Monday, 9 January 2017

शायनिंग

काल आय आर सी टी सी च्या वेबसाईट वर तिकीट बुक करायला गेलो तर मेसेज झळकला "या महिन्याचा तुमचा सहा तिकिटांचा कोटा संपला आहे"

हे थोर आहे. सेल्स हाच धर्म असलेल्या माझ्यासारखा माणूस हे वाचून येडाच झाला. नशिबाने साथ दिलीय म्हणून आज काल विमान प्रवास परवडतो नाहीतर रेल्वेनेच प्रवास करायचा म्हंटलं तर  आज ही मला महिन्याला किमान दहा तिकिटं काढावी लागतील. मग सहा प्रवासानंतर मी लायनीत उभं राहायचं! हे विचारलं की लागलीच सैनिक.....कारगिल.....तिथे जाऊन उभं रहा... बा ब्ला ब्ला.

की असं आहे, तुम्हाला महिन्यात सहा रेल्वे प्रवास, तीन शिवनेरीने, दोन विमान प्रवास इतकीच परवानगी आहे. त्यापुढे.......पायी चाला की. राष्ट्राबद्दल प्रेमच नाही हो तुम्हाला.

अन ते काय इन्कम सोर्स डिक्लेयर करायची काय पद्धत आहे ते. पंचवीस एक वर्षापूर्वी राष्ट्रीय बँकेमध्ये दहा हजारच्या वर पैसे काढायचे असतील तर स्लिप च्या मागे लिहावं लागायचं की मी हे पैसे कुठे खर्च करणार आहे ते! आमच्या एका मित्राने लिहून दिलं होतं की "आज संध्याकाळी घोड्याची रेस खेळायला जायचं आहे"

म्हणजे उद्या मी इन्कम सोर्स म्हणून "खत्रीच्या लाईन मध्ये मिळाले" तर ही मंडळी मटका बंद करणार नाहीत पण मी खेळलो म्हणून माझ्यावर कारवाई करणार.

मागचं बी जे पी सरकार शायनिंग इंडिया च्या नावाखाली झोपलं. या सरकारच्या शायनिंगने तर आमचे डोळे इतके दिपले आहेत की पुढे नुसता अंधारच दिसतोय.

डुक्कर

परवा एकदम फिल्मी सिन घडला.

मी मॉर्निंग वॉक घेताना आझादनगर एरिया तुन चालत होतो. थोडा खडबडीत रस्ता चालू झाला अन मला एका डुकराच्या पिल्लाचा किंचाळण्याचा आवाज आला. दहा पावलं चालल्यावर मला उजवीकडचं ते भीषण चित्र दिसलं.

एक डुकराचं पिल्लू जमिनीवर गडबडा उलटं पालटं होऊन लोळतंय अन सहा सात भटकी कुत्री जीव तोडून त्याच्यावर तुटून पडली आहेत. अत्यंत त्वेषाने ती कुत्री त्या डुकराच्या पिलाचा जीव घेण्यास उतावीळ झालीत अन त्या भीतीने ते पिल्लू असहाय्य होऊन ओरडतंय.

त्या कुत्र्यांवर दगड भिरकावण्यासाठी मी एखादा दगड शोधत असतानाच एक विस्मयकारी घटना घडली.

डावीकडच्या झाडीतून तीन एक अशी बलदंड डुकरं माझ्या समोरून त्या कुत्र्यांवर चाल करून गेली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच ती तीन डुकरं त्या कुत्र्यांवर मोठ्याने आवाज करत कुत्र्यांना ढुशी मारू लागली.

बाजी पालटली. आता भीतीने बोंबलायची पाळी कुत्र्यांची होती. xडीला पाय लावून त्या कुत्र्यांची इकडे तिकडे पांगापांग झाली.

ते डुकराचं पिल्लू आता धापा टाकत, पण जीव वाचल्याच्या आनंदात खाली मान करून उभं होतं.

आणि ते तीन डुकरं डोळ्यातून अंगार बरसंवत त्या पिलाला मधोमध ठेवत त्याच्या भोवती गोलगोल फिरत होती. जणू म्हणत होती "हातच लावून दाखवा कुणी या पिल्लाला. फोडून काढू"

क्षणार्धात घडलं हे सगळं आणि मी स्तिमित होऊन सगळं बघत होतो.

माणसाला लागलेल्या दुर्गुणापासून डुक्कर जमात कोसो दूर आहे, हे पाहून डुकरांबद्दल मला अतीव आदर वाटू लागला.

सिल्व्हर ज्युबिली

तर झालं असं की माझ्या लग्नाला या वर्षी पंचवीस वर्षे झाली. हो, ते ऍक्टिव्हेट डीऍक्टिव्हेट च्या नादात ते फेसबुकवर टाकायचं राहून गेलं. अन पोरांच्या परीक्षेच्या नादात वैभवी विसरली. दोघांचे नाद वेगळे.

या पंचविसाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी काही तरी आणायचं ठरवलं. सगळ्यात पहिले वैभवी कडून माझ्यासाठी एक झकास लेदर बॅग मीच ऑनलाईन ऑर्डर करून टाकली. अन मी वैभवी साठी काही घ्यावं म्हणून वेस्टसाईड ला गेलो.

मॉल चालू होऊन दहा बारा वर्षे झालीत खरं तर. पण मला ती खरेदी काही अजून अंगवळणी पडली नाही आहे. पण इथे मनाचा हिय्या करून घुसलो.

काही ड्रेस घ्यावा म्हणून मी वूमन सेक्शन ला गेलो तर पहिले अंतर्वस्त्रांचा विभाग. मी त्यातून अंग चोरून ड्रेस सेक्शन कडे जात असतानाच एक साधारण साठीच्या बाईने इतका तिरस्कारयुक्त कटाक्ष माझ्याकडे टाकला की मी खाल मानेनं तिथून बाहेर सटकलो. (हा कटाक्ष म्हणजे द्रौपदीने मयसभेत दुर्योधनाकडे जसा टाकला असेल तसा इति: जयंत)

मग मी माझा मोर्चा कॉस्मेटिकस विभागाकडे वळवला. सगळ्यात पहिले तर थंडीत स्विमिंग पूल वर आपण पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेतो तेव्हा जसं पुलभोवती चक्कर मारतो तसा मी अंदाज घेत त्या सेक्शन ला प्रदिक्षणा मारल्या. माझी घालमेल बघून एक सुहास्य वदना, अर्थात सुंदर, मला म्हणाली "sir, may I help you"

मी म्हणालो "ताई, मला ह्या ज्या सगळ्या बाटल्या आहेत त्यापैकी फक्त लिपस्टिक्स माहित आहे. बाकी मेक अप साठी जे सामान लागतं त्याबद्दल मला फार माहिती नाही आहे. तूच मला समजावून एक सेट बनवून दे"

मग तिने विचारलं "मॅडम चं कॉम्पलेक्शन कसं आहे"

मी म्हणालो "गोरी आहे, पण तुमच्या पेक्षा कमी" यावर ती झक्क लाजली. तिने मग सात आठ मेक अप च्या गोष्टी काढून दिल्या. पण त्यात परफ्युम नव्हता.

परफ्युमसाठी तिने बाजूच्या सेक्शन मध्ये नेलं. तिथल्या माणसाने चार पाच परफ्युम च्या बाटल्या हुंगवल्यावर मला एक कॉफी बीन्स ची बाटली हुंगायला दिली. मी बीन्स चा वास घेण्याऐवजी कॉफी हातात घेऊन इथे ग्राइंड करून कॉफी वगैरे मिळते का हे इकडे तिकडे पाहू लागलो. ते पाहून तिथल्या गौरांगना ग्राहक फिस्कन हसल्या. मला चूक उमगली अन त्या सेल्समन चा माझ्याकडे पाहण्याचा दर्याद्र भाव पण दिसला.

लो रिअल च्या कोस्मटीक्स अन तो फ्रेंच परफ्युम याचं बिल पाहून मला झीट आली. मी परत कॉफी बॉटल मागवली अन हुंगली तेव्हा शुद्धीवर राहिलो.

सगळं घेऊन घरी आलो अन बिलाचं दुःख विसरत वैभवीला ऐटीत तो मेक अप बॉक्स दिला. तर तिने पहिला प्रश्न विचारला "किती उडवले". मूड प्रसन्न रहावा म्हणून मी तिला "किंमत काय विचारतेस?लग्नाचा पंचविसावा वाढदिवस....." वगैरे सांगितलं. "बरं ठीक आहे. उद्या नील चा मॅथ्स चा पेपर आहे. तो जास्त महत्वाचा आहे, मी हे नंतर बघते". आमची अर्धांगिनी वदली.

जे काही आहे ते असं आहे अन छान आहे.

(लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट आहे, त्यामुळे मॉल मधल्या ताईशी मारलेल्या काल्पनिक गप्पा इथे लिहीत नाही)

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मराठी ब्रिफिंग

२७ डिसेंबर २०१६ रोजी पुण्यातील क्रिसलीस इंत्रेप्रेन्युअर फोरम च्या पुढाकाराने १८२ जणांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं. ह्या १८२ जणांनी "पाण्याखाली सगळ्यात लांब मानवी साखळी" असा विक्रम प्रस्थापित केला. या आधीचा हा विक्रम १७३ जणांनी इटली मध्ये नोंदवला होता.

हे आव्हान क्रिसलीस चे चेअरमन श्री मनीष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पेललं. या विक्रमाची तयारी जवळपास ६ महिन्यापूर्वी चालू झाली होती. क्रिसलीस चे कौन्सिल लिडर्स श्री प्रमोद भालेराव, श्री हरीश भाबड, श्री पराग पाटील, श्री मिलिंद शालगर आणि श्री महेंद्र यादव यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

भारतात जवळपास २०० लोकं एका वेळेस स्कुबा डायव्हिंग करून ही मानवी साखळी तयार करण्यासाठी मागणारी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, जगात दुसरीकड कुठेे हा विक्रम करता येईल याची चाचपणी केली गेली. अन त्यातून मग थायलँड च्या को ताव नावाच्या बेटाची निवड करण्यात आली. को ताव हे बेट स्कुबा डायव्हिंग साठी स्वर्ग समजण्यात येतो अन जगभर त्या कारणासाठी प्रसिद्ध आहे.

हा विक्रम साकारताना बऱ्याच आव्हानांना क्रिसलीस ला सामोरे जावे लागले. सगळ्यात पाहिलं आव्हान होतं, २०० पेक्षा जास्त लोकांना या साठी तयार करणे, आणि मग या सगळ्यांचं ट्रेनिंग घडवून आणणे. आणि गंमत म्हणजे या लोकांपैकी खूप जणांना पोहायला पण येत नव्हतं. पण कौन्सिल मेंबर्स चे अविरत कष्ट आणि सहभागी डायव्हर्स च्या मदतीने शेवटी १८२ लोकं विक्रमासाठी तयार झाले.

या विक्रमाची माहिती देताना श्री मनीष गुप्ता म्हणाले "सुरुवातीला एक मिनिटांसाठी पाण्याखाली राहणे ही खूप मोठी गोष्ट वाटली नाही. पण २६ डिसेंबर ला रंगीत तालमीच्या दिवशी, आमच्या लक्षात आलं की हे अवघड आहे. त्या दिवशी पाण्याखाली एक तास राहून ही आम्ही ती साखळी तयार करू शकलो नाही. आम्ही खूप निराश झालो. पण आम्ही सगळ्यांनी आमच्या योजनेत बदल केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ डिसेंबर ला आम्ही सकारात्मक भावनेने विक्रमाला गवसणी घालायला सज्ज झालो. सकाळी च आम्ही सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हंटले आणि एक वेगळीच ऊर्जा आम्हा सगळ्यांच्या मनात तयार झाली. हा विक्रम आम्ही राष्ट्राला अर्पण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळेपासून साधारण तीन तासांनी आणि जवळपास ३० मिनिटे पाण्याखाली राहून आम्ही १८२ जणांनी "पाण्याखालील सगळ्यात लांब मानवी साखळी" च्या जागतिक विक्रमावर मोहोर उमटवली.

या विक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य असं की १८२ लोकांपैकी फक्त एक स्कुबा डायव्हिंग साठी प्रमाणित होता, २०% लोकांना पोहोणे येत नव्हतं, ९ वर्षांपासून ते ६० वर्ष वयापर्यंत लोकं सहभागी झाले होते, ५० स्त्रिया होत्या. हे सारे सभासद उद्योजेकतेशी संबंधित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एकाच देशातल्या म्हणजे भारत, एकाच राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्र, एकाच गावातील म्हणजे पुण्यातील होते.

मिस पॉलिना यांना गिनीज च्या इंगलंडच्या ऑफिस तर्फे या विक्रमाची सत्यासत्यता पडताळण्यासाठी पाठवलं होतं. तिने श्री मनीष गुप्ता यांना या विक्रमामागची संकल्पना विचारली. तेव्हा श्री गुप्ता म्हणाले "पहिली गोष्ट म्हणजे, मानवतेसाठी सगळ्यांनी एकत्र यावं. म्हणजे विश्वाची एकात्मकता. आणि दुसरं म्हणजे असं काही आमच्या कडून घडावं की साऱ्या देशाला अभिमान वाटला पाहिजे. खेळाडू किंवा कलाकार यांना देशाला अभिमान वाटाव्या अशा गोष्टी करण्याच्या खूप संधी असतात. आमच्या सारख्या साध्या लोकांना अशीच संधी आम्ही उपलब्ध करून दिली"

या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ओर्बीट्झ टूर्स अँड ट्रॅव्हेल्स यांनी नियोजन केले तर  सहभागी लोकांना स्कुबा डायव्हिंग चं प्रशिक्षण हे अबसोल्युट स्कुबा यांनी दिलं

गुरगाव

कालची संध्याकाळ गुरगाव मध्ये पहिले Ambience Mall अन नंतर सायबर हब मध्ये घालवली. थोडा वेळ होता म्हणून PVR सिनेमा मध्ये गोल्ड क्लास मध्ये पिक्चर बघायला गेलो. तर तिकीट एकाचं ७७० रु आणि टॅक्स पकडून रु ९२३ फक्त.

मध्ये एकदा डेक्कन रेंदेवह्यु (रेंदेवह्यु शब्द इंग्रजीत नका लिहायला सांगू) ऐटीत जेवायला गेलो होतो. शप्पथ सांगतो ३० मिली चा आचरट भाव बघून तिथून निघून आलो होतो. तेवढ्या वेळेत एका मित्राने मिनरल वॉटर ची बाटली फोडली म्हणून एका बॉटल चे १०४ रु कचकचीत मोजले होते. नंतर मग शिक्षा म्हणून निप मधला एक पेग त्या मित्राला कमी दिला होता.

पण ही असली नाचक्की सिनेमाचं तिकीट काढताना येईल असं वाटलं नव्हतं. तिकिटांचा दर ऐकून भोवळ आली, ती आवरली ते शेजारून मंद सुवासवाली गेली म्हणून.

काय सांगावं राव तुम्हाला. हे गुरगाव अन दिल्लीत लहानगे, टिन एजर, माझ्या वयाच्या आसपास चे माणसं अन बायका, नववृद्ध अन नववृद्धा (या शब्दाचे मालक श्री उदय जोशी आहेत बरं) आणि म्हातारे म्हाताऱ्या काय टेचात राहतात राव. म्हणजे मुंबई वगैरे लोकं तर पाणीच भरतील त्याबाबतीत दिल्लीकरांसमोर. पुण्यातल्या लोकं तर म्हणजे फुल हवा येऊ द्यावी. पुण्यातील कॅम्प मधील स्त्री वर्ग च आ वासून पाहणारा मी, त्या सायबर हब मधील फॅशन बघून फुल पगलावलो होतो राव. डिप्रेशनच पार.

आमच्या सेटको बद्दल मी काय काय लिहितो. काल गुरगावमध्ये एका मित्राच्या ऑफिस मध्ये गेलो. डोकं गरगरण्याचा अनुभव घेतला होता. ते बघून ट्युबोर्ग झटक्यात उतरली. काय ते ऑफिस, तिथल्या थिंकिंग चेअर, डोक्याला शांतता लाभावी म्हणून tranqulity टनेल, आता पर्यंत पाहिलेली सगळ्यात हाय टेक बोर्ड रूम. मित्रा, सलाम रे तुला. ३७५००० स्क्वे फूट चं ऑफिस मॅनेज करणं खायची गोष्ट नाही रे.

सकाळी रेंट आउट केलेल्या फ्लॅट मध्ये दिल्लीत पाऊस झाल्यामुळे लाईट गेली होती. आंघोळ करताना डोक्यावर थंड गार पाणी टाकल्यावर शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जी कळ उमटली त्याने मी परत माझ्या वास्तव जगात आलो.

Wednesday, 4 January 2017

वर्ल्ड

हो ना करता करता शेवटी क्रिसलीस च्या को ताव च्या स्कुबा डायव्हिंग समुद्रात पाण्याखालच्या सगळ्यात लांब मानवी साखळी चा वर्ल्ड रेकॉर्ड च्या एक्सपीडिशन मध्ये सहभाग घ्यायचं ठरवलं. अगदी एम बी बी एस. मियाँ, बीबी, बच्चो के साथ. येरवडा मध्ये डेव्हलपमेंट बोर्ड चा एक भला मोठा स्विमिंग पूल आहे. तिथं Absolute Scuba म्हणून ट्रेनिंग फर्म आहे. तिथं ट्रेनिंग पार पडलं. केवळ एका ट्रेनिंग मध्ये इतका मोठा घाट घातला हे पहिल्यापासून खटकत होतं पण ट्रेनिंग देणाऱ्यांचं ते डिसीजन, त्या मुळे मी माझा कंसर्न माझ्या जवळ ठेवला. एकतर मी लीडर असतो नाहीतर फॉलोअर. इथे माझी भूमिका फॉलोअर ची आणि ती इमानइतबारे बजावली, शेवटपर्यंत. आणि मनीष गुप्ता नावाचं एक जादूगार आमच्या बरोबर होता, त्यामुळे मी आणि आम्ही बरेच निश्चिन्त होतो.

रोड, विमान आणि जलप्रवास करत जवळपास २५ तासांनी आम्ही को तौ बेटावर पोहोचलो. २६ तारखेला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड अटेम्प्ट ची रंगीत तालीम होती. चीफ ट्रेनर ने ब्रिफिंग दिलं. अन अटेम्प्ट ची रिहर्सल झाली. त्यामध्ये अगदी धज्जीया उडाली असं नाही म्हणता येणार पण प्रयत्न यशस्वी होणार की नाही या बद्दल बऱ्याच जणांच्या मनात साशंकता तयार झाली. साहजिक होतं म्हणा ते. एकमेकात समन्वय नव्हता. म्हणजे वैयक्तिक पातळीवर बऱ्याच जणांनी रिहर्सल व्यवस्थित केली तरी एकूण २०२ लोकांची थॉट प्रोसेस एका प्लॅटफॉर्म वर येणं गरजेचं होतं. अन तिथे मोठी गॅप होती.

इथे मनीष गुप्ता नावाचा लीडर पिक्चर मध्ये आला. आम्हाला सगळ्यांना मनीष सर, एक ह्युमरस व्यक्तिमत्व आणि सदा हसतमुख माणूस म्हणून माहिती आहेत. पण २६ च्या रात्री मात्र एम जी सरांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. जे या रेकॉर्ड च्या थीम च्या बाहेर विचार करत होते त्यांना जागेवर आणायचं काम त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणाने केलं. कुणाला त्याचं वाईट वाटलं ही असेल, पण मनीष सर जर तसं बोलले नसते तर रिकाम्या हाताने परत येण्याची शक्यता खूप जास्त होती. २०२ पैकी २० जणांना वगळण्याचा कठोर निर्णय ही त्यांना घ्यावा लागला.

२७ ला सकाळी एकंदरीत रेकॉर्ड साठी पूरक वातावरण राष्ट्रगीताने केलं. आणि चेंज केलेला डाईव्ह प्लॅन आम्हाला सांगितलं. एकूण २४-२५ ग्रुप होते ७-८ लोकांचे. आणि A1 आणि H3 ग्रुप ला पहिले समुद्राकडे जायचं होतं अन त्या H3 मध्ये मी पण येतो. टाळ्या तर अशा वाजल्या की जणू सचिन स्टेडियम वर उतरतो आहे. साईटवर आमच्या डाईव्ह लिडर्स च्या बॉडी लँग्वेज मध्ये पण खूप फरक पडला होता. त्यांनी आणि रनर्स ने मिळून आम्हाला किटस चढवले. मनीष सर आणि टीम ने त्यांची पण आदल्या रात्री घेतली असावी. एकंदरीत absolute Scuba आणि CEF यांनी भरपूर विचारमंथन करून एक सगळ्या नवशीक्या डायव्हर्स ला झेपेल असा डाईव्ह प्लॅन बनवला.

आणि मग ती घटिका आली. इशारे होऊ लागले, शिट्या वाजू लागल्या अन आम्ही १८२ जण हळूहळू रेकॉर्ड साईट कडे जाऊ लागलो. चित्रपटात एखादी सेना पुढे सरकल्याचा सिन असतो तशी एक काळी रेष त्या विशाल समुद्रात इंच इंच पुढे सरकू लागली.

एका स्पॉट वर आम्हाला स्कुबा डायव्हिंग करत पाण्याखाली जायला लावलं आणि सगळे जण रेकॉर्ड साईटला, जिथे रोप लावला तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. रेकॉर्ड टाइम एक मिनिटांचा असेल तरी व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी आम्हाला पाच मिनिटे पाण्याखाली राहणं गरजेचं होतं. सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात पकडून मानवी साखळी तयार केली ज्यात १० वर्ष वयापासून ते ६० वर्षापर्यंत स्कुबा डायव्हर्स होते. पाच मिनिटे म्हणता म्हणता आम्ही तब्बल पस्तीस मिनिटे पाण्याखाली होतो.

व्हिडीओ रेकॉर्डिंग संपल्याचा सिग्नल मिळाला. जॅकेट इन्फ्लेट करून सगळे वर आले अन त्या नंतरचा अर्धा तास मात्र युगासारखा गेला. उडत न्यूज आली की कुणा एकाचा बॅच पडला म्हणून रेकॉर्ड फेल गेला आणि परत साखळी तयार करायची. तो तयार केलेला व्हिडीओ पॉलिना नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ची जज त्याची सगळी सत्यता पडताळून पाहत होती  

डाईव्ह स्टुअर्डस ला बाहेर बोलावलं गेलं. आणि आम्हा डायव्हिंग मेंबर्स ना पण किनारी यायला सांगितलं. आणि तो क्षण आला जेव्हा पॉलिना मॅडम वदल्या "I hereby officially confirm that Chrysalis Entrepreneurs Forum officially holds the world record of forming the longest human chain under water with 182 participants"

त्यानंतर चा जल्लोष मात्र अभूतपूर्व होता. भारत माता की जय चे नारे दिले गेले.  म्हणजे तीन महिन्यांपूर्वी जर मला कुणी म्हंटलं असतं की तुझं नाव गिनीज बुक मध्ये नोंदवलं जाणार तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण आज ते वास्तव होतं.

काल परत आलो. येताना काही जास्त खरेदी न करता बॅगचं वजन वाढलं होतं. घरातल्या चारही जणांचे रेकॉर्ड्स जे बरोबर होते.

काही नोंदी:

- Total bliss, हा शब्द आपण नेहमी वापरतो. समुद्रखाली ३ मीटरच्या पुढे त्या शब्दाचा अर्थ कळतो.

- आयुष्यातील जादुई क्षण अनुभवताना पैसा हा विषय शेवटचा असतो.

- "शिस्त पाळा" हे ऐकायला अतिशय बोअर होतं, पण जेव्हा आपण तसं वागतो तेव्हा भव्य दिव्य घडण्याची शक्यता असते.

- Will from within can overpower apparent failures


Tuesday, 3 January 2017

झिंगा

झिंगा  माहिती आहे का तुम्हाला? लॉबस्टर. पाणी सुटलं ना तोंडाला. हं, तर कसा असतो झिंगा? मऊ, लुसलुशीत. पण गंमत अशी आहे की हा लॉब्स्टर एका कठीण कवचाखाली जगतो. रिजिड शेल. पण झिंगा जेव्हा मोठा होत असतो तेव्हा ह्या कवचाची मात्र वाढ होत नसते.

पण मग लॉबस्टरची वाढ होते कशी? झिंगा जसा वाढू लागतो, ते कवच त्याला अपुरं पडू लागतं. आणि मग झिंगा त्यावेळेस प्रेशर खाली येतो. त्याला अस्वस्थ वाटू लागतं. पण मग पुढे काय होतं?

तर हा झिंगा एखाद्या खडकाखाली जातो. कारण त्याला दुसऱ्या मोठ्या माशांपासून स्वतः चा बचाव करायचा असतो. अंगावरचं कवच फेकून देतो आणि परत नवीन कवच तयार करतो, त्याच्या वाढलेल्या अंगाला बसेल असं.

जसजशी त्याची ग्रोथ होते मग परत हे कवच त्याला अपुरं पडू लागतं. तो पुन्हा खडकामागे जातो आणि नवीन कवच बनवतो, त्याच्या ग्रोथला सुटेबल असं. झिंगा आपल्या आयुष्यात ही जुनं कवच फेकून नवीन धारण करण्याची प्रोसेस अगणित वेळा करतो. ते थांबतं जेव्हा त्याचं आयुष्य संपतं तेव्हाच.

थोडक्यात सांगायचं हे की झिंग्याला ग्रोथ करण्याची प्रेरणा मिळते ती त्याला कवचाखाली अस्वस्थ वाटतं तेव्हा. तसं जर अस्वस्थ वाटलं नसतं  तर त्याची ग्रोथ करण्याची शक्ती नाहीशी झाली असती. म्हणजे असं  आहे बघा, तो झिंगा गेला असता डॉक्टर कडे. सांगितलं असतं "अहो, डॉक्टर, स्ट्रेस मुळे मी जरा अस्वस्थ वाटतंय हो" डॉक्टर ने लागलीच प्रिस्क्रिप्शन काढलं असतं, काही औषधं खरडली असती. झिंग्याने तो कोर्स पूर्ण केला असता.

झिंगा जगला असता, त्याच कवचाखाली. पण त्याची ग्रोथ नसती झाली.

आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं जेव्हा आपल्याला बिझिनेस मध्ये स्ट्रेस येतो, त्यावेळेस आपल्याला ग्रोथ च्या संधी खुणावत असतात. आणि मग अशा आव्हानात्मक परिस्थितीशी  आपण जेव्हा सकारात्मकतेने  दोन हात करतो तेव्हा आपल्याभोवती तयार केलेलं सुखासीनतेचं कवच भेदतो आणि नवीन आव्हानाला सामोरं जाण्याची नवीन ताकद आपल्यात तयार होते. . . . . . . .  . . अगदी तो झिंगा कसं नवीन कवच तयार करतो तसंच,

(डॉ अब्राहम यांच्या यु ट्यूब लिंक वर आधारित)

झिंगा