हो. काय चाटायचं त्या अस्मितेला. आणि प्रेम करा हो भाषेवर अस्मिता कुठली बाळगता.

- वेगवेगळे धर्म: या प्रकाराने जितकी आपली धुलाई केली आहे ना त्याला तोड नाही. घरात पाळा हो. कशाला पाहिजे आरत्या म्हणायला लाऊडस्पीकर. बोंबटण्याने देवाला कळणार का तुम्ही आहात म्हणून. झालंय कसं निधर्मी राष्ट्र, म्हणजे निधर्मी, कुठल्याही धर्माची कास न ठेवणारे. निशस्त्र, कुठलेही शस्त्र नसलेले, निर्भय, कुणाचेही भय नसलेला तसं निधर्मी. या समाजव्यवस्थेने आणि राजकारणाने निधर्मी शब्दाचा उलटा शब्द समानार्थी म्हणून प्रचलित केला, आणि तो म्हणजे सर्वधर्मसमभाव. सगळ्याच धर्माचं लांगूलचालन करा. तुम्ही मिरवणूका काढा, मग तुम्हीही काढा. तुमच्या धर्माचा महापुरूष, त्यांच्या जयंतीला सुट्ट्या मग तुमच्याही महापुरूषाला सुटट्टया. धर्म अंगीकारून जगायच्या ऐवजी त्याचा गर्व करतो आपण.

इतिहास: उज्वल भविष्याची आस ठेवण्याऐवजी उज्वल भूतकाळावरून पाठ थोपटून घेतो आपण. शून्य आम्ही जगाला दिलं, आमचे बाण म्हणजेच आजचे क्षेपणास्त्र, काही हजार वर्षापुर्वी आमच्याकडे विमानं होती म्हणे, गणपती म्हणजे पहिली प्लास्टिक सर्जरी आणि कौरव म्हणजे स्टेम सेल टेक्नॉलॉजीचा पहिला प्रयोग. हो, सगळं मान्य, पुढं काय? घराण्याचं खापरपणजोबाचं नाव आठवत नाही आपल्याला पण हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टींचा अभिमान मात्र बाळगता येतो. कुणाला येडं बनवतो आपण. आपल्यालाच.

ही डोक्याभोवती आवळलेली आवरणं जोपर्यंत फेकून देत नाही तोपर्यंत काही खरं नाही रे मित्रा.

No comments:

Post a Comment