Monday 29 June 2015

नागपूर पार्ट १

मला असं नेहमीच वाटत आलं आहे की जगण्याची संधी जरी पुण्याने दिली तरी संधीचा दरवाजा ठोठावण्याची अक्कल मात्र नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर शहराने दिली. नाशिक अन औरंगाबादमधे तर माझं लौकिकार्थाने शिक्षणच झालं, पण ८३ ते ८६ या उन्हाळ्यात मी नागपूरला जे जगलो, त्याने प्रचलित शिक्षणाव्यतिरिक्त जीवनाचे विविध कंगोरे दाखवले हे नि:संशय. माणूसकी, प्रेम, संयमित व्यावहारिकता याचा थोडा जरी अंश माझ्यात उरला असेल तर तो नागपूरमुळे आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. 

काही नाती अशी असतात की त्याला नाव नसतं. माझं आणि साधनाताईचं असंच एक नातं. साधनाताई खरं तर माझी आत्या. आत्या का तर ती बाबांना दादा म्हणायची म्हणून. बाकी काही नाही. पण तिचे भाऊ जे माझ्या वयाचे होते, तिला साधनाताई म्हणायचे मग मी पण तेच बोलवायला लागलो. आता तिची मुलं मला मामा म्हणतात. 

उत्साह या शब्दाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला साधनाताईला भेटायला हवं. क़ायम उत्फुल. नाशिकला आम्ही रहायचो. घिसाडांचं घर टिळकवाडीत आणि आम्ही दिंडोरी रोडला. हो, घिसाड आडनाव. तिच्या सुस्वरूपतेला आणि स्वभावाला न शोभणारं. आपल्या वागण्यानं क़ायम समोरच्यावर क़ायम आनंदाचा शिडकावा शिंपडणार्या साधनाताईचं आडनाव लग्नानंतर उन्हाळे असं व्हावं ही  अजून एक गंमत. सहा सात वर्षाच्या कौटुंबिक जिव्हाळ्याची मैत्री घट्ट नात्यात कधी परिवर्तित झाली हे दोन्ही घरातल्या लोकांना कळलंच नाही. 

मला नक्की वर्ष आठवत नाही पण ८२-८३ असावं. साधनाताईचं लग्न झालं आणि ती नागपूरला आली, तिथल्या उन्हाळ्यात नांदायला. हो, तिचं आडनाव आता उन्हाळे झालं. गिरीश उन्हाळे, तिचा आत्येभाऊ. त्यांनीच मागणी घातली तिला. गिरीश, खरं नाव विसरलो पण काहीतरी देवाचं नाव आहे, त्यांना बाळ म्हणायचे. लग्न करायला नाशिकला आले तेव्हा काहीजण त्यांना बाळ, काही बाळदादा तर काही बाळ्या म्हंटलेलं आठवतंय. या सगळ्यांचं रूपांतर लग्नानंतर बाळासाहेब अशा भारदस्त नावात झालं. वरपक्षाच्या रूममधे गेल्यावर बाळासाहेबांच्या व्यवस्थित ठेवलेल्या बँगेत विल्सचं पाकीट माझ्या नजरेने हेरलं होतं. "तुझा नवरा सिगरेट पितो" हे मला साधनाताईच्या कानात जाऊन सांगायचं होतं. पण ती उबळ दाबून धरली. 

बाळासाहेब, नावाबरोबर सध्या त्यांची नंतर तब्येतपण भारदस्त झाली, पण आपण त्यांना गिरीशच म्हणू. अतिशय सॉफ्टस्पोकन, मृदू बोलणारे. नागपूरच्या कानाला गुदगुल्या करणार्या शिव्यांमधल्या "आयला, मायला, साल्या, भोसडीच्या" इतक्याच काय त्यांच्या तोंडून पडायच्या. कदाचित बालमनावर विपरीत परिणाम नको म्हणून माझ्यासमोर ते ठेवणीतले मंत्रोच्चार करत नसावेत. बोलणंही एकदम हळू. फोनवर बोलत असतील तर शेजारच्या माणसाने कितीही कान टवकारले तरी एखादा शब्द ऐकू आला तर शप्पथ. राहणं एकदम टापटीपीचं. कडक इस्त्रीचे कपडे, कायम शर्ट आत खोचलेला, चापूनचोपून पाडलेला भांग, एकदम भारी पर्फ़्यूम अन डोळ्यावर गॉगल असा एकदम टकटकीत मामला होता. पण या सगळ्या प्रकारात भपका कुठेही नव्हता. तर ते सगळं त्यांना शोभून दिसायचं. 

आजही मी बाळासाहेबांना फोन केला की ते "हा, बोल राजेश, कसा आहेस" अशी शांत आवाजात एकदम साधी, अळणी म्हणा हवं तर, सुरूवात करतात अन साधारण आमचं संभाषण दीड मिनीटात संपतं. याउलट साधनाताई ला फोन केला की "अय्या राजेश, किती दिवसांनी फोन केलास रे" अशी दणदणीत सुरूवात होऊन मग अधूनमधून "अजून काय म्हणतोस" असं म्हणत संपलेलं संभाषण पुन्हा पुढे नेत अाणि मग माझ्यानंतर वैभवीशी, मग वहिनीशी म्हणजे माझ्या आईशी बोलून साधारण अर्ध्या पाऊण तासाने ती फोन खाली ठेवते. सौंदर्याचा निकष लावला तर साधनाताई रूपवान अन गिरीश स्मार्ट पण ताईइतके नाही. पण कपड्यांची टापटीप बाळासाहेबांची साधनाताई पेक्षा उजवी. असं परस्परविरोधी असणारी ही जोडी माझ्या लेखी लक्ष्मी नारायणापेक्षा काही कमी नव्हती. 

आयुष्य कसं जगावं याचे आपले काही ठोकताळे असतात. त्याला आदर्श असंही म्हणतात. 

गिरीश आणि साधनाताईचा संसार बघून मी माझ्याही आयुष्याचे ठोकताळे मांडू लागलो.  

क्रमश: 

No comments:

Post a Comment