Tuesday, 8 March 2016

JV

In 2012, myself and my business partner sold our stake of our company to Setco, the first question that was asked "Why did you sell maximum stake of your US company?" It is nice question. But the hidden question was "Are you idiot to sell your own stake?". When I observed that many friends and technocrats have asked this question, I gave a thought and asked question to myself  "Am I really fool to sell my own company?"
The first thing which every one would say "Look, you will be thrown out of  company in next 3 years". We are running in 4th year of JV and there are no signs that to happen. In fact the bond is growing stronger, every day.
The another statement "Be aware, some one from abroad will sit on your head and you will have to dance on his tunes." To tell you frankly, there is no change in our status and we still have freedom to take decisions which are in the best interest of the company. Our principal from  will act as catalyst to expedite for decisions of expansion, they  give advice on cash flow management. In fact they support us morally and help is to expand methodologically, analytically. 
"Remember, your name will be wiped out of market" Indeed, it happened. But not because of them. It was we, who proposed to change our company name from Ultra Precision Spindles Pvt Ltd to Setco Spindles India Pvt Ltd. There are certain reasons behind it. And we do not have any regrets giving up our name which was otherwise our brain child. 
I wonder, why this JV between big US company and macro Indian company is going great?. I think one of the main reasons is transparency in transactions. We used to have weekly call in initial days. But, now after 4 years, we do not call each other for months together. We meet once in 4 months, hold our board meeting, exchange our thoughts, decide on actions and work on it. We do have difference on opinions on certain issues. But while arguing, both the companies know that it is debated in the best interest of company and not to pamper individual's ego. 
I would like to state here that JVs are not that bad as said by many owners, in particular of SMEs.  If you look at your own enterprise by bird's eye view, JVs work wonders, where you enjoy liberty in taking decisions by having international exposure in all areas of business. 
Rajesh Mandlik (9822454204,RajeshM@Setco.com)

Sunday, 6 March 2016

५ मार्च २०१६.

शनिवार ५ मार्च २०१६, एक संस्मरणीय दिवस होता माझ्यासाठी.

फेसबुक वर मित्र आहेत डॉ जयंत पाटील, प्राचार्य आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि शिरपूर चे. स्वतः एम टेक आय आय टी खरगपूर अन डॉक्टरेट. अशा उच्च विद्याविभूषित माणसाला ह्या फेबु मुळे आपण मित्र वगैरे म्हणू शकतो, हे थोर आहे. तर
सरांनी मला वीस एक दिवसांपूर्वी फोन केला अन म्हणाले "मी तुमच्या पोस्ट वाचतो. तुम्ही आमच्या कॉलेज मध्ये entrepreneurship विषयावर मेकॅनिकल इंजि च्या फायनल इयर च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधाल का?" हो तर म्हणून गेलो मी. पण मनात आलं हे म्हणजे होतकरू फलंदाजांसमोर आशिष नेहरा ला उत्तम batting कशी करावी हे सांगायला बोलावण्यासारखं आहे. पाटील सर थोडे गल्ली चुकले का?

तर पोहोचलो सकाळी साडे आठ नऊ च्या सुमारास. आणि मग डोळे विस्फारत ते कॉलेज अन शिरपूर गावाची महती ऐकली, अनुभवली. भव्य बिल्डिंग, व्यवस्थित मेन्टेन केलेली लश ग्रीन लॉन, वातानुकूलित क्लास रूम, हजारो कॉम्पुटर असलेल्या लॅब, मॉडेल न ठेवता वर्क शॉप मध्ये खऱ्या मशिन्स, खेळण्याचं ग्राउंड, भली मोठी लायब्ररी, आणि सकारात्मकतेने भारलेलं असं ते कॉलेज.

अन गावभर काँक्रिटिकरण झालेले प्रशस्त रस्ते, उन्हाळा तोंडावर आलेला असताना पाणी टंचाई आसपास न फिरकणारी जल व्यवस्था, अंडर ग्राउंड ड्रेनेज सिस्टम असणारी नगरपालिका, पंधरा वर्षांपूर्वी ३५०फुटावर गेलेलं वॉटर टेबल आता जलसंवर्धनामुळे ३० फुटावर आलं आहे ते, कापूस पिकून तो बाहेर जाऊ नये म्हणून दहा हजार लोकांना जॉब आणि शेतकऱ्यांना मार्केट मिळवून देणारं टेक्स्टाईल पार्क, आशियातील पहिली गोल्ड रिफायनरी, हो, गोल्ड रिफायनरीच, कुठल्याही किमतीला शेत जमीन न विकण्याची मानसिकता. हो हो, मी आपल्याच देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या अमरीश पटेल नावाच्या नेत्याने केलेली करामत केलेलं गाव विस्मयचकित होऊन बघत होतो.

आणि मग अकरा वाजता माझं Entrepreneurship Development वर बोलणं चालू झालं. पोरांना विचारलं, मराठीत बोलू का. होकार मिळाल्यावर जीव भांड्यात पडला. आणि मग एकेरी, दुहेरी धावा घेत मग जसे चौके, छक्के बसू लागतात तसं ते भाषण रंग भरू लागलं. हंशे वसूल होऊ लागले अन प्रसंगी टाळयाही पडू लागल्या. माझा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. त्या मुलांचं अन प्रोफ़ेसरांचं काय मत झालं ते तेच जाणे, पण मी मात्र ते १२० मिनिटे खूप एन्जॉय केले. हो, तब्बल दोन तास बोलत होतो. ज्या तत्वांना धरून हा बिझिनेसची नैय्या हाकली, ते सगळे पत्ते ओपन केले. आणि प्रश्नोत्तराच्या वेळे नंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो कित्येक दिवस माझ्या कानात गुंजत राहील. त्या दोन मुली आभाराचे भाषण वाचत होत्या अन मी उभ्या जागी थिजलो होतो.

शप्पथ सांगतो, मिळेल त्या वाहनाने इंटर सिटी प्रवास करण्यापासून फ्रिक्वेन्ट फ्लायर झालेल्या अन १९९४ साली एम ८० वरून मार्केटिंग करत आज वातानुकूलित कार मध्ये बिझिनेस मिटींगला जाणाऱ्या राजेश पेक्षा हा वयाच्या १२ व्या वर्षी पहिलं भाषण ३ मिनीटेही न बोलू शकणारा आणि आता १२० मिनिटे extempore बोलू शकणारा राजेश मला स्वतः ला जास्त भावला. आयुष्य सार्थकी लागलं.

अशा प्रसंगी तो मिळालेला बुके वक्ता तिथं सोडून जातात. मी मात्र तो घेतला बरोबर. त्या गुलाबाच्या सुवसाबरोबर मी १२० क्षण मी अंगात भिनवून घेतले. माझ्या मनाच्या कुपीत ते क्षण आता बंदिस्त झाले आहेत.

ध्यानी मनी नसताना त्या कॉलेजने पाकीट हातात दिलं, मानधानचं. हे काही बोललो नव्हतो मी, पण पाटील सरांनी आग्रहाने घ्यायला सांगितलं. वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेल्या पहिला पगार अन आयुष्याच्या या टप्प्यात  दैनिक सामना ने सदर लिहिल्याबद्दल दिलेला चेक अन हे पाटील सरांनी दिलेलं पाकीट, प्रत्येक वेळी आनंदाची अनुभूती तीच. रक्कम किती ते महत्वाचं नव्हतंच कधी. भाव महत्वाचा.

आनंद शितोळे म्हणालेच आहेत "फेसबुक म्हणजे हातात मिळालेली जळती काडी आहे. मग तिने स्वतः ला च प्रकाश देणारी पणती पेटवायची, की दुसर्यांना प्रकाश दाखवणारी मशाल पेटवायची की सगळंच दहन करणाऱ्या मारुतीच्या शेपटीला आग लावायची, हे तुम्ही ठरवायचं"

मला मात्र आयुष्याला अर्थ देणारे अनेक अध्याय फेसबुकमुळे वाचायला मिळाले आणि अजून कित्येक वाचायला मिळतील या बाबत माझ्या मनात शंका नाही. 

Thursday, 3 March 2016

कॉमेंट्स

मला काही मित्र सांगतात की पुस्तक काढ जे लिहितो त्याचं. मागे यावर थोडं लिहिलं होतं. फेसबुक किंवा ब्लॉग लिहिणं हा एक फॉर्म आहे. आपल्या क्रिकेट मध्ये कसं टेस्ट, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी तसं.  पुस्तक लिहायला एक कमिटमेंट लागते. फेसबुक वर मित्र यादीच्या १०-२०% लाइक मिळवणारा माणूस लेखक होऊ शकेल यावर मला शंका आहे. हं, कदाचित त्याच्यात लिहिण्याचा किडा असेल, पण ती सवय कल्टिव्हेट करण्यासाठी खूप पापड बेलावे लागतील.

फेसबुक वर लिहिलं जातं त्यात लांबीची फक्त काळजी घ्यावी लागते. रुंदी ची काळजी तुमचा स्क्रीन घेतो. मोबाईल, आय पॅड, डेस्कटॉप, काहीही असलं तरी रुंदी फिट बसते. बाकी फेसबुक वरच्या लिखाणाला खोली कुठे लागते? ती लागत नसल्यामुळे मी खूप फडफड करू शकतो. त्यामुळे कंटाळा न येईपर्यंत च्या लांबीत शब्द संपदा घुसडली की जमतं सगळं.

अगदी खरं सांगायचं तर, मला तर माझ्या पोस्ट वरच्या कॉमेंट्स जास्त आवडतात. म्हणजे, आता नावं लिहित नाही, काही मित्र अगदी कॉमेंट स्पेशालिस्ट आहेत. म्हणजे ते पोस्टत नाहीत पण त्यांच्या कॉमेंट्स! क्या कहने. म्हणजे काही उत्तम लिहिणाऱ्या लोकांच्या कॉमेंट्स छान असतात च. पण मी लिहितो ती कॅटेगरी वेगळी. हे कॉमेंट पटू. प्रतिक्रियावादी. कधी संवादी तर कधी विवादी. त्यांच्या कॉमेंट्स मध्ये भावोत्कटता असते, अभिनंदन असतं, मैत्र असतं, हास्य असतं आणि कधी चीड ही. एक माझे मित्रवर्य असे ही आहेत की जे पोस्ट ला सहमत असतील तर लाइक ठोकून जातात अन नसतील तर खडूस, तिरसट अशी कॉमेंट आवर्जून करतात. माझे तर कित्येक ओळखीचे लोकं म्हणतात ही "राजेश, तु ठीक लिहितोस, पण त्या वरच्या कॉमेंट्स बहारदार असतात" मला तर हे ऐकून कधी कधी असं वाटतं की आपण काही न पोस्टताच कॉमेंट पडाव्यात.

मी स्वतः उत्तम कॉमेंट कर्ता नाही आहे. त्यामुळे मी कॉमेंटत नाही. मागे त्यामुळे आत्ममग्नतेचा माझ्यावर आरोप केला. म्हणजे काय तर मी माझ्याच पोस्ट वर बागडतो. खरंही असेल ते. पण पोस्ट लिहायची, कॉमेंट वाचायच्या, शक्य तिथे रिप्लाय द्यायचा अशी देशोन्नतीची कामं केल्यावर परत दुसऱ्यांच्या पोस्ट वाचायच्या अन त्यावर ही कॉमेंटायचं. खूप होतं ते. त्यामुळे अगदी वाचेल त्या पोस्ट वर कोमेंटायला होत नाही. आता काही पोस्ट असतात च अशा की जिथे प्रतिक्रिया क्रमप्राप्त असतं. आणि झालंय असं की पुण्यात 30 वर्ष राहिल्यामुळे दुसर्यांची स्तुती हात राखून करतो अन विद्रोह, अस्मिता वैगेरे भावनांशी तोंड ओळख नसल्यामुळे कॉमेंट पण एकदम सपक.

असो. तर सदर पोस्ट समस्त कॉमेंट कर्त्याना समर्पित. तुमच्या अशा विविध रसांनी ओथंबलेल्या कॉमेंट नसत्या तर हे प्रकरण फारच निरस असलं असतं.

आणि हो, आता मित्रांना सांगतोच आता की पोस्ट पेक्षा कॉमेंटचं संकलन करतो अन त्याचं पुस्तक काढू. माझ्या पोस्टीपेक्षा ते नक्कीच जास्त वाचनीय असेल. 

Tuesday, 1 March 2016

समास

एक ट्रेनिंग प्रोग्रॅम चालू होता. काही सिनियर मंडळी होती, काही हुशार लोकं पण होती. या सगळ्यामध्ये एक frail, दोन वर्ष अनुभव असलेला तरुण पण होता. चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या मुलाकडे कुणाचं लक्ष असण्याचं कारण नव्हतं. त्यालाही त्याची जाणीव होती. एका कोपर्यात तो निमूटपणे बसला होता.

 ट्रेनर ने चार भूमितीचे आकार सांगितले. सर्कल, त्रिकोण, चौरस आणि चौथा आकार म्हणजे विचित्र होता झेड आकाराचा.

सहभागी असलेल्या लोकांना त्यांनी आवडता आकार कुठला ते लिहायला सांगितले. मग प्रत्येक आकार तो म्हणायचा आणि ज्यांना तो आवडतो त्यांनी  हात वर करायचा.

सर्कल, उपस्थितांपैकी 8 एक जणांनी हात वर केले.

त्रिकोण, 12 जणांनी हात वर केले.

चौरस, 10 जणांनी अनुमती दाखवली.

झेड आकार आवडतो असं सांगणारा मात्र एकंच दिवटा निघाला. सगळे जण त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. त्याला ही खूप अवघडल्यासारखं वाटू लागलं.

त्या ट्रेनर ने प्रत्येक आकाराचा अर्थ सांगायला सुरुवात केली. सर्कल आवडणाऱ्या लोकांचे गुणविशेष, त्रिकोण ज्यांना भावतो त्याची खासियत आणि चौरस ज्यांना आवडतो ते कसं काम करतात हे सांगितलं.

आता राहिला झेड आकाराचा अर्थ. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर कुतूहल तर ज्याने झेड आकार आवडतो असं सांगितलं त्याला टेन्शन. झेड, हा काय आकार आहे. कुठून ते लिहिलं असंही वाटून गेलं.

ट्रेनर म्हणाला "शक्यतो झेड आकार ज्यांना आवडतो ते हुशार नसतात, पण आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे असतात. आलेल्या परिस्थितीला तोंड कसं दयायचं हे त्यांच्या पटकन लक्षात येतं, कारण ती लोकं रिजिड नसतात, तर adaptable असतात. We should have at least one in the organisation who likes Z shape and we are lucky to have one in our group"

अचानक त्या मुलाकडे सगळे कौतुकाने पाहू लागले. सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं.

अगदी शब्दांच्या गर्दीत, एरवी दुर्लक्षित असलेला, समासातला शब्द, लक्ष वेधून घेतो, तसंच.

😊😊

यश अपयश

इंटरव्ह्यू घेताना बऱ्याचदा अशी लोकं येतात की ज्यांचा आधी स्वतः चा बिझिनेस असतो. पण काही कारणामुळे तो अयशस्वी झाला असतो.

ह्या लोकांकडे त्या जॉब ला लागणारे क्वालिफिकेशन आणि अनुभव असतो. पण तरीही ते स्वतः त्यांच्या बिझिनेसमध्ये अपयशी झाले असतात, यामुळे मनात त्यांच्या capability बद्दल एक शंका तयार होते. जर ते स्वतः चा बिझिनेस वाचवू शकले नाही तर दुसऱ्याचा कसा सांभाळू शकतील हा प्रश्न उभा राहतोच.

मला कळतं की असं pre occupied notion मनात असणं हे त्या माणसावर अन्याय करणारं आहे. पण मी अशा लोकांना बोर्ड वर घेऊ शकलो नाही हे वास्तव आहे. ही पॉलिसी चुकीची असू शकते याचा मी बर्याचदा विचार करतो.

मनातच काही पॉलिसीबद्दल रिजिड राहून एखाद्या गोष्टीकडे बघणं कसं चुकीचं ठरू शकतं याचं फार मार्मिक उदाहरण ली आयोका याने आपल्या आयोका बाय आयोका या आत्मचरित्रात दिलं आहे. आयोका ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी. आयोका फ़ोर्ड कंपनीत इंजिनियर म्हणून जॉईन झाले आणि प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचले. फोर्डला मस्टांग सारखी अनेक अपत्य त्यांनी दिली. ते इतके लोकप्रिय होते की अमेरिकेचे प्रेसिडेंट कँडिटेट असणार होते. बर्याच अँड मधे ते स्वत:च असायचे. मतभेदामुळे त्यांनी फ़ोर्ड सोडली, रादर he was fired. आणि त्यानंतर त्यांनी क्रायसलर ही भारतात फार लोकप्रिय नसलेली, पण बिग थ्री पैकी एक जॉईन केली. क्रायसलर पूर्ण डबघाईला आली होती आणि तिला आयोकांनी कसं उर्जितावस्थेत आणलं त्याची चित्तथरारक कथा त्या पुस्तकात आहे.  (आयोका चा उच्चार आयकोका करायचा असतो म्हणे. फारच अवघड स्पेलिंग आहे त्याचं. कंस चालू झाला तर अमेरिकन आडनावाचा एक क़िस्सा सांगून टाकतो. आमचा एक परिचित आला होता ज्याचं आडनाव होतं आयकानसिअर. त्याचं स्पेलिंग ह्या आयकोका सारखंच अवघड. त्याने व्हिजिटिंग कार्ड वरच आडनावाच्या खाली लिहून टाकलं I-CAN-SEE-HER, असं वाचा)

तर आयोका म्हणतात "फोर्डची एक पॉलिसी होती की युनिव्हर्सिटी तून फक्त टॉपर फोर्डमधे जॉईन करून घेत असत. It means, had Mr Isaac Newton and Mr Albert Einstein been studying in the same university, Ford was lucky enough to hire only either of them"

काही गोष्टींसाठी कन्वेन्शनल पॉलिसीला तिलांजलि द्यावी.

चेन्नैत असाच बिझिनेस मधे अपयशी ठरलेला माणूस सेल्स मँनेजर म्हणून घेतला आहे.

बघू काय होतं ते. 😊😊

अनिल अंबानी

खुपदा विचार करतो पोस्टू नको यात आज. पण प्रवासात लोकं भेटतात अन विषय देऊन जातात.

जेफ बरोबर काल राजकोट विमानतळावर होतो. एक बंधू उगाच माझ्याकडे हसत होता. मी पण हसल्यासारखं केलं. गडी चांगला सुटाबुटात होता. बोर्डिंग पास घेऊन झाल्यावर जेफबरोबर गप्पा मारत असताना तो आला अन मधेच येऊन म्हणाला

बंधू: आपको कही देखा है
मी: अच्छा, मुझे नही लगता

मी असं बोलल्यावर काही न बोलताच परत गेला.

आमच्या गप्पा चालू झाल्यावर परत हा मधेच येत म्हणाला

बंधू: क्या आप अहमदाबाद मे रहते हो
मी: नही

पुनामे रहता हूँ म्हणेपर्यंत पंटर परत त्याच्या खुर्चीकडे रवाना.

काहीवेळाने परत आला अन म्हणाला "मुझे कहा वो समझमे नही आ रहा है, लेकिन हम कही मिले है" आता मात्र मी नाराज झालो. कारण मी आपण कसं आधी नाही भेटलो हे सांगायच्या आत, बंधू पाठ करून चालू लागायचा. आताही "मेरा पुनामे बिझिनेस......." असं चालू केलं तर पंटर गायब. लैच सटकली. जेफ ला कळंना काय चालू आहे ते.

विमानात बसण्यासाठी रांगेत उभा राहिलो अन तो परत माझ्याकडे आला.

"क्या आप रिलायन्स मे काम करते हो?"

माझा पेशन्स संपला.

मी म्हणालो "हो"

त्याच्या चेहर्यावर हसू उमटलं अन खुशीत येऊन मला म्हणाला

"क्या नाम है तुम्हारा?"

मी बोललो

"अनिल धीरूभाई अंबानी"

नंतर मुंबईला लगेज बेल्ट वर दिसला तो. पण तसाच गेला. मी दिसलो म्हणून बँग सोडली का बेल्टवर, काय माहित?

😊😊

सापेक्ष

कसं आहे की, कुठल्याही व्यक्तीबद्दलची प्रतिमा ही सापेक्ष असते. म्हणजे आता बघा, एखादा लाचखोर माणूस असेल अन तो बायकोला नवलखा हार आणून देत असेल तर तिच्या नजरेत तो भारीच, नाही का? त्यांचे पोट्टेही त्याच्यावरून जीव ओवाळत असतीलच, नाही का? पण ज्यांच्याकडून पैसे खाल्ले, त्याचा तळतळाट लागेल की हो त्याला.

म्हणजे कसं आहे, तो सलमान. आता परवा तो फिल्मफेयर प्रोग्रॅम मन लावून बघत होतो. अन आला की हा बाबा. फुटपाथ वाल्याला उडवलं अन त्याही पेक्षा रवींद्र पाटलाची स्टोरी. मनातून उतरलेला तो दबंग गडी. आता बच्चन साहेब किंवा माधुरी बाई त्याच्याशी हात मिळवताहेत. एक तर त्यांची काही मजबुरी असावी किंवा मग मला जी सलमान बद्दल चीड असावी ती बच्चन साहेबांना वा नेने बाईना नसावी.

किंवा आता हे संजू बाबा. आमच्या सारख्याना जे वाटतं ते विधु विनोद चोप्रा ला का वाटावं. आमच्या साठी जो देशद्रोह तो त्यांच्यासाठी खेळणं मोडून पुरून टाकलं. आता आम्हाला नाही बघवत मुन्नाभाई, त्याला इलाज नाही.

पण अनिल कपूर अन जॉनी लिव्हर ने दाऊद च्या पार्टीत कमर हलवली ते विस्मृतीत जातं.

आयुष्यभर त्यांनी उत्तमोत्तम गाणी दिली. त्या गाण्यांचं असलेलं गारुड "त्यांनी पेडर रोड वर फ्लाय ओव्हर नाही बनवू दिला" किंवा "आयुष्यभर कुणाला संगीत क्षेत्रात पुढे नाही येऊ दिलं" या आरोपांमुळे दूर नाही होत. तर काही जण त्यावर मात्र पेटतात. स्वतः कुणाला मदत म्हणून छदाम दिलेला नसतो, पण "शासनाने दिलेला प्लॉट तो. हॉस्पिटल साठी त्यात नवल ते काय" किंवा "दुसऱ्याच्या पैशाने बांधलं ते" असं काही जण बिनदिक्कत बोलून जातात. असतात एकेकाची मतं.


समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी झटलेल्या लोकांनी काही स्टेटमेंट केलं की मला नाही वाटत फणा काढून उभं राहायला. बरं मुख्य म्हणजे त्यांना हौस ही नसते मत प्रदर्शित करायची. आम्हीच विचारतो " अण्णा, तुम्ही काय म्हणता?" "ताई तुमचं मत काय?" "आमटे साहेब, तुम्हाला काय वाटतं?" तुम्ही मागं लागता, उत्तर द्या. आणि उत्तर तुम्हाला आवडेल तेच द्यायचं. म्हणजे हे समाजकार्य करणाऱ्या लोकांनी छोटी सुद्धा चूक कारायची नाही, अशी काही लोकांची ठाम धारणा असते.

आम्हाला वाटतो आदर त्यांच्या बद्दल. तुम्हाला नाही वाटत. ठीक आहे, तो तुमचा प्रश्न.

अलोकनाथ अन गोविंदा कुठली ऍड करतात ते माझ्यातरी फुल डोक्यात जातं. दुसऱ्या कुणाला ते योग्य वाटू शकेल. सांगता येत नाही.

हे असं आहे. चांगली कामं आणि वाईट कामं यावर आपण एखाद्याला जोखत राहतो. सामान्यांच्या बाबतीत होतं, पण ते व्यक्त होत नाही. किंवा काही बांधिलकीमुळे आपण तडजोड करतो. कधी तोडतो तर कधी जोडून ठेवतो.

प्रसिद्ध लोकांबाबतीत ते व्यक्त होतं. ते होताना व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष तिरस्काराची किंवा आदराची पातळी बदलत जाते.

काहींची कुणाबद्दल ती अगदीच उथळ असते आणि ही उथळ भावना नेहमी दुसर्याची असते, आपली मात्र अगदी तर्कशुद्ध असते असं प्रत्येकाला वाटतं,  म्हणून वादविवाद होत राहतात.

जाता जाता:

अशी उथळ वक्तव्ये करताना मला दोन गोष्टी माहित असतात:

- एक तर मी जे बोलतो हे त्यांच्या पर्यंत पोहोचणार नसतं.

- आणि पोहोचलंच तरी माझी दखल घ्यायला ते मोकळे नसतात.