Thursday 16 July 2015

"चक दे"


मी काही फार मोठा चित्रपट समीक्षक नाही. जे समोर येत गेलं ते पाहत गेलो. पटकथा सशक्त असेल तर चित्रपट सुंदर बनतो इतकं कळलं. अर्थात हे मत झालं. वयोपरत्वे आवड ही बदलत गेल्या. मैने प्यार किया, हम आपके है कौन, कयामत से कयामत तक, दिल वैगेरे सारखे पिक्चर आता बोर वाटतात.

गेल्या काही वर्षात असे सशक्त पटकथेचे काही चित्रपट पाहण्यात आले. लगान, wednesday, सरफरोश, तारे जमीं पर, स्वदेस, इक्बाल, थ्री इडियटस, जो जीता वोही सिकंदर. हे  पटकन आठवतील असे. पण जर कुठल्या चित्रपटाने मनावर गारुड केलं असेल तर तो म्हणजे "चक दे".

हॉकी एकेकाळचा आपला राष्ट्रीय खेळ. ध्यानचंद/रुपचंद असताना २४-० वैगेरे आपण धुतला आहे लोकांना. पण या देशात अनेक गोष्टींना उतरती कळा लागली तशी हॉकी ला पण. पण याच खेळला मध्यवर्ती कल्पनेत घेऊन चक दे ची कथा बांधली आहे, तिला तोड नाही. तुम्ही आठवा, या चित्रपटाचं नाव घेतलं की तुम्हाला कबीर खान झालेला शाहरुख आठवत नाही, त्याचा डायरेक्टर कोण आहे लक्षात नाही, प्रोड्युसर चा पत्ता नाही. लक्षात राहते ती कथा, ती फायनल म्याच.

पहिल्या फ्रेम पासून चित्रपट आपल्यावर पकड घ्यायला चालू करतो. कबीर खानचं इंडियन वुमन हॉकी टीम चा कोच होणं आणि नंतर त्या अख्या टीमला एकत्र आणून प्रशिक्षण देणं आणि त्या सगळ्यांची मोट बांधून एक सशक्त संघ तयार करणं हा एक आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव आहे. उशीर झाला म्हणून सबरवाल ला परत जायला सांगणं, बिंदिया/गुंजन/आलिया या तिघा वात्रट पोरींना जागा दाखवणं, कोमल आणि बलबीरला त्यांच्या नैसर्गिक गुणवत्ते बरोबर संघाचं स्थान आधी हे पटवून देणं, सॉफ्ट स्पोकन विद्या शर्माला संघाचा कर्णधार करणं अशा अनेक घटना मधून एखादी टीम घडवताना काय काय उदयोग करावे लागतात याचं यथार्थ चित्रण केलं आहे.

मुलींना मनातून अगदी असं वाटत असतं की जे चालू आहे, म्हणजे कबीर खानची मनमानी, ती योग्य आहे. पण सामान्य माणसाला असलेला resistance to change आडवा येतो. आणि मग त्या सगळ्या जणी मिळून बंड करतात कोच विरूद्धच. ती सगळी घालमेल फेअरवेल पार्टीला छेड काढणाऱ्या गुंडावर उतरवतात. कर्तृत्व फुलवण्यासाठी प्रतिकूलता तयार व्हावी लागते हेच खरं.

वुमन हॉकी टीम आणि पुरुष हॉकी टीमची लढत पण अगदी उत्कंठावर्धक केली आहे. आणि त्यात मुली हरलेल्या दाखवल्या ह्यात दिग्दर्शकाचं यश आहे. मुली जिंकलेलं दाखवू शकत होता तो. पण जे अतर्क्य ते पचवायला अवघड जातं.

कर्णधार करावं म्हणून बिंदिया सर्वस्व दयायला निघते, त्यावेळेसचा कबीर खानचा निग्रहाचा नकार त्या सीनला वेगळ्याच उंचीवर पोहोचवतो.

फायनलच्या पार्टीला कबीर खान, प्रीती आणि कोमल ला बोलावून ऑस्ट्रेलिया चा कोच तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तेव्हा बघा बुवा आता, असं म्हणून सोडून देतो.

चित्रपटाचं संगीत ही अगदी संयुक्तिक आहे. बादल पे पाव है, चालू होतं आणि ते विमान ऑस्ट्रेलिया ला पोहोचतं तेव्हा आपणही त्या विमानात आहोत असा एक फील येतो. मौला मेरे ले ले मेरी जान म्हणतानाची आर्तता विठ्ठला ला साद घालताना जी भावना येते, तिच्याशीच मिळतीजुळती.

अर्थात, हिंदी चित्रपटात मेलोड्रामा लागतोच. त्या न्यायाने काही बावळट सीन आहेतच. उदा: एक गोरे को पहिली बार तिरंगा लहेराते हुए देखा है ही forced  patriotism ची लाईन. किंवा प्रीती सबरवाल आणि कोमल एकमेकांना गोल करू देतात, तो ड्रामा. पण चित्रपटाच्या सुंदरतेला काजळाचा तीट म्हणून खपून जातं ते.

एकूणच एखादा माणूस, ज्याला आयुष्यात काही तरी करून दाखवायचं आहे, आणि ते साध्य करताना येणारे ताणताणाव, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेवावं आणि त्यांनी मात्र ढकलून द्यावं, अशी माणसं भेटतात, अपरंपार कष्ट, कठोर निर्णय घेताना होणारी कुचंबणा, योग्य दिशेने चाललो आहे की नाही या स्वत:च्या क्षमतेची दरवेळेस लागणारी कसोटी, कधी काही अनाहूत पणे चुक झालीच तर वाट्याला येणारी अवहेलना, या सगळ्यांची भावनिक आंदोलनं कबीर खानच्या रूपाने आपल्या समोर येतात आणि त्या भूमिकेचच आयुष्य जगणारी माझ्यासारखी माणसं पिक्चर बघताना अक्षरश: गुंगून जातात.



No comments:

Post a Comment