Thursday 4 June 2015

परभणी २

घराच्या दक्षिणेकडे तीन घरं. सोबणे, डांगे अन देशपांडे. फाटकाच्या कोपर्यावर सरू आजी. माजघरात एक मोरी होती. तिचा वापर आम्ही पोरं आंब्याच्या कोयी साठवण्यासाठी करत असू. हो, आंब्याच्या कोयींचा खेळ असायचा. आठ कोयींची एक रांग, परत पुढे आठ कोयींची रांग आणि सगळ्यात पुढे गट्टू. ५ ते ६ फुटावर उभं राहून आम्ही आमच्या कोयीने ढाय उडवायचो. जितक्या उडतील, त्या आमच्या. गट्टू उडवला तर सगळ्या कोयी आपल्या. डांग्यांचा शाम champion होता खेळात. लेफ्टी अन चकण्या, दणादण गट्टू उडवून अख्खी ढाय मारायचा. मी हरलो की त्या ,मोरीत जाऊन कोय कपाळावर आपटून रडायचो. तरी बरं उन्हाळ्यात दररोज आंब्याचा रस घरात होत असल्यामुळे ५०-१०० कोयी जमा व्हायच्या. पण माझा जीव त्या खेळातल्या कोयींमध्ये अडकला असायचा. खेळत शाम्या माझा दुश्मन असला तरी बाकी वेळेत  जानी दोस्त होता.

स्वयंपाकघरात आजी कायम काम करत असायची. जेवणाचं बनलं की एखादी चटणी कुट नाहीतर मुसळीवर मसाला कर, नाहीतर रवी वापरून ताक बनव. आणि ती ४ एक फुटी रवी होती अन तिला फिरवायला जाडजूड दोरी होती. सगळ्यांचं करून सवरून बाकी बायका आडव्या पडून गप्पा मारू लागल्या की आजी एकटीच साधारण २-३ वाजता जेवायची. कायम २५-३० पान वाढणाऱ्या आजीला आयुष्याच्या शेवटी एकटीला करून ११ वाजता एकटीनेच जेवावं लागलं हे तिचं दुर्दैव.

देवघरात पंगत बसायची. वदनी कवळ घेता चा उद्घोष झाला की सगळे गप्पा टप्पा मारत जेवत. पण भंकस नसायची. कुणाची टाप. समोर आजोबा, केशवराव डंक, दस्तुरखुद्द बसले असायचे.

आजोबा, एक दणदणीत व्यक्तिमत्व. कधी कुणावर भडकलेले मी बघितलं नाही. पण जरब च अशी होती की कोण टूरटूर करेल. काळा कोट, आत पांढरा शर्ट, खाली धोतर अन डोक्यावर टोपी. कपाळावर आडवं गंध. हातात छत्री नाहीतर काठी. चालू लागले की त्यांच्या रस्त्यावर चिडीचूप. एकटेच बसले असायचे. कचेरीत. दुपारी त्यांना जेवायला बोलवावं लागायचं. कुणाची टाप नसायची त्यांना बोलवायची. आम्ही नातवंडा पैकी एक कुणीतरी जायचं. मी दारातूनच बोलवायचो, अन तिथंच दाराशी उभा राहयचो. ते उठले की मग हलायचो. पूजा खणखणीत चालयची. पूजेच्या खोलीत मी त्यांना शीर्षासन करताना बघितल्याचे स्मरते. मी कधी अनुभवलं नाही पण आई सांगते, ६-७ भाषा यायच्या त्यांना. शाळा, गोरक्षण संस्था यांच्या विश्वस्त मंडळावर होते ते.

मुक्ताजीन हे अनेकांचे ऋणानुबंध असलेले ठिकाण होते. किती लग्नं, मुंजी त्या आवारात झाल्या याला गणती नाही. आजोबा सगळ्यांना मदत करावयास तत्पर असावेत.

हैदराबाद च्या नाईकांची होती ती मुक्ताजीन. काळाच्या ओघात नाईकांनी त्यांच्या मराठवाड्यातल्या सगळ्या स्थावर मालमत्ता विकायला काढल्या. त्यात मुक्ताजीनही विकली गेली. साधारण ८२-८३ ची गोष्ट असावी. समद नावाच्या गृहस्थाने विकत घेतली. मालक बदलल्यावर काही वर्षात जीनला अवकळा आली. समदचा मुलगा फ़ज्जु, पंचविशीतला असेल, आजोबांशी हसत बोलायचा, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचे. त्या सगळ्या प्रकारात आजोबांना खूप मनस्ताप झाला असावा असे मला आता वाटते. कदाचित तो मानसिक त्रास त्यांना सहन झाला नसावा. १९८८ साली त्यांचे निधन झाले.

पुढे काळ मोठा निष्ठुर होत गेला. १९९१ साली मामाचे अपघाती निधन झाले. पुढे पुढे मुक्ताजीन ला अवकळा आली. सगळे आपापल्या संसारात रमले. आजी एकटीच त्या घरात राहू लागली. नाही म्हणायला मधु मामा काळजी घ्यायचा. तो मुलखाचा दारुडा. पण आजीवर लक्ष ठेवून होता हेच नशीब. २००० च्या सुमारास डंक कुटुंबाने मुक्ताजीन वर पाणी सोडलं.

फेसबुक च्या परभणीकर ग्रुपच्या ओढीने मी परभणीला गेलो मागच्या वर्षी. आजोळ बघावं म्हणून गेलो तर अक्षरश: खंडहर उभी होती. माझं आजोळ, तो राजमहाल  काळाच्या उदरात गडप झालं होतं. भिरभिरत्या नजरेने मी त्याच्या जवळ एका घराजवळ थांबलो आणि विचारलं की इथे केशवराव डंक यांचं घर होतं, कुठे आहे ते सांगू शकाल का? तर म्हणाले, कोण डंक तो दारुड्या. मला एक जोरात हुंदका आला. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. मी स्कूटर ओढली. तो माणूस, काय झालं, थांबा वैगेरे म्हणू लागला. मी त्याला हातानेच खुण केली, की  बास आता. नजरेला नरक दिसला, अन कानात शिसे ओतले.

मी परत परभणीला गेलो तर, तिकडे नजर ही टाकणार नाही अशी शप्पथ खाल्ली.

क्रमश:

परभणी २

   

2 comments:

  1. मनाला भिडणारंय.माझ्या आजोळच्या घरची , रहिमतपुरची परिस्थिती याहून वेगळी नाहीये. ते घर एकेकाळी सावकाराचं घराणं होतं. केवढं घर..एका वेळी 22 माणसं असलेलं घर आता खरंच खंडहर झालंय. सगळे पांगले. आजी आजोबा गेले. मामाला झेपेनासं झाल्याने मुलाकडे रहायला आला. आता त्या घरातले मागच्या पिढीतले देव कोणीतरी येण्याची वाट बघत आहेत.

    ReplyDelete
  2. मंजिरी, ब्लॉगवरच्या कॉमेंट वाचायची सवय नाही. त्यामुळे सादाला प्रतिसाद द्यायचा राहिला. खरंय तुम्ही लिहीलं ते

    ReplyDelete