काल व्यंकटेशला भेटलो. वेंकी म्हणतात त्याला. वय साधारण पस्तीस चाळीसच्या मध्ये. कंपनी पण तशी लहानच, पिनिया बंगलोर मध्ये. सहा सात हजार स्क्वे फूट मध्ये. वयोपरत्वे आणि व्यवसायाच्या साईझच्या दृष्टीने मी मोठा. म्हणून थोडा ताठ्यात गेलो होतो शॉप मध्ये.
Saturday, 18 February 2023
व्यंकटेश
Tuesday, 14 February 2023
दोन प्रकारचे लीडर्स
मी दोन प्रकारचे व्यावसायिक लीडर्स बघितले आहेत.
पहिला प्रकार म्हणजे जे लोकांसाठी काम करतात. म्हणजे लोकांची ग्रोथ ही त्यांच्या केंद्रस्थानी असते. ग्रोथ म्हणजे फक्त आर्थिक ग्रोथ नव्हे, तर सर्वांगीण विकास. त्यासाठी हे लीडर्स आपल्या लोकांना एम्पॉवर करण्यात विश्वास ठेवतात. त्यासाठी ते त्यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करतात. ते स्वतःची पोझिशन बाजूला ठेवतात आणि फक्त कंपनीचं हित डोळ्यसमोर ठेवतात.
आमचा रिटायर झालेला प्रेसिडेंट जेफ क्लार्क याबाबत माहीर होता. तो कधीही आपले निर्णय कंपनीवर लादायचा नाही. खरंतर "हे असं करा/करू नका" हे म्हणायची त्याच्याकडे पॉवर होती. पण असे अनेक निर्णय, भले त्याच्या मनाविरुद्ध असतील पण कंपनीच्या हिताचे असतील तर त्याने खुल्या मनाने स्वीकारले. आणि हो, हे करताना अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा केली, समोरच्याला बोलू दिलं, त्याच्या मताचा आदर केला, काउंटर अर्ग्युमेंट करताना व्हेटो कधी वापरला नाही. काही वेळा त्याने त्याच्या निर्णया बद्दल कन्व्हिन्स केलं आम्हाला पण तो लादला नाही. याचा फायदा असा झाला कि प्रत्येकाचा सेल्फ एस्टीम हा जोपासला गेला. शेवटी एकमेकांना आदर देणं म्हणजे हेच नाही का?
जेफ सारखे लोक ही पहिली कॅटेगरी.
याउलट मी असे काही लोक बघितले आहेत की त्यांचा आपल्या टीमवर अजिबात विश्वास नसतो. (तो जर नसेल तर ही लोक टीम वाढवतात कशाला हा मला नेहमी पडणारा प्रश्न). सतत त्यांना आरोपीच्या कटघर्यात. निर्णय त्यांच्यावर लादायचे आणि ते वर्क आउट नाही झाले तर त्यासाठी टीमला जबाबदार धरायचं. व्यवसायात स्वतः निर्णय घेऊन टाकायचा टीमला विचारायचं नाटक करायचं. म्हणजे सहसा त्यांचा डायलॉग असा असतो "मी अमुक तमुक करायचं ठरवलं आहे. तुम्हाला काय वाटतं?" आता तुम्ही व्यवसायाचे प्रीमियर. तुम्ही ठरवलंच आहे तर आम्ही कशाला विरोध करू? असा लोक विचार करतात. आणि यापुढे जाऊन कुणी काही सुचवलं तर आपल्या पोझिशनचा वापर करून ते म्हणणं हाणून पडायचं. लोक सुद्धा आपल्या कोशात जातात. ते निर्णय घेत नाहीत आणि मग होयबा, किंवा प्राकृत भाषेतील चमचा लोकांची गॅंग आपल्या भोवताली जमा करण्यात तो लीडर धन्यता मानतो. या प्रकारच्या लीडर बरोबर काम करणाऱ्या लोकांची वाढ खुरटते, पर्यायाने व्यवसायाची.
काळाच्या कसोटीवर सिद्ध होणारं एंटरप्राइज, मग ते कुठल्याही साईझ चं असो, बनवायचं असेल तर पहिल्या प्रकारचे नेतृत्वगुण अंगात बाणवायला हवेत असं माझ्या लक्षात आलं.
लोकांना भेटलं की हे असं नव्याने काही तरी शिकायला मिळतं.
व्यवसायाने बाळसं धरल्यावर एका प्रक्रियेत मोठा फरक होतो. फरक बऱ्याच गोष्टीत होतो. पण सगळ्यात मोठा फरक होतो तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत.
व्यवसाय लहान असताना सर्व निर्णय तुम्हाला एकट्याने घ्यायचे असतात. त्यातून परिस्थितीला अनुसरून निर्णय घ्यायची सवय लागते खरी, पण त्या प्रोसेस मध्ये अजून एक घडतं. एकधिकारशाहीचा जन्म होतो. एखाद्या सिच्युएशन कडे आपण जसं बघतो तीच पद्धत बरोबर असा एक फाजील आत्मविश्वास अंगात भिनतो.
कालानुरूप व्यवसाय वाढतो. त्याला संयुक्तिक असं एक बोर्ड कंपनीत तयार होतं, डायरेक्टर बोर्ड. अगदीच फॉर्मल बोर्ड तयार नाही झालं तरी मग सिनियर लोकांची टीम तयार होते. असं अपेक्षित असतं की आता यापुढे घेतले जाणारे निर्णय हे त्या बोर्ड च्या किंवा कोअर टीमच्या संमतीने घेतले जावेत. मग ते कुठलेही असोत.
इथं खरी गंमत चालू होते. इतके दिवस एकट्याने निर्णय घेण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सवय लागलेल्या प्रमुखाला अपल्यावरती आता बोर्ड आहे आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त पॉवर आहे हेच मान्य होत नाही.
तीच गोष्ट सिनियर लोकांच्या टीमची. या टीमला जर निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही तर कुठलाही निर्णय घेताना एकांगी विचार केला जातो, फक्त प्रमुखाच्या मेंदूने, जो व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक असेलच असे नाही. रादर दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टीने तो चुकीचा पण असू शकतो.
Saturday, 21 January 2023
सोशल मीडिया
सोशल मीडिया म्हणजे माझ्यापुरतं फेसबुक, लिंक्ड इन, व्हाट्स अप इतक्या पुरतं मर्यादित आहे. या संदर्भांत
मला साधारण तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात.
"राजेश काय चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो" ही बहुतेकदा माझे नातेवाईक आणि काही प्रत्यक्षातल्या मित्रांची प्रतिक्रिया असते. यात वास्तविकतेपेक्षा हेटाई जास्त असते.
"तुम्ही जे काही लिहिता ते आम्हाला आवडतं." हे फेसबुकवरील मित्र मैत्रिणी आणि लिंक्ड इन चे कनेक्शन व्यक्त होतात. यातही काही जेन्यूईन असतात तर काहींना नाईलाज असतो.
"इतका वेळ कसा काय मिळतो तुला/तुम्हाला?" ही एक बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न. यातही काहींना कुतूहल असतं, काहींना अविश्वास असतो. परवा श्रीपाद घोडके कडे मला तरुणांनी मला हा प्रश्न विचारला.
सोशल मीडिया मॅनेज कसा करतो, यावर लिहा असं काही जणांनी सांगितलं, त्यावर लिहितो. व्हाट्स अप आणि लिंक्ड इन मॅनेज करायला फार अवघड नाही.
व्हाट्स अप वर सहसा चॅटिंग करत नाही. बोलायला अगदीच जमत नसेल तर करतो, ते ही अगदी मोजकं. चॅटिंगचा थ्रेड लांबू लागला की फोन करतो.
वाढदिवस, श्रद्धांजली, सणावाराच्या शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी यावर स्वतःहून कुठल्याही ग्रुप वर कधीही लिहीत नाही. पर्सनल मेसेजद्वारे भावना पोहचवतो.
कितीही भारी मेसेज असेल तरीही फॉरवर्ड करत नाही. अगदीच वाटलं तर ओरिजिनल सोर्स वर जातो आणि तिथली लिंक शेअर करतो.
व्यावसायिक असे नऊ ग्रुप आहेत (३ क्रिसलीस, ३ आय एम टी एम ए, १ असोसिएशन, १ ट्रस्टी, १ कंपनी), पर्सनल ६ ग्रुप आहेत. त्यातले तीन फॅमिली चे आहेत ज्याची जास्तीत जास्त मेम्बर संख्या ८ आहे. दोघांचे नंबर वेगळे आहेत. सर्व ग्रुप वर राजकीय, धार्मिक, जातीय धुळवड खेळायला सक्त मनाई आहे. कुठं झालीच तर माझ्या शब्दात सुनावतो आणि ते जर बंद झालं तरच ग्रुपवर थांबतो. नाहीतर ग्रुप सोडतो.
रिझल्ट: सकाळी मोबाईलवर दोन्ही नंबर मिळून साधारणपणे फक्त दहा ते बारा मेसेज असतात.
लिंक्ड इन:
लिंक्ड इन चा वापर फेसबुकपेक्षा रिलेटिव्हली कमी. ते ऑफिसमध्ये बघायची लिबर्टी घेतो. कारण ते बहुधा व्यावसायिक कारणासाठी निगडित असतं. तिथे तसाही फारसा टाईमपास होत नाही.
आता राहता राहिलं फेसबुक:
फेसबुकवर फक्त दोनच ऍक्टिव्हिटी इमानेइतबारे करतो. एक वॉल वर लिहिणे. अगदीच संयुक्तिक कॉमेंट असतील तर त्यांना उत्तर देणे.
फेसबुकच्या दिवसभरातील माझ्या दोन वेळा फिक्स आहेत. एक घरून कंपनीत येईपर्यंत आणि दुसरी कंपनीतून निघाल्यावर घर येईपर्यंत. साधारण दीड पावणेदोन तास. याशिवाय घरातील ऍडिशनल अर्धा ते पाऊण तास. कंपनीतील सव्वानऊ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत फेसबुक वापरत नाही. सुट्टीच्या दिवशी घरी फेसबुक जास्त वापरलं जातं. बाकी प्रवासात असेल तर बेधुंद फेसबुक वापरतो. एअरपोर्ट, कार किंवा ट्रेन मध्ये असेल तर कधी पुस्तक तर कधी फेसबुक.
फेसबुकवर सुद्धा कुठल्याही राजकीय, धार्मिक आणि जातीय धुळवडीत सहभाग नसतो. कुठल्याही ट्रेंड मध्ये सहसा सहभागी नसतो. फेसबुकवर कुणी काय लिहावं, कुठले फोटो लावावे, कोण शहाणपणा करतो, मूर्खपणें वागतं याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. (दोन-तीन पोस्ट पूर्वी लिहिल्या होत्या, त्यानंतर कानाला खडा).
माझा सोशल मीडिया वापरायचा अजेंडा फिक्स आहे. मी टाईमपास साठी येत नाही. समाज प्रबोधन, दुसर्यांना इन्स्पिरेशन वगैरे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. तो अजेंडा काय आहे, त्याचा वापर काय आणि कसा करायचा याबाबत माझे आराखडे फिक्स आहेत. माझ्या वेळेची किंमत काय आहे मला चांगलं माहित आहे. त्यामुळे इथं जो वेळ व्यतीत करतो, तो फुकट नाही आहे. सध्या इतकंच सांगतो.
Wednesday, 4 January 2023
माझं मन.
आता तसाही शेवट जवळ आलाच आहे. सगळ्या प्रकरणावर एकदाचा पडदा पडणार असं दिसतं आहे. तेव्हा मित्रा, मला जे सांगायचं आहे ते मी स्पष्टपणे सांगून टाकतोच. आणि हे जे मी सांगणार आहे ते पूर्णपणे सजगतेने सांगणार आहे, ज्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही.
मी सर्वार्थाने परिपूर्ण असं आयुष्य जगलो आहे. इथवर पोहोचण्यासाठी प्रसंगानुरूप अनेक काटेरी मार्गांचा उपयोग केला. आणि त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे जे मी वागलो ते माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, जे मला पटतं, तसाच वागलो.
पश्चातापाचे क्षण मी पण भोगले. फारसे नाही आणि ज्याचा आवर्जून उल्लेख करावा असे तर फारच कमी. त्या प्रसंगी मला कृतिशील राहणं हे अतीव गरजेचं होतं. सुटका नव्हतीच. मी त्यावर विचारपूर्वक निर्णय घेतले. काळजीपूर्वक एकेक गुंता सोडवत गेलो. त्या उपरही सांगतो, हे सगळं करताना मी फक्त माझ्या मनाचं ऐकलं.
हो, काही प्रसंग आलेही आयुष्यात, आणि मला माहिती आहे की ते तुझ्याही लक्षात असतील. माझ्या क्षमतेपेक्षा मी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे फटके ही बसले. पण त्याच्या परिणामांना मी सामोरे गेलो आणि काहींना काळाच्या ओघात मी विस्मृतीत ढकललं. पडलो, धडलो पण पुन्हा उभा राहिलो अन नव्याने घडलो. हे सगळं करताना कौल घेतला तो माझ्याच मनाचा.
मी जगण्यावर असोशीने प्रेम केलं. कधी हसलो तर कधी रडलो. कधी पराभूताची मानसिकता अनुभवली. कोषात गेलो. पण आता जेव्हा अश्रूच गोठले आहेत तेव्हा तो भूतकाळ मला मोठा विस्मयकारी वाटतो आहे. मला त्यावेळेस घेतलेल्या निर्णयाचा गम अजिबात वाटत नाही आहे. कारण मी केलेल्या कृतीची दिशा माझ्याच मनाने तर दाखवली होती.
शेवटी मनुष्ययोनीत जन्माला आलोच आहे तर त्यातून काहीतरी भरीव निष्पन्न घडायला नको का? जर भरभरून जगलोच नाही तर अस्तित्वहीन असण्याचा काय उपयोग? लाचारीतून जन्माला आलेल्या शब्दांचा मला सहारा नकोच आहे. सत्य आणि सत्यच बोलण्याचं धैर्य माझ्यात हवं. आणि मला माहिती आहे, याचा मला प्रचंड त्रास झाला आहे, होणार आहे. पण शेवटी माझं मन मला जे सांगतं आहे तेच ऐकायला हवं.
माझं मन.....त्याचंच बोट धरून तर मी अनेक आव्हानांना सामोरे गेलो आहे.
फ्रॅंक सिनात्रा च्या माय वे या गाण्याचा गद्य भावानुवाद
Friday, 28 October 2022
डॉ शंतनू अभ्यंकर
डॉ शंतनू अभ्यंकर आणि माझी तशी जुजबी ओळख. म्हणजे मी त्याला ओळखतो पण तो मला ओळखत नसावा. किंवा ओळखत असला तरी वैभवीचा नवरा म्हणून. मला मात्र या ना त्या कारणाने शंतनू बद्दल माहिती आहे. त्याचा मोठा भाऊ शशांक माझ्या चांगला ओळखीचा. रादर माझं पहिलं व्हिजिटिंग कार्ड शशांकने छापलं आहे १९९४ साली. शंतनू चे सासरे बजाज औरंगाबाद चे उच्चपदस्थ. त्यांच्याही घरी माझं जाणं झालेलं. त्याने होमिओपॅथी करून मग बीजेला ऍडमिशन घेतली ते ही लक्षात आहे. असो, मी शंतनूला ओळखतो हे सांगण्यासाठी ही पोस्ट नाही आहे. तर पोस्ट आहे त्याच्या लेखाबद्दल.
शंतनूला नुकताच भेटलो होतो डॉ कल्पना सांगळेच्या पुस्तक प्रकाशनाला. आपल्या खुसखुशीत शब्दात त्याने त्या दिवशी भाषण पण केलं. आणि त्यानंतर दीड दोन महिन्यात त्याच्या आजाराचं निदान झालं. लंग्ज कँसर. मी आणि वैभवी पण ऐकून अवाक झालो. काल त्याचा त्या संदर्भांतील लेख वाचला.
ज्यांना कुणाला कँसरबद्दल, किंबहुना कुठल्याही आजाराबद्दल भीती असेल त्याने हा लेख वाचावा. लोक अध्यात्मिक, तात्विक बऱ्याच गोष्टीवर बोलतात. मला वाटतं शंतनू ते जगतोय. ते तो जगतोय हे सांगण्यासाठी त्याला शब्दजंजाळ भाषा वापरावी लागत नाही. त्याने स्वतःचे अनुभव, त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकुणात आयुष्याकडे किती निरपेक्ष भावनेनें बघायला हवं हे त्या लेखातून प्रत्येक वाक्यातून उद्धृत केलं आहे. त्यात फार अलंकारिक भाषा नाही आहे, काहीही अनाकलनीय नाही आहे. इन फॅक्ट एखादा मित्र आपल्या खांदयावर हात ठेवून स्वतःच्याच आजाराबद्दल आपलंच सांत्वन करतोय, त्यातले बारकावे आपल्याला समजावून सांगतोय आणि एकुणात ते सगळं करताना जगण्याकडे किती तटस्थ भूमिकेने बघायला हवं आहे हे सांगतोय. बरं हे सगळं करताना कुठलाही अभिनिवेश नाही आहे, कुठलीही निराशा नाही आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांवर कायम विरोधात आहे असा एक समज आपल्याकडे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत शंतनू जे आयुष्य जगतो आहे ते अध्यात्मापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. तो लेख वाचताना शंतनू बद्दल कणव निर्माण होत नाही, त्याच्याबद्दल रागही येत नाही तर आपण स्तिमित होत तो लेख वाचत संपवतो.
योगी लोक काय सांगतील ते तुमच्या माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या, कुठलाही फॅन्सी ड्रेस न घालणाऱ्या, हातात कमंडलू वगैरे न घेता या संवेदनशील डॉक्टर ने अगदी सहजगत्या सांगितलं आहे. बोरकरांनी म्हंटल्याप्रमाणे "जीवन यांना कळले हो" ही कविता शंतनूला परफेक्ट लागू होते.
Thursday, 6 October 2022
कोविड नंतर भारतीय इकॉनॉमी
खरंतर या विषयावर मी आधी लिहिलं होतं, पण पब्लिक मेमरी शॉर्ट असते आणि त्यातही फेसबुकवर लिहिलेलं कुणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे मध्ये एका पोस्टवर जेव्हा मी भारत आर्थिक बाबींवर सुस्थितीत आहे असं लिहिलं होतं तेव्हा कुणाला तो विनोद वाटला होता किंवा काहींचा त्यावर विश्वास बसला नव्हता.
जे काही मी लिहिणार आहे ते स्टॅटेस्टिक्स हे वेगवेगळ्या कॉन्फरन्स मधून मांडलं गेलेलं आहे. व्यवसायाच्या निमित्ताने मला तिथे हजर राहायला मिळतं आणि तिथून हा डेटा मिळतो. त्याची सत्यासत्यता प्रूव्ह करण्याची जबाबदारी मी टाळणार नाही, पण मी काही बिझिनेस ऍनालिस्ट वगैरे नाही आहे. जे काही मोठी लोक सांगतात ते टिपून ठेवतो.
- भारतासारखे विकसनशील देश हे जागतिक इकॉनॉमी च्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स देत आहेत. यात भारतासकट साऊथ ईस्ट एशियातील काही देशांचा समावेश होतो.
- भारताचा इन्फ्लेशन रेट हा प्री कोविड वर्षात ३.५% ते ५% दरम्यान होता. पोस्ट कोविड काळात तो ७% पर्यंत पोहोचला आहे. पुढच्या वर्षी तो परत प्रि कोविड लेव्हल ला येण्याची शक्यता आहे म्हणजे ४% च्या आसपास. प्रगत देशांचा इन्फ्लेशन रेट हा प्रि कोविड काळात साधारण पणे १.५% ते २% या दरम्यान होता. पोस्ट कोविड आणि त्यात परत रशिया युक्रेन युद्धामुळे तो १०% पर्यंत पोहोचला आहे. तो सध्या ८.५% ते ९% दरम्यान स्थिरावला आहे. पण तो परत मूळ पदावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे असे तज्ञ लोक सांगतात.
- रशिया बरोबरचे राजनैतिक संबंध हा भारताच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. भारत आणि रशिया यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अनेक वेळा झाले आहे. त्यात लष्करी सामुग्री शिवाय क्रायोजेनिक इंजिन सारख्या हाय एन्ड टेक्नॉलॉजी चा समावेश होतो. या मैत्रीपूर्ण संबंधामुळे रशिया युक्रेन युद्धात आपण रशियाला विरोध केला नाही आणि त्यामुळे भारताला फ्युएल प्राईस इन्फ्लेशन वर बाकी जगाच्या मानाने चांगलं यश मिळालं. भारतातही इंधनाचे दर वाढले पण रेट ऑफ चेंज हा अनेक प्रगत देशापेक्षा कमी होता.
- भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा येणाऱ्या काही वर्षात ७% च्या वर असणार आहे हे माझं नाही तर अनेक फायनान्शियल संस्थांचा कयास आहे. जगात इतका ग्रोथ रेट हा फार कमी देशांचा असणार आहे.
- भारताने आपली बँकिंग प्रणाली ही फार सेफ बनवली आहे. आणि हे आज नव्हे तर अगदी २००३ पासून. आणि त्यामुळेच दोन मोठे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेला बसले पण भारतीय आर्थिक स्थिती डळमळीत झाली नाही. पहिला धक्का लेहमन ब्रदर्स चा २००९ साली आणि नंतर २०२० चा कोविड. त्या दोन्हीला भारतीय अर्थव्यवस्थेने समर्थ पणे तोंड दिलं आहे.
- आजच्या घडीला कॅपिटल गुड मार्केट साईझ (म्हणजे यात ऑटोमोबाईल, हेवी मशिनरी वगैरे सारखे प्रोजेक्ट येतात) हे साधारण पाने $ ४३.२ बिलियन चं आहे ते २०२६ साली $ १०० बिलियन पर्यन्त जाण्याचं प्रोजेक्शन आहे. मेक इन इंडिया या ड्राइव्ह चा सगळ्यात जास्त फायदा या सेक्टर ला होताना दिसतोय. रेल्वे, डिफेन्स, एरोस्पेस या क्षेत्रात प्रचंड काम भारतीय कंपन्यांना मिळालं आहे. पी एल आय, गतिशक्ती या योजनेमुळे याला सकारत्मक इंधन मिळालं आहे.
- सगळ्यात मुख्य म्हणजे जागतिक मार्केट मध्ये चीन ने आपली विश्वासार्हता गमावली आहे. यात कोविड एक भाग झाला. याव्यतिरिक्त गेल्या दोन एक वर्षातील घडामोडी पाहिल्या तर चीन-तैवान संबंध, सेमी कंडक्टर सप्लाय मध्ये आलेलं अभूतपूर्व शॉर्टेज, श्रीलंका इश्यू, भारताशी घेतलेला राजनैतिक पंगा, त्यांच्या पोलादी पडद्याआड घडणाऱ्या अनेक घटना यामुळे त्यांनी आपली इमेज खराब करून टाकली आहे. याचा अर्थ असा नाही की चीन फार प्रॉब्लेम मध्ये वगैरे आहे कारण त्यांचं अंतर्गत कंझम्पशन खूप जास्त आहे. त्यामुळे "चीन साठी चीन, आणि बाकी जगासाठी भारत" अशी एक प्रतिमा उत्पादन क्षेत्रात तयार झाली आहे. भारताबरोबरच व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया या दक्षिण पूर्व देशांना फायदा होणार आहे.
संधी दाराशी आली आहे. तिचं सोनं करण्यासाठी "उत्पादकता" हा कळीचा मुद्दा आहे. आजच्या घडीला भारताची उत्पादकता ही जगात खूप कमी आहे. यावर जास्त बोलत नाही कारण गाडी मग वेगळ्याच ट्रॅक वर जाईल. फक्त एक माझं मत सांगतो. या संधीचा फायदा उठवण्यासाठी प्रचंड सामाजिक स्थित्यंतर तर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तसं जर झालं र पुढील ७-८ वर्षे प्रचंड घडामोडीची असणार आहेत.
आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिकल सिस्टम घडामोडी मध्ये आपली पावले बरोबर पडली तर भविष्यात येणाऱ्या अनेक दीपावली समृद्धी घेऊन येणार आहेत, असा अनेकांचा अंदाज आहे. मीही त्याबद्दल आशावादी आहे
Monday, 3 October 2022
ब्रेन ड्रेन
आजकाल बऱ्याच वेळा हे दिसून येतं आहे की अनेक घरातून मुलं मुली हे परदेशात शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी पकडून सेटल होतात. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे "आजची तरुणाई पैशाच्या मागे लागली आहे" किंवा "चंगळवाद फोफावला आहे" इतकं बोलून त्या वस्तुस्थितीची बोळवण करून टाकतो. ही तिकडे गेलेली मुलं मुली भारतात असणाऱ्या लोकांचा चेष्टेचा विषय बनतो.
माझ्या मते आपण हे सगळ्या गोष्टीकडे फार सुपरफिशियल पद्धतीने बघतो आहोत. म्हणजे अगदी माझीच केस स्टडी घेऊ यात. माझा व्यवसाय हा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. देवकृपेने बऱ्यापैकी नाव वगैरे कमावलं आहे. एका मल्टी नॅशनल कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे. बरं सेटको बोर्ड आमच्या मुलांना कंपनीत घ्यायला तयार आहे. तरीही माझा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियरिंग करून एम एस करण्यासाठी अमेरिकेत गेला आहे आणि परत येण्याची सुतराम शक्यता नाही आहे. माझ्या पार्टनर ची मुलगी सुद्धा सेटको त काम करून आता अमेरिकेला गेली आहे. आणि तिची पण परतण्याची शक्यता धूसर आहे. यापलीकडे जाऊन माझ्या मोठ्या मुलाने नील ला मेकॅनिकल इंजिनियरिंग न घेता कॉम्पुटर सायन्स घ्यायला लावलं आहे आणि त्यालाही तो तिकडे बोलावतो आहे.
माझ्या देशप्रेमाच्या मला फार गप्पा मारायला आवडत नाही. पण ज्या पद्धतीने मी कंपनी चालवतो त्यावरून माझ्या कंपनीतल्या लोकांनाच नव्हे तर माझ्या अमेरिकन काउंटर पार्ट ला पण माहिती आहे की माझं भारतावर आणि इथल्या लोकांवर किती प्रेम आहे ते. त्यामुळे ती भावना घरात पण झिरपलेली आहे, असा माझा समज आहे.
आता प्रश्न हा आहे की इतकं असलं तरी माझी पोरं बाहेर राहण्याचा विचार करत आहेत. मग याचं उत्तरदायित्व आपल्या सोशल इको सिस्टम वर आहे असं माझं हळूहळू मत बनत चाललं आहे.
आपल्या इथलं असलेलं क्वालिटी ऑफ लाईफ, मग त्यामध्ये रस्त्याची कंडिशन, सार्वजनिक स्वच्छता, आपल्या इथं असणारी जातिव्यवस्था, धार्मिक भावनेचं झालेलं अति उन्मादीकरण या आणि यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात असा माझा दावा नाही तर कयास आहे. घरापासून कॉलेज पर्यंत जाताना फ्लेक्स वर दिसणारे भावी नेते जे गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून असतात, कानावर सातत्याने पडणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या बातम्या, शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात राजकारण्यांचा झालेला शिरकाव या सगळ्यांचा तरुणाईच्या मनावर सबकॉन्शसली फरक पडत नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर मोठी गल्लत होत आहे.
वानगीदाखल दोन घटना सांगतो. सहावी सातवीत असताना निलला शाळेतर्फे ट्राफिक कंट्रोल कसा करायचा हे शिकवायला रस्त्यावर नेलं होतं. लाल सिग्नल असल्यामुळे ते बारा वर्षाच्या पोराने एक इनोव्हाला हात दाखवून अडवलं. तर त्या गाडीतल्या पांढरे कपडे आणि सोनसाखळी घातलेल्या सद्गृहस्थाने निलला, बारा वर्षाच्या पोराला "ए ***चोद चल, बाजूला हो" असं सांगून गाडी पुढं दामटली.
सिंहगडच्या पायथ्याला काही गावकरी आपल्या शेतात कार पार्किंग साठी जागा देतात. यश, नील आणि मी असे तिघेही होतो. सिन असा होता की आमच्या शेजारी एका पोलीस अधिकाऱ्याची एर्तिगा होती. तो अधिकारी आपल्या कुटुंबकबिला घेऊन आला होता. पण बाहेर जाताना त्या गावकऱ्याने त्याला पार्किंग चे ३० रु मागितले तेव्हा "पैसे कसले मागतोस हरामखोर" असं म्हणत निघून ती गाडी निघून गेली.
अशा घटनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत नसेल का? घरातील एक सद्भाव वातावरण आणि घराच्या बाहेर जे १२ एक तास असतात तिथलं विचित्र वातावरण यामुळे ही तरुणाई कन्फ्युज होत नसेल का?
त्यामुळे हे बिघडलेलं सोशल इंजिनियरिंग जर आपण बदललं नाही तर हे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत जाणार आहे. आज अनेक शहरात बिल्डिंगमध्ये फक्त म्हातारे लोक राहत आहेत. राष्ट्रप्रथम ही भावना खऱ्या अर्थाने मनात रुजवायची असेल तर शैक्षणिक, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास या मूलभूत गोष्टीवर अगदी मुळापासून काम करत प्रगल्भ समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे.
ब्रेन ड्रेन