Tuesday, 21 October 2014

ते आणि आपण

बऱ्याचदा मी परदेशातले अनुभव लिहितो. तुम्हाला वाटेल हा फारच स्वत:ची लाल करतो, आणि तिकडे काय भारी असतं असं लिहून आम्हाला शहाणपणा शिकवतो. पण जे आहे ते आहे. एका बाबतीत मात्र आपण भारतीय समस्त जगाला मात देऊ शकू आणि ती गोष्ट म्हणजे "दिलदारपणा". आणि त्यातल्या त्यात मी जेव्हा आपल्याला जर्मनी या अत्यंत प्रगत अन गुणवत्तेचा मापदंड असलेल्या देशातील लोकांबरोबर compare करतो, तेव्हा मला आपली लोकं फारच भारी वाटतात.

माझे जर्मनीत ६-७ सप्लायर आहेत. त्यापैकी एक मायकेल फ्रीटाग. महिन्याला मी त्याच्याकडून १००० एक युरोचं मटेरियल घ्यायचो. (साधारण लाखभर रुपये). पैसे आधी रेमिट करायचे. दरवेळेला. मग हा बाबुराव मटेरियल पाठवणार. बँक पैसे रेमिट करायला २५ युरो चार्ज करते, अर्थात माझ्या कंपनीवर. एकदा order दिली होती, ३०० युरोची. बँके नि पैसे रेमिट करताना चुकून २५ युरो त्याला चार्ज केले. थोडक्यात त्याला २७५ युरो मिळाले. तर म्हणाला "आधी २५ युरो पाठव. मग मटेरियल पाठवतो" मी बोललो "बंडू, तुझ्याकडून मी दर महिन्याला माल उचलतो. पुढच्या order मध्ये २५ युरो जास्त टाकतो". तर म्हणाला "नाही, तू नाही दिलेस पैसे तर" आहे कि नाही बिनडोक. शेवटी माझा भाऊ आहे अमोल. तो असतो जर्मनीत.  त्याला सांगितलं, टाक त्या मायकेलच्या बोडक्यावर २५ युरो. तेव्हा कुठं त्यानं मटेरियल पाठवलं. (आता तुम्ही विचार कराल, कि बँकेला का नाही सांगितलं. तर आपली सिस्टम आहे. विनाकारण आपण परदेशात पैसे नाही पाठवू शकत)

आतासुद्धा होतो जर्मनीत ट्रेनिंग ला. त्या  चं authorisation आहे आम्हाला. तरी आम्हाला म्हणे ट्रेनिंग चे दिवसाला १००० युरो पडतील. मी म्हणालो "तात्या, तुझेच स्पिंडल आम्ही रिपेयर करणार. भारतात तुझं सर्विस सेंटर आहे म्हंटल्यावर तुझाच बिझिनेस वाढेल ना. तरीही आम्हालाच बांबू लावणार" तर म्हणाला "माझा एक ट्रेनर ४ दिवस तुमच्यात बिझी राहणार" मी बोललो "अरे, आम्ही दोन माणसं तिथं येणार. दोघांचे १ लाख रु, हॉटेल आणि इतर खर्च ५०००० रु. आम्ही इतक्या ची वाट लावतो, तू थोडा खर्च कर ना" कसाबसा बाबा तयार झाला.

rigid तर इतके आहेत कि ज्याचं नाव ते. यांच्याकडून चूक म्हणजे होतंच नाही कधी अशी शायनिंग. अरे काय आकाशातून पडले का तुम्ही. नाव नाही लिहित, पण क्वालिटी भंगार म्हणून, एजन्सी सोडून दिली त्यांची. आताची गोष्ट. ज्या कंपनीत गेलो होतो त्याने ३ spare part  पाठवले होते. आम्ही सांगत होतो, त्यात प्रोब्लेम आहे म्हणून. तर नाहीच. जर्मनीला गेल्यावर कळलं कि त्यांची चूक होती म्हणून. तर म्हणतो कसा "मला चेक करावं लागेल तू order बरोबर दिलीस का ते" आहे कि नाही अतिशहाणा.

ऱ्हाईन नदी अख्ख्या जर्मनी तून १२ महिने दुथडी भरून वाहत असते. अमाप पाणी. तरी हॉटेल मध्ये फुकट पाणी दिलं तर शप्पथ. रूम वर पण ३.३० युरो ला ५०० ml ची बाटली ठेवली असते रुबाबात. (३०० रु). जेवायला गेलो कि विचारणार "what would you like to drink?" पाण्याचा, कोल्ड ड्रिंक चा आणि बियर चा रेट सेम. कशाला बोंबलायला लोकं पाणी पितील.

स्वच्छतेचं लय कौतुक इथल्या लोकांचं.  दांडू दाखवून लोकांना सवयी लावल्यात. Given a chance, आपल्यापेक्षा घाण करतील. ऑक्टोबर फेस्ट ऐकलं असेल ना तुम्ही. अरारा, बियर पिउन काय राडा करतात. उलटया करणे, बाटल्या फोडणे सगळे प्रकार चालतात. एकच नशीब, शहरभर राडा करत नाहीत तर एका मैदानात घालतात गोंधळ. समोरच्या बाकावर पाय ठेवून बसणं अगदी सर्रास चालतं ट्रेन मध्ये.

घर भाडयाने देतात, पण deposit परत देताना पार वाट लावतात.

तेव्हा एकच सांगतो मित्रानो, मोठं मन आपल्या लोकांचं. प्रगती झाली असेल त्यांची, पण कद्रू आहेत  लेकाचे.

आपलं मन आहे तसं ठेवून, काही गोष्टी थोडया सुधरवल्या ना, येड लावू आपण जगाला.

I love my India

ते आणि आपण




No comments:

Post a Comment