Friday, 31 October 2014

का?

ऐकीव माहिती आहे, म्हणे अॅमस्टरडॅम मधे सायकलचं खुप वेड. पण मग सायकलीच्या चोर्या होऊ लागल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढं सायकलची किंमत ती काय. पण पोलिस तक्रारी वाढल्या. भांडणं वाढली. शासनानं गंमत केली. मुख्य चौंकात ४-५ हजार सायकली ठेवून दिल्या. लोकांना सांगितलं, काय वापरायच्या ते वापरा. आणून परत ठेवून द्या. सायकल चोरीचं प्रमाण कमी झालं.

आमच्या SKF मधे तीन ची Allen key कमी. छोटी असल्यामुळे हरवायची. मग लोकं एकमेकांची ढापायचे. ज्याच्याकडं नसायची त्याचं काम delay व्हायचं. आम्ही एक काम केलं ३ च्या १०० Allen keys आणून ठेवल्या open box मधे. लोकांना सांगितलं, वापरा पण परत आणून ठेवा. १०-१५ गेल्या, पण परत ३ च्या Allen key साठी काम अडलं नाही.

आपल्याला कमी वाढतो की काय, किंवा परत वाढायला येईल की नाही, या भितीपोटी लोकं जास्त वाढून घेत असावेत. अन्न वाया जाऊ लागलं. त्यातूनच buffet जेवणाची पद्धत आली असावी. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. अन्न कमी वाया जाऊ लागलं असेल.

अमेरिकेत बर्याच ठिकाणी कोक किंवा coffee चं refill फुकट मिळतं. मग असं होतं का हो, फुकट मिळतं तर लाईन लागली आहे.

काय असेल बरं मानसिकता. कुठं थांबायचं हे काही बाबतीत कळतं, पण काही बाबतीत नाही.

म्हणजे एका जन्मात पुरेल इतके पैसे कमावल्यावरही, माणसाला पैसे कमावण्यासाठी का काम करावं वाटतं? का पुढच्या पिढीच्या भविष्याची तरतूद करून ठेवावी वाटते? त्याचा त्याच्या मुलामुलींच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो का?

किंवा दारू फुकट मिळाली तर पार उलट्या होईपर्यंत, फालतूची बडबड करेपर्यंत माणूस का पितो? त्याला असं वाटतं का की परत ही वेळ आपल्या आयुष्यात येणार नाही म्हणून.

त्या ५-६ वर्षाच्या मुलींवर अत्याचार करताना कुठे या लोकांची बुद्धी शेण खायला जाते?

धड धाकट अशा तीन तीन लोकांची हत्या करताना यांचे हात थरथरून थांबत का नाहीत?

का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

फेसबुकवर चौफेर वाचन करत असल्यामुळे मला राजकारण्याचंही एक गुप्त अंग (शब्द जोडून वाचून नये) आहे असा एक फील येऊ लागला आहे. माझ्या राजकीय विश्लेषणाची (ख्या ख्या, असं कोण हसतय रे) दखल कुणी घ्यावी असंही नाही, पण त्यातून डावी विचारसरणी प्रतिध्वनित होते असं माझं मन सांगत होतं. (माझ्या राजकीय विचारांची माझ्याशिवाय दुसरा कुणी कुत्राही दखल घेणार नाही हे माहित आहे. आता या वाक्यात मी स्वत:ला कुत्रा म्हणवलं असा कुणी जावईशोध लावला तर माझा नाईलाज आहे.) फेसबुकवर येईपर्यंत, माणूस एक तर सरळ किंवा वाकड्या विचारसरणीचा असतो एवढंच माहित होतं. ही डावी अन उजवी विचारसरणी म्हणजे वेगळंच झेंगट. असो.

तर आपणच तयार केलेल्या भाजप विरोधक या प्रतिमेला जागणं तर भाग होतं. ते बजावत मी कालपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या पोस्ट वाचत होतो. पेपर पण अख्खा चाळून काढला. आजचा लोकसत्ता (मला काही कळत नाही, पण काही लोक याला संघसत्ता संबोंधतात. इथं बोंबलायला मला तरूण भारत संघाचं आणि लोकमत/सकाळ काॅंग्रेसचा वाटत नाही तर बाकीच्यांची काय कथा), मग मटा, पुढारी, संध्यानंद सगळे पेपर पिंजून काढले. पेपर मधे तर नाहीच नाही, पण फेसबुकवरच्या पोस्टमधेही कुठे टिंगल टवाळी नाही. पार विश्वंभर चौधरीपासून ते माझा आवडता मित्र निर्भय पर्यंत सगळ्यांनी स्तुतीच केली राव. माझी पंचाईतच झाली. म्हंटलं आपल्याला काही सुचत नाही तर कुणाला तरी अनुमोदन द्यावं. पण नाहीच. नाही म्हणायला काही माझ्या सेन्सिबल मित्रांनी ते ब्राह्मण किंवा संघाचे म्हणून, पेशवाई आली वैगेरे अशी गरळ ओकली, पण आपल्या काय पल्ले नाही पडली. त्यामुळे असल्या फडतूस पोस्टच्या मी वार्यालाही उभा नाही राहिलो.

आता काय विधीमंडळ नेते झालेच आहेत. मुख्यमंत्री होतीलच. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

लेन्स आणून ठेवली आहे. घासून पुसून साफ करून ठेवतो, आणि बघतो कुठं काही चुकतंय का साहेबांचं. आणि मग हाणायचं काहीतरी तिरकं. तेव्हढेच आपली प्रतिमा जपल्याचं समाधान. नाही का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा


Tuesday, 28 October 2014

Bargaining

दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबादला गेलो होतो. तिथे नवरंगपुरा मार्केटमधे गेलो होतो. म्हंटलं मुलासाठी ड्रेस घ्यावा. त्यावेळी कुठल्याही गावाला गेलो की आई सांगायची, घरातल्या लोकांसाठी आणत जा काहीतरी. त्याआधी दोन वर्षापूर्वी बायकोला बंगलोर हून रु १६०० ची साडी आणली होती. तेव्हापासून या प्रकारातला माझा interest तसा कमीच झाला होता. आता तर कुठं गेलो आणि कुणी गिफ्ट वैगेरे दिलं तर घेऊन येतो. नाहीतर तसाच. (भेटलो तर लक्षात ठेवा)

तर काय सांगत होतो, गेलो दुकानात. आणि बोललो दाखवा ड्रेस. किमती चालू झाल्या २००, २५०, ३००. मला एक ड्रेस फारच आवडला. पण किंमत रु ३५०. दुकानदाराला म्हणालो "थोडा कम करो ना". नंतरचं संभाषण तो गुजरातीत आणि मी हिंदीत (इथे मराठीत) चालू झालं. गुजराती लोकांचं हे एक वैशिष्ट्य, समोरचा तमिळ मध्ये बोलत असला तरी हे गुजरातीत, मग माझ्यासारख्या मराठी बाणाची काय कथा. उगाच नाही वेस्टर्न लाईन चा भैया  पण गुजराती बोलत. 

दु:  तू सांग 
मी: २०० ला दया
दु:  नाही परवडत.
मी: बरं ठीक आहे, २२५ ला दया
दु: नाही जमणार
मी: तू सांग
दु: ३००
मी: थोडे कमी करा कि
दु: नाही जमणार. ३०० च्या खाली एक रुपया नाही.

तो अशा टेचात म्हणाला कि माझाही मराठा बाणा जागा झाला. मी बोललो "राहू दे मग. जातो मी" तो म्हणाला " जेवढयात मिळतं घ्या, नंतर पस्तावाल." मी बोललो "अरे जा, तू काय एकटाच आहे का मार्केट मध्ये. शोधेन मी" आणि तडक निघालो. दीड तास मार्केट पालथं घातलं, पण तसा ड्रेस काय मिळाला नाही. परत गेलो त्या दुकानात आणि म्हणालो "दया तो ड्रेस"

दु: हे घ्या
मी: ३०० ना
दु: नाही आता ३५० लाच.
मी: अहो असं काय, मगाशी ३०० म्हणालात ना
दु: मग तेव्हा का नाही घेतला. आता भाव ३५०.
मी: अहो असं काय करता, दया  ना  हो प्लीज ३०० ला.
एव्हाना त्याचा साथीदार आला.
दु: एकदा बोललो ना आता ३५० म्हणजे ३५०. त्याच्या खाली एक पैसा नाही. पाहिजे असेल तर घ्या नाही तर बघा.
मी: (काकुळतीने) अहो द्या ना ३०० ला, मुलगा खुश होईल, बायको ओवाळेल मला.
दुकानदार साथीदाराकडे बघतो. साथीदार दरवाज्यापाशी जाऊन उभा राहतो, दरवाजा उघडतो, "आता निघा" असं नजरेतूनच बोलतो. माझ्या मनात विचार आला, साला जेवढयाला मिळत होता ड्रेस, घेतला असता तर बरं झालं असतं. उगाचच नाटकं केली. मन कुरतडत बसलो.

उद्धव ठाकरेंच्या मनात काय चालू आहे याची कल्पना आहे मला.

दोन गोष्टी:

- तो ड्रेस शेवटी घेतला कि नाही हे दोन दिवसात सांगतो.
- तुमच्या मनात आलं असेल कि तो दुकानदार पण दाढीवाला अन ५६ इंच छातीवाला आणि साथीदार दाढीवाला अन डोक्यावर टक्कल असलेला होता का? तर उत्तर आहे, नाही.  इतके पण योगायोग नसतात घडत आयुष्यात.

Saturday, 25 October 2014

करद्यातली सकाळ

करद्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा. सकाळची सहाची रम्य वेळ. त्या किनारी कुणीच नाही. पायाला गुदगुल्या करणार्या वाळूतून एकटाच चालत असणारा मी. लाटा किनार्यावर विसर्जित झाल्यावर परत जाताना झालेली वाळूची मोहक नक्षी. अचानक मला त्या खळाळणार्या समुद्राच्या किनार्यावर दिसलेले असंख्य पक्षी. काही उडणारे, काही नितळ पाण्यात खाद्य शोधणारे, तर काही नुसतेच बसलेले.

मला वाटलं अशा रम्य वेळी मी एकटाच का. मला वाटलं माझ्याबरोबर असायला पाहिजे...................,माझ्याबरोबर असायला पाहिजे.......................गणेश बागल

कसलं कद्रू डोकं दिलं आहे मला. अशावेळी स्वत:च्या बायकोबरोबर चालण्याचा विचार करायचा सोडून, गणेश. छ्या. "आपल्याला हव्या ते वेळी हव्या त्या व्यक्तिची आठवण न येणे म्हणजे नरक." वपु

(खरंतर हे भंगार वाक्य माझंच आहे. याला आपण वपुंचं मरणोत्तर साहित्य म्हणू यात फारतर. सध्या पुलंची प्रार्थना जोरात फिरत आहे. वपुंवर का अन्याय)

कुठल्याही बीच रिसोर्ट ला किंवा कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीबरोबर मी टूर वर गेलो की "स्वत:च्या" हे आवर्जून लिहावं लागतं यावर माझे समस्त पुरूषमित्र सहमत असावेत. बाकी दोन गोष्टी पहायला मला अशा ठिकाणी मला बिलकुल आवडत नाही, एक म्हणजे माझे सुटलेले पोट व एकंदरच अस्ताव्यस्त पसरलेलं शरीर आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या व्यक्तिमत्वाला न शोभणार्या अन त्याला व्यवस्थित carry न करू शकणार्या ३/४th घातलेल्या बायका. हो म्हणजे, स्वत:च्या सोडून दुसर्या बायकांबरोबर चालण्याच्या विचार करण्याच्या पापापासून मला जर कुणी वाचवत असेल तर हा 3/4th युक्त ड्रेसिंग सेन्स. आणि या एका कारणासाठी कुणाची नज़र लागू नये म्हणून मी माझ्या बायकोला ही ती घालण्यास उद्युक्त करतो. Men will be men. पण ३/४th या पाश्चात्य वेशभूषेबद्दलचा मनातला आकस समस्त पुरूषवर्गाने कमी करायला हवा. त्याचं असं झालं की मी व मंडळी मुरूडगावात देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो, तर तिथे पाटी "प्रवेश हिंदू पद्धतीने पोशाख केलेल्यांना" मला वाटलं मंडळीला बाहेर उभं रहायला सांगतात की काय! तर पुजारीने काही अडवलं नाही बुवा. यावरून मी तीन inferences काढले

- ३/४th हा आता हिंदु पोशाख म्हणून मान्य व्हावा (हे मोहन भागवतांसाठी) बाकी ३/४th च्या 1/4th होतील तेव्हा डोळे उघडतील, असंही  काही लोकं म्हणतील. पण एकच सांगू इच्छितो. जर्मनीला चर्च मधे गेलो होतो. मी अन रियाज. म्हणजे एक हिंदू अन एक मुसलमान, ख्रिश्चन देवालयात. मुख्य म्हणजे चर्च मधे एकही उघड़ी नागडी स्त्री दिसली नाही. मला म्हणायचं हे की कुठे कसे कपडे घालायचं याचा sense असतो बायकांना
- हिंदु पद्धतीने पोशाख, म्हणजे पोशाख असावा आतमधे माणूस पाहिजे. बरीच प्रगती म्हणायची की. (हे शंकराचार्यांसाठी. तुम्ही किती समाजाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरतोय) काही वर्षात जाईल ती पाटीही.
- पुर्वी एका पेक्षा अधिक बायका असाव्यात म्हणून ओळख करून देताना "या आमच्या मंडळी" असं म्हणत असावेत. मी आपलं सहज मंडळी म्हणून लिहून बघितलं. लिहीतानाच हडबडलो.

खरं म्हणजे पुरावा म्हणून दोन चार फोटो मोबाईलमधून उडवले पण आहेत मी. (या वाक्याचा अर्थ डिलीट केले असा वाटत असेल, पण तो फ्लॅश उडवला म्हणजे फोटो काढला या धर्तीवर घ्यावा. १९६८ ला जन्मलेल्या माणसाने नवीन technology adapt केली तरी त्याची बुद्धी जुनाटच आहे याचं हे एक उत्तम उदाहरण), पण ते इतके गचाळ आहेत की माझी ते पोस्ट करण्याची daring नाही झाली. गणेशचं नाव ज्या फ्रेम मधे आहे तिथे माझं फोटो, ते पण पक्ष्यांचे, लावणं म्हणजे पंडितजींच्या समोर एखाद्या बाथरूम सिंगरने "इंद्रायणी काठी" म्हणण्याचं धाडस करण्यासारखं आहे. (उपमा चुकली का? पंडितजी म्हणजे  जरा जास्तच झालं नाही का. बरं मग आनंद भाटे, नाहीतर जयतीर्थ मेवूंडी, नाहीतर राहूल  देशपांडे, नाहीतर.......... बास पेपर मधे वाचून शास्त्रीय गायकांपैकी ही तीनच नावं आठवत आहेत) 


असो. तर गणेश, या पोस्टमधे मी तुझी खुपंच स्तुति केली आहे. माझा एक दोन दिवसात तुला जर फोन आला तर काही तरी assignment साठी केला असं काही वाटू देउ नको ही लै म्हणजे लैच नम्र विनंती. फोनला उत्तर द्यावे.

Sent from my iPad

Wednesday, 22 October 2014

ISRO हवाल आणि हाल

परवा परत आले होते  ISRO चे scientist. मग परत ते मंगलयानाचं टॅक्सी पेक्षा कमी चार्ज वैगेरे झालं. हसलो परत. त्यांनी काही भारी गोष्टी सांगितल्या अजून. एक तर यानाच्या velocity मधे पूर्ण प्रवासात जर कधीही 0.1 m/sec इतका जरी फरक पडला असता तरी यान भलतीकडेच भरकटलं असतं. यानाने पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण कक्षेत ७ फेर्या मारल्या. हेच काहीतरी पुढच्या प्रवासासाठी इंधन होतं. (हे काही कळलं नाही, पण असंच काहीतरी म्हंटले बुवा). पृथ्वीच्या कक्षेतून, मंगळाच्या कक्षेत जाताना अशी वेळ निवडली होती जेव्हा दोन ग्रहात कमीत कमी अंतर होतं. पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर एक मेसेज जायला एका बाजूने १२ मिनीट लागतो. म्हणजे एखादा fault जर आला तर तो solve झाला की नाही याला २४ मिनीटे लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी plan B तयार होता. पण यानाच्या संपूर्ण प्रवासात कुठलाही plan B वापरावा लागला नाही. ज्या वेळेला पाहिला मेसेज येणं expected होतं, तो येण्यात एक सेकंदाचाही फरक पडला नाही.

आले त्याच दिवशी IRS हा communication satellite पाठवला होता. सिरीजमधला दुसरा. सात पाठवायचे आहेत. ते झालं की अख्खा भारत GPRS साठी कव्हर होईल. अमेरिकेची गरज पडणार नाही.

काही दिवसांपूर्वी कॅनडा, Switzerland, Germany, France या प्रगत चार देशांचे एकूण ५ satellite आपण एकाच launcher ने ठेवून आलो orbit मधे.

३०० बिलीयन डाॅलरची बाजारपेठ ही मंगलयानामुळे नसून क्रायोजेनिक इंजिन बनवण्याच्या सफलतेमुळे आणि वरच्या दोन business avenue मुळे आहे.

Cheers. मजाच आली हे सगळं ऐकताना. तुम्हाला पण ना!

I am proud of ISRO.

********************************************************************************

आता हे पण वाचा.

- या scientist ना (म्हणजे जे माझ्याकडे आले होते) दिवसाला हाॅटेलमधे राहण्याचे रू ५५० मिळतात.

- यांना पूर्ण दिवसाच्या जेवणाखाण्याचे रू १५० मिळतात.

- यांना कामासाठी दिवसभराच्या फिरण्याचे फक्त रू १५० मिळतात.

- माझ्याकडे inspection आले तेव्हा रेल्वे नी आले. त्याचेही tatkal मधे तिकीट काढलं तर त्यांचे पैसे मिळत नाही. आज काल premium train चं तिकीट ४ ते ५ हजार असतं. ते काढलं तरी पैसे regular तिकीटाचे मिळतात.

शप्पथ, या मंडळींना जर private sector सारख्या facilities दिल्या ना, आकाशगंगेतला एकही ग्रह सोडणार नाहीत.

जे झालं ते झालं, नवीन सरकारने या बाबींकडे लक्ष द्यावं ही अंतरिक इच्छा.

(वरची सगळी गप्पा मारण्यातून आलेली माहिती आहे. पुरावा मागू नये. बाकी govt undertaking च्या लोकांच्या हालाचे क़िस्से आहेत, ते नंतर. एक आठवलं, विमानप्रवास फक्त Air India ने म्हणे. आता काय बोलायचं कप्पाळ)

Tuesday, 21 October 2014

ते आणि आपण

बऱ्याचदा मी परदेशातले अनुभव लिहितो. तुम्हाला वाटेल हा फारच स्वत:ची लाल करतो, आणि तिकडे काय भारी असतं असं लिहून आम्हाला शहाणपणा शिकवतो. पण जे आहे ते आहे. एका बाबतीत मात्र आपण भारतीय समस्त जगाला मात देऊ शकू आणि ती गोष्ट म्हणजे "दिलदारपणा". आणि त्यातल्या त्यात मी जेव्हा आपल्याला जर्मनी या अत्यंत प्रगत अन गुणवत्तेचा मापदंड असलेल्या देशातील लोकांबरोबर compare करतो, तेव्हा मला आपली लोकं फारच भारी वाटतात.

माझे जर्मनीत ६-७ सप्लायर आहेत. त्यापैकी एक मायकेल फ्रीटाग. महिन्याला मी त्याच्याकडून १००० एक युरोचं मटेरियल घ्यायचो. (साधारण लाखभर रुपये). पैसे आधी रेमिट करायचे. दरवेळेला. मग हा बाबुराव मटेरियल पाठवणार. बँक पैसे रेमिट करायला २५ युरो चार्ज करते, अर्थात माझ्या कंपनीवर. एकदा order दिली होती, ३०० युरोची. बँके नि पैसे रेमिट करताना चुकून २५ युरो त्याला चार्ज केले. थोडक्यात त्याला २७५ युरो मिळाले. तर म्हणाला "आधी २५ युरो पाठव. मग मटेरियल पाठवतो" मी बोललो "बंडू, तुझ्याकडून मी दर महिन्याला माल उचलतो. पुढच्या order मध्ये २५ युरो जास्त टाकतो". तर म्हणाला "नाही, तू नाही दिलेस पैसे तर" आहे कि नाही बिनडोक. शेवटी माझा भाऊ आहे अमोल. तो असतो जर्मनीत.  त्याला सांगितलं, टाक त्या मायकेलच्या बोडक्यावर २५ युरो. तेव्हा कुठं त्यानं मटेरियल पाठवलं. (आता तुम्ही विचार कराल, कि बँकेला का नाही सांगितलं. तर आपली सिस्टम आहे. विनाकारण आपण परदेशात पैसे नाही पाठवू शकत)

आतासुद्धा होतो जर्मनीत ट्रेनिंग ला. त्या  चं authorisation आहे आम्हाला. तरी आम्हाला म्हणे ट्रेनिंग चे दिवसाला १००० युरो पडतील. मी म्हणालो "तात्या, तुझेच स्पिंडल आम्ही रिपेयर करणार. भारतात तुझं सर्विस सेंटर आहे म्हंटल्यावर तुझाच बिझिनेस वाढेल ना. तरीही आम्हालाच बांबू लावणार" तर म्हणाला "माझा एक ट्रेनर ४ दिवस तुमच्यात बिझी राहणार" मी बोललो "अरे, आम्ही दोन माणसं तिथं येणार. दोघांचे १ लाख रु, हॉटेल आणि इतर खर्च ५०००० रु. आम्ही इतक्या ची वाट लावतो, तू थोडा खर्च कर ना" कसाबसा बाबा तयार झाला.

rigid तर इतके आहेत कि ज्याचं नाव ते. यांच्याकडून चूक म्हणजे होतंच नाही कधी अशी शायनिंग. अरे काय आकाशातून पडले का तुम्ही. नाव नाही लिहित, पण क्वालिटी भंगार म्हणून, एजन्सी सोडून दिली त्यांची. आताची गोष्ट. ज्या कंपनीत गेलो होतो त्याने ३ spare part  पाठवले होते. आम्ही सांगत होतो, त्यात प्रोब्लेम आहे म्हणून. तर नाहीच. जर्मनीला गेल्यावर कळलं कि त्यांची चूक होती म्हणून. तर म्हणतो कसा "मला चेक करावं लागेल तू order बरोबर दिलीस का ते" आहे कि नाही अतिशहाणा.

ऱ्हाईन नदी अख्ख्या जर्मनी तून १२ महिने दुथडी भरून वाहत असते. अमाप पाणी. तरी हॉटेल मध्ये फुकट पाणी दिलं तर शप्पथ. रूम वर पण ३.३० युरो ला ५०० ml ची बाटली ठेवली असते रुबाबात. (३०० रु). जेवायला गेलो कि विचारणार "what would you like to drink?" पाण्याचा, कोल्ड ड्रिंक चा आणि बियर चा रेट सेम. कशाला बोंबलायला लोकं पाणी पितील.

स्वच्छतेचं लय कौतुक इथल्या लोकांचं.  दांडू दाखवून लोकांना सवयी लावल्यात. Given a chance, आपल्यापेक्षा घाण करतील. ऑक्टोबर फेस्ट ऐकलं असेल ना तुम्ही. अरारा, बियर पिउन काय राडा करतात. उलटया करणे, बाटल्या फोडणे सगळे प्रकार चालतात. एकच नशीब, शहरभर राडा करत नाहीत तर एका मैदानात घालतात गोंधळ. समोरच्या बाकावर पाय ठेवून बसणं अगदी सर्रास चालतं ट्रेन मध्ये.

घर भाडयाने देतात, पण deposit परत देताना पार वाट लावतात.

तेव्हा एकच सांगतो मित्रानो, मोठं मन आपल्या लोकांचं. प्रगती झाली असेल त्यांची, पण कद्रू आहेत  लेकाचे.

आपलं मन आहे तसं ठेवून, काही गोष्टी थोडया सुधरवल्या ना, येड लावू आपण जगाला.

I love my India

ते आणि आपण




Saturday, 18 October 2014

आजी अन तिचे नातू

२०११ च्या जुलैला मी केसरीबरोबर अमेरिकेची ट्रीप केली.   My fair lady. सगळ्या बायका, साधारण माझ्याच वयाच्या. काहीतरी ८० च्या पण. पहिल्या दिवशीच आमची घट्ट मैत्री झाली. दुसर्या दिवसापासून गप्पांच्या मैफिली सजू लागल्या. बर्याच जणी नोकरी करणार्या, काही उद्योजिका तर काहींना रीतसर पेंशनर. मला विचारलं "तुम्ही काय करता?" मी तर आयुष्यभर चुल अन मुल केलं. ह्यांची आई ते चार वर्षाचे असताना गेली, घरात बाईमाणूस नाही. मग मीच ओढ़ला गाड़ा. "पण, मग आता काय करता?" "आता, मी नातवांमधे रमते, गेली कित्येक वर्षं." माझ्या तोंडून चटकन निघून गेलं. मग त्यांचं चालू झालं "सरळ पाळणाघरात ठेवायचं वैगेरे, वैगेरे". मला तर ते काही पटलं नाही. पैश्यांचं सोडा हो, पण आजीचे प्रेम, त्यांना आवडेल ते खाऊ घालणे, वेळेवर दुध देणे ही कामं माझ्याव्यतिरिक्त दुसरं कुणी व्यवस्थित करू शकेल यावरच मुळी माझा विश्वास नव्हता.

नातवंडं जेव्हा मांडीवरून रांगायला अन मग हळूहळू पाऊल टाकायला लागतात तेव्हा आजीबाई ला होणारा आनंद शब्दात नाही सांगता येणार. मुले वर्षात कशी मोठी होतात ते कळतच नाही. त्यांचे बोबडे बोलणे, आई बाबा आॅफीसला निघाल्यावर निरागसपणे टाटा करणे (त्या छोट्यांच्या मनात काय घालमेल चालू असेल याचा विचार केला तर आपल्यालाच थोड़े वाईट वाटते).

अरे हो, एक सांगायचंच राहिलं, माझी मोठी सुन, वैभवी, डाॅक्टर, तिची स्वत:ची पॅथ लॅब अन धाकटी अर्चना, इलेक्ट्रानिक इंजिनियर, MSEB त.

तर सांगत होते, की मोठा नातू यश, ३ वर्षाचा झाला, चुरचुर गोड़ बोलू लागला. (आता वय १९. आता जणू त्याचं बोलणंच आटलंय). एकदा त्यांच्या आईला घरी यायला उशीर झाला. तेव्हा म्हणाला, "आजी, आता माझी मम्मी येईपर्यंत तुच माझी मम्मी. आणि मग ती आल्यावर तु परत आजी. चालेल?" तो इतका निरागसपणे म्हणाला की मला अतीव समाधान वाटले. त्या रात्री माझ्या वजनात २ पौंडाची भर पडली. या अशाच सतत भर पडण्यामुळे मी जाड झाली आहे. (कसलं भारी कारण).

दुसरा नातू, अभिषेक, जन्मत:चं एकदम गुटगुटीत. त्याची आई संध्याकाळी साडेसहाला घरी यायची. तोपर्यंत आम्ही तयार होऊन खाली फिरायचो. आजूबाजुच्या बायका म्हणत "आजीला नातू शोभतो" माझे ताबडतोब उत्तर "आजीला दृष्ट नाही लागणार, पण माझ्या गोड़ नातवाला लागेल." त्याच्या काकाने प्रथमच कार घेतली. त्या रंगाची कार दिसली, की "चल त्या कारमधे जाऊ या" म्हणून तिथेच अडायचा. आता दहावीचा आहे तो. अभ्यासात मग्न आहे.

यश ९ वर्षाचा झाल्यावर मला तिसरा नातू झाला. खरंतर मला मुलगी नाही, आणि पहिले दोन नातू. मला वाटलं की आता नात होणार. पण झाला तो नील, अतिशय गोड. हे मुलं खेळतच मोठं झालं. त्याचं अंगाखांद्यावर खेळणं, त्याच्या बरोबर हाॅलमधे खेळणं ही म्हणजे माझ्यासाठी करमणूक. सारखी बडबड, आणि बरीच लाॅजिकलही. आता तो दहा वर्षाचा आहे, पण घरात तो चालतो म्हणजे फ़ुटबॉल बरोबर पळतो.

ह्या तीन नातवंडांच्या सहवासात मला tv चे वेड लागले नाही (मी अजिबात tv बघत नाही). त्यांच्या सहवासात कसा वेळ गेला हे कळलंही नाही अन अजून कळतही नाही. कधीकाळी नोकरी केली नाही याची खंत वाटायची, आता तीही वाटत नाही. आजही राजेश अाणि यशने ठरवलं की दोघांचं दररोजचं ३८ किमी फिरणं कमी होण्यासाठी नांदेड सिटीत छोट्या फ्लॅटमधे रहायचं. पाळणाघरासारखी परत माझ्या मनाने उचल खाल्ली अन मी त्यांच्या दिमतीला येऊन राहते आहे. आणि यात मला एक प्रकारचे आत्मिक समाधान लाभते आहे. (नाही म्हणायला नील पासून लांब राहते त्यांची खंत वाटते, पण ठीक आहे)

या पोरांचे आईबाप, पोरांचं जीवन मार्गी लागावं म्हणून हाय वे बांधताहेत. त्यावरून ही पोरंाच्या पायाला चाकं लागून ती भरधाव जातीलही. कुणाच्या पंखात इतके बळ येईन, की ती हवेतून उडतीलही. उडावंही त्यांनी, माझे आशिर्वाद आहेत त्यांना. पण या मोरपंखी आठवणींची साठवण मात्र माझ्याजवळंच राहीन. ती कुपी या आजीच्या पदरात बंदिस्त असेल.

नातूही खुश अन आजीही.............

"घरात असता हासरे तारे, मी पाहू कशाला नभाकडे"

कुमुद मंडलिक