Monday, 19 August 2019

सोशल मीडिया

जे जे म्हणून पहिलं ते आयुष्यभर लक्षात राहतं. पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचा भाग झालो हे नेहमीच लक्षात राहील. कार्यक्रम संदर्भात कन्फेशन: तिथं पोहोचेपर्यंत वाटलं नव्हतं की कार्यक्रमाची मांडणी इतकी आखीव रेखीव असेल. विषय जोरकस होते. दर्जा एकंदरीत वरचा होता. त्याबद्दल समीर, मंगेश आणि टीमचे अभिनंदन. प्रसादचे आभार की त्याने माझं नाव इथं सुचवलं. एक प्रेक्षकांची संख्या सोडली, तर नाव ठेवायला अजिबात जागा नव्हती.

दोन सेशन मध्ये पॅनलिस्ट होतो. "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" आणि "मला व्यक्त होताना असणाऱ्या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा"

पहिल्या विषयावर पॅनलिस्ट म्हणून बोलण्यापेक्षा मलाच शिकायला खूप मिळालं. दोन तर महत्वाचे मुद्दे आहेत. माझे टेकअवे मी इथं लिहिणार नाही आहे. कुणाला हवे असतील त्यांनी मेसेंजर वर संपर्क करावा. पण एक मात्र बोललो की सोशल मीडिया तर्फे मार्केटिंग करण्याची अक्कल मला फार उशिरा आली आणि माझे त्या बद्दलचे खूप मिस कन्सेप्शन होते जे गेल्या वर्षभरात दूर झाले. सोशल मीडिया मार्केटिंग हा प्रकार सिरीयसली उद्योजकांनी घ्यायला हवा. २०१४ मध्ये नाही म्हणायला, थोड्या राजकीय विषयावर पोस्ट लिहायचो आणि त्यामुळे मी माझे कस्टमर्स आणि सहकारी यांना फेसबुकवर मित्र यादीत जागाच नाही दिली. ती मोठी चूक झाली. पुढे मग राजकीय पोस्ट लिहिणं हे अलमोस्ट बंद केलं. आता मात्र एक दिशा मिळाली आहे आणि ती दुसऱ्या पॅनल डिस्कशन मध्ये सांगितली.

दुसऱ्या टॉपिक मध्ये पहिले विचारलं की  पोस्ट चोरी होतात त्याबद्दल काय म्हणणं आहे. कौशल इनामदार आणि सारंग साठे हे दोघे दृकश्राव्य माध्यमातील त्यामुळे त्यांना ही चिंता असणारच. पण मी आणि गौरी या टेक्स्ट फॉर्म मध्ये लिहिणारे. मी सांगितलं "हा प्लॅटफॉर्म मी निवडला आहे. आणि त्याचा फॉरमॅट असा आहे की पोस्ट या उचलल्या जाणार आणि त्याबद्दल कन्सर्न असण्यात काही मतलब नाही. जो पर्यंत माझी पोस्ट वापरून कुणी अर्थार्जन करत नाही तो पर्यंत मी बोंब मारण्यात मतलब नाही. इंटरनेट चा खर्च याशिवाय मी त्या कन्टेन्ट वर फिजिकल खर्च करत नाही. ज्यांना स्वतःचं लिखाण चांगलं वगैरे वाटतं त्यांनी पुस्तक काढावं आणि पैसे कमवावे."

दुसरा विषय ट्रोलिंगचा. ट्रोलिंग हे मुख्यतः राजकीय आणि धार्मिक विषयावर पोस्ट अथवा कॉमेंट टाकली की होतं. व्यावसायिक लोकांनी राजकीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक या कुठल्याही मुद्दयांवर आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त करू नये, असं मला वाटतं. आपल्या राजकीय भावनेचं प्रकटीकरण हे मतपेटीद्वारे आणि धार्मिकतेचं प्रदर्शन हे घरातल्या देव्हाऱ्यात मांडावं. सोशल मीडिया त्यासाठी प्लॅटफॉर्म नाही. तो ज्यांच्यासाठी आहे ते त्याचा दणकावून वापर करत आहे. आपण त्याच्या फंदात पडू नये.

क्लोजिंग रिमार्क मध्ये हेच सांगितलं की सोशल मीडिया हे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी चांगलं टूल आहे. आणि मुख्य म्हणजे ते आपल्यासाठी बनलं आहे आपण त्याच्या साठी नाही. तर त्या डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया याचा वापर आपल्या वृद्धीसाठी वापरावा, मग ती व्यावसायिक असो वा वैयक्तिक असो.  

(बाकी विषय आणि त्यावर बोलणारे लोक धारदार होते. सायबर हायजिन, सायबर व्हिक्टिम, व्यवसायिक यश हे सगळे मुद्दे राज्याच्या कानाकोपऱ्यात जावे असं मला मनापासून वाटतं आणि एकूणच सर्वांची इन्क्लुजिव्ह ग्रोथ व्हावी हि सदिच्छा.)

Thursday, 15 August 2019

सोशल मीडिया

सोशल मीडिया हा बऱ्याच जणांप्रमाणे माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. सध्या मी फेसबुक, व्हाट्स अप आणि लिंक्ड इन वर ऍक्टिव्ह आहे. इथं प्रत्येकाचा अजेंडा असतो. माझाही आहे.

मी इथं ब्रॅंडिंग करत असतो. एक तर माझं स्वतःचं किंवा माझ्या व्यवसायाचं आणि अगदी उद्दात्त वगैरे म्हंटलं तर देशाचं. स्वतःचं ब्रॅंडिंग करणे या पद्धतीला "स्वतःची लाल करणे" असं इथं बोललं जातं. ब्रॅंडिंग म्हणजे 'समोरच्याच्या मनात स्वतःची प्रतिमा तयार करणे.

या मधील हे कंपनीचं ब्रॅंडिंग इथं फेसबुकवर मी फार उशिरा चालू केलं. काही करणं होती त्यासाठी.  पण स्वत:चं ब्रँडिंग चालू करून आता तीन चार वर्षे झालीत. ब्रँड मार्केट करण्यामागची खरी गोम ही आहे की तुमचा प्रत्यक्ष डिलिव्हरन्स हा ब्रँड प्रॉमिस प्रमाणे हवा. तो देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो.

हे करताना इथं मी कुणाला मित्र वाटतो, कुणाला दादा वाटतो, कुणाला आदरयुक्त भीती वगैरे वाटते. काही जणं डायरेक्ट खिजवतात, कुणी आडून टोमणे मारतं, कुणी जेष्ठतेच्या भावनेने काळजीपूर्वक सल्ला देतं की न्यून किंवा अहंभाव येऊ देऊ नको. मला या सगळ्यांचा आदर आहे. मी हे एन्जॉय करतो.

यातील गंमत अशी आहे की माझ्या प्रत्यक्ष जीवनात व्यवसायाच्या अनुषंगाने या सर्व भावना अधिक तीव्रतेने शो केस होतात. इथं त्यामानाने या सर्व भावना मवाळ असतात. प्रत्यक्षातील माझं प्रेम किंवा दुःख, मिळणारा आदर किंवा माझा अहंकार, लोकांच्या मनातील माझ्या बद्दलची भीती किंवा माझं न्यूनत्व हे इथल्यापेक्षा धारदार असतं. त्यामुळे इथं मला क्षणिक दुःख किंवा सुखशिवाय अंगाला काही लागत नाही. आर जे संग्राम सांगतो तसं मी सोसल इतकं सोशल मीडिया वापरतो.  सोशल मीडिया वर ब्रँड बनवताना काही दोस्ती झाली आहे, ती मात्र जीवापाड जपतो. सोशल मीडिया हे बॅरिअर माझ्यासाठी तुटतं.

हे सगळं मी बोलणार आहे १८ ऑगस्टला "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" या विषयावर पॅनेलिस्ट म्हणून. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून यावं. 

Monday, 12 August 2019

हव्यास

शनिवारी सांगलीला टेम्पो पाठवायचा होता. नेमकं टेम्पो मालकाच्या आजोबांचं निधन झालं. मग जे काही पाठवायचं ते कारने पाठवलं. कार सोमवारी सकाळपर्यंत आली नव्हती. म्हणून कंपनीत कॅबने आलो.

कॅब मध्ये फोनवरून फळणीकरांशी बोलत होतो. औषधं कितीची झाली वगैरे चर्चा चालू झाली. मग पूरग्रस्त परिसरातील डॉक्टरशी बोलणं झालं. पुढच्या लॉट मध्ये काय पाठवायचं ते मागवून घेतलं. उद्या आमच्या क्रिसलीस ग्रुप मध्ये चर्चा ठरली, ते ही फोनवर बोलणं झालं. 

तर ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागे एक कारण आहे. किंवा एक मित्रवर्य म्हणतात तसं वाचणाऱ्यावर प्रभाव पडण्याचा मला हव्यास आहे. तर जे तसं समजतात त्यांनी तसं समजावं. 

तर कारण हे आहे की कॅब मधून उतरण्याअगोदर कॅब ड्रायव्हर म्हणाला "तुम्ही सर कॅबचं भाडं देऊ नका."

मी विचारलं "का?"

तर म्हणाला "तुम्ही इतकं करताय तर माझ्याकडून फुल न फुलांची पाकळी".

मी समाधानाने हसलो. माझं कॅब अकौंट कार्डला  कनेक्ट आहे. शून्य रुपये आल्यावर म्हणाला आग्रह करू लागला, कॅश परत देतो.

मी म्हणालो "मित्रा, मदत करावी हे तुझ्या मनात आलं, हे खूप आहे. मदतीचा चान्स आज हुकला. कुठं तरी करशील नक्की"

मनोभावे आम्ही एकमेकांचा हात हातात घेतला.

दुसर्यावर प्रभाव पाडण्याचा हव्यास मला आता फेसबुकच नाही तर प्रत्यक्ष जीवनात पडला आहे. 

Saturday, 10 August 2019

सेल्स कॉल

काल नासिकला गेलो होतो. कस्टमर कॉल वर. बऱ्याच दिवसांनी मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स हातात घेतले. मशीनमध्ये घुसून काम केलं. शर्ट ला ऑइल लागलं आणि ट्राऊजर ला काळे डाग पडले. जेवण्याच्या आधी हात धुतले खरे, पण हाताला तो जुन्या काळात येणारा मंद असा ऑईलचा वास आला. माझ्या लेखी तो वास म्हणजे पारिजातक चुरगळल्यावर हाताला जो येतो तोच.

हे माझं आवडतं काम. कस्टमर ला सोल्युशन देणे. इम्पोर्ट सब्स्टीट्युट बनवणे. थोडक्यात कस्टमरची कम्फर्ट लेव्हल तयार करणे. आजकाल कस्टमर पण अवघड प्रश्न विचारत नाहीत. पूर्वी बजाज ऑटो, टाटा मोटर्स वगैरे कंपनीतील लोक असे प्रश्न विचारायचे की उत्तरं देताना त्रेधा उडायची. आता कुणी असे इंटरेस्टिंग प्रश्न विचारले की भारी वाटतं. आणि मी मग बोलूनही दाखवतो, की चर्चा करताना मजा आली.

कंपनी मोठी झाली. मॅनेजमेंटचं काम वाढलं. स्ट्रॅटेजी, बॅलन्स शीट, एचआर, फायनान्स हे असलं काहीतरी अवघड काम आजकाल करावं लागतं.

काल जाणवलं, हार्ड कोअर टेक्निकल काम केलं की दिल गार्डन होऊन जातं. पण नंतर हे पण वाटलं, की तेच काम करत राहिलो असतो तर कदाचित ग्रोथ पण झाली नसती. कुणास ठाऊक जॉईंट व्हेंचर पण झालं नसतं आणि पुण्याव्यतिरिक्त चेन्नई आणि दिल्लीत प्लांट पण चालू करू शकलो नसतो.

ते काय असेल ते असेल, पण आता ठरवलं आहे. सहा महिन्यातून का होईना एखादा असला खंग्री टेक्निकल सेल्स कॉल करायचा. वर उल्लेखलेली अवघड काम करताना डोकं खूपदा पकून जातं. त्यावर उतारा म्हणून.  मन फ्रेश होऊन जातं.



Thursday, 1 August 2019

हेडोनिक ट्रेडमिल

समजा मी एक कार विकत घेतली. त्याचा आनंद साधारण एक आठवडा टिकतो. एकदा ती कार माझ्या इको सिस्टम चा भाग झाली की माझं मन कुठलातरी दुसरा आनंद शोधण्यासाठी बाहेर पडतं. हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात हेडोनिक ट्रेडमिल. (ट्रेडमिल वर आपण पळत राहतो पण असतो त्या जागेवरच, म्हणून हे नाव दिलं असावं असा माझा अंदाज) आपण काही भौतिक गोष्टींचा पाठपुरावा करतो, ज्यामुळे मला आनंद वाटेल. ती गोष्ट कवेत आल्यावर आपल्याला यशस्वी झाल्याचा अनुभव येतो. त्या अनुभवातून मिळणारा आनंद काही काळ टिकतो आणि मग आपण परत कोणत्यातरी नवीन अनुभवामागे धावत सुटतो.

पण मग यातून सुटका आहे का? तर आहे. तात्विक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आली आहे. काही काळासाठी पटतं ही आपल्याला. पण थोड्या दिवसात आपल्याला त्याचा विसर पडतो.

१. जितके लागतात तितके पैसे मिळवण्याइतकं काम करा. (याचा अर्थ पैसे कमवू नका असा नाही.) एक लॉंग टर्म सेव्हिंग प्लॅन बनवला आणि रिटर्न्स ठरवले की मग पैसे जास्त मिळाले तरी त्याचा आनंद होत नाही. जिवंतपणी मोक्ष मिळाला असं होतं मग.

२. व्यायाम करून तब्येत खणखणीत ठेवा. आणि एनर्जी वाढवा.: या उपायाचे अनंत फायदे आहेत.  व्यायाम, झोप आणि मोजके पण व्यवस्थित खाणं याला चॉईस ठेवण्यात मतलब नाही. याला महत्व दिलं की हे शरीर जे रिटर्न्स देतं त्याला तोड नाही.

३. जे लोक आवडीचे आहेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवा: समान विचारसरणीचे लोक, मित्र, फॅमिली यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा. ह्या लोकांना आपण गृहीत धरतो पण अडचणीवेळी हीच लोक आपल्या मदतीला येतात.

४. ज्या गोष्टी आयुष्यात डोक्याला शॉट लावतात त्यांना आयुष्यातून कायमचं हद्दपार करा. अशा गोष्टी शोधा आणि त्यावरचे उपाय छोटे असतात. उदा: टूर ची बॅग तयार ठेवायची अन त्यात चार्जर, टॉयलेटरीज ची बॅग वेगळं ठेवणे. दिलेली वेळ पाळणे. वगैरे.

५. शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं. नवनवीन आव्हानात्मक परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणे. जर असं काही नसेल तर अशी आव्हानात्मक परिस्थिती शोधणे अन त्यावर मात करणे. नवीन प्रोजेक्ट्स, काही शिकणे (भाषा, वादन, गाणे, खेळ काहीही). यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो.

(एका इंग्रजी लेखाचा स्वैरानुवाद) 

Friday, 19 July 2019

धडा

७ जुलै २०१९ हा दिवस भयानक होता. त्याच्याशी संबंधित भावनिक नातं जर सोडलं, तर खूप काही शिकवलं त्या दिवसाने. या प्रकारच्या अपघाताच्या बातम्या आपण वाचतो, पण आपल्याबरोबर असं काही होऊ शकेल अशी पुसटशी शंका आपल्या मनाला शिवत नाही. जणू काही अमरत्व घेऊन आलो आहे. काही चांगल्या गोष्टी आयुष्यात घडल्या की ज्याला मी लायक नव्हतो, तसं असं काही माझ्याबरोबर घडावं असंही पाप काही घडलं असेल असं आठवत नाही.

एक व्यावसायिक म्हणून धडे मिळाले. ते सगळ्यांसोबत शेअर करावे वाटले.

१. एकतर सगळ्यात आधी एच आर मॅन्युअल बनवून घ्या. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल पॉलिसी ठरवा आणि ती लिहून काढा.

२. कंपनीची गाडी असेल तर तिचं रजिस्टर बनवा आणि गाडी जर बाहेर जात असेल तर तिची न चुकता नोंद करा.

३. कंपनीची गाडी असेल तर तिचा पर्सनल वापर, नाही म्हणजे नाही.

४. इ एस आय सी शिवाय एक मेडिक्लेम आणि अपघात विमा पॉलिसी जरूर काढा.

५. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वर विमा असतो पण त्याला काही साधे नियम आहेत, ते समजून घ्या.

६. रात्री दहा ते सकाळी सहा प्रवास टाळा.

७. एम्प्लॉयर म्हणून सगळ्या लोकांना आदराची आणि प्रेमाची वागणूक द्या. तो तुमचा स्वभाव खूप मोठ्या मनस्तापापासून वाचवू शकतो.

८. देव न करो असं कुणाबरोबर होवो, पण झालं तर या प्रकारातील भावनिक भाग आणि व्यावहारिक भाग नीट समजून घ्या. दोघांची सरमिसळ करू नका.

९. गोष्टी धीराने घ्या. त्यावर टीमचं मोराल खूप अवलंबून असतं. Be brave......Even if you are not, pretend. No one can tell the difference.

१०. दोन महिन्यांपूर्वी चार लोक स्पर्धक कंपनीने उचलले आणि आता चार लोक देवाने. स्पर्धक कंपनीचे आभार मानतो. स्पर्धक कंपनी दयाळू आहे. ती त्या चौघांना जगवते. देवासारखी निष्ठुर नाही ती. 

Thursday, 18 July 2019

रामभाऊ

"तुला म्हणून सांगतो रामभाऊ, पण काय भारी चव होती या हॉटेलची दहा एक वर्षांपूर्वी! तब्येत खुश एकदम. पण आजकाल चव बिघडली यांची"

"शक्यता आहे. पण कुणास ठाऊक हॉटेलच्या पदार्थांची चव तशीच असेल. कदाचित अशीही एक शक्यता आहे की गेल्या दहा वर्षात वयोमानाप्रमाणे तुझ्या जिभेची चव बिघडली असेल."

"भावा, नेहमी लक्षात ठेव. तुझे पंचेंद्रिय कालमानानुसार घासत जा. चष्मा साफ कर, कान हलके होऊ देऊ नको, स्पर्श झाला तर अवघडु नको आणि प्रत्येक गोष्टीत चूक हुंगू नकोस."

रामभाऊ रॉक्स, मी शॉक्स.