Thursday, 8 February 2024

 सकाळी पावणे अकरा ला लुधियाना स्टेशनवर कार आलीच होती. तिथून मी होशियारपूर ला पहिल्या कस्टमर कॉलसाठी गेलो.  तिथं मिटिंग चालू असतानाच मला इंडिगो चा मेसेज आला की माझी रात्री सव्वा दहाची चंदिगढ-पुणे फ्लाईट खराब वातावरणामुळे रद्द केली गेली आहे. मिटिंग चालू असल्यामुळे त्यावर काही करू शकत नव्हतो. कॉल पूर्ण झाल्यावर मला लुधियानात मिटिंग होती. परतीच्या प्रवासात मी इंडिगो कस्टमर केअर ला फोन केला. त्यांनी मला रिशेड्युल मध्ये संध्याकाळी पावणे सात ची फ्लाईट ऑफर केली जी मला शक्य नव्हती. कारण माझा दुसरा कॉलही होणार नव्हता आणि मुख्य म्हणजे मी वेळेवर पोहोचेल की नाही याची गॅरंटी नव्हती कारण तो प्रवास साडेतीन तासाचा होता. 

चंदिगढ चं वातावरण खूपच बेकार होतं. सूर्य नावाला दिसत नव्हता. इंडिगो ने मला दुसऱ्या दिवशीची सकाळी सहा वीस ची फ्लाईट सांगितली जी घेण्यात धोका होता. शेवटी विचार करून मी दुपारी १२:२० च्या फ्लाईट ला होकार दिला जी व्हाया बंगलोर संध्याकाळी सात वाजता ला पुण्यात पोहचवणार होती.

मी चंदिगढ मध्ये एक हॉटेल बुक केलं आणि माझे एक कस्टमर कम मित्र आहेत, त्यांच्या बरोबर डिनर मिटिंग अरेंज केली. रात्री दहा वाजता हॉटेल ला येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी वेळेवर एअरपोर्ट ला पोहोचलो. वातावरण थोडं बरं होतं. मला अजून एक कळलं होतं की चंदिगढ बंगलोर जाताना विमान इंदोर ला हॉपिंग करणार होतं. पण सकाळी सव्वा अकरा वाजता पाऊस चालू झाला आणि अर्ध्या तासात पूर्ण झाकोळून गेलं आणि पावसाचं तांडव नृत्य चालू झालं आणि ढग फुटीसारखा तुफान पाऊस चालू झाला. पुढील एक तास पर्जन्यदेव बरसत होते. आमचं इनकमिंग फ्लाईट हे जयपूरला वळवण्यात आलं. मला वाटलं आपली आता पुन्हा लागते पण सुदैवाने पाऊस उघडला आणि वातावरण क्लिअर झालं. बारा वीस च्या माझी फ्लाईट आता दोन पंचवीस ला निघणार होती. चंदिगढ-इंदोर-बंगलोर या प्रवासाला सव्वा तीन तास लागणार होते आणि माझी बंगलोर पुणे पाच पन्नास ची फ्लाईट चुकणार हे फिक्स झालं होतं.

मी तिथं माझ्या प्रॉब्लेम बद्दल बोलायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला इंडिगो तुन फोन येईल असं सांगितलं. शेवटी बोर्डिंग चालू झालं. मी रांगेत उभा राहिलो पण दोन मिनिटात माझ्या नावाचा पुकारा झाला आणि मला थांबायला सांगितलं. रांग पुढं सरकत होती आणि मी आशाळभूतपणे ग्राउंड स्टाफ कडे "मेरा क्या होगा" हा प्रश्न चेहऱ्यावर ठेवून पाहत होतो. स्टाफ मला फक्त हाताने "जरा धीर धरा" इतकंच सांगत होती.

सगळं बोर्डिंग पूर्ण झालं आणि मला सांगण्यात आलं की बंगलोर हुन रात्री आठ पन्नास च्या फ्लाईट मध्ये मला सीट देण्यात आली आहे आणि माझे बोर्डिंग पास बॅक ऑफिस मधून प्रिंट होऊन येत आहेत. बोर्डिंग पास आले आणि मला स्टाफने पटकन बोर्ड करायला सांगितलं. मी पास स्कॅन केला आणि आणि धावत एरोब्रिज मधून जात होतो. दरवाजाजवळ जाईपर्यंत माझ्या लक्षात आलं की मला पहिला बोर्डिंग पास हा चंदिगढ बंगलोर ऐवजी चंदिगढ इंदोर असा दिला आहे. मी दरवाजा वरील स्टाफ ला सांगितलं तर तो म्हणाला की काही प्रॉब्लेम नाही, ऍडजस्ट होईल. मी म्हणालो की तुझ्या सिनियर स्टाफला विचार तर तिच्या प्रॉब्लेम लक्षात आला. तिने बॅक ऑफिस ला फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही फ्लाईट मध्ये बसा मी व्हाट्स अप वर बोर्डिंग पास मेसेज करते.

मी म्हणालो तो पास आला नाही तर मला इंदोर ला डिप्लेन व्हावं लागेल. "सर, भरोसा रखिए, मैं  भेजूंगी आपका बोर्डिंग पास" आणि तिने मला विनंती करून फ्लाईट मध्ये जायला सांगितलं. 

टेक ऑफ करण्यासाठी विमान रन वे वर आणि व्हाट्स अप वर मला करेक्ट बोर्डिंग पास आला.

तुम्हाला वाटेल पुराण संपलं असेल इथं. तर नाही. इंदोरला फ्लाईट हॉप करताना तिथल्या ग्राउंड स्टाफच्या मॅनिफेस्टो मध्ये माझं नाव नव्हतं. परत तिथं सिनियर स्टाफ आला. फोनाफोनी झाली. माझ्या व्हाट्स अप वर आलेल्या बोर्डिंग पास चं व्हेरिफिकेशन झालं आणि माझ्या भोवती कोंडाळे करून असलेला स्टाफ गेल्यावर मी वाचत असलेलं पुस्तक परत माझ्या लॅपटॉप बॅग मध्ये ठेवावं तर वर कॅरेज मध्ये माझी लॅपटॉप बॅगच नव्हती. नजर भिरभिरत असताना दिसलं की ग्राउंड स्टाफ अन आयडेंटिफाईड बॅग म्हणून घेऊन चालला होता. मी माझं बोर्डिंग पासचं लफडं निस्तारत असताना भावाने विचारलं होतं म्हणे ही बॅग कुणाची आहे. कुणी उत्तर न दिल्याने घेऊन चालला होता. शेवटी बंगलोर ला आलो. तिथंही पाऊण तास फ्लाईट लेट होत रात्री साडेअकरा ला माझी एकवचनी वरात घरी पोहोचली आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

Thursday, 1 February 2024

 कधी कधी वाटतं आपुनही भगवान है. पण मग नशीब दणकन जमिनीवर आणतं. फार नाही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे की माझ्या मनात विचार आला की आपलं काम किती भारी आहे. दणकावून काम करणे, कामासाठी पायाला भिंगरी लागल्यागत फिरणे, प्लॅनिंग पण असं मस्त करणे की रेल्वे, फ्लाईट या मिळेल त्या मोडने प्रवास करणे, त्याची तिकिटं, हॉटेल बुकिंग, टॅक्सी वगैरे वगैरे. गेल्या एकोणतीस वर्षांच्या फिरतीत फार कमी वेळा माझी फ्लाईट वा रेल्वे रद्द किंवा चुकली असं झालं आणि त्याचं मला फार कौतुक. 

पण आता पंजाबच्या दौऱ्यात या सगळ्या कौतुकाला सुरुंग लागला. लोकांच्या वेगवेगळ्या प्रवासात जे होऊ शकतं ते माझ्या एकाच प्रवासात झालं. म्हणजे पुण्यात परत पोहोचेपर्यंत येडा झालो होतो. 

मी मानेसर ला जाऊन एक दिवस काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी वंदे भारत ने लुधियाना ला जाणार होतो. दिवसभर होशियारपूर आणि लुधियानात काम करून रात्री चंदिगढ-पुणे फ्लाईट ने परत यायचं अशी दोन दिवसांची टूर होती. 

शक्यतो मी दिल्लीला जाताना सकाळी ७:४० ची एअर इंडिया ची फ्लाईट घेतो. यावेळेस काय झोल मध्ये बुकिंग करत होतो, पण सकाळ ७:४० ऐवजी संध्याकाळी ६:४० चं फ्लाईट बुक झालं. ते केलं खरं पण मंगळवारी सकाळी साडेअकरा ला मेसेज आला की संध्याकाळची फ्लाईट कॅन्सल झाली. एअर इंडिया वाले म्हणाले की पुढच्या तीन दिवसातील कुठलंही बुकिंग घ्या जे मला शक्य नव्हतं. मंगळवारी जाणं क्रमप्राप्त होतं कारण पुढे अनेक प्लॅन केले होते. दादापुता करत त्याने मला चार च्या फ्लाईट मध्ये जागा दिली. घाई गडबड करावी लागली. त्यात माझ्या ड्रायव्हर ला माझा बिझिनेस पार्टनर हॉस्पिटल ला घेऊन गेला होता. मी साडेबारा ला निघालो कंपनीतुन. रस्त्यात नवश्या मारुतीपाशी ड्रायव्हर एक्सचेंज झाला. 

मानेसर ला नेहमी जातो तेव्हा आमचं एक छोटेखानी हॉटेल फिक्स आहे. पण यावेळी दुसऱ्या दिवशी वंदे भारत ने सकाळी सहा वाजता निघायचं होतं. म्हणून मग नेट वरून शोधून पहाडगंज मधील एक हॉटेल बुक केलं. ते अशा अंतरावर होतं की सकाळी मी पायी पाच मिनिटात स्टेशन ला पोहोचेल. 

मी हॉटेल ला पोहोचलो खरा पण माझ्या आयुष्यातील मी सगळ्यात लहान रूम पाहिली. म्हणजे यदाकदाचित दारू पिऊन मी रूम मध्ये गेलो आणि झिंगुन आडवं पडायचं म्हंटलं तरी कुठल्या तरी भिंतीला अडकून तिरपा झालो असतो. एनिवे, फक्त रात्र काढायची होती. झोपलो आणि सकाळी सहाची वंदे भारत पकडली. वंदे भारत चं रेकॉर्ड आहे की ती ऑन टाईम असते. पण रेल्वे हरियाणा पंजाब प्रदेशात शिरली आणि तुफान धुकं चालू झालं.

सकाळी ९:२० ला पोहोचायचो मी तो पावणे अकरा ला लुधियानात उतरलो. 

क्रमश: 

(प्रवास तुम्हाला काय काय शिकवतो हे दोन भागातून तुम्हाला कळेल, म्हणून पोस्ट लिहितो आहे)

Monday, 18 December 2023

 ३ नोव्हेंबर ला जिम मध्ये छातीत दुखल्यासारखं झालं. त्याकडे दुर्लक्ष करत मी काम केलं. ४ नोव्हेंबर ला निगडीत ग दि मा सभागृहात गाडी पार्क केल्यावर रॅम्प वर चालत आलो. नाट्यगृहात ए सी असला तरी मला घाम आल्यासारखं झालं. तिथून मी गाडी चालवत पुण्यात आलो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि जेवण करून मी कंपनीत आलो तेव्हा मला अनइझी वाटत होतं. मी निर्णय घेतला स्ट्रेस टेस्ट करून घेऊ. नेमके माझे स्वतःचे डॉक्टर दिवाळीचा आधीचा आठवडा म्हणून लवकर घरी गेले होते. मी दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊन स्ट्रेस टेस्ट केली जी नेमकी पॉझिटिव्ह आली. 

पण एक गोष्ट त्यात चांगली झाली की डॉक्टर ने सांगितलं की स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह ही शेवटच्या एक मिनिटात आली त्यामुळे ती कदाचित डिसेप्टिव्ह आहे. आधी दोन प्लास्टी झाल्यामुळे डॉक्टर म्हणाले की सी टी अँजिओग्राफी करून घ्या. सोमवारी ६ नोव्हेंबर ला सी टी अँजिओग्राफी झाली आणि सुदैवाने त्यात लक्षात आलं की हृदय एकदम टकाटक आहे. दोन दिवसात माझ्या नेहमीच्या डॉक्टर ला रिपोर्ट दाखवले आणि त्यांनी पण सांगितलं की माझे चेस्ट पेन हे कार्डिअक नाही आहेत. 

गंमत अशी झाली की इतकं सगळं सांगून सुद्धा माझे चेस्ट पेन काही थांबत नव्हते. आणि ते दुखणं हे मी शब्दात सांगू नाही शकत. पण डोकं दुखायला लागल्यावर डोक्यात जशा कळा येतात तसे ते पेन्स होते. त्यावर विचार करत असताना मला एक साक्षात्कार झाला की हा स्ट्रेस प्रॉब्लेम तर नाही आहे? 

मी माझी मानसोपचार तज्ञ बहीण मानसी देशमुख हिची मदत घ्यायचं ठरवलं. तिच्या सेशन मध्ये तिने मला १७५ प्रश्न असलेले प्रश्नावली दिली आणि मला विचारलं की गरज पडली तर मनोविकार तज्ञांकडे जाऊन औषधे घ्यायची तयारी आहे का? मी हो म्हणालो. 

मानसीने माझं डायग्नोसिस केलं आणि तिने सांगितलं की मला अँगझायटी डिसऑर्डर झाली आहे आणि ती वाढण्याअगोदर वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे. तिनेच मला एका सायकियाट्रिस्ट चा रेफरन्स दिला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मला सांगितलं की कौन्सिलिंग थेरपी चालू करण्याआधी तुमची मानसिकता जागेवर येण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी एकच गोळी दिली. 

त्या रात्री मी ती गोळी घेतली आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः जादू झाल्यासारखे माझे चेस्ट पेन थांबले. 

औषधे चालू आहेत. जानेवारी महिन्यात कौन्सिलिंग सेशन चालू होतील. 

बराच विचार केला की इतकी पर्सनल गोष्ट सोशल मीडियावर सांगावी की नाही. पण शेवटी सांगावी वाटली. कारण मानसिक आजार हा कुणालाही होऊ शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. 

Wednesday, 13 December 2023

 दिवसाचे चोवीस तास आणि वर्षात ३६५ दिवस हे वैश्विक सत्य आहे. पण त्याच आणि तितक्याच काळाचा वापर करून प्रत्येक जण आयुष्य मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जगतो. त्यामध्ये काही लोक आकाशाची उंची गाठतात तर काही जण मात्र भरीव असं काही फारसं करू शकत नाहीत. किंबहुना तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांचा पण विचार केला तर अनेक जण अर्ह समस्ती आयुष्य जगतात. अर्ह समस्ती म्हणजे worthy of existence. काय मानसिकता असावी अशा लोकांची हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. मी जेव्हा या लोकांचा अभ्यास करतो, एकूण जीवनशैलीबद्दल विचार करतो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. 

त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य जगण्याचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याबद्दल या लोकांच्या डोक्यात खूपच स्पष्टता असते. कुठलंही काम करताना ही लौकिकार्थाने समाजात विशिष्ट योगदान देणारी मंडळी, त्या कामाला सिद्धांताच्या आणि उद्देशाच्या कसोटीवर अगदी तावून सुलाखून बघतात. त्या सिद्धांताला आणि उद्देशाला जागणारं ते काम असेल तर त्यात अक्षरश: झोकून देतात आणि त्यासाठी १००% प्रयत्न पणाला लावतात. पण जर काही कारणाने त्यांच्या मूळ सिद्धांताला धक्का बसणार असेल आणि मूळ उद्देश जर सफल होत नसेल तर बहुतेकदा हे लोक त्या कामाच्या वाटेला पण ही लोकं जात नाहीत. या वैचारिक स्पष्टतेमुळे कुठलं काम हातात घ्यायचं आणि कुठलं नाही याची निवड करताना त्यांचा वेळ फारसा जात नाही आणि मग जे काम हातात घेतलं ते तडीस नेताना ते तन-मन-धन झोकून काम करतात. 

सिद्धांत आणि उद्देश यापैकी एक वेळ जगण्याचे सिद्धांत शोधणं हे सोपं असेलही कदाचित, पण उद्देश शोधणं हे मात्र फार जिकिरीचं काम असतं. स्वतःच्या "असण्याबद्दल" खूप खोलवर विचार करणं हे गरजेचं असतं. वयाच्या कुठल्या पायरीवर याची उपरती होते हा एक मोठा प्रश्नच आहे. काही जण वयाच्या विशीत हे शोधू शकतात तर काही जण तीस, चाळीस किंवा पन्नाशीत याचा धांडोळा घेतात. काहींना मात्र आयुष्य संपतं तरी त्याचा शोध घेता येत नाही आणि अनेक जणांना तर तो शोध घ्यावा याची इच्छा पण होत नाही. फक्त एक मात्र आहे की ज्याक्षणी या सिद्धांताचा आणि उद्देशाचा साक्षात्कार होतो तो युरेका क्षण असतो. आपल्याला लक्षात येतं की आपण ही राजहंस आहोत आणि त्यानंतरच्या आयुष्याला एक वेगळे आयाम प्राप्त होतात. त्या युरेका क्षणाच्या आधीचं आणि नंतरचं जगणं यात प्रकर्षाने जाणवणारा फरक दिसून येतो. 

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हा मूळ उद्देश हा भौतिक गोष्टींशी सांगड घालणारा नसतो. तर तो अभौतिक आणि अमूर्त गोष्टींभोवती रुंजी घालत असतो. एकदा आपलं :असणं" हे भौतिकतेशी निगडित नाही आहे हे लक्षात आलं की त्या उद्देशाला परिपूर्ण करण्यातला प्रवास हा कमालीचा आनंददायी असतो. त्यातून मिळणारं समाधान हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. इंग्रजीत एक शब्द आहे "पॅशन". सामान्यतः त्या शब्दाचा वापर सहजगत्या केला जातो. पॅशन ला मराठीत समानार्थी शब्द दिसत नाही. तरी आपण तिला उत्कट किंवा तीव्र भावना म्हणू शकतो. एखादं काम स्वतःवर ओढून घेताना कुठल्याही भौतिक परताव्याची अपेक्षा न ठेवता काम करणं म्हणजे पॅशन. त्यातील गंमत अशी आहे की जेव्हा या भावनेने काम केलं जातं तेव्हा त्या कामातील गुणवत्ता आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्स हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळेच निःस्वार्थी भावनेने समाजपयोगी काम करणाऱ्या अनेक जणांकडून आपण स्तिमित व्हावं असे अचाट काम झालेलं आपण पाहतो. या  उत्कट भावनेला निखार येण्यासाठी मात्र मनातील उद्देश हा एकतर उदात्त हवा किंवा एव्हरेस्ट इतका भव्य हवा. उदात्त उद्देश आणि त्याची पूर्तता करणारी उत्कट भावना याचा एकत्रित अविष्कार हा दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो हे आपण आजूबाजूच्या अनेक उदाहरणावरून बघतो. 

बऱ्याचदा असं म्हंटलं जातं की ही जगणं गाणं करण्याची भावना किंवा तिला सूर देणारा उद्देश हे अंगभूत असावं लागतं किंवा ते जन्मतः च येतं. मला नाही वाटत तसं. बहुतांशी लोक जन्माला येताना एकाच प्रकारची शारीरिक आणि मानसिक क्षमता घेत जन्माला येतात. (काही अपवाद असतात). ते लक्षात न घेता बहुतेकदा असामान्य लोकांना आपण देवत्व देऊन मखरात बसवून टाकतो आणि आपणही काही भरीव करू शकतो या भावनेला तिलांजली देतो. जन्मा नंतरची जडणघडण, त्यातही मानसिक, ही कौटुंबिक आणि  सामाजिक इको सिस्टम वर अवलंबून असते. किंबहुना असं म्हंटलं जातं की वयाच्या सातव्या वर्षापर्यंत माणसाचा मेंदू आपल्याला हवा त्या पद्धतीने विकसित करता येतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर त्या विचारात बदल घडवून आणता येत नाही. तो बदल घडवता येतो. 

फक्त त्यासाठी लर्निंग. . . . . . . . . . . . अनलर्निंग. . . .. . . . . . . रिलर्निंग ही  पद्धती समजून घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत जे काही जीवन कौशल्ये आपण शिकलो ती एकतर कुणाला तरी हस्तांतरित करण्यात शहाणपण असतं. हे झालं अनलर्निंग. एकदा ते केलं की आपण नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. या नवीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागतात. त्यासाठी कदाचित वेगळी कौशल्ये नव्याने शिकावी लागतात. ही झाली रिलर्निंग ची पद्धत. यामुळे जगण्यात एक नावीन्यता येते. कुठलंही काम करताना "हे बोअर झालं आहे आहे" ही भावना मनाला शिवत नाही. नवनवीन आव्हानं वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वीकारण्यासाठी मन घाबरत नाही. 

ही वरची शृंखला लक्षात आली की त्याला पूरक गुण असतो तो म्हणजे योजनाबद्ध नियोजन. नियोजनाशिवाय जर काही काम हातात घेतलं तर अपयशी इतिश्री होण्याची मुहूर्तमेढ आपण रोवत असतो. नियोजन या प्रकारावर थोडा जास्त वेळ काम केलं तर ते काम नंतरच्या काळात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता जास्त असते.  

एकदा का नियोजन झालं की पुढची महत्वाची पायरी आहे ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. बऱ्याचदा आपण योग्य निर्णय कसे घेता येतील याची वाट बघतो. इथं गंमत अशी आहे की जे लोक लौकिकार्थाने सातत्याने योग्य निर्णय घेत असतात त्यांनी आयुष्यात कधीकाळी खूप चुकीचे निर्णय घेतेलेले असतात. त्यातून जे अनुभव पदरात पडतात त्यातून मग योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. Experience is what you get when you don't get what you wanted असं एक इंग्रजी वाक्य आहे. त्या वेगवेगळ्या अनुभवातून निर्णय क्षमता विकसित करावी लागते. 

निर्णयक्षमता अंगात बाणली गेली की त्याला जोड लागते ते कृतिशीलतेची. कृतीविना निर्णय हे फक्त स्वप्नच  राहतं. कामात चालढकल करणं हे खरंतर कृती टाळणे असंच असतं. त्यामुळे एखादं काम हातात घेतलं तर ते लवकरात लवकर तडीला नेण्यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च करण्याची तयारी हवी. हातात घेतलेल्या कामाला तडफेच्या कृतीची जोड देत ते जर पूर्णत्वाला नेलं तर त्यातून मिळणारा आनंद हा स्वर्गातीत असतोच शिवाय आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आपसूक येतो. 

या तीन गुणांबरोबर गरज असते ती चिकाटीची, पाठपुराव्याची. मॅकडोनाल्ड चा संस्थापक रे क्रॉक याच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट आहे "फाउंडर". त्यात क्रॉक च्या तोंडी सुंदर वाक्य "Perseverance beats genius"  एखाद्याच्या अंगात भले हुशारी कमी असेल पण त्याची पाठपुरावा करण्याची क्षमता असेल तर तो आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मला असे अनेक यशस्वी लोक माहिती आहेत कि ज्यांनी आपली काही स्वप्ने वर्षनुवर्षे मनाशी जपून ठेवली आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेत, कृतिशीलतेची जोड देत आणि त्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा करत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. 

तर आहे हे असं आहे. जे लोक आयुष्य अर्ह समस्ती पद्धतीने जगतात आणि जे लोक फारसं काही दखलयोग्य जगू शकत नाही त्यांच्या विचारधारेत हा पंचसूत्राचा  मूलभूत फरक आहे असं माझं मत आहे. लेखाच्या सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला दिवसाचे २४ तास मिळाले आहेत. त्या वेळेचा वापर आपण किती इफेक्टिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह करतो हे आपल्या हातात आहे. येणाऱ्या नवीन वर्षात तो तसा करता यावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. 



Thursday, 30 November 2023

 संजय आणि संदीप एकत्रच इंजिनियरिंग पास आउट झाले. संजय आपला गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील तर संदीपचं घर तालेवार. दोघे जानी मित्र. दोघेही जबरदस्त हुशार. पण स्वभाव पूर्ण वेगळे. संजयची मानसिकता काटकसरी आणि नम्रतेची तर संदीप मोठया गप्पा मारणाऱ्या आणि थोडा आढ्यताखोर. दोघांनाही नोकरी लागली. वेगवेगळ्या कंपनीत. संजय मान खाली घालून इमानेइतबारे जॉब करत राहिला. तर संदीपने पाच  एक वर्षे काम करत व्यवसायात उडी मारली. 

सात वर्षे नोकरी करून संजयने सुद्धा छोटं वर्कशॉप चालू केलं.

संजयची स्टेडी ग्रोथ चालू होती. संदीपचं पण वरवर पाहता दणकेबाज व्यवसाय वाटत होता. संदीप संजयला म्हणायचा सुद्धा "अरे, काय एक दोन रन काढतोस. माझ्यासारखा चौके छक्के मारायला शिक". संजय कसंनुसं फक्त हसायचा. 

संदीपने एकदम फॅन्सी ऑफिस बनवलं आणि मोठी फॅक्टरी टाकली. ऑफिसवर एखाद दोन कोटी रुपये खर्च केले असावे. आलिशान केबिन होती संदीपची. उदघाटन समारंभाला संजय काही बोलला नाही, पण नंतर त्याने एकदा संदीप ला विचारलं "तुला काही सॉलिड ऑर्डर वगैरे मिळाली का, की इतकी मोठी फॅक्टरी आणि फाईव्ह स्टार ऑफिस बनवलं तू?" संदीप त्याला बेदरकार पणे म्हणाला "तुला नाही कळणार हा माईंडसेट. तू आपला दहा बारा हजार स्क्वे फूट मध्ये गोट्या खेळत बस." इतकं बोलून सुद्धा संजय ने मोठ्या मनाने त्याला शुभेच्छा दिल्या. 

दोघे आपापल्या व्यवसायात रमले. 

संजयच्या कानावर संदीप बद्दल काही बाही ऐकायला येऊ लागलं. लोकांचे पैसे बुडवणे, बँकेकडून लोन घेतलं त्याचे हप्ते चुकवणे. एखाद दोन वर्षात संदीपची पार वाताहत झाली. लोकांनी कोर्ट केस केल्या. 

संजय स्वतःहून संदीपला एक दिवशी भेटला. काय झालं ते समजून घेतलं. संजयचा संदीपच्या हुशारी वर विश्वास होता. तो संदीप ला म्हणाला "तुझा खड्डा बुजवण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत, पण तुझ्यासाठी मी नवीन बिझिनेस काढतो, तू सांभाळायचा. पैसे कमावून देणेकर्यांचे पैसे चुकवू." आम्ही सगळ्यांनी संजयला खूप धोका पत्करतो म्हणून सांगितलं. पण संजय म्हणाला "दोस्ती आहे, तिला जागावं तर लागणार.". 

व्यवसाय चालू झाला. एकेदिवशी संदीपचे देणेकरी पोलिसांना घेऊन त्याला पकडायला आले. संजय मध्ये उभा राहिला. म्हणाला "एक वर्ष द्या. प्रत्येकाचे पैसे चुकवणार. मी खात्री देतो." संजयचं रेप्युटेशन चांगलं होतंच. देणेकरी परत गेले. 

काल संजयचा मला फोन आला. ज्या सात देणेकर्यांनी संदीप वर पोलीस केस केल्या होत्या, त्यातील शेवटच्या व्हेंडर चे पेमेंट संदीप ने केले. सर्वांनी पोलीस केस मागे घेतल्या. मी अवाक होत, संजयचं अभिनंदन केलं. तर तो म्हणाला "अजून काम संपलं नाही आहे. या वर्षी ज्यांनी केस नाही केल्या पण त्यांचे पैसे देणे आहे, त्यांचे पैसे देणार."

पूर्ण फिल्मी वाटणाऱ्या स्टोरीचा मी साक्षीदार आहे. संजयला मी त्याच्या धैर्याबद्दल, मित्राला मदत करण्याच्या त्याच्या पॅशन बद्दल मनोमन सॅल्युट केला. शेवटी अख्खं कुटुंब त्याने उध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. 

Saturday, 25 November 2023

 डीएसके असं म्हंटलं की पुणेकरांना धसका बसतो. पण मी ज्या डीएसके यांची ओळख करून देणार आहे ते आहेत साताऱ्याचे दीपक सुधाकर कुलकर्णी. सॉफ्ट स्किल ट्रेनर ही पहिली ओळख आणि त्यातून झालेली मैत्री. मला आठवतं आहे, माझ्या कंपनीत ट्रेनिंग साठी आले आणि नंतर थोड्या वेळासाठी मला भेटायला आले आणि गप्पा दोन एक तास रंगल्या. नंतरच्या काळात मैत्री वृद्धिंगत होत गेली. त्यांनी शासकीय तंत्र विद्यालयात नोकरी पण केली. दोन एक वर्षांपूर्वी  निवृत्त झाले. आम्ही काही प्रोजेक्ट एकत्र करावा असाही प्लॅन झालेला. पण काही कारणामुळे तो नाही झाला. 

२०१९ च्या सुमारास सातारा आकाशवाणीवर सॉफ्ट स्किल या विषयाला धरून त्यांनी लिहिलेले काही भाग प्रसारित झाले. डीएसके ते मला  भाग नियमित पाठवत आणि घरून कंपनीत जाताना मी ही ते ऐकत असे. ते ऐकताना कधी हलके हसू यायचं तर कधी अंतर्मुख व्हायचो. त्याच प्रसारित झालेल्या भागांचं डीएसके यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केलं "हटके सोचो". 

जी भाषा आकाशवाणीवर प्रसारणसाठी वापरली त्याच भाषेत पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्यामुळे ते फार शब्दजंजाळ न होता सोप्या भाषेत उतरलं आहे. पुस्तकाचा खरा वाचकवर्ग हा मराठी तरुण आहे. शेतीचा कौटुंबिक व्यवसाय सोडून मुलं शहरात नोकरीची कास धरायला येतात आणि इथल्या वातावरणाने बुजून जातात. या नवीन वातावरणात जुळवून घेण्यासाठी काय करायला हवं हे डीएसके यांनी सहजपणे सांगितलं आहे. एक गाव...एक गणपती सारखी स्फोटक वाक्य आहेत पण त्याचा फार वाद होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकात पेरली आहेत. सॉफ्ट स्किल्स हा पुस्तकाचा गाभा असला तरी ते नागरिकशास्त्राचं पुस्तक झालं आहे आणि त्याची एकुणात आपल्या सगळ्यांना किती गरज आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. 

"हटके सोचो" या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच श्री अच्युत गोडबोले आणि श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पार पडलं.

पुस्तक सगळ्यांनी वाचावं असंच झालं आहे पण छोट्या गावातून शहरात येऊन करिअर चालू करणाऱ्या युवा वर्गाने आवर्जून वाचावं. ते वाचल्यावर ते लेखकाबद्दल "डीएसके, मनातलं दडपण नाहीसं करणारा माणूस" असं म्हणतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

काल उल्लेख केलेलं कांचन दीक्षित यांचं "टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट" आणि कुलकर्णी यांचं "हटके सोचो" या दोन्ही पुस्तकांचे विषय आवडते. त्या दोन्ही प्रकाशनवेळी लेखक द्वयींनी आणि प्रकाशकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आनंद वाटतो. 

Wednesday, 25 October 2023

मध्ये माझ्या कंपनीत एक गेस्ट आले होते. कंपनीत राउंड घेताना मी त्यांना म्हणालो "माझ्या समोर आमच्या क्षेत्रातील कितीही लोक असू द्या, त्यांच्या प्रत्येक स्पिंडल रिपेयर या विषयातील प्रत्येक टेक्निकल क्वेरीचं माझ्याकडे उत्तर आहे." त्यांनी फार कौतुकाने माझ्यावर लिंक्ड इन वर पोस्ट लिहिली. ती वाचल्यावर माझा एक मित्र म्हणाला "तुझा हा तुला फाजील आत्मविश्वास वाटत नाही आहे का?". 

प्रथमदर्शी तसं वाटतं खरं, पण माझ्या त्या स्टेटमेंट मागे दोन दशकांची पार्श्वभूमी आहे. अन त्या वीस वर्षातील अनेक अपयशाच्या कहाण्या आहेत. झालं असं की ज्या व्यवसायात आम्ही आहोत त्याचं बाळकडू आम्हाला नोकरीच्या ठिकाणी मिळालं तरी ते नॉलेज वापरून मी आणि माझ्या पार्टनर ते बाकी स्पिंडल प्रकारात अप्लाय केलं. ते करताना आम्हाला कुणी गाईड नव्हता ना कुणी ट्रेनर. ज्या मध्ये आमची कंपनी सध्या लीडर म्हणून गणली जाते त्या स्पिंडल बद्दल आम्हाला काडीची माहिती नव्हती. (एसकेएफ मधील स्पिंडल अगदीच वेगळे होते). त्यातील प्रत्येक एलिमेंट आम्ही समजून घेतला. खूप जास्त तांत्रिक होईल म्हणून डिटेल मध्ये लिहीत नाही, पण स्पिंडल दुरुस्ती करताना मूलभूत दुरूस्तीशिवाय काही बाय डिफ़ॉल्ट पूरक गोष्टी कराव्याच लागतात हेच आमच्या गावी नव्हतं. कधी ते आम्ही स्वतः अभ्यास करून तर काही वेळा कस्टमरच्या स्पिंडल वर प्रयोग करत शिकलो. जेव्हा कस्टमरच्या स्पिंडल वर प्रयोग केले, तेव्हा चुका झाल्या आणि बेफाम झाल्या. त्याबद्दल कस्टमरच्या मजबूत शिव्या पण खाल्ल्या. काही चुकांमुळे रात्री जागवल्या. झोपच यायची नाही. 

एका कस्टमर ने मला स्पिंडल दुरुस्ती साठी बोलावलं. ज्या प्रकारचा स्पिंडल होता तो त्याआधी मी आयुष्यात बघितला नव्हता. मी हुशाऱ्या मारत कस्टमर ला म्हणालो "अहो, असं कधी होत नाही स्पिंडल मध्ये. काही तरी मोठी गडबड केली तुम्ही काम करताना." त्या मेन्टनन्स मॅनेजर ने मला सांगितलं "बाळा, घरी जा आणि थोडा अभ्यास कर. मग कॉल ला ये." मी परत आलो. त्या स्पिंडल चा प्रकार इंटरनेट वर अभ्यासला. तो रिपेअर कसा करायचा याची प्रोसेस तयार केली. आज त्या प्रकारचे स्पिंडल भारतात आम्ही सगळ्यात जास्त रिपेअर करतो. 

२०१७ साली आम्ही स्पिंडल उत्पादन क्षेत्रात शिरलो. उत्पादन आणि दुरुस्ती या प्रोसेस मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या विभागात सुद्धा कुणी आम्हाला गोष्टी रेडी प्लेट मध्ये दिल्या नाही. खूप प्रॉब्लेम्स आले, किंबहुना अजूनही येत आहेत. पण शिकत जातोय. दोन चार वर्षानंतर मला खात्री आहे, आता काही फसलेल्या प्रयोगातून आम्ही तावून सुलाखून बाहेर पडलो असेल आणि सिकंदर बनलो असू. 

आणि हे बिझिनेस प्रोसेस बद्दल सुद्धा तितकंच खरं आहे. गेले दोन दशकं टक्के टोणपे खात, कुणाकडून फसवले जात, कुणाकडून शिव्या खात इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. 

तेव्हा मित्रा, माझा शर्ट जरी बाहेरून परीटघडीचा दिसत असला तरी त्याच्या आतल्या बाजूला खूप काटे आहेत आणि माझं शरीर त्यामुळे रक्ताळलेलं आहे.  अनुभव असे आहेत की ते गोठलं आहे म्हणून ते रक्त तुला दिसत नाही आहे....इतकंच